परिचय
ऊर्जेबद्दल सामाजिक, आर्थिक, पर्यावरणीय आणि सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टिकोनातून वाढत्या प्रमाणात चिंता निर्माण झाली आहे. सस्टेनेबल एनर्जी फॉर ऑल युनायटेड नेशन्स म्हणजेच संयुक्त राष्ट्रांच्या शाश्वत ऊर्जा उपक्रमामध्ये, शाश्वत ऊर्जेशिवाय शाश्वत विकास शक्य नाही यावर भर देण्यात आला आहे. जगभरात सुमारे 2.3 अब्ज लोक अजूनही घन इंधन वापरून स्वयंपाक करतात आणि एकट्या 2020 मध्ये जे सुमारे 3 कोटी २० लाख मृत्यू झाले त्यात 2 लाख 37 हजार पेक्षा जास्त मृत्यू पाच वर्षांखालील मुलांचे होते. हे मृत्यू घरगुती वायू प्रदूषणामुळे झाले होते. जीवाश्म इंधनाच्या वापराचा महिलांवरही दुष्परिणाम होतो. अगदी आधीपासूनच ऊर्जा आणि सार्वजनिक आरोग्य यांच्यातील दुव्याबद्दल तज्ज्ञांनी चर्चा केली आहे. जलद तांत्रिक प्रगती आणि हवामान बदल, शाश्वत विकास उद्दिष्टे (SDGs) च्या व्यापक संदर्भात चांगल्या आरोग्यासाठी ऊर्जेची सुरक्षितता असावी अशा जागतिक मानसिकतेला जोर आणि गती मिळते आहे. याबद्दल स्पष्ट भूमिका आणि मोजता येण्याजोगे निर्देशांक असतील तरच ही मानसिकता कृतीमध्ये बदलता येईल. आरोग्याच्या प्रगतीसाठी ऊर्जेची सुरक्षा महत्त्वाची आहे.
आरोग्याच्या सामाजिक निकषांवर चर्चा करताना आरोग्याच्या दृष्टीने ऊर्जा सुरक्षेचे महत्त्व लक्षात घेतले पाहिजे. ऊर्जेच्या सुरक्षेमुळे केवळ आरोग्यच नव्हे तर दारिद्र्य निर्मूलन, लैंगिक समानता, स्वच्छ पाणीपुरवठा, नोकरी आणि आर्थिक सुरक्षा यासारखी इतर शाश्वत विकास उद्दिष्टे साध्य करण्यातही मदत होईल. हवामान बदलाचा सामना करण्यासाठीही ऊर्जा सुरक्षा हे एक महत्त्वाचे साधन आहे. सुरक्षित, सुलभ, परवडणारी आणि शाश्वत ऊर्जा मिळवल्यास चांगल्या आरोग्याची हमी मिळू शकते. या संदर्भात संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेने 26 जानेवारी रोजी आंतरराष्ट्रीय स्वच्छ ऊर्जा दिवस घोषित केला. स्वच्छ ऊर्जेसाठी न्याय्य आणि सर्वसमावेशक संक्रमण करता यावे यासाठी जागरूकता वाढवणे आणि कृती करणे हा यामागचा उद्देश आहे.
स्पष्ट भूमिका आणि मोजता येण्याजोगे निर्देशांक असतील तरच ही मानसिकता कृतीमध्ये बदलता येईल. आरोग्याच्या प्रगतीसाठी ऊर्जेची सुरक्षा महत्त्वाची आहे.
