Author : Sohini Bose

Expert Speak Raisina Debates
Published on Jun 17, 2024 Updated 1 Hours ago

सामायिक सागरी क्षेत्राच्या माध्यमातून द्विपक्षीय संबंध वाढवण्यासाठी बंगालचा उपसागर हा बांगलादेश आणि थायलंडला एक संधी प्रदान करतो. त्यामुळे चट्टोग्राम-रानोंग दळणवळण अत्यंत लाभदायक ठरू शकते.

चट्टोग्राम-रानोंग कनेक्ट: थेट जहाज वाहतूक मार्ग देणार व्यापार वाढवण्याची संधी

बांगलादेश आणि थायलंड हे समुद्रकिनारी वसलेले देश आर्थिक समृद्धीसाठी कार्यक्षम व सुस्थापित बंदरांच्या संपर्कावर अवलंबून आहेत. बांगलादेश हा बंगालच्या उपसागराच्या उत्तरेकडे वसलेला आहे, तर थायलंड अंदमान समुद्राच्या पूर्व किनाऱ्यावर वसलेले आहे. त्यामुळे दोन्ही देशांना आपल्या सामायिक सागरी क्षेत्राच्या माध्यमातून द्विपक्षीय व्यापार वाढवण्याची संधी आहे. बांगलादेशाच्या पंतप्रधान शेख हसीना यांच्या सहा दिवसांच्या थायलंड दौऱ्यादरम्यान या दृष्टीने क्षमता आजमावण्यात आली. या दौऱ्यात उभय देशांमधील नेत्यांमध्ये बांगलादेशातील चट्टोग्राम बंदर आणि थायलंडमधील रानोंग बंदर या दरम्यान थेट सागरी मार्गाची उभारणी करण्यासाठीच्या प्रकल्पासंबंधी प्रामुख्याने चर्चा झाली. उभय देशांमध्ये या प्रकल्पाविषयीचा सामंजस्य करार २०२१ च्या डिसेंबर महिन्यात करण्यात आला होता.

बांगलादेशात आग्नेय दिशेस असलेले चट्टोग्राम बंदर हे देशाचे प्रमुख बंदर आहे. देशाच्या सागरी व्यापाराची ९० टक्के उलाढाल या बंदरामध्ये होते. बांगलादेशाच्या उपसागरातील हे सर्वाधिक व्यग्र असलेले बंदर आहे; तसेच लॉइडच्या जगातील सर्वोत्कृष्ट १०० बंदरांच्या यादीत समावेश असलेले या प्रदेशातील हे एकमेव बंदर आहे. रानोंग बंदर हे अंदमान समुद्राला लागून असलेले एकमेव बंदर आहे. अशा पद्धतीने ते बांगलादेशाच्या उपसागराशी जोडलेले आहे. अन्य बंदरांशी विशेषतः भारतातील अंदमान व निकोबार बेटांशी असलेला संपर्क सुधारण्यासाठी थायलंड रानोंग बंदराचा विकास करीत आहे. बांगलादेशाकडून थायलंडला होणारी निर्यात सध्या सिंगापूर बंदर, मलेशियातील केलांग बंदर आणि श्रीलंकेतील कोलंबो बंदरातून होत असून त्यासाठी दहा दिवसांचा अवधी लागतो. या बंदरांदरम्यान थेट सागरी दळणवळण झाले, तर वाहतुकीचा वेळ तीन दिवसांवर येईल आणि खर्चात सुमारे तीस टक्क्यांची कपात होईल. स्थानिक खासगी कंपन्या या मार्गावरून मोठ्या प्रमाणात माल वाहून नेऊ शकतील आणि सात मीटर उंच असलेली व दहा हजार टनांची क्षमता असलेली किंवा २० फुटाच्या समकक्ष युनिटची क्षमता असलेली पिंपे बसवलेल्या  मालवाहतुकीच्या जहाजातून वाहतूक करू शकतील.

