रशियाने उत्तर कोरियासोबत सर्वसमावेशक धोरणात्मक करारावर स्वाक्षरी केली. संपूर्ण आशिया-पॅसिफिक प्रदेशात या घडामोडीचे तरंग उमटले. आता पुतिन यांनी सात वर्षांच्या अंतरानंतर 20 जून 2024 रोजी व्हिएतनामला भेट दिली आहे. हा सात वर्षांचा कालावधी पाहिला तर तेव्हापासून बरेच काही बदलले आहे. युक्रेनमधील युद्ध आणि पाश्चिमात्य देशांच्या निर्बंधांमुळे रशियाने आग्नेय आशियाला आपल्या परराष्ट्र धोरणात महत्त्व दिले आहे. रशियाचे हे परराष्ट्र धोरण 2023 च्या संकल्पनेत ठळकपणे दिसते. यात आर्थिक वाढीवर भर देण्यात आला होता. आसियान सदस्य राष्ट्रांशी सुरक्षा आणि मानवतावादी सहकार्य करण्याला रशियाने प्राधान्य दिले होते. त्यामुळे केवळ द्विपक्षीय संबंधच नव्हे तर आग्नेय आशियाई क्षेत्रासाठी पुतिन यांच्या या भेटीचा काय अर्थ आहे हे समजून घेणे महत्त्वाचे आहे.
रशिया-व्हिएतनाम संबंध
रशिया आणि व्हिएतनाममध्ये ऐतिहासिक संबंध आहेत. मॉस्कोने व्हिएतनाम युद्धादरम्यान कम्युनिस्ट शक्तींना पाठिंबा दिला होता आणि व्हिएतनामशी प्रमुख आर्थिक भागीदारीही केली होती. सोव्हिएत युनियनच्या विघटनानंतर 1990 च्या दशकात या द्विपक्षीय संबंधांमध्ये थोडीशी घट झाली पण संबंध मात्र कायम राहिले. 2001 मध्ये जेव्हा पुतिन यांनी हनोईला भेट दिली तेव्हा दोन्ही देशांनी आर्थिक आणि राजकीय सहकार्य वाढवत धोरणात्मक भागीदारी पूर्ण केली. रशियामधली दिग्गज मोठी गॅस कंपनी गॅझप्रॉम आणि पेट्रोव्हिएतनाम यांनी आधुनिक रिफायनरी बांधल्यानंतर तर ऊर्जा क्षेत्रातील सहकार्य आणखी वाढले. पेट्रोव्हिएतनाम 2008 पासून रशियन आर्क्टिकमधील नेनेट्स स्वयंशासित प्रांत असलेल्या ऑक्रगमध्ये प्रकल्प चालवते आहे. रशियाने व्हिएतनामला सोन ला जलविद्युत प्रकल्प सारख्या प्रकल्पांमध्ये मदतही केली आहे. व्हिएतनामने दक्षिण चीन समुद्रातील तेल ड्रिलिंग प्रकल्पांमध्ये रशियन कंपन्या आणि गुंतवणूक धोरणात्मकदृष्ट्या वापरली आहे. असे केल्याने व्हिएतनाम आपले सार्वभौमत्व टिकवून ठेवू शकतो आणि चीनला वेठीस धरू शकतो.
रशिया आणि व्हिएतनाममध्ये ऐतिहासिक संबंध आहेत. मॉस्कोने व्हिएतनाम युद्धादरम्यान कम्युनिस्ट शक्तींना पाठिंबा दिला होता आणि व्हिएतनामशी प्रमुख आर्थिक भागीदारीही केली होती.
रशियासोबतची लष्करी भागीदारी ही या कार्यक्रमातली एक मोठी गोष्ट आहे. मॉस्कोने हनोईला Su-27, Su-30 MKI, S-300 क्षेपणास्त्र प्रणाली, कॉर्वेट्स, गेपार्ड क्लास फ्रिगेट्स, स्वेतल्याक-क्लास गस्ती नौका यांसारखा लष्करी पुरवठा केला आहे. किलो-श्रेणीच्या पाणबुड्या, T-90 टाक्या याचाही यात समावेश आहे. रशियाने 2012 मध्ये सर्वसमावेशक धोरणात्मक करार केला. 2012 मध्ये युरेशियन इकॉनॉमिक युनियनसह मुक्त व्यापार करारावर स्वाक्षरी करणारे व्हिएतनाम हे एकमेव आग्नेय आशियाई राष्ट्र होते. 2016 मध्ये लष्करी करारावर स्वाक्षरी करण्यात आली होती आणि रशियाला प्राधान्याने कॅम रान नौदल तळावर प्रवेश देण्यात आला.
पुतिन यांची भेट
या भेटीदरम्यान पुतिन आणि व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष तू लॅम यांनी शिक्षण, आण्विक तंत्रज्ञान संशोधन, रोग प्रतिबंधक यंत्रणा, तेलाचे उत्खनन आणि न्याय या क्षेत्रातील 11 करारांवर स्वाक्षऱ्या केल्या. या बैठकीत सरकारी मालकीची आण्विक कंपनी रोसाटॉम, नैसर्गिक वायू कंपनी नोवाटेक आणि सरकरची तेल कंपनी झारुबेझनेफ्ट यासारख्या आघाडीच्या रशियन कंपन्यांचा सहभाग होता. रशिया आणि व्हिएतनाम यांच्यातील धोरणात्मक सहकार्य वाढविण्यावर संयुक्त निवेदनावर स्वाक्षरी करण्यात आली. तेल आणि वायू सहकार्यावर नोवाटेक आणि पेट्रो व्हिएतनाम यांच्यातील सामंजस्य करारावरही स्वाक्षरी झाली. याद्वारे मॉस्को व्हिएतनाममध्ये 10 मेगावॅटची आण्विक संशोधन सुविधा तयार करण्यात मदत करेल आणि कर प्रशासन, सीमाशुल्क गुन्ह्यांचा प्रतिकार करण्यासाठी आणखी एक सहकार्य करार केला जाईल. राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्या म्हणण्यानुसार, 40 टक्के व्यापार राष्ट्रीय चलनांमध्ये झाला आणि व्लादिवोस्तोक आणि हो ची मिन्ह यांच्यातील सागरी विस्तारमार्गातील सहकार्य आशादायी आहे.
रशियाचा उत्तर कोरियापर्यंत पोहोचण्याचा उद्देश मुख्यत: भू-राजकीय होता. परंतु पुतिन यांच्या व्हिएतनाम भेटीत प्रतीकात्मकता आहे तसाच भक्कम भू-आर्थिक विचार आहे. या देशातल्या ऐतिहासिक संबंधांमुळे काही प्रमाणात आर्थिक अवलंबित्व आहे. 2023 मधला रशिया आणि व्हिएतनाम यांच्यातला व्यापार फक्त 3.6 अब्ज अमेरिकी डाॅलर्स होता. हा व्यापार चीनसोबतच्या 175 अब्ज अमेरिकी डाॅलर्स आणि अमेरिकेच्या 123 अब्ज अब्ज अमेरिकी डाॅलर्स व्यापारापेक्षा खूपच कमी आहे. व्हिएतनामसाठी रशिया हा व्यापाराचे प्रमुख स्त्रोत आहे. आता रशियावर आंतरराष्ट्रीय निर्बंध लादल्याने त्यांची व्यापार क्षमता आणखी कमी होईल. परंतु हनोई रशियासाठी अजूनही एक महत्त्वाचा भागीदार आहे. काही व्हिएतनामी बँकांमध्ये रूबलमध्ये व्यवहार केले जातात. व्हिएतनाम हे रशियन पर्यटकांसाठी एक महत्त्वाचे स्थान आहे आणि व्हिएतनाम पर्यटकांच्या संख्येत सहाव्या क्रमांकावर आहे.
रशियाचा उत्तर कोरियापर्यंत पोहोचण्याचा उद्देश मुख्यत: भू-राजकीय होता. परंतु पुतिन यांच्या व्हिएतनाम भेटीत प्रतिकात्मकता आहे तसाच भक्कम भू-आर्थिक विचार आहे.
रशियाच्या 2023 च्या परराष्ट्र धोरणानुसार रशियन फेडरेशनने आसियान देशांसोबत वाढीव सहकार्यावर भर दिला आहे. एका दशकापूर्वी रशियाने ‘पूर्वेकडे पाहा’ हे धोरण स्वीकारले होते. याचाच एक भाग म्हणून आसियान क्षेत्रात रशियाला आपली भागीदारी वाढवायची आहे. व्हिएतनाम हा पूर्वेला आग्नेय आशियाशी जोडतो आणि म्हणूनच हा देश रशियाच्या आग्नेय आशियामधल्या धोरणातला प्रमुख देश आहे. आग्नेय आशियाई राष्ट्रांच्या परराष्ट्र धोरणांमध्ये बहुध्रुवीयता वाढते आहे. म्हणूनच रशियाने व्हिएतनामसोबत संबंध दृढ करण्यावर भर दिला आहे.
व्हिएतनामचा फायदा काय?
पुतिन यांची व्हिएतनामची भेट या प्रदेशात त्यांना अजूनही मिळत असलेला राजनैतिक पाठिंबा प्रदर्शित करण्याच्या हेतूने होती. पश्चिमात्य देशांनी लादलेले निर्बंध आणि रशियाला एकटे पाडण्याच्या घडामोडींमध्येच ही भेट झाली. आपल्याला आशिया-पॅसिफिक प्रदेशात एक विश्वासार्ह सुरक्षा रचना तयार करायची आहे, असे पुतिन म्हणाले. पुतिन यांचे यजमानपद मिळवून व्हिएतनामने बरेच काही साध्य केले आहे. अमेरिका, चीन आणि रशियाच्या नेत्यांच्या दौऱ्याचे यशस्वीपणे आयोजन करणारा व्हिएतनाम हा एकमेव देश ठरला आहे.
आग्नेय आशियातील बहुतेक देश या प्रदेशातील मोठ्या सत्तास्पर्धेला सामोरे जाण्यासाठी ही रणनीती वापरत आहेत. व्हिएतनामच्या कम्युनिस्ट पक्षाने या धोरणाला ‘बांबू डिप्लोमसी’ असे म्हटले आहे. मोठ्या शक्तींच्या स्पर्धेत कोणाचीही बाजू न घेता बदलाच्या वाऱ्यांसह वाकणे असा ‘बांबू डिप्लोमसी’ चा अर्थ आहे. प्रत्येकाशी मैत्री करणे आणि कोणतीही औपचारिक युती टाळणे या व्हिएतनामच्या जुन्या परराष्ट्र धोरणाशी हे सुसंगत आहे.
युक्रेनच्या संकटामुळे रशिया सध्या हनोईला कोणतीही मोठी शस्त्रे पुरवण्याच्या स्थितीत नाही. याबद्दल व्हिएतनाम जागरुक आहे. तरी विश्लेषकांच्या मते, प्रदीर्घ चाललेल्या इंडोचायना युद्धांमध्ये सोव्हिएत युनियनने व्हिएतनामला दिलेल्या पाठिंब्याबद्दल व्हिएतनाम अजूनही कृतज्ञ आहे. युक्रेनमधील युद्धाला कसे तोंड द्यायचे याचा व्हिएतनामचा पेच अजून सुटलेला नाही. त्यामुळे या देशाने या विषयावर तटस्थ भूमिका राखली आहे.
व्हिएतनामने कीव्हला मदत पाठवली आणि युक्रेनशी सौहार्दपूर्ण संबंध राखले. पण त्याचवेळी रशियाच्या कृतीचा निषेध करण्यासाठी संयुक्त राष्ट्रांमध्ये मंजूर केलेल्या विविध ठरावांपासून मात्र व्हिएतनाम दूर राहिला. पुतिन यांच्या भेटीच्या आधी पुतिन यांनी युक्रेन संकटाबद्दल व्हिएतनामच्या संतुलित भूमिकेची प्रशंसा केली होती. व्हिएतनाम देखील लष्करी शस्त्रे मिळवण्यासाठी पर्यायी स्रोत शोधण्याचा प्रयत्न करतो आहे. व्हिएतनाम इतर देशांबरोबरच्या सुरक्षा भागीदारीत विविधता आणण्याचा प्रयत्न करतो आहे. परंतु हनोईला या पैलूंमध्ये रशियावरील आपले अवलंबित्व पूर्णपणे संपवण्यास अद्याप वेळ लागेल.
व्हिएतनामने कीव्हला मदत पाठवली आणि युक्रेनशी सौहार्दपूर्ण संबंध राखले. पण त्याचवेळी रशियाच्या कृतीचा निषेध करण्यासाठी संयुक्त राष्ट्रांमध्ये मंजूर केलेल्या विविध ठरावांपासून मात्र व्हिएतनाम दूर राहिला.
व्हिएतनामसोबत धोरणात्मक सर्वसमावेशक भागीदारी मजबूत करणे हे रशियासाठी नेहमीच प्राधान्य राहिले आहे, असे पुतिन यांनी म्हटले आहे. व्हिएतनामसाठी ही भेट म्हणजे दोन्ही देशांमधील द्विपक्षीय व्यापार आणि आर्थिक सहकार्याला चालना देण्यासाठी ठोस उपायांवर चर्चा करण्याची संधी आहे. व्हिएतनामने BRICS मध्ये सामील होण्यासाठी स्वारस्य दाखवले आहे, असेही पुतिन यांनी नमूद केले. मॉस्कोने या वर्षी मलेशिया आणि थायलंड या आग्नेय आशियाई राष्ट्रांसह BRICS चे फिरते अध्यक्षपद स्वीकारले आहे.
पुतिन यांच्या या भेटीला अमेरिकेकडून फारसा प्रतिसाद मिळाला नाही. गेल्या वर्षी अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनीही व्हिएतनामला भेट दिली होती. त्यावेळी व्हिएतनामने अमेरिकेशी असलेले आपले संबंध सुधारले. कोणत्याही देशाने पुतिन यांना त्यांच्या आक्रमक युद्धाला प्रोत्साहन देण्यासाठी व्यासपीठ देऊ नये आणि पुतिन यांच्या अत्याचारांकडे दुर्लक्ष करून सगळे सुरळित करण्याची परवानगी त्यांना देऊ नये, अशी टिप्पणी अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाच्या प्रवक्त्याने केली आहे. अमेरिका आणि व्हिएतनाममधल्या व्यापाराला अलीकडच्या काळात गती आली आहे. अमेरिका सध्या व्हिएतनामच्या बाजार अर्थव्यवस्थेची स्थिती सुधारण्यासाठी पुनरावलोकन करते आहे. यामुळे हनोईतून अमेरिकेत आयात केलेल्या वस्तूंवर कमी शुल्क लागेल आणि व्हिएतनामचाही फायदा होईल.
दक्षिण चीन समुद्रात चीनच्या वाढत्या कारवायांमुळे निर्माण झालेल्या सुरक्षा आव्हानांचा सामना करण्यासाठी अमेरिका आणि त्याचे मित्र देश व्हिएतनामसाठी महत्त्वाचे आहेत. दक्षिण चीन समुद्रात व्हिएतनाम आणि चीन यांच्यातील संघर्ष फिलीपीन्सच्या बाबतीत तितका तीव्र नसला तरीही आता तो वाढतो आहे. परंतु त्याच वेळी अमेरिकेच्या फार जवळ जाण्याचा व्हिएतनामचा विचार नाही. कारण यामुळे चीन दक्षिण चीन समुद्रात व्हिएतनामवर अधिक दबाव आणू शकतो. हेच चीनने फिलीपिन्सच्या बाबतीत केले आहे.
पुतिन यांची व्हिएतनाम भेट अमेरिका आणि त्याच्या मित्र देशांसाठी चांगली नाही. परंतु कोणाचीही एकाची बाजून ने घेता दुसऱ्याचे समाधानही करायचे अशी व्हिएतनामची भूमिका आहे. हे मूळात व्हिएतनामचे विविधतेचे परकीय धोरण आणि स्वायत्ततेचे धोरण अवलंबण्याबद्दल आहे.
या प्रदेशातील अमेरिका आणि चीनच्या स्पर्धेला सामोरे जाण्यासाठी बहुतेक आग्नेय आशियाई राष्ट्रांनी असेच धोरण स्वीकारले आहे. आग्नेय आशियात काही लोकांसाठी युक्रेनचे संकट हे 'दूरचे संकट' म्हणून पाहिले जाते. अमेरिकेचा मित्र असलेल्या थायलंडसारख्या देशासाठी रशिया-युक्रेन युद्धाबाबतचे जनमत व्हिएतनामप्रमाणेच विभागलेले आहे. व्हिएतनामसह मलेशिया आणि थायलंड यासारख्या देशांना ब्रिक्समध्ये सामील व्हायचे आहे. त्यामुळे रशियाने अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारली आहे. आग्नेय आशियातील बहुतेक देश त्यांचे पर्याय खुले ठेवून त्यांच्या भागीदारीत विविधता आणू पाहात आहेत. आर्थिक आणि सुरक्षा क्षेत्रात आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी कोणत्याही एका देशावर अवलंबून राहणे या देशांना परवडणारे नाही. त्यामुळेच त्यांची महाशक्तींबद्दल सावध भूमिका आहे.
राजोली सिद्धार्थ जयप्रकाश हे ऑब्झर्व्हर रिसर्च फाउंडेशनमध्ये संशोधन सहाय्यक आहेत.
प्रेमेशा साहा ऑब्झर्व्हर रिसर्च फाउंडेशनमध्ये फेलो आहेत.
The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.