Author : Rahul Rawat

Expert Speak Raisina Debates
Published on May 23, 2025 Updated 0 Hours ago
ऑपरेशन सिंदूर भारताच्या प्रभावी युद्धकौशल्याचे उदाहरण आहे, ज्याने शत्रूच्या फिजीकल आणि कॉग्निटिव्ह क्षेत्रात खर्च लादून प्रतिबंधकता पुन्हा संतुलित केली.
ऑपरेशन सिंदूर: भारताच्या लष्करी रणनीतीची यशस्वी चाचणी!

Image Source: Getty

    ‘क्लॉजविट्झ विजडम’चा (युद्धाचे स्वरूप, त्याचे राजकारणाशी असलेले नाते आणि लष्करी धोरण या घटकांच्या महत्त्वाची जाणीव) पुनर्विचार करायचा झाला, तर अनिश्चितता हे लष्करी मोहिमांचे वैशिष्ट्य आहे. लष्कर आपले कार्य कशाप्रकारे करते आणि उद्दिष्ट कसे साध्य करते, हे युद्धभूमीवरील आणि त्याही पलीकडील यश-अपयशाचे प्रमुख सूचक असते. ‘ऑपरेशन सिंदूर’ हे सुरुवातीला पाकव्याप्त जम्मू काश्मीर (PoJK)मधील दहशतवादी संघटनांच्या आणि दहशतवादाचा पुरस्कर्ता असलेल्या पाकिस्तानच्या कारवायांना विचारपूर्वक व नियोजनबद्ध नॉन-एस्कलेटरी लष्करी प्रत्युत्तर म्हणून सुरू करण्यात आले. त्यानंतर पाकिस्तानने नागरी व लष्करी पायाभूत सुविधांना लक्ष्य करून क्षेपणास्त्रे आणि ड्रोनच्या साह्याने केलेला हवाई हल्ला म्हणजे एक अविवेकी कृत्य होते. या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने पाकिस्तानमधील हवाई रडार आणि हवाई दलाच्या तळांसह अतिमहत्त्वाच्या लष्करी मालमत्तांना लक्ष्य करून जाणीवपूर्वक व्याप्ती वाढवण्याचा निर्णय घेतला. व्यापक व प्रमाणबद्ध वाढीमुळे उद्दिष्टे यशस्वीरीत्या पूर्ण झाली आणि या दरम्यान भारताने नव्या मर्यादा पातळ्याही निश्चित केल्या.

    पाकिस्तानने नागरी व लष्करी पायाभूत सुविधांना लक्ष्य करून क्षेपणास्त्रे आणि ड्रोनच्या साह्याने केलेला हवाई हल्ला म्हणजे एक अविवेकी कृत्य होते.

    मोहिमेच्या दृष्टिकोनातून पाहिले, तर भारतीय सैन्याने युद्धाच्या तत्त्वांचे कसे अनुकरण केले हे बारकाईने तपासले, तर भविष्यातील संघर्षाचे व्यवस्थापन करण्यासाठी भारताला यातून नवे धडे शिकायला मिळाले आहेत, असे म्हणता येते.

    आराखड्याच्या स्वरूपातील युद्धाची तत्त्वे

    लष्करी रणनीती आणि त्यानंतरच्या कार्याचा प्रभाव मोजण्यासाठी लष्करी विचारवंतांनी नऊ प्रमुख तत्त्वे आणि त्यांचे यश व अपयश मोजण्यासाठी साधने, मार्ग आणि उद्दिष्टांशी त्याची जोडणी याचा अभ्यास केला आहे.