थेट जहाज वाहतुकीचे फायदे

थेट जहाजमार्गामुळे बांगलादेश आणि थायलंड या दोन्ही देशांमधील व्यापार व पर्यटन या क्षेत्रांची प्रगती होऊ शकते. कारण दोन्ही देशांना आपसातील व्यापारी देवाण-घेवाण वाढवण्यावर भर द्यायचा आहे. या बाबतीत पंतप्रधान शेख हसीना यांच्या एप्रिलमधील दौऱ्यात या वर्षी मुक्त व्यापार (फ्री ट्रेड) करारावर सह्या करण्यात आल्या होत्या. या करारावर वाटाघाटी करण्यास औपचारिक सुरुवात करण्यात आली. या करारामुळे द्विपक्षीय व्यापारातील तूट भरून निघू शकते. कारण बांगलादेश थायलंडला जेवढी निर्यात करतो, त्यापेक्षाही अधिक आयात करतो. उदाहरणार्थ, २०२२ मध्ये बांगलादेशाने थायलंडला ८ कोटी ३० लाख डॉलरची निर्यात केली; परंतु आयातीचे मूल्य मात्र एक अब्ज १७ कोटींवर गेले.

थेट जहाजमार्गामुळे बांगलादेश आणि थायलंड या दोन्ही देशांमधील व्यापार व पर्यटन या क्षेत्रांची प्रगती होऊ शकते. कारण दोन्ही देशांना आपसातील व्यापारी देवाण-घेवाण वाढवण्यावर भर द्यायचा आहे. या बाबतीत पंतप्रधान शेख हसीना यांच्या एप्रिलमधील दौऱ्यात या वर्षी मुक्त व्यापार (फ्री ट्रेड) करारावर सह्या करण्यात आल्या होत्या.

या व्यापाराच्या सुविधेसाठी प्रारंभी थेट जहाज मार्गाचा वापर करण्यात येऊ शकतो. मात्र, भविष्यकाळात हा प्रवाशांसाठी खुला होऊ शकतो. यामुळे पर्यटन क्षेत्राला लाभ होऊ शकतो. हे क्षेत्र उभय देशांच्या सहकार्यासाठी महत्त्वपूर्ण मानले जाते. बांगलादेशातून थायलंडमध्ये दर वर्षी मोठ्या संख्येने पर्यटक येतात आणि वैद्यकीय पर्यटनासाठी थायलंडला प्राधान्यही दिले जाते. २०१९ मध्ये बांगलादेशातील एक लाख ४० हजार पर्यटकांनी थायलंडला भेट दिली. त्यांपैकी चार हजार ३०० पर्यटक वैद्यकीय कारणासाठी आले होते. यामुळे थायलंडच्या अर्थव्यवस्थेत सुमारे १८ कोटी २० लाख डॉलरची भर पडली. हे पाहता दोन्ही देश या क्षेत्रातील सहकार्य वाढवण्यास उत्सुक आहेत. पंतप्रधान शेख हसीना यांच्या दौऱ्यात तीन सामंजस्य करार झाले, ते त्याचेच दर्शक आहेत. त्यामधील एक पर्यटनासंबंधी, दुसरा अधिकृत पासपोर्टधारकांच्या व्हिसामधील मुदतवाढीचा आणि तिसरा ग्राहकांच्या बाबतीत सहकार्य व आपसातील साह्य करार. येत्या काळात, बौद्ध स्थळांना पर्यटनाच्या दृष्टीने पुढे आणण्यासाठी संयुक्त उपक्रम हाती घेण्यात येतील.

धोरणात्मक लाभ

व्यापारी आणि नागरिकांमधील संपर्क वाढवण्याव्यतिरिक्त रानोंग व छट्टोग्राम या दरम्यान थेट जहाज वाहतूक सुरू करण्याने उभय देशांना धोरणात्मक लाभही होऊ शकतो. छट्टोग्रामशी बळकट संपर्क प्रस्थापित झाला, तर थायलंडचे नेपाळ, भूतान आणि ईशान्य भारताशी संबंध सुधारण्याची संधी निर्माण होईल. दुसरीकडे, आग्नेय आशियातील देशांशी आपले संबंध दृढ करण्याचा बांगलादेशाचा प्रयत्न आहे. शिवाय ‘मेकाँग-गंगा सहकार्य व्यासपीठा’त सहभागी होण्यासाठी या देशाला थायलंडच्या मदतीची गरज आहे. त्याचप्रमाणे रोहिंग्यांचा प्रश्न सोडवण्यासाठी आग्नेय आशियायी देशांच्या संघटने(आसियान)मध्ये विभागीय भागीदारी दर्जा प्राप्त करण्यासाठीही बांगलादेशाला थायलंडच्या मदतीची आवश्यकता आहे.  

