Expert Speak India Matters
Published on Mar 15, 2024 Updated 0 Hours ago

ओझे मानले जात असूनही, वृद्ध स्त्रिया, विशेषत: कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबातील, बिनपगारी आणि कमी पगाराच्या कामातून खूप योगदान देतात आणि त्यांचे योगदान अपरिचित होते.

वृद्ध महिला: ‘दडलेले कार्यबल’ आणि ज्या अजिबात अवलंबून नाहीत!

हा लेख ‘आंतरराष्ट्रीय महिला दिन’ या मालिकेचा भाग आहे.


वर्षाची ती वेळ पुन्हा आली आहे, जेव्हा सर्वचजण लैंगिक समानतेवर विचार व्यक्त करतात, ज्यात महिला कामगारांचे शोषण करणारे सौंदर्यप्रसाधनांचे ब्रँड्सही आले, ज्यांच्याकडील नेतृत्वाच्या उच्च पदांवर महिला अभावानेच असतात आणि जे बहुतांश सौंदर्य उत्पादनांमधील आवश्यक घटक असणारा अभ्रक (सौंदर्य उत्पादने बनवण्यासाठी वापरण्यात येणारा एक आवश्यक घटक) झारखंडमधील बेकायदेशीर खाणींतून अभ्रक मिळवतात, जिथे स्त्रिया आणि मुले अत्यंत धोकादायक परिस्थितीत काम करतात आणि त्यांना खूप कमी मोबदला दिला जातो. महिलांबद्दलची त्यांची खोटी चिंता केवळ त्या महिलांच्या समूहापुरती मर्यादित आहे, ज्यांना त्यांची महागडी सौंदर्य उत्पादने खरेदी करणे परवडते. हे सांगण्याची गरज नाही की, चुकीच्या स्त्रीवादाची ही आवृत्ती भारतासारख्या विकसनशील देशातील गरीब वृद्ध महिलांच्या संरचनात्मक दडपशाहीबद्दल चिंता करत नाहीत, ज्यांना महागडी सौंदर्य उत्पादने परवडत नाहीत. दुर्दैवाने, लैंगिक समानतेवरील जागतिक चर्चाविश्वाने वृद्ध महिलांच्या चिंतेकडेही दुर्लक्ष केले आहे. बहुतांश लक्ष तरुण मुलींना शिक्षित करण्याकडे आणि पौगंडावस्थेतील मुली व गर्भवती महिलांच्या पोषणाला आणि आरोग्यसेवेला प्राधान्य देण्यावर केंद्रित केले जाते, तर वृद्ध महिलांच्या चिंतांवर धोरणात्मक चर्चेत क्वचितच चर्चा केली जाते. स्त्री-पुरुष समानता तेव्हाच प्रत्यक्षात येईल, जेव्हा सर्व वयोगटातील महिला सक्षम होतील आणि सन्मानाने जीवन जगू शकतील.

जगभरातील वृद्ध स्त्रिया कोणत्याही स्वीकृतीशिवाय अथवा साह्याशिवाय त्यांच्या पगारी आणि बिनपगारी कामाद्वारे त्यांच्या कुटुंबासाठी, समुदायासाठी आणि अर्थव्यवस्थेसाठी महत्त्वपूर्ण योगदान देतात.

हा लेख म्हणजे ब्रिटिश समाजशास्त्रज्ञ डायन एल्सन यांनी म्हटल्याप्रमाणे, वय आणि लिंग या दोन्हींमुळे वंचित असलेल्या वृद्ध महिलांवर प्रकाशझोत टाकत आंतरराष्ट्रीय महिला दिनावर त्यांचा असलेला हक्क सांगण्याचा एक छोटासा प्रयत्न आहे. विशेषत: गरीब कुटुंबातील वृद्ध स्त्रिया, बहुतेकदा कुटुंबांसाठी आणि सरकारसाठी समस्या मानल्या जातात, कारण सांभाळ करण्याची उच्च गरजा असलेल्या त्यांना आश्रित मानले जाते. मात्र, जगभरातील वृद्ध स्त्रिया कोणत्याही मान्यतेशिवाय किंवा सहाय्याशिवाय त्यांच्या पगारी आणि बिनपगारी कामाद्वारे त्यांच्या कुटुंबासाठी, समुदायासाठी आणि अर्थव्यवस्थेसाठी महत्त्वपूर्ण योगदान देतात. बहुतांश विकसनशील देशांमध्ये नातवंडांची काळजी घेणे, शेती करणे, स्वयंपाक करणे, साफसफाई करणे, पाणी आणणे इत्यादी घरगुती कामे वृद्ध स्त्रिया करतात. आणि अनौपचारिक क्षेत्रातील नोकऱ्यांतून आणि तुटपुंज्या उत्पादनातून स्वतःचा आणि त्यांच्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह करण्यासाठी पैसे मिळवतात, अनेकदा त्या गंभीर आरोग्यविषयक समस्येशी आणि अपंगत्वाशी लढा देत हे सारे निभावत असतात.

