Expert Speak Raisina Debates
Published on May 20, 2024 Updated 0 Hours ago

भारत-प्रशांत क्षेत्र बड्या सत्ता स्पर्धांचे केंद्र बनले आहे. त्याच वेळी युक्रेन युद्धाने रशिया आणि उत्तर कोरियाला जवळ आणले आहे.

जुन्या नात्याला संजीवनी : उत्तर कोरिया-रशिया संबंधांच्या पुढच्या टप्प्याचा वेध

रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर घालण्यात आलेले निर्बंध आणि बाजारपेठांचे आशिया खंडात झालेले स्थलांतर यांमुळे रशियाचा युरो-अटलांटिक क्षेत्रातील रस कमी झाला आहे. त्याचा परिणाम म्हणजे आशिया खंड रशियासाठी अपरिहार्यपणे मुख्य केंद्र बनला आहे. युक्रेन युद्धामुळे रशियाच्या धोरणांमध्ये बदल होऊन भारत-प्रशांत क्षेत्राला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. या पार्श्वभूमीवर, शीतयुद्धाच्या समाप्तीनंतर उत्तर कोरियाशी असलेल्या संदर्भहीन संबंधांना रशियाकडून संजीवनी देण्यात आली आहे. या दोन्ही देशांमधील वाढती जवळीक हा त्यांच्या दुर्बळ होणाऱ्या अंतर्गत राजकीय परिस्थितीचा भाग आहे. तरीही ईशान्य आशिया क्षेत्राला सध्या किंवा नंतर सामोऱ्या जाव्या लागणाऱ्या एका मोठ्या बदलाचा हा एक लहानसा भाग आहे. ही सत्तेची वाढती समीकरणे आहेत. नवी भू-राजकीय समीकरणे जशी समोर येतील, तशी विविध देशांना उत्तर कोरिया आणि रशिया यांच्याप्रमाणे पुन्हा एकदा धोरणात्मक आढावा घेऊन त्यानुसार पुढील हालचाली कराव्या लागतील. उभय देशांच्या द्विपक्षीय संबंधांचे हे अमृतमहोत्सवी वर्ष असून रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन या वर्षी उत्तर कोरियाला भेट देण्याची शक्यता आहे. ही त्यांची त्या देशाला दिलेली २४ वर्षांनंतरची पहिलीच भेट असेल. सत्तेचा काटा ईशान्य आशियाकडे झुकत असल्याने या भू-राजकीय आघाडीच्या संदर्भाने रशिया-उत्तर कोरिया सहकार्याचे स्वरूप समजावून घेणे आवश्यक आहे.

रशिया व उत्तर कोरिया संबंधांचा मार्ग

उत्तर कोरिया आणि रशिया (आधीचे सोव्हिएत युनियन) या दोन देशांदरम्यानच्या संबंधांचा मागोवा घ्यायचा झाला, तर १९४० च्या अखेरीपर्यंत जावे लागेल. त्या काळात जोसेफ स्टॅलिन आणि किम २ संग यांच्या नेतृत्वाखाली उभय देशांचे संबंध बळकट झाले होते. शीत युद्धादरम्यान साम्यवादी देश या नात्याने असलेल्या सामायिक तत्त्वांच्या दिशेने रशिया-उत्तर कोरिया संबंध मोठ्या प्रमाणात वाढले. त्या वेळी सोव्हिएत युनियनवर स्टॅलिन यांची सत्ता होती; परंतु स्टॅलिन यांच्या मृत्यूनंतर उभय देशांचे संबंध उतरणीला लागले. कारण किम २ संग यांच्या राजकीय वर्चस्वाला आव्हान देण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. या धोरणामुळे उत्तर कोरियाचा रशियाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला. ही स्थिती १९५७ पर्यंत कायम राहिली. नंतर दुसरे मंत्रिमंडळ स्थापन झाले आणि त्यानंतर किम हे उत्तर कोरियाचे सर्वोसर्वा बनले.

सोव्हिएत युनियनच्या विघटनापर्यंत संबंधांमध्ये हळूहळू सुधारणा होत गेली. सोव्हिएत युनियनच्या विघटनाचे उत्तर कोरिया आणि उत्तर कोरियाच्या अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम झाले. मानवतावादावरील इतिहासातील सर्वांत मोठ्या संकटाला या काळात तोंड द्यावे लागले.