व्यापारी आणि नागरिकांमधील संपर्क वाढवण्याव्यतिरिक्त रानोंग व छट्टोग्राम या दरम्यान थेट जहाज वाहतूक सुरू करण्याने उभय देशांना धोरणात्मक लाभही होऊ शकतो. छट्टोग्रामशी बळकट संपर्क प्रस्थापित झाला, तर थायलंडचे नेपाळ, भूतान आणि ईशान्य भारताशी संबंध सुधारण्याची संधी निर्माण होईल.

याशिवाय, थेट जहाजमार्गामुळे बांगलादेशाला प्रशांत महासागरामध्ये थेट प्रवेश मिळू शकतो. हा प्रवेश थायलंडच्या पंतप्रधानांच्या महत्त्वांकाक्षी ‘लँडब्रिज’ प्रकल्पमार्गाने मिळू शकतो. रानोंग बंदर हा त्याचा महत्त्वाचा भाग आहे. दक्षिण थायलंडमधील क्रा इस्थमसमध्ये एका कालव्याची उभारणी करण्याच्या आधीच्या प्रस्तावाची जागा लँडब्रिज प्रकल्पाने घेतली आहे. या प्रकल्पात अंदमान समुद्राला थायलंडच्या आखाताशी महामार्ग व रेल्वेमार्गांनी जोडण्यासाठी वाहतूक कॉरिडॉर उभारण्याचा समावेश आहे. हा कॉरिडॉर हिंद महासागर आणि प्रशांत महासागर या दरम्यान माल आणि प्रवाशांची वाहतूक करण्याची सुविधा उपलब्ध करून देईल. त्यासाठी मलाका सामुद्रधुनी पार करण्याची गरज राहणार नाही. हा प्रकल्प कार्यान्वित झाला, तर बंगालच्या उपसागरातील व्यापारासह रानोंग व छट्टोग्राम या दरम्यानच्या थेट जहाज वाहतुकीलाही चालना मिळेल. याचे कारण म्हणजे, भारत आणि बांगलादेशात यापूर्वीच ‘किनारी जहाजउद्योग करार’ करण्यात आला आहे. या करारामुळे चट्टोग्राम बंदरातून कोलकाता व चेन्नई बंदरांमध्ये थेट व्यापारी सुविधा निर्माण होऊ शकते; तसेच ‘बिमस्टेक’च्या दळणवळणाच्या मास्टर प्लॅनमध्ये (२०२२) थायलंडचे रानोंग बंदर आणि चेन्नई व कोलंबो बंदरांदरम्यान थेट जहाज वाहतूक प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न होऊ शकतो.

राजनैतिक इशारा

थेट जहाज मार्गाचे अनेक फायदे असले, तरी त्याची अंमलबजावणी करताना बांगलादेश व थायलंड या दोन्ही देशांच्या राजनैतिकदृष्ट्या संवेदनशील विषयांवर विचार होण्याची गरज आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, चट्टोग्राम व रानोंगच्या मध्यभागी असलेल्या राखीनच्या समुद्रकिनारी असलेल्या प्रांतातील पारंपरिक समूह आणि लष्करी गट यांच्यातील संघर्षामुळे म्यानमारमध्ये राजकीय अस्थिरता निर्माण झाली आहे. थेट जहाज मार्गासाठी २०१६ पासून चर्चा सुरू असतानाही या प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यास बराच विलंब होत असल्यास हाच घटक कारणीभूत ठरला आहे. हा मार्ग कार्यान्वित होण्यासाठी राजनैतिकदृष्ट्या विचार करावा लागणार आहे.    