    लष्कराच्या संकल्पनात्मक आयामांचे मोहिमांच्या स्वरूपातील रणनीतीत रूपांतर करण्यासाठी युद्धाची नऊ मूलभूत तत्त्वे ही विचारात घ्यावयाचे मुद्दे म्हणून काम करतात : उद्दिष्ट - लष्करी कारवाईची उद्दिष्टे ठरवणे; डावपेच – बळाचा वापर करून आणि अन्य अचलित मार्गांनी स्थानगत लाभ मिळवणे; आश्चर्य – शत्रूला अचानक लक्ष्य करणे; समूह – वर्चस्वासाठी लष्करी शक्तीवर लक्ष केंद्रित करणे; बळाची बचत – सर्व प्रयत्नांचे प्रमाण निश्चित करणे; आक्रमकता – पुढाकार घेऊन साध्य करणे आणि त्याचा लाभ घेणे; सुरक्षा – स्वतःच्या सैन्याचे रक्षण करणे; साधेपणा – संवाद आणि माहितीमध्ये साधेपण; आणि अधिकाऱ्यांमधील एकवाक्यता – राजकीय व लष्करी अधिकाराच्या सुयोग्य संतुलनाखाली मोहिमा राबवण्यासाठी अधिकाऱ्यांमधील एकता.

    पुढील टप्प्यात ऑपरेशन सिंदूरची उद्दिष्टे आणि परिणामांची पडताळणी करण्यासाठी प्रभावीपणाचे विश्लेषण करण्यासाठी प्रत्येक घटकाचे मूल्यांकन केले आहे.

    भारताच्या हवाई दलाने पाकिस्तानच्या लष्करी पायाभूत सुविधांना लक्ष्य करून अचूक आणि प्रमाणबद्ध हल्ले केले. त्यामुळे पाकिस्तानी लष्कराच्या कमांड आणि नियंत्रणाला मोठा धक्का बसला.

    ऑपरेशन सिंदूरचे मूल्यांकन

    भारताच्या अत्यंत अचूक हल्ल्यांचे उद्दिष्ट स्पष्ट होते : पाकिस्तानव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानच्या हद्दीत असलेल्या दहशतवादी ठिकाणांवर हल्ला करणे. दहशतवाद्यांचे तळ कोठेही असले, तरी ते उद्ध्वस्त झाले पाहिजेत, असा या हल्ल्यांचा हेतू होता. त्या नंतर भारताच्या लष्करी आणि नागरी तळांवर ड्रोन व क्षेपणास्त्र हल्ल्यांच्या माध्यमातून पाकिस्तानने तीव्रता वाढवल्यावर भारताने उद्दिष्टांचा पुनर्विचार कसा केला, हे स्पष्ट झाले. भारताच्या हवाई दलाने पाकिस्तानच्या लष्करी पायाभूत सुविधांना लक्ष्य करून अचूक आणि प्रमाणबद्ध हल्ले केले. त्यामुळे पाकिस्तानी लष्कराच्या कमांड आणि नियंत्रणाला मोठा धक्का बसला. हेतुपुरस्सर आणि टप्प्याटप्प्याने घडणाऱ्या कारवाईच्या गतीमुळे पाकिस्तानच्या कृत्यांना प्रत्युत्तर देण्याच्या डावपेचांना मदत मिळाली. प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष घटकांना लक्ष्य करण्याच्या अप्रत्यक्ष दृष्टिकोनामुळे दहशतवादी संघटना व पाकिस्तानी लष्कर या दोन्हींनाही एक ठोस संदेश मिळाला. शिवाय सिंधू जल करार स्थगित करण्याच्या स्वरूपात राजनैतिक दबावतंत्र (कोअसिव्ह डिप्लोमसी) वापरून त्यास पाठिंबा दिला गेला. एक आश्चर्याचा घटक म्हणजे, ‘ऑपरेशन अभ्यास’मध्ये देशाच्या विविध भागांमध्ये नागरी आपत्कालीन सज्जतेसाठी ‘मॉकड्रिल्स’ घेण्यात आली. ही मॉकड्रिल्स भारताची सज्जता आणि दृढनिश्चय यांचे दर्शन घडवण्यासाठी करण्यात आली होती. ती ऑपरेशन सिंदूरच्या काळातच केली गेली. भारतीय विमानतळ प्राधिकरणाने (AAI) देशाच्या पश्चिम आघाडीवरील सीमेलगतच्या राज्यांमधील एअरमन (NOTAM)वर नोटीसा बजावल्या. हवाई दलाने (IAF) सज्जतेसाठी सराव करण्यासाठी ‘एनओटीएएम’चा वापर केला आणि सात व आठ मे च्या मध्यरात्री अचूक हल्ले करण्यासाठी त्याचा वापर केला. त्याचप्रमाणे पाकिस्तानी हद्दीत प्रवेश न करता स्टँड-ऑफ शस्त्रांचा वापर केल्याने कूटनीतीचा वापर केला. त्यामुळे दहशतवादाचा प्रसार करणारे तळ अचूक लक्ष्य झाले.