सध्या ऊर्जा सुरक्षेमध्ये दोन मुख्य समस्या आहेत. हरित वायूंचे उत्सर्जन आणि दुसरी समस्या म्हणजे ऊर्जेचा कमी पुरवठा. विकसित, विकसनशील, नाजूक आणि संघर्षाच्या परिस्थितीमध्ये उर्जेचा समान पुरवठा होत नाही. ऊर्जा सुरक्षेच्या या दोन समस्या आरोग्य क्षेत्रासाठीही चिंतेचा विषय बनल्या आहेत. जगातील ऊर्जेच्या दृष्टीने असुरक्षित असलेल्या प्रदेशातील लोकांसाठी जागतिक पातळीवरच्या आरोग्य सेवा पोहोचवण्यात अडथळा निर्माण होतो. विकसनशील देशांमधील जवळजवळ 1 अब्ज लोकांना विश्वासार्ह वीज पुरवली जाते. ऊर्जेचा पुरवठा होत नाही अशांनाही आरोग्य सेवा दिल्या जातात. यामुळेच चांगल्या आरोग्यासाठी स्वच्छ ऊर्जेमध्ये संशोधन आणि विकास वाढवणे व पर्यायी ऊर्जेचा वाटा वाढवणे आवश्यक आहे. ऊर्जा संक्रमणाला गती देणेही तितकेच महत्त्वाचे आहे.
Figure 1: Consumption-based CO2 emissions per capita vs GDP per capita
Source: Our World in Data
Figure 2: Access to Electricity (percentage of population)
Source: World Bank
ऊर्जा संक्रमणातील आव्हाने
स्वच्छ उर्जा संक्रमणाचा हवामान बदलाशी थेट संबंध आहे आणि गेल्या दोन दशकांपासून राजकीय चर्चांमध्ये यावर विश्लेषण होते आहे. तरीही ऊर्जेच्या संक्रमणामध्ये अनेक आव्हाने आहेत. महायुद्धानंतरच्या काळात अनेक देश भू-राजकीय तणाव आणि निर्यातबंदीचे साक्षीदार आहेत. त्यामुळे ऊर्जा सुरक्षेची हमी देण्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. अशा भू-राजकीय घटना ऊर्जा सुरक्षेसाठी कारणीभूत असलेल्या पुरवठा सेवा आणि पायाभूत सुविधांमध्ये व्यत्यय आणतात. भू-राजकारणाला आकार देण्यात ऊर्जा सुरक्षेची महत्त्वाची भूमिका आहे. कारण ऊर्जा सुरक्षेमध्ये शक्ती संतुलनाला आकार देण्याची आणि देशांच्या राजकीय आणि आर्थिक स्थैर्यावर प्रभाव टाकण्याची क्षमता आहे.
स्वच्छ उर्जा संक्रमणाचा हवामान बदलाशी थेट संबंध आहे आणि गेल्या दोन दशकांपासून राजकीय चर्चांमध्ये यावर विश्लेषण होते आहे. तरीही ऊर्जेच्या संक्रमणामध्ये अनेक आव्हाने आहेत.
विकसनशील देश विजेची किंमत, स्वच्छ ऊर्जा प्रकल्पांची अनुपलब्धता आणि जीवाश्म इंधनावरील उच्च अवलंबित्वामुळे ऊर्जा संक्रमणासाठी तिप्पट दंड भरतात, असे मत जागतिक बँकेतील ऊर्जा आणि उत्खननाच्या जागतिक संचालकांनी व्यक्त केले आहे. कमकुवत प्रशासन यंत्रणा, विशिष्ट घटकांना दिल्या जाणाऱ्या अनुदानाचा अभाव, अकार्यक्षम नियोजन आणि अपुरी क्षमता यामुळे ऊर्जा संक्रमण म्हणावे तितक्या वेगाने होत नाही. कमी-कार्बन ऊर्जेसाठी धोरणे तयार केली जात असताना विविध भागधारकांनी सर्वसमावेशक निर्णय घेतले पाहिजेत. ऊर्जेच्या संक्रमणातील चढ-उतार आणि धक्के कमी करून ऊर्जेच्या उपलब्धतेची हमी देणे आवश्यक आहे.
ऊर्जा संक्रमणाच्या आव्हानांवर मात करताना ऊर्जेची सतत मागणी आणि पुरवठा यावर लक्ष द्यावे लागणार आहे. ऊर्जेची स्थिती जागतिक राजकारणावरही प्रभाव टाकेल. जीवाश्म इंधनांप्रमाणे ऊर्जा प्रणालीतील बदल भूराजनीतीवरही परिणाम करू शकतात. ऑइल कार्टेल्स आणि ब्लॉक्स प्रमाणे स्वच्छ ऊर्जा तंत्रज्ञानावर प्रभुत्व मिळवणारे देश जास्त शक्तिमान होतील. त्यांच्याकडे जास्त प्रमाणात संपत्ती येईल. कारण जीवाश्म इंधनांवरचे अवलंबित्व कमी होऊन त्या देशांना स्वच्छ ऊर्जा मिळेल. त्यामुळेच तंत्रज्ञान आणि वित्तविषयक समस्यांचे निराकरण करणारे सामूहिक उपाय विकसित करणे आणि स्वच्छ ऊर्जा तंत्रज्ञानासाठी महत्त्वाच्या सामग्रीचा पुरवठा करणे आवश्यक आहे.
ऊर्जेचा पुढचा प्रवास
अनेक देशांमध्ये सुरू असलेला संघर्ष आणि स्पर्धा स्वच्छ ऊर्जा संक्रमणाची मागणी करतो आहे. संक्रमण प्रक्रियेला गती देण्यासाठी काही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आरोग्य आणि ऊर्जा तसेच आरोग्य आणि ऊर्जेच्या व्यासपीठांवर उच्च-स्तरीय युती, जागतिक आर्थिक मंचाद्वारे शाश्वत विकास प्रभाव बैठक, स्वच्छ ऊर्जा संक्रमण कार्यक्रम यावर भर देणे आवश्यक आहे. इंटरनॅशनल एनर्जी एजन्सी, भारत आणि फ्रान्सने सुरू केलेली इंटरनॅशनल सोलर अलायन्स आणि ग्लोबल बायोफ्युएल अलायन्स हे भारताकडे G20 अध्यक्षपद असतानाच्या प्राधान्यक्रमांपैकी एक आहे. नुकत्याच झालेल्या COP28 परिषदेत हवामान आणि आरोग्यासाठी पर्यायी ऊर्जेच्या संक्रमणाच्या चर्चेमध्ये पहिल्यांदाच ‘जीवाश्म इंधन’ हा शब्द वापरण्यात आला.
ऊर्जा-आरोग्य संबंधातील हे जागतिक उपक्रम सरकारी, खाजगी कंपन्या आणि स्वयंसेवी संस्थांच्या कृतीच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. अशा उपक्रमांमध्ये माहितीचे नीट संकलन होते व लस वितरणासारख्या मोहिमांमध्ये त्याचा उपयोग होतो. कोविड-19 दरम्यान सौर उर्जेवर चालणाऱ्या पोर्टेबल रेफ्रिजरेटर्सनी भारतातील दुर्गम भागात 1 लाख 50 हजाराहून अधिक लसींचे व्यवस्थापन करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. मनुष्यबळ पुरवणाऱ्या स्वयंसेवी संस्था, निधी उभारणी करणारे खाजगी क्षेत्र आणि सरकारी संस्थांच्या मदतीने हे शक्य झाले. ऊर्जा आणि आरोग्य सुरक्षेबद्दल असे उपक्रम सुरू झालेले असूनही अनेक देशांमधील राजकीय आणि सामाजिक-आर्थिक अनिश्चिततेमुळे त्याच्या अमलबजावणीमध्ये जागतिक वचनबद्धता आवश्यक आहे.
ऊर्जा-वापर-संबंधित आरोग्यावर होणारे परिणाम आणि पर्यायी ऊर्जेचे संक्रमण लक्षात घेता संदर्भ आणि परिस्थितींवर आधारित अनुकूल उपाय आवश्यक आहेत. हवामान, ऊर्जा आणि आरोग्याची उद्दिष्टे लवचिकपणे पूर्ण करण्यासाठी समस्येवरच्या ठराविक उपायांपेक्षा यंत्रणा बनवण्यावर भर देणे ही काळाची गरज आहे. रिबाऊंड मॉडेल ऑफ रेझिलियन्स हा एक असा दृष्टिकोन आहे ज्याद्वारे ऊर्जा-आरोग्य संबंधातील समस्यांवर प्रभावीपणे धोरणे राबवण्यासाठी आणि मूल्यमापन करण्यासाठी मदत होऊ शकते. क्षमतांचे नियंत्रण आणि चपळता तसेच भांडवलाचे संसाधन आणि नेटवर्कच्या लवचिक प्रणालीसाठी एक माॅडेल तयार करणे आवश्यक आहे.
Figure 3: Suggested framework for resilience of energy-health nexus
Source: Adapted from Rebound Model of Resilience
हे मॉडेल देशांसाठी आणि कंपन्यांसाठी प्रतिकूल परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी साधन, पद्धती आणि मानसिकता शोधण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. नाजूक आणि संघर्षग्रस्त देशांना पर्यायी ऊर्जा प्रकल्पांमध्ये गुंतवणूक आकर्षित करणे कठीण असल्याने असे ऊर्जा प्रकल्प विकसित करण्यासाठी निधी आणि नेटवर्क प्रदान करणाऱ्या पीस रिन्यूएबल एनर्जी क्रेडिट्स (पी-आरईसी) सारख्या उपक्रमांना प्रोत्साहन दिले पाहिजे. भू-राजकीय गतिशीलतेतील बदलांमुळे मूल्य साखळीतील असुरक्षिततेच्या कोणत्याही धोक्याचे परिणाम कमी करण्यासाठी कमी आणि मध्यम-उत्पन्न देश, लहान बेटे आणि विकसनशील देशांची क्षमता वाढवण्याची गरज आहे.अनेक विकसनशील देशांना त्यांच्या संसाधनांच्या मर्यादांमुळे जागतिक सहकारी यंत्रणांमध्ये गैरसोयीचा सामना करावा लागतो. त्यामुळे या वचनबद्धतेसाठी दृढनिश्चय आणि ऐक्य महत्त्वाचे ठरते. क्लायमेट व्हल्नरेबल फोरम आणि ग्रीन क्लायमेट फंडच्या बाबतीत अशा मंचांची निर्मिती, पुढाकार आणि यशोगाथांमधून शिकणे हा एक मंत्र आहे. असे धोरण स्वीकारण्यासाठी आणि जागतिक सहभागातील अडथळे दूर करण्यासाठी महत्त्वाच्या भागीदारी आवश्यक आहेत. ऊर्जा-आरोग्य संबंध मजबूत करण्यासाठी ऊर्जा संक्रमणास गती देणारी एक लवचिक प्रणाली तयार करणे आणि त्यात स्थानिक, राष्ट्रीय, प्रादेशिक आणि जागतिक स्तरावरील विविध भागधारकांना प्रोत्साहन देणे ही काळाची गरज आहे.
संजय एम पट्टनशेट्टी हे प्रसन्न स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ मणिपाल अकादमी ऑफ हायर एज्युकेशन येथे जागतिक आरोग्य प्रशासन विभागाचे प्रमुख आहेत.
अनिरुद्ध इनामदार हे सेंटर फॉर हेल्थ डिप्लोमसी प्रसन्न स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ येथे रिसर्च फेलो आहेत.
किरण भट्ट हे ग्लोबल हेल्थ प्रसन्ना स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ मणिपाल अकादमी ऑफ हायर एज्युकेशनच्या सेंटर फॉर हेल्थ डिप्लोमसी विभागाचे रिसर्च फेलो आहेत.
The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.