थेट जहाज मार्गाचे अनेक फायदे असले, तरी त्याची अंमलबजावणी करताना बांगलादेश व थायलंड या दोन्ही देशांच्या राजनैतिकदृष्ट्या संवेदनशील विषयांवर विचार होण्याची गरज आहे.

बंगालच्या उपसागराच्या क्षेत्रात चीनच्या हालचालीमुळे दुसरे आव्हान निर्माण झाले आहे. अलीकडील काही वर्षांत बांगलादेशात चीनच्या गुंतवणुकी वाढल्या आहेत आणि मलाका सामुद्रधुनीसंबंधी झालेल्या कोंडीतून चीनची सुटका होण्यासाठी थाय लँडब्रिज प्रकल्प अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. २०२४ च्या फेब्रुवारी महिन्यात चीनमध्ये असलेल्या ‘एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेंस्टमेंट बँके’ने हा प्रकल्प विकसित करण्यासाठी उत्सुकता दर्शवली आहे. चट्टोग्राम बंदर विकसित करण्यासाठी चीनच्या गुंतवणुकीमुळे आणि लँडब्रिज प्रकल्पाच्या उभारणीसाठी चीनकडून होणारे प्रयत्न यांमुळे चट्टोग्राम व रानोंग यांच्यातील थेट जहाज वाहतूक मार्ग हा चीनच्या बेल्ट अँड रोड प्रकल्पाचा महत्त्वाचा घटक बनू शकतो. कारण बांगलादेश आणि थायलंड हे दोन्ही देश बेल्ट अँड रोड प्रकल्पाचे सदस्य आहेत. हे भारत आणि अन्य भारत-प्रशांत क्षेत्रातील देशांसाठी चिंताजनक असेल. कारण या देशांना बंगालच्या उपसागरातील सत्ता समीकरणे जैसे थे ठेवावयाची आहेत. चीनच्या या हालचालींमुळे त्याचा सागरी क्षेत्रातील वावर वाढणार आहे. बांगलादेश आणि थायलंड या दोन्ही देशांचे भारताशी पूर्वीपासूनच मजबूत संबंध आहेत. थेट जहाज वाहतूक मार्गाच्या स्थापनेसाठी प्रयत्न केले जात असल्याने या देशांमधील राजनैतिक बळाचीही चाचणी घेतली जाईल.

असे असले, तरी बांगलादेशाला आपल्या सर्वांत कमी विकसित देश या दर्जातून सन २०२६ पर्यंत बाहेर पडण्यासाठी अधिक आर्थिक प्रगतीची गरज आहे. २०३१ पर्यंत मध्यम उत्पन्न असलेल्या देशांच्या गटात जाण्याचे बांगलादेशाचे उद्दिष्ट आहे. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी थेट जहाज वाहतूक मार्गाचे व्यावसायिक मूल्य उच्च ठरले आहे. थायलंडच्या दृष्टीने पाहिले, तर या मार्गामुळे दक्षिण आशियाशी व्यापार वाढवण्याची संधी निर्माण होईल. विशेषतः चीनच्या पलीकडे जाऊन आपल्या व्यावसायिक संबंधांत वैविध्य आणण्याचा थायलंडचा प्रयत्न आहे. या जहाज मार्गाची उच्चतम कार्यक्षमता लक्षात घेण्यासाठी या मार्गाला बंगालच्या उपसागराच्या प्रादेशिक व्यापारी जाळ्याचा अविभाज्य भाग बनवायला हवा; तसेच आर्थिक आकांक्षा आणि राजनैतिक संवेदनशील मुद्दे यांच्यात समतोल राखायला हवा.


सोहिनी बोस या ‘ऑब्झर्व्हर रीसर्च फाउंडेशन’मध्ये असोसिएट फेलो आहेत.

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.

Author

Sohini Bose

Sohini Bose

Sohini Bose is an Associate Fellow at Observer Research Foundation (ORF), Kolkata with the Strategic Studies Programme. Her area of research is India’s eastern maritime ...

Read More +