‘एज इंटरनॅशनल’च्या अलीकडील अहवालात वृद्ध महिलांना ‘दडलेले कार्यबल’ म्हटले आहे. वृद्ध स्त्रिया, सरासरी ४.३ तास अत्यावश्यक घरगुती कामात आणि विनावेतन सांभाळ करण्याविषयीच्या कामात व्यग्र असतात. अधिकाधिक तरुण स्त्रिया श्रमशक्तीत प्रवेश करत असल्याने, आजी नातवंडांचे संगोपन करण्याच्या मोठ्या जबाबदाऱ्या स्वीकारत आहे. अनेक गरीब कुटुंबांमध्ये, वृद्ध महिला अनौपचारिक क्षेत्रातील त्यांच्या कामातून अल्प उत्पन्न कमावतात, घरासाठी अन्न आणि इतर आवश्यक गोष्टी मिळवण्यातही महत्त्वाची भूमिका बजावतात. बहुतेक विकसनशील अर्थव्यवस्थांमध्ये वृद्ध महिलाही कृषी क्षेत्रात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. खेड्यांतून मोठ्या शहरांकडे अधिक युवा स्त्री-पुरुष स्थलांतरित झाल्यामुळे, शेतीची अधिकची कामे वृद्ध महिलांना करावी लागत आहेत. ‘एज इंटरनॅशनल’च्या अहवालानुसार, कोविड-१९ साथीपूर्वी, ६५ वर्षांवरील ७ पैकी १ महिला कमी आणि मध्यम-उत्पन्न असलेल्या देशांमध्ये मोबदला मिळणारे काम करायची, तर उच्च उत्पन्न असलेल्या देशांमध्ये ६५ वर्षांवरील १० पैकी १ महिला मोबदला मिळणारे काम करायची. उप-सहारा आफ्रिकेत ही संख्या विशेषतः जास्त होती, जिथे ६५ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या ५ पैकी २ महिला मोबदला मिळणारे काम करायच्या.

खेड्यांतून मोठ्या शहरांकडे अधिक युवा स्त्री-पुरुष स्थलांतरित झाल्यामुळे, शेतीची अधिकची कामे वृद्ध महिलांना करावी लागत आहेत.

वृद्ध स्त्रिया अनौपचारिक क्षेत्रातील त्यांच्या मोबदला न मिळणाऱ्या सांभाळ करावयाच्या कामातून आणि मोबदला देणाऱ्या कामातून जे महत्त्वपूर्ण योगदान देतात, त्याकडे धोरणकर्त्यांनी पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे; याचे कारण सरकारी आकडेवारीत त्यांच्या आर्थिक योगदानाची नोंद करण्याची रचना तयार करण्यात आलेली नाही. महिला विना मोबदला सांभाळ करण्याचे जे महत्त्वाचे काम करतात, त्याला सरकार क्वचितच मान्यता देते. शिवाय, काम करणाऱ्या वयात असलेली लोकसंख्या साधारणपणे १५ ते ६० वर्षांच्या दरम्यानची असते, असे परिभाषित केले जाते. परिणामी, बहुतेक सरकारी अहवाल आणि सर्वेक्षणात अनौपचारिक क्षेत्राला कमी लेखले जाते, जिथे मोठ्या प्रमाणात वयस्कर महिला काम करतात.

भारतातील सार्वजनिक चर्चा मुख्यतः लोकसंख्याशास्त्रीय लाभांशावर केंद्रित असते, कारण देशात युवकांची संख्या मोठी आहे. मात्र, देशात वृद्ध लोकांची मोठी आणि वाढती लोकसंख्या आहे, परंतु वृद्धांकडे धोरणात आणि सामाजिकदृष्ट्या पुरेसे लक्ष पुरवले जात नाही. वृद्ध महिलांची कुटुंबात आणि समाजातील सदस्यांकरवी काळजी घेतली जाईल, हे गृहितक आता खरे ठरणार नाही, याचे कारण आधुनिक जगाच्या गुंतागुंतीमुळे पारंपरिक कौटुंबिक आणि समुदाय संबंधांचे स्वरूप आता बदलत आहे. महिलांना त्यांच्या आयुष्याच्या उत्तरार्धात सन्मान आणि कल्याण सुनिश्चित करण्याच्या दिशेने पहिले पाऊल म्हणजे मानसिकतेत बदल. सर्वप्रथम, वृद्ध महिलांना अवलंबून न राहता समाजाचे योगदान देणारे सदस्य मानले गेले पाहिजे. दुसरे म्हणजे, विनामोबदला सांभाळ करण्याचे काम. विशेषत: नातवंडांची काळजी घेणे, बहुतेक वृद्ध महिलांना समाधान देणारे असले तरी, त्यांच्या आर्थिक योगदानाची दखल घेणे आवश्यक आहे. तिसरे म्हणजे, वृद्ध महिलांच्या मोबदला देणाऱ्या कामाचे आर्थिक महत्त्व मोजले जायला हवे.

वृद्ध महिलांची कुटुंबात आणि समाजातील सदस्यांकडून काळजी घेतली जाईल, हे गृहितक आता खरे ठरणार नाही, याचे कारण आधुनिक जगाच्या गुंतागुंतीमुळे पारंपरिक कौटुंबिक आणि समुदाय संबंधांचे स्वरूप आता बदलत आहे.

वृद्ध स्त्रिया करत असलेल्या मोबदला मिळणाऱ्या कामाच्या मूल्याचा अधिक चांगला अंदाज येण्याकरता, कामकाजाच्या वयोगटातील लोकसंख्येत आवश्यक व्याख्यात्मक बदल करणे आवश्यक आहे. तसेच, आर्थिक स्वातंत्र्य वृद्ध महिलांकरता लाभदायक ठरत असताना, हेदेखील स्पष्ट आहे