उत्तर कोरियाने १९६१ मध्ये रशिया व चीनदरम्यानच्या सहकार्य व साह्यासाठीच्या मैत्री करारावर सह्या केल्या. हल्ला झाला, तर राजवटीचा बचाव करण्याचे आश्वासन या करारात देण्यात आले होते. सोव्हिएत युनियनच्या विघटनापर्यंत संबंधांमध्ये हळूहळू सुधारणा होत गेली. सोव्हिएत युनियनच्या विघटनाचे उत्तर कोरिया आणि उत्तर कोरियाच्या अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम झाले. मानवतावादावरील इतिहासातील सर्वांत मोठ्या संकटाला या काळात तोंड द्यावे लागले. रशियाचे अध्यक्ष बोरिस येल्त्सिन यांच्या नेतृत्वाखाली उत्तर कोरियाबरोबरचे संबंध दुर्लक्षित राहिले. शतकाच्या अखेरीस संबंधांत सुधारणा होण्यासाठी पुतिन यांनी गंभीरपणे प्रयत्न केले; परंतु त्यात फारशी प्रगती झाली नाही. कारण उत्तर कोरियाने अमेरिकेशी वाटाघाटी करण्यास सुरुवात केली होती. पण उत्तर कोरियाने आपल्या पहिल्या अण्वस्त्राची चाचणी केल्याने या वाटाघाटींना अपयश आले. त्यानंतर संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा मंडळाने उत्तर कोरियावर घातलेल्या निर्बंधांचे रशिया व चीनने समर्थन केले. त्याचा उत्तर कोरियाच्या रशियाशी असलेल्या संबंधांवर प्रतिकूल परिणाम झाला. मात्र, रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्यावर परिस्थितीत बदल झाला. कारण ईशान्य आशियात झालेल्या नव्या आघाडीच्या विरोधात एकत्र येण्याची संधी या दोन्ही देशांना मिळाली.

युक्रेन युद्धादरम्यान रशिया-उत्तर कोरिया संबंध

गेल्या वर्षी म्हणजे २०२३ मध्ये रशियाच्या संरक्षणमंत्र्यांनी उत्तर कोरियाला भेट दिली. त्या पाठोपाठ किम जोंग उन यांनी रशियाचा दौरा केला. कोव्हिड-१९ साथोरानंतरचा किम यांचा हा पहिलाच परदेश दौरा होता. किम यांच्या भेटीनंतर उत्तर कोरियाचे परराष्ट्रमंत्री चो सन वे रशियाच्या दौऱ्यावर आले आणि रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्जे लाव्हरोव्ह यांनी उभय देशांमधील संबंध मजबूत करण्याच्या दृष्टीने चर्चा करण्यासाठी उत्तर कोरियाला भेट दिली. या सर्व भेटीगाठींमुळे उभय देशांमधील द्विपक्षीय, प्रादेशिक आणि संस्थात्मक पातळीवरील संबंधांना वेग आला. अलीकडेच, रशियाच्या परराष्ट्र गुप्तचर विभागाचे संचालक सर्जे नारश्कीन यांनी उत्तर कोरियाला भेट दिली. त्यानंतर संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा मंडळामध्ये एक अकल्पित निर्णय घेण्यात आला. सोव्हिएत युनियनने १७१८ मध्ये उत्तर कोरियावर घातलेले निर्बंध यापुढेही कायम ठेवण्याच्या संयुक्त राष्ट्रांच्या उत्तर कोरियाविषयक तज्ज्ञ मंडळाच्या निर्णयावर व्हेटो वापरून रशियाने हा निर्णय फेटाळला. उत्तर कोरियाला पाठिंबा देण्याच्या या जाहीर कृतीमुळे रशियाचे दक्षिण कोरिया आणि जपानसारख्या अमेरिकेच्या मित्रदेशांशी असलेले संबंधही बिघडले. पुढे युक्रेनच्या संघर्षादरम्यान उत्तर कोरियाने रशियाची बाजू घेण्याची संधी घेऊन युद्धाला आपला स्पष्ट पाठिंबा दिला. केवळ संधीसाधू चाल अशी याची सुरुवात झाली असली, तरी पुढील काळात हा भरीव पाठिंबा ठरला. रशियाला उत्तर कोरियाकडून शस्त्रास्त्रांचा पुरवठा करण्यात आला. त्यामुळे रशिया-युक्रेन युद्धात खळबळ उडाली. त्याच पद्धतीने उत्तर कोरियालाही गेल्या वर्षी गुप्तचर उपग्रह प्रक्षेपणासाठी तांत्रिक मदत मिळाली होती.

