Author : Sameer Patil

Expert Speak Raisina Debates
Published on Jun 02, 2025 Updated 3 Hours ago

भारताने ऑपरेशन सिंदूर सुरू केल्यावर मालवेअर, खोटी माहिती आणि डिजिटल हल्ल्यांच्या माध्यमातून सायबरस्पेस ही रणभूमी बनली. भारत-पाकिस्तान संघर्षातील ही एक नवी आघाडी बनली आहे.

ऑपरेशन सिंदूर आणि पाकचे भारतावरील सायबर हल्ले

Image Source: Getty

    पहलगाममध्ये २२ मे २०२५ रोजी झालेला दहशतवादी हल्ला आणि त्यानंतर सात मे रोजी सुरू झालेले ऑपरेशन सिंदूर या घटनांमुळे भारत व पाकिस्तानमधील संघर्ष तीव्र बनला आणि सायबरस्पेस ही एक महत्त्वाची रणभूमी म्हणून आकारास आली. पाकिस्तानमधील विघातक घटकांकडून भारताच्या सायबरस्पेसवर आणि कम्प्युटर नेटवर्कवर असंख्य सायबरहल्ले करण्यात आले. त्याच वेळी सरकारशी संबंधित प्रचार मोहिमांमध्येही वाढ झाली. भारत-पाकिस्तान संघर्षादरम्यान सायबरस्पेस हे सक्रिय आणि समन्वयीत संघर्षाचे ठिकाण बनण्याची ही पहिलीच घटना आहे.

    सध्याच्या संघर्षात पाकिस्तानी विघातक घटकांकडून करण्यात आलेल्या सायबर मोहिमांनी भारतविरोधी लष्करी मोहिमेच्या डिजिटल व्यापकतेसाठी पूरक भूमिका बजावली. ‘युद्धाचे ढग’ निर्माण करणे हा या मोहिमांचा उद्देश असला, तरी त्याचा परिणाम मर्यादित प्रमाणात झाला.       

    पुलवामा-बालाकोट युद्धादरम्यान २०१९ मध्ये सायबर स्पर्धा तुलनेने मर्यादित राहिली. २०१९ च्या आधी पाकिस्तानमधून होणाऱ्या विघातक सायबर हालचालींचे बरेचसे स्वरूप ‘जशास तसे’ हॅकिंग आणि भारताच्या सरकारी वेबसाइट्सचे विकृतीकरण करण्यापुरते मर्यादित होते. अलीकडील आठवड्यांमध्ये दिसून आल्याप्रमाणे अशा प्रकारच्या हालचाली सुरूच राहिल्या, तरी पाकिस्तानशी संबंधित विघातक घटक अधिक प्रगत आणि लक्ष्यीत झाले आहेत. कोव्हिड-१९ साथरोगादरम्यान या बदलाला वेग आला. या बदलाला चीनची लक्षणीय मदत मिळाली.

    सध्याच्या संघर्षात पाकिस्तानी विघातक घटकांकडून करण्यात आलेल्या सायबर मोहिमांनी भारतविरोधी लष्करी मोहिमेच्या डिजिटल व्यापकतेसाठी पूरक भूमिका बजावली. ‘युद्धाचे ढग’ निर्माण करणे हा या मोहिमांचा उद्देश असला, तरी त्याचा परिणाम मर्यादित प्रमाणात झाला. पाकिस्तानशी संबंधित विघातक घटकांच्या द्वेषयुक्त कृतींचे तीन विभागात वर्गीकरण करता येऊ शकते : भारतीय वेबसाइट्सचे विकृतीकरण, मालवेअर, ॲडव्हान्स्ड पर्सिस्टंट थ्रेट्स (APT) आणि सायबरस्पेसमध्ये भारताच्या विरोधातील खोटी माहिती प्रसारित करणे.

    भारतीय वेबसाइट्सचे विकृतीकरण

    ऑपरेशन सिंदूर सुरू होण्याच्या आधीच्या काही दिवसांमध्ये पाकिस्तानमधील हॅकरनी भारतीय वेबसाइट्सचे विकृतीकरण करण्याची नेहमीची कृत्ये पुन्हा सुरू केली होती. भारताच्या संरक्षण संस्था, स्थानिक सरकारी पोर्टल आणि अगदी एका ‘थिंक टँक’लाही लक्ष्य केले होते. या संस्थांच्या वेबसाइट्सचे विकृतीकरण आणि हँकिंग करण्यात आले होते. एका प्रकरणात, संरक्षण सार्वजनिक क्षेत्रातील युनिट असलेल्या आर्मड व्हेईकल निगम लि.च्या वेबसाइटवर पाकिस्तानचा ध्वज आणि पाकिस्तानी लष्कराचा अल खलिद रणगाडा दाखवण्यात आला होता. काही माध्यमांनी डेटामध्ये फेरफार केल्याचे वृत्तही दिले होते. मात्र या दाव्यांना पुष्टी मिळू शकली नाही.

    अशा विकृतीकरणाच्या कृती मोठ्या प्रमाणात प्रतीकात्मक असतात. त्यांचा उद्देश प्रणालीत नुकसान करण्याऐवजी क्षमता दाखवणे आणि लक्ष वेधून घेणे हा असतो; परंतु तणाव वाढला असताना मालवेअर आणि एपीटीच्या स्वरूपात एक अधिक गंभीर धोका निर्माण झाला.

    मालवेअर आणि एपीटी

    पहलगाम हल्ल्यानंतर अनेक सरकारी आणि न्याय संस्थांनी भारताच्या महत्त्वाच्या पायाभूत सुविधांवरील सायबर हल्ल्यांमध्ये वाढ करण्याचा इशारा पाकिस्तानमधील विघातक घटकांनी दिला होता. सायबर हल्ल्यांचे प्रकार घडू शकतात, असा सावधगिरीचा इशारा कम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम इंडिया (सीईआरटी-इन)ने देशातील आर्थिक संस्था आणि महत्त्वाच्या विभागांना दिला होता. त्याचप्रमाणे पाकिस्तानातील विघातक घटकांकडून फिशिंग होण्याच्या धोक्याचा इशारा तमिळनाडू पोलिस आणि हिमाचल पोलिसांनी दिला होता.

    बांगलादेश, इंडोनेशिया आणि मोरोक्कोसह अन्य देशांमधून होणाऱ्या विघातक सायबर कृत्यांमध्येही वाढ झाल्याचे या अहवालात अधोरेखित करण्यात आले आहे. कदाचित पाकिस्तानच्या कारवायांवर पडदा टाकण्यासाठी आणि पाकिस्तानवरून लक्ष विचलित करण्यासाठी त्या देशांकडून अशी कृत्ये करण्यात आली असावीत.

    भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त जम्मू काश्मीर (PoJK)मधील दहशतवाद्यांच्या तळांवर क्षेपणास्त्र हल्ले सुरू केल्यानंतर भारताविरुद्धच्या ‘डिस्ट्रिब्युटेड डिनायल ऑफ सर्व्हिस’ (DDoS) हल्ल्यांमध्ये वाढ झाल्याचे निरीक्षण सायबर सुरक्षा तज्ज्ञांनी नोंदवले होते. ‘टेक्नियाकँक्ट’ या भारताच्या सायबर सुरक्षा कंपनीच्या मते डीडीओएस हल्ल्यांमध्ये प्राप्तीकर विभाग, हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड, भारतीय रेल्वे आणि भारत संचार निगम लिमिटेड यांसह प्रमुख सरकारी संस्थांना लक्ष्य करण्यात आले होते. संघर्षाच्या काळात १५ लाखांपेक्षाही अधिक हल्ल्यांची नोंद महाराष्ट्र सायबरच्या ‘रोड ऑफ सिंदूर’ या अहवालात करण्यात आली आहे. त्यांपैकी १५० हल्ले भारताच्या डिजिटल सुविधांमध्ये घुसून केले आहेत. त्यात डीडीओएस हल्ले, मालवेअर घुसखोरी आणि अगदी ग्लोबल पोझिशनिंग सिस्टिम (GPS) स्पूफिंगचा समावेश होतो. बांगलादेश, इंडोनेशिया आणि मोरोक्कोसह अन्य देशांमधून होणाऱ्या विघातक सायबर कृत्यांमध्येही वाढ झाल्याचे या अहवालात अधोरेखित करण्यात आले आहे. कदाचित पाकिस्तानच्या कारवायांवर पडदा टाकण्यासाठी आणि पाकिस्तानवरून लक्ष विचलित करण्यासाठी त्या देशांकडून अशी कृत्ये करण्यात आली असावीत.

    या सायबर हल्ल्यांमध्ये सहभागी असलेला एक प्रमुख एपीटी म्हणजे पाकिस्तानमधील एपीटी-३६ हा विघातक घटक. त्याला ‘ट्रान्स्परंट ट्राइब अँड अर्थ कारकडन’ असेही म्हणतात. अहवालानुसार, पहलगाम हल्ला झाल्यानंतर भारतीय सरकारी अधिकारी आणि संरक्षण विभागातील कर्मचाऱ्यांना लक्ष्य करून ‘क्रिम्सन रिमोट ॲक्सेस ट्रोजन’ (आरएटी) मालवेअर सोडला गेला. एपीटी-३६ हे संवेदनशील आणि गुप्त माहिती मिळवण्यासाठी भारत सरकार, संरक्षण नेटवर्क आणि संघटनांवर सातत्याने हल्ला करते. या विघातक घटकाने यापूर्वी अनेक चाली केल्या आहेत. त्यात कवच ॲपची नक्कल करण्यासाठी नवीन डोमेन तयार करणे (भारत सरकारच्या ईमेल सेवेवर सुरक्षित लॉगीन करण्यासाठी वापरले जाते.) याचा समावेश होतो.

    खोटी माहिती आणि खोटा प्रचार

    दोन्ही देशांमधील तणाव वाढत असताना पाकिस्तानातील अनेक विघातक घटक आणि सोशल मीडिया हँडलनी पहलगाम हल्ल्याला ‘फॉल्स फ्लॅग’ ऑपरेशन असे भासवण्यासाठी भारतविरोधी समन्वयीत खोटी माहिती आणि प्रचार मोहिमा राबवल्या. त्याचप्रमाणे ऑपरेशन सिंदूर हे नागरिकांवर हल्ला करण्यासाठी होते, असा आभास निर्माण केला. भारतीय नागरिकांची फसवणूक करण्यासाठी आणि त्यांची दिशाभूल करण्यासाठी व त्यांची विचारसरणी दूषित करण्यासाठी हे केले गेले. अन्य कथ्यांमध्ये पाकिस्तानी हल्ल्यांमुळे भारताच्या लष्करी सुविधांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे भासवून पाकिस्तानात घुसून हल्ला करण्याच्या भारताच्या लष्करी क्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले.

    यातील बहुतेक खोटी माहिती एक्स (आधीचे ट्विटर)वरून पसरवण्यात आली. ते आता भारतविरोधी प्रचाराचे केंद्र बनले आहे. भारत सरकारने या व्यासपीठावरील आठ हजारांपेक्षाही अधिक अकाउंट हटवण्याची विनंती केल्याचे वृत्त आहे.

    सायबर संरक्षणाच्या बाबतीत पाकिस्तानने जेव्हा १० मे २०२५ रोजी भारतीय शहरे आणि लष्करी सुविधांना लक्ष्य करून ऑपरेशन बुन्यान मर्सूस सुरू केले, त्या वेळी पाकिस्तानची मीडिया हँडल खोटी माहिती पसरवण्याच्या सुनामीत गुंतली होती. पाकिस्तानी हॅकरनी भारताच्या अनेक महत्त्वपूर्ण पायाभूत सुविधांमध्ये घुसखोरी केल्याचे दावे ते करत होते. भारतातील ७० टक्के वीजपुरवठा खंडीत झाल्याची निखालस खोटी माहितीही पसरवण्यात आली होती.

    चीनची भूमिका

    पाकिस्तानची लष्करी क्षमता वाढवण्यातील चीनचा वाटा सर्वज्ञात आहे. अलीकडच्याच संघर्षादरम्यान ही बाब स्पष्ट झाली आहे. आता पाकिस्तानची सायबर क्षमता वाढवण्यात आणि त्यांचे प्रचाराचे नेटवर्क विस्तारण्यात चीनचा हात होता, ही गोष्टही यातून अधोरेखित झाली आहे. भारताविरुद्धच्या एपीटी-३६ च्या विघातक मोहिमांना विशेषतः चीन-पाकिस्तान आर्थिक कॉरिडॉर (सीपीईसी) अंतर्गत चीनच्या मदतीचे बळ असल्याचा अंदाज बऱ्याच काळापासून आहे. सीपीईसीमध्ये पाकिस्तानसाठी इन्फर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी (आयसीटी) आधारित डेव्हलपमेंट कॉम्पोनंटचा समावेश आहे.

    पाकिस्तान आणि चीनमधील या वाढत्या सायबर आघाडीमुळे भारतासाठी संभाव्य ‘दोन आघाड्यांवर युद्ध’ होण्याची भीती अधिकच वाढली आहे. हे युद्ध भौतिक आणि डिजिटल डोमेनवर एकाचवेळी लढले जाईल आणि ते चीन व पाकिस्तानदरम्यानच्या समन्वयाने लढवले जाईल.

    विशेषतः भारताच्या विरोधात खोटी माहिती पसरवण्याच्या आणि प्रचाराच्या बाबतीत ही पद्धत दिसून येते. पूर्वी पाकिस्तानच्या सोशल मीडिया हँडलनी भारत-चीन सीमा वादावर अनेकदा चीनच्या कथ्याच्या (नरेटिव्ह) सूरात सूर मिसळला होता. या वेळी चीनच्या प्रसार माध्यमांनी आणि सोशल मीडिया हँडलनी पाकिस्तानच्या भारतविरोधी प्रचाराचा फैलाव व विस्तार केला. शिनुआ आणि चायना ग्लोबल टेलिव्हिजन नेटवर्कसारख्या वृत्तसंस्थांच्या सोशल मीडिया अकाउंटनी सातत्याने पाकिस्तानचे खोटे दावे केले. त्यात भारताने नागरी संस्थांवर हवाई हल्ले केले आणि पाकिस्तानी हॅकरनी भारतातील वीजपुरवठा खंडीत केल्यासारख्या खोट्या माहितीचा समावेश होतो. पंजाबच्या आदमपूर हवाई तळावर हल्ला करून एस-४०० क्षेपणास्त्र यंत्रणा उद्ध्वस्त केल्याचे पाकिस्तानने दिलेले खोटे वृत्त शिनुआ या वृत्तसंस्थेने पसरवले होते.

    पाकिस्तान आणि चीनमधील या वाढत्या सायबर आघाडीमुळे भारतासाठी संभाव्य ‘दोन आघाड्यांवर युद्ध’ होण्याची भीती अधिकच वाढली आहे. हे युद्ध भौतिक आणि डिजिटल डोमेनवर एकाचवेळी लढले जाईल आणि ते चीन व पाकिस्तानदरम्यानच्या समन्वयाने लढवले जाईल.

    निष्कर्ष

    सायबर मोहिमा या लष्करी मोहिमांना कशा पूरक ठरतात, हे युक्रेन आणि आखाती देशांमधील संघर्षांनी २०२२ पासून दाखवून दिले आहे. परिणामी, सायबरस्पेसची विकसित होणारी भूमिका समकालीन युद्धांचे एक लक्षणीय वैशिष्ट्य बनली आहे. सध्या सुरू असलेल्या भारत-पाकिस्तान संघर्षाने यास एक नवा आयाम दिला आहे. तो म्हणजे, सायबरस्पेस आता सहाय्यक राहिलेला नाही, तर दोन्ही देशांसाठी त्यांचे कौशल्य दाखवण्यासाठी, एकमेकांच्या कम्प्युटर नेटवर्कमध्ये घुसण्यासाठी आणि केवळ स्थानिक स्तरावरच नव्हे, तर जागतिक समुदायाला लक्ष्य करून ‘कथ्याचे युद्ध’ (नरेटिव्ह वॉरफेअर) खेळण्यासाठीचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे.


    समीर पाटील हे ‘ऑब्झर्व्हर रीसर्च फाउंडेशन’मधील ‘सेंटर फॉर सिक्युरिटी, स्ट्रॅटेजी अँड टेक्नॉलॉजी’चे डिरेक्टर आहेत.

    The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.