    मोहिमेच्या उद्दिष्टामध्ये समूह, अर्थकारण, आक्रमण आणि सुरक्षा या घटकांचा वापर करण्यात आला. भारताने आपल्या विविध स्तरांवरील हवाई संरक्षण यंत्रणेचा अवलंब करून लक्ष्याचा अचूक भेद करणाऱ्या युद्धसामग्रीचा वापर करून चोख प्रत्युत्तर दिले आणि त्याच वेळी शत्रूला जराही लाभ मिळू दिला नाही. या प्रक्रियेत भारताच्या सैन्याने शत्रूच्या हवाई संरक्षण यंत्रणेला (SEAD) दडपून टाकले. त्यामुळे पाकिस्तानी हवाई दलाच्या (PAF) मालकीच्या अनेक मालमत्तांवर अचूक हल्ले करता आले. दरम्यान, भारताच्या नागरी व लष्करी पायाभूत सुविधा सुरक्षित राहिल्या. त्यांचे किरकोळ नुकसान झाले; परंतु पाकिस्तानी सैन्याने युद्धबंदीचे उल्लंघन केल्यामुळे काही नागरिकांचा मृत्यू झाला.     

    भारताच्या सैन्याने शत्रूच्या हवाई संरक्षण यंत्रणेला (SEAD) दडपून टाकले. त्यामुळे पाकिस्तानी हवाई दलाच्या (PAF) मालकीच्या अनेक मालमत्तांवर अचूक हल्ले करता आले.

    देशातील व जागतिक स्तरापर्यंत या घडामोडी पोहोचवताना संवादाच्या एका सुव्यवस्थित आणि समन्वित रचनेच्या माध्यमातून कामाचा साधेपणा राखला गेला. यामुळे मल्टीमीडिया व्यासपीठांच्या माध्यमातून पाकिस्तानने पसरवलेले चुकीच्या माहितीचे व फेक न्यूजचे धुके कमी करण्यास मदत मिळाली. देशाचे परराष्ट्र सचिव आणि लष्कराच्या तिन्ही विभागांच्या प्रतिनिधींनी दिलेल्या माहितीत म्हणजेच लष्कर, नौदल व हवाई दलाच्या हालचाली आणि कार्यान्वित केलेल्या योजनांच्या गतीबद्दल व अंमलबजावणीबद्दल स्पष्ट माहिती देण्यात आली. अखेरीस नियोजनाच्या टप्प्यातून तिन्ही दलांची एकता दिसून झाली. पंतप्रधानांनी सुरक्षाविषयक कॅबिनेट समितीशी विचारविनिमय केला आणि त्यानंतर संरक्षणमंत्री, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार, संरक्षण प्रमुख व तिन्ही दलांच्या प्रमुखांशी सल्लामसलत करून धोरणात्मक दिशानिर्देश दिले आणि लष्करी प्रत्युत्तराला चालना दिली. युद्धमोहिमेची पातळी निश्चित करण्यासाठी आणि त्यानंतर पाकिस्तानच्या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी सैन्याला देण्यात आलेल्या स्वातंत्र्यामुळे तिन्ही दलांमध्ये एकतेचा प्रत्यय आला. पश्चिम आघाडीवर भूमीवरील संरक्षण आणि मोहीम सज्जतेचे नियंत्रण लष्कराने घेतले होते. हवाई दलाने प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून अचूक हल्ले केले आणि लष्कर व हवाई दलाच्या हवाई संरक्षण युनिटनी पाकिस्तानकडून होणाऱ्या क्षेपणास्त्र व ड्रोन हल्ल्यांना निष्प्रभ केले. भारतीय नौदलाने अरबी समुद्रात प्रतिबंध केला, पाकिस्तानच्या तथाकथित बहुक्षेत्रीय लष्करी क्षमतांच्या सक्रियतेचा मागोवा घेऊन त्यांवर मर्यादा आणली. नौदलाचा ताफा आणि पाणबुड्यांच्या तयारी व संयुक्त सज्जतेमुळे पाकिस्तानकडून सागरी क्षेत्रात असणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या आक्रमणाचा धोका कमी झाला. एकूणच संयुक्त नियोजन, स्रोतांचे वाटप, संबंधित क्षेत्रांमध्ये मोहिमांचा समन्वित वेग, अन्य सेवांना पूरक घटकांची तरतूद यांमुळे एक समन्वित आणि एकात्मिक लष्करी प्रयत्न अधोरेखित झाले.          