उत्तर कोरियातील हजारो नागरिक रशियामध्ये कामासाठी वास्तव्य करतात. कॉमनवेल्थ इन्डिपेंडन्ट स्टेट्स (सीआयएस) चे स्थलांतरित मजूर रशिया सोडून जाऊ लागल्याने रशियन कंपन्या उत्तर कोरियातील श्रमिकांना काम देण्यास उत्सुक आहेत.

उत्तर कोरियाला आपल्या संरक्षण दलाचे आधुनिकीकरण करण्यासाठी प्रयत्न करीत असल्याने नवा संरक्षण भागीदार मिळवण्याची त्यांची धडपड सुरू आहे. रशियाने उत्तर कोरियाशी संरक्षण भागीदारी जरी केली नाही, तरी तो देश उत्तर कोरियाच्या बिगरआण्विक क्षमता वाढवू शकतो. गेल्या काही वर्षांत उत्तर कोरिया आणि रशिया या देशांमधील नागरिकांचे आपसातील संबंधही सुधारले आहेत. उत्तर कोरियातील हजारो नागरिक रशियामध्ये कामासाठी वास्तव्य करतात. कॉमनवेल्थ इन्डिपेंडन्ट स्टेट्स (सीआयएस) चे स्थलांतरित मजूर रशिया सोडून जाऊ लागल्याने रशियन कंपन्या उत्तर कोरियातील श्रमिकांना काम देण्यास उत्सुक आहेत. २०२२ मध्ये रशियातील ३१ हजार कामगार उत्तर कोरियातून आले होते. याशिवाय, २०२३ च्या अखेरीस बांधकाम क्षेत्रातील दोन हजारपेक्षाही अधिक कामगारांना नोकरीवर घेण्यासाठी उत्तर कोरियाकडून अर्ज देण्यात आला होता. हे पाहता नजीकच्या काळात आणखी कामगार रशियात येण्याची दाट शक्यता आहे.

रशिया आणि भारत-प्रशांत क्षेत्र

संरक्षण साधनसामग्रीच्या तातडीच्या गरजेशिवाय या संबंधांना वळण देणारा आणखी एक प्रमुख घटक म्हणजे, आशिया-प्रशांत क्षेत्र. सध्या आकाराला येत असलेली अमेरिकेची नवी आघाडी आपल्या सुरक्षेला धोका आहे, असे उत्तर कोरियाला वाटते आहे. त्यामुळे या अघाडीला प्रत्युत्तर देण्यासाठी उत्तर कोरियाला रशियाशी असलेले संबंध वाढवायचे आहेत. विशेषतः आज रशियाला पाश्चात्य देशांनी धोरणात्मकरीत्या एकटे पाडल्याने रशिया हा आपला योग्य भागीदार आहे, असे उत्तर कोरियाला वाटते. या उलट, ईशान्य आशियातील बदलत्या राजकीय समीकरणांमध्ये भागीदार म्हणून आपले स्थान सुरक्षित करण्यासाठी रशियाला ही उत्तम संधी चालून आली आहे. कारण या क्षेत्रात धोरणात्मक हित असल्याचे रशियाला वाटते. आशिया-प्रशांत क्षेत्रातील विभाजनवादी धोरणांना प्रत्युत्तर देण्यासाठी एका व्यापक आंतरराष्ट्रीय सहकार्याचा विकास करावा, असे आवाहन रशियन संघराज्याच्या २०२३ च्या परराष्ट्र धोरणाच्या संकल्पनेअंतर्गत करण्यात आले आहे. यामधून आशिया-प्रशांत क्षेत्रात उत्तर कोरियाचे महत्त्व स्पष्टपणे समोर येते. पूर्व युरोप हे रशियाचे तातडीचे प्राधान्य असले, तरी अमेरिका आणि जपानच्या वाढत्या भागीदारीमुळे जपानशी असलेल्या आपल्या संरक्षण संबंधांसमोर आव्हान निर्माण होत असल्याकडेही रशियाचे लक्ष आहे. रशिया आणि जपान यांच्यामध्ये सागरी क्षेत्रावरून वाद आहेत. या प्रकारे रशिया आणि उत्तर कोरिया यांच्यातील धोरणात्मक भागीदारी ही उभय देशांच्या सामायिक हितसंबंधांसाठी करण्यात आली आहे. त्यांच्या सुरक्षेला धोका पोहोचवणाऱ्या कोणत्याही घटकांची धार कमी करणे, हे या संबंधांचे उद्दिष्ट आहे.

शिवाय, आशिया-प्रशांत क्षेत्रातील (भारत-प्रशांत क्षेत्र असेही संबोधले जाते) भू-राजकीय समीकरणांमधील आवश्यक भागीदार म्हणून आपले स्थान बळकट करण्याची रशियाला मिळालेली ही संधी आहे. हे स्थान अद्याप बळकट झालेले नाही. रशियाला भारत-प्रशांत क्षेत्रात बऱ्याच काळापासून आपले स्थान भक्कम करायचे होते. या क्षेत्रात विशेषतः उत्तर प्रशांत क्षेत्रात  कोणत्याही एका देशाचे वर्चस्व प्रस्थापित होऊ नये, असा रशियाचा प्रयत्न आहे. या धोरणाअंतर्गत, आशिया-प्रशांत क्षेत्रात रशियाच्या धोरणात्मक संबंधात वैविध्य आणण्यासाठी उत्तर कोरिया मदत करीत आहे. रशियासाठी ही कमी गुंतवणुकीत जास्त परताव्याची परिस्थिती आहे. रशियाला उत्तर कोरिया महत्त्वाचा आहे. कारण रशियाकडे अधिक खरेदीदार नाहीत आणि चीन व अमेरिकेच्या एकमेकांविषयीच्या धोरणांमध्ये चांगले संबंध ठेवता येतील, असा उत्तर कोरिया हा एक देश आहे, असे रशियाला वाटते. उभय देशांमध्ये यशस्वी संबंध प्रस्थापित झाले, तर आशिया-प्रशांत क्षेत्रात उत्तर कोरियाला अधिक महत्त्व येईल आणि रशिया व अगदी चीनकडूनही त्यांना आणखी फायदे मिळवता येतील. कारण उत्तर कोरियाला आता किंवा नंतर या दोन शेजारी देशांसमवेत आणखी दृश्य संबंध प्रस्थापित करता येऊ शकतात.

‘नाटो’चे सरचिटणीस जेन्स स्टॉलटोनबर्ग यांनी हुकूमशाही शक्तींच्या विरोधात उभ्या असलेल्या दोन्ही बाजूंना आणखी सहकार्यासाठी आवाहन केले आहे.

हे संबंध पुढे नेण्यासाठी आणखी काही घटक प्रयत्न करीत आहेत. त्यापैकी एक म्हणजे नाटो. युक्रेन युद्धाला सुरुवात झाल्यानंतर अमेरिका आणि जपानने एक नव्या संकल्पनेवर जोर दिला आहे. ती म्हणजे, ‘सुरक्षेत दुफळी नाही.’ याचा अर्थ, भारत-प्रशांत क्षेत्राची सुरक्षा युरोपच्या सुरक्षेशी जोडलेली आहे. या दोन्ही क्षेत्रांच्या सुरक्षेतील सामरिक संबंधाने उत्तर कोरिया आणि रशिया दोन्ही देशांना एक पर्याय म्हणून समोर ठेवले आहे. ही बाब नाटोच्या वार्षिक बैठकीत ठळक झाली. या बैठकीसाठी दक्षिण कोरिया आणि जपानला नियमितपणे आमंत्रण धाडले जाते. नाटोचे सरचिटणीस जेन्स स्टॉलटोनबर्ग यांनी हुकूमशाही शक्तींच्या विरोधात उभ्या असलेल्या दोन्ही बाजूंना आणखी सहकार्यासाठी आवाहन केले आहे. रशिया आणि उत्तर कोरिया यांच्या विरोधात उभ्या राहणाऱ्या आंतर-खंडीय आघाडीसंदर्भाने दोन्ही देश सावध आहेत. चीन हा चर्चेचा सातत्याने उपस्थित होणारा मुद्दा असला, तरी चीनला हवे तेवढे महत्त्व देण्यात आलेले नाही. त्यामुळे या संबंधांमधील प्रेरक घटक हे अल्पकालीन व दीर्घकालीन असे दोन्हीही आहेत.   

चीनचा मुद्दा आणि पुढील मार्गक्रमण

रशिया आणि उत्तर कोरिया यांच्या संबंधात अपेक्षेपेक्षाही वेगाने वाढ होत असताना चीनच्या उत्तर कोरियाकडे पाहण्याच्या दृष्टिकोनातही फरक पडलेला आपल्याला दिसतो. रशिया व उत्तर कोरियाच्या संबंधांवर चीनने आजवर सौम्य भाष्य केले आहे. मात्र, त्याच वेळी चीनने उत्तर कोरियाशी संबंध वाढवले. उत्तर कोरिया व रशियाच्या संबंधांना मंजुरी असल्याचे चीनच्या सौम्य भाषेतून दिसून येते. चीनच्या मंजुरीचे कारण त्या देशाच्या धोरणात्मक समीकरणांमध्ये दडले आहे. या प्रदेशातील आपले वर्चस्व धोक्यात आणण्याची क्षमता असलेल्या त्रिपक्षीय सुरक्षा यंत्रणेला कमकुवत करणे, हे चीनचे उद्दिष्ट आहे. भारत-प्रशांत क्षेत्रामध्ये आपले जाळे विस्तारण्याचा अमेरिकेकडून प्रयत्न सुरू असल्याच्या पार्श्वभूमीवर आपले भू-राजकीय स्थान धोक्यात येत आहे, असे चीनला वाटले, तर उत्तर कोरियाशी अधिक जवळचे संबंध प्रस्थापित करणे, चीनला भाग पडणार आहे. उत्तर कोरियाच्या अर्थव्यवस्थेला रशिया व चीन यांचे एकत्रित पाठबळ मिळाले, तर अमेरिका व त्याच्या मित्र देशांनी २००९ पासून उत्तर कोरियावर लादलेल्या प्रतिबंधांच्या सर्व प्रयत्नांवर पाणी फिरेल. असे झाले, तर १९५० मध्ये जसे कोरियन युद्धाला तोंड फुटले होते, तसे आणखी एका सक्रिय शीतयुद्धाला सुरुवात होईल. युक्रेनमधील युद्धाने ‘बटरफ्लाय इफेक्ट’ (लहानशा बदलामुळे खूप मोठे परिणाम होण्याचा धोका) निर्माण झाला आहे. त्यामुळे ईशान्य आशियातील सुरक्षा परिस्थिती बदलू शकते. याची पहिली झलक रशिया-उत्तर कोरिया संबंधांमधून दिसते. येत्या काही वर्षांत, ईशान्य आशियामध्ये होणाऱ्या भू-राजकीय घडामोडींकडे लक्ष ठेवणे चित्तवेधक ठरणार आहे. शिवाय, यामध्ये संघर्षाची शक्यता फारच कमी आहे.


अभिषेक शर्मा आणि राजोली सिद्धार्थ जयप्रकाश हे ओआरएफच्या स्ट्रॅटेजिक स्टडीज प्रोग्रॅमचे संशोधन सहाय्यक आहेत. 

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.

Authors

Abhishek Sharma

Abhishek Sharma

Abhishek Sharma is a Research Assistant with ORF’s Strategic Studies Programme. His research focuses on the Indo-Pacific regional security and geopolitical developments with a special ...

Read More +
Rajoli Siddharth Jayaprakash

Rajoli Siddharth Jayaprakash

Rajoli Siddharth Jayaprakash is a Research Assistant with the ORF Strategic Studies programme, focusing on Russia's domestic politics and economy, Russia's grand strategy, and India-Russia ...

Read More +