Author : Ayjaz Wani

Expert Speak Raisina Debates
Published on May 02, 2025 Updated 0 Hours ago

पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण काश्मीर खोऱ्यात पाकिस्तानविरोधी तीव्र निदर्शने उसळली; स्थानिक काश्मिरी जनतेने उघडपणे दहशतवाद नाकारला, हा जनतेच्या भावना आणि भारताच्या एकात्मतेच्या प्रयत्नांना पाठिंबा देणारा निर्णायक टप्पा ठरला.

काश्मीरमधील जनतेचा दहशतवादाप्रती बदलता दृष्टिकोन

Image Source: Getty

२५ एप्रिल २०२५ रोजी, जुम्माच्या ख़ुत्ब्यादरम्यान, मीरवाइजने श्रीनगरच्या जामिया मस्जिदच्या मंचावरून पेहलगाममधील दहशतवादी हल्ल्याची तीव्र शब्दांत निंदा केली. हीच ती जामिया मस्जिद आहे, जी पूर्वी पाकिस्तानच्या समर्थनाने चालवलेल्या विभाजनवादी भूमिकेसाठी ओळखली जात होती. २०१९ पूर्वी, जुम्माच्या नमाजानंतर काश्मीरच्या अनेक शहरांमध्ये दगड फेकीच्या घटना नेहमीच घडत असत. मीरवाइजने दहशतवाद्यांनी धर्माच्या आधारावर पर्यटकांची हत्या केल्याचा निषेध केला, हे पाकिस्तान प्रायोजित दहशतवादाबाबत काश्मीरमध्ये उद्भवलेल्या मानसिकतेतील मूलभूत बदलाचे स्पष्ट संकेत आहेत. केवळ मीरवाइजच नव्हे, तर इतर अनेक धार्मिक नेत्यांनीही या हल्ल्याचा उघडपणे निषेध केला. या हल्ल्याच्या निषेधार्थ संपूर्ण काश्मीरमध्ये निदर्शने झाली, मशाल जुलूस निघाले आणि पाकिस्तान प्रायोजित दहशतवादाविरुद्ध जनतेचा रोष उफाळून आला. अशा कठीण काळात आशेचा किरण शोधणे कठीण असते, पण हे एक उदाहरण ठरू शकते. गेल्या ३५ वर्षांत प्रथमच काश्मीर खोऱ्यात पाकिस्तान प्रेरित दहशतवादाविरोधात लोकांनी पूर्णपणे एकजुटीने बंद पाळला. सर्वसामान्य जनतेची ही एकजूट काश्मीरच्या सर्व समस्यांचे निराकरण करू शकणार नाही, पण तिचे अस्तित्व फार महत्त्वाचे आहे. पेहलगाम हत्याकांडातून वाचलेल्यांविषयी विचार करा त्यांना वाचवण्यासाठी स्थानिक काश्मिरी जनतेने जी मदत केली, ती आश्वासक आहे.

मीरवाइजने दहशतवाद्यांनी धर्माच्या आधारावर केलेल्या हत्येचा निषेध करताच, खोऱ्यातील बदलत्या दृष्टिकोनाची स्पष्ट जाणीव होते, जी काश्मीरच्या भविष्याला एक नवी दिशा देणारी ठरू शकते.

२०१९ नंतर काश्मीरमधील तरुणांच्या मोठ्या वर्गाने भारताच्या एकीकरणाच्या प्रयत्नांमध्ये रस घेतला आहे. हे युवक एक सुरात पाकिस्तानप्रायोजित दहशतवादाची ठाम निंदा करत आहेत. त्यांच्या दृष्टीने, पहलगामवरील हल्ला हा शांतता आणि सौहार्द यांसाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांवर पाकिस्तानने घातलेला निर्दय आघात आहे. या घटनेने वादीतील नाजूक जखमेवर बोट ठेवले आहे. तथापि, काश्मिरी समाजातील काही घटक अजूनही काश्मीरच्या भारताशी एकीकरणाच्या विरोधात काम करत आहेत आणि त्यांना त्यांच्या कारवायांसाठी शेवटी उत्तरदायी ठरवले जाईल. काश्मिरी युवकांनी विशेषतः त्यांच्या आजूबाजूच्या वातावरणाबद्दल आणि सोशल मीडियावर चालणाऱ्या प्रवाहांबाबत जागरूक राहिले पाहिजे, जेणेकरून समाजात लपून बसलेल्या गद्दारांना आणि शत्रूंच्या साथीदारांना ओळखण्यात ते सुरक्षा यंत्रणांना महत्त्वपूर्ण मदत करू शकतील. काश्मिरी तरुणांचा हा जागरूक आणि सक्रिय सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे. देशासाठी या नाजूक वळणावर, हे युवक कधीही निराशा निर्माण करणार नाहीत, याची आशा ठेवल्यास हरकत नाही.

घाटीमध्ये शोक, संताप आणि धक्क्याची लाट

पहलगाममधील भीषण दहशतवादी हल्ला अशा काळात घडला आहे, जेव्हा काश्मीर भारतासोबत आर्थिक विकास आणि सामाजिक एकात्मतेच्या मार्गावर पुढे जात आहे. सध्याच्या घडीला, अलगाववादी प्रवाह आणि दहशतवाद यांचा प्रभाव इतिहासात कधी नव्हे इतका क्षीण झाला आहे. अनुच्छेद ३७० आणि ३५A रद्द झाल्यानंतर काश्मिरी तरुणांच्या मानसिकतेत आणि भावविश्वात भारताशी एकरूप होण्याबाबत एक ठोस आणि सकारात्मक बदल घडून आला आहे. २०१९ पूर्वी कलम ३७० मुळे काश्मीरमध्ये कुशासन, भ्रष्टाचार आणि स्थानिक सत्तेचा ताण निर्माण झाला होता. त्या काळात केंद्र सरकार अनेकदा अलगाववादी विचारसरणी, दहशतवाद आणि प्रादेशिक पक्षांच्या आडून घाटीत पाकिस्तानप्रेरित हिंसेच्या भडक्यांकडे दुर्लक्ष करत होती, ज्यामुळे संपूर्ण परिसर दहशतीच्या आगीत सापडला होता. मात्र, २०१९ नंतर केंद्र सरकारने प्रशासकीय आणि सुरक्षाविषयक ठोस पावलं उचलल्यामुळे अलगाववाद्यांचे आणि भूमिगत समर्थकांचे (OGW) जाळं मोडीत काढण्यात यश आलं. पाकिस्तानप्रेरित जमात-ए-इस्लामीसारख्या संघटनांवर बंदी घालण्यात आली, आणि त्या पाश्र्वभूमीवर दहशतवाद्यांनी काश्मीर टायगर्स, जैश-ए-मोहम्मदचा पीपल्स अँटी फॅसिस्ट फ्रंट, तसेच लश्कर-ए-तोयबाचा द रेजिस्टन्स फ्रंट यांसारख्या नव्या संघटनांची निर्मिती केली.  

पाकिस्तानचा सांप्रदायिक द्वेष निर्माण करण्याचा डाव पूर्णपणे फसला आहे. कारण, काश्मीर खोऱ्यातील जनतेने या अमानवी कृत्याचा एकमुखी निषेध करत, आपल्या मनात भारताशी असलेल्या भावनिक, सामाजिक आणि राजकीय नात्याची जिवंत आणि जाज्वल्य भावना ठामपणे व्यक्त केली आहे.

सामान्य जनतेकडून मर्यादित मिळणारे समर्थन आणि सुरक्षा यंत्रणांनी उचललेले कडक उपाय यांमुळे या मुखवटे घालून कार्यरत असलेल्या दहशतवादी संघटनांनी केवळ त्यांच्या कार्यक्षेत्रात बदल केले नाहीत, तर खोऱ्यात मनोवैज्ञानिक दबाव निर्माण करण्यासाठी त्यांनी कमकुवत घटकांवर, जसे की बाहेरून आलेले मजूर, ड्युटीवर नसलेले पोलिस कर्मचारी यांच्यावर लक्ष्य साधायला सुरुवात केली. काश्मिरी जनतेने संपूर्ण खोऱ्यात अशा लक्षित हत्यांच्या निषेधार्थ आंदोलनं छेडली. कारण त्यांच्या दृष्टीने हे हल्ले म्हणजे त्यांच्या दुःखाच्या राजकारणाचा एक भाग आहे. लोकांनी या दहशतवादी कृत्यांना "मानवतेवर हल्ला" असे संबोधित केलं, अशा विघातक मानसिकतेला विरोध करण्यासाठी ठोस पावलं उचलायला सुरुवात केली, ज्याचे अंतिम उद्दिष्ट काश्मीरमध्ये कायमस्वरूपी अशांतता निर्माण करणे होते. पहलगामवरील हल्ल्यामुळे केवळ संपूर्ण देश हादरला नाही, तर काश्मीरच्या कानाकोपऱ्यात 'आम्ही हिंदुस्तानी आहोत', 'भारत आमचा देश आहे', 'दहशतवाद मुर्दाबाद' अशा घोषणा दुमदुमल्या. खोऱ्यातून उठलेल्या या ऐक्याच्या आवाजांनी पाकिस्तानपुरस्कृत दहशतवादी संघटनांना आणि खुद्द पाकिस्तानलाही मोठा धक्का बसला. याच वाढत्या जनदबावामुळे 'दि रेजिस्टन्स फ्रंट'ने (TRF) पहलगाम हल्ल्यात आपला कोणताही सहभाग असल्याची शक्यता नाकारली. त्यांनी हा हल्ला "काश्मीरमधील उदारमतवादी सुरांना बदनाम करण्यासाठी रचलेली एक नियोजित कारस्थान" असल्याचे म्हटले. काश्मिरी मुस्लिमांमधील बदलत्या भावना, दहशतवादी संघटनांच्या डावपेचांबद्दल असमाधानी असल्यामुळे या गटांना खोऱ्यातील उदारमतवादी आवाजांविरुद्ध लक्ष्यित कारवाई सुरू करण्यास भाग पाडले आहे. 27 एप्रिल 2025 रोजी दहशतवाद्यांनी उत्तर काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यात काश्मिरी लोकांमध्ये, विशेषतः तरुणांमध्ये भीती निर्माण करण्यासाठी आणखी एका 45 वर्षीय व्यक्तीची हत्या केली.

ऑनलाइन जगतात फेक नैरेटिव

बदलती परिस्थिती आणि खोऱ्यात झालेल्या राजकीय उलथापालथीमुळे काश्मिरी जनतेने चुकीच्या माहितीच्या प्रचाराविषयी तसेच पाकिस्तानमधून प्रसारित होणाऱ्या भ्रामक व्हिडीओंविषयी अधिक जागरूक राहणे अत्यावश्यक झाले आहे. यासोबतच, मध्यपूर्वेसह इतर आंतरराष्ट्रीय भागांतील सोशल मीडियावरूनही पसरवले जाणारे दिशाभूल करणारे संदेश आणि व्हिडीओ यांच्यापासून सावध राहण्याची गरज आहे. पहलगामवरील दहशतवादी हल्ल्यानंतर अवघ्या काही तासातचं पाकिस्तानमधील प्रसारमाध्यमांनी हा हल्ला ‘फॉल्स फ्लॅग ऑपरेशन’ असल्याचा दावा करत, तो भारत सरकारच्या यंत्रणांनी एकत्रितपणे आखलेला कट असल्याचे खोटे वर्णन प्रसारित केले. खोऱ्यातील बदलते राजकीय वातावरणसुद्धा आता एक मोठे आव्हान बनले आहे. काश्मीरच्या काही फेसबुक न्यूज पोर्टल्सवरून पसरवले जाणारे व्हिडीओ हे पूर्णपणे खोटे असतात. हेच व्हिडीओ पाकिस्तानमधून चालवल्या जाणाऱ्या विशिष्ट सोशल मीडिया खात्यांद्वारे मोठ्या प्रमाणात पसरवले जातात. यांचा उद्देश पाकिस्तानचा प्रचार करणे आणि धार्मिक तणाव वाढवणे हाच होता. प्रमाणिकतेच्या अभावामुळे अनेक सोशल मीडिया खात्यांनी दोन वर्षांपूर्वीचे व्हिडिओ पुन्हा पोस्ट करून असा खोटा नैरेटिव तयार करण्याचा प्रयत्न केला की, काश्मीरमधील विद्यार्थ्यांना इतर राज्यांमध्ये घाबरवले जात आहे आणि त्यांना जाणूनबुजून लक्ष्य केले जात आहे. या प्रकारांमुळे माहितीची सत्यता तपासणे आणि विचारपूर्वक पावले उचलणे अत्यावश्यक बनते. खरे तर, काही राज्यांमध्ये अशा घटना नोंदवल्या गेल्या आहेत, ज्या काश्मिरी नागरिकांना धमकावण्याच्या स्वरूपाच्या होत्या. परंतु विशेष बाब म्हणजे, संबंधित राज्य सरकारांनी वेळीच पावले उचलून काश्मिरी विद्यार्थ्यांची आणि व्यापाऱ्यांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी गंभीर प्रयत्न केले आहेत. एका राज्यात तर पोलिसांनी काश्मिरी नागरिकांना धमकावणाऱ्या व्यक्तीविरोधात एफआयआर दाखल केला असून, स्थानिक पोलिसांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून वातावरण शांत ठेवण्याचा प्रयत्नही केला आहे. 

पाकिस्तानच्या सत्ताकेंद्राला या हल्ल्यात धार्मिक नैरेटीव्ह तयार करण्यात पूर्णपणे अपयश आले आहे.

पहलगाम हल्ल्यानंतर संपूर्ण देशात शोकाची लाट पसरली आहे. जम्मू-काश्मीरसह संपूर्ण देशाची भावना अत्यंत वेदनादायक आहे. तथापि, काही विशिष्ट काश्मिरी सोशल मीडियावर कार्यरत न्यूज पोर्टल आणि काही लोक, जे सोशल मीडियाचा दुरुपयोग करत आहेत, त्यांना खोट्या नैरेटीव्हचा शिकार होण्यापासून वाचले पाहिजे, ज्याला अनेक वेळा पाकिस्तान आणि त्याच्या आसपासच्या काही नेत्यांकडून प्रचारित करण्याचा प्रयत्न केला जातो. पाकिस्तानच्या सत्ताकेंद्राला या हल्ल्यात धार्मिक नैरेटीव्ह तयार करण्यात पूर्णपणे अपयश आले आहे. खोऱ्यातील लोकांनी एकजुटीने आणि एका सुरात ज्या प्रकारे या हल्ल्याची निंदा केली, ते काश्मिरींच्या भारतासोबत अधिक भावनिक आणि सामाजिक-राजकीय एकात्मतेची इच्छा व्यक्त करते. अशा परिस्थितीत, काश्मीरच्या लोकांना सोशल मीडियावर पसरवलेल्या खोट्या नैरेटीव्हचा शिकार होण्यापासून वाचले पाहिजे. कारण पहलगामवरील हल्ला स्पष्टपणे अशाच एक हेतूने करण्यात आला आहे. भारत आणि काश्मीरच्या नागरिकांनी हे समजून घेतले पाहिजे की, युद्धात केवळ सैन्यच नाही, तर संपूर्ण देश एकत्र लढतो.


अयाझ वानी (PhD) हे ‘ऑब्झर्वर रिसर्च फाउंडेशन’च्या स्ट्रॅटेजिक स्टडीज प्रोग्रॅममध्ये फेलो आहेत.

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.