    भारतीय नौदलाने अरबी समुद्रात प्रतिबंध केला, पाकिस्तानच्या तथाकथित बहुक्षेत्रीय लष्करी क्षमतांच्या सक्रियतेचा मागोवा घेऊन त्यावर मर्यादा आणली.

    युद्धाच्या या तत्त्वांकडे पाहिल्यावर लक्षात येते की भारताचे अवलंबाच्या स्तरावर आणि धोरणात्मक पातळीवर होणारे नुकसान मर्यादित स्वरूपाचे आहे. ते मुख्यत्वे विस्तारित, त्रि-सेवा आधारित, बहुक्षेत्रीय लष्करी मोहिमांमुळे झाले होते. पाकिस्तानकडून पसरवली जाणारी अण्वस्त्राशी संबंधित वक्तव्ये आणि हेतुपुरस्सर हल्ल्यांच्या मालिकेला न जुमानता आपली धोरणात्मक उद्दिष्टे साध्य करण्यात भारताला यश आले.

    निष्कर्ष

    थोडक्यात, भारताच्या लष्कराने एक ‘न्यू नॉर्मल’ सिद्ध केले आहे; तसेच सीमेपलीकडून होणारा दहशतवाद आणि त्याचा पुरस्कर्ता पाकिस्तान याविरुद्ध लष्करी कारवाई करण्यामध्येही परिवर्तन घडवून आणले आहे. युद्धाच्या अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर धोरणात्मक व्यावहारिकतेमुळे भारताला आपली संरक्षणाची बाजू बळकट ठेवण्यास आणि रणनीतीच्या भौतिक व संज्ञानात्मक दोन्ही स्तरांवर शत्रूला लक्ष्य करण्यास मदत मिळाली आहे. माहिती क्षेत्र हा सहभागाचा एक नवा आयाम आहे. शत्रूवर मानसिक स्तरावर कायमस्वरूपी परिणाम साधण्यासाठी कथ्याला (नरेटिव्ह) आकार द्यायला हवा. लक्ष्यावर अचूक प्रहार करण्यासाठी आणि शत्रूवर वर्चस्व मिळवण्यासाठी आधुनिक युद्धतंत्रात तंत्रज्ञान केंद्रस्थानी असल्याचे ऑपरेशन सिंदूरने अधोरेखित केले आहे. भविष्यकालीन संघर्षाच्या परिस्थितीत युद्धाचे बदलते स्वरूप पाहता लष्करी तंत्रज्ञानाची भूमिका अधिकच महत्त्वपूर्ण बनेल. या पार्श्वभूमीवर, पाकिस्तानच्या विकसित होत असलेल्या क्षमतांचे भारताने सातत्याने विश्लेषण करायला हवे. कारण सध्या असलेल्या अनुकूल पारंपरिक लष्करी समतोलात अडथळा आणण्याची क्षमता त्यात असू शकते. अखेरीस पाकिस्तानच्या दहशतवादाच्या पुरस्कारावर आणि पाकिस्तानच्या दृष्टिकोनावर ऑपरेशन सिंदूरचा दीर्घकालीन परिणाम होऊ शकतो का, हे येणारा काळच ठरवेल.


    राहुल रावत हे ‘ऑब्झर्व्हर रीसर्च फाउंडेशन’मधील ‘स्ट्रॅटेजिक स्टडीज प्रोग्राम’मध्ये रिसर्च असिस्टंट आहेत.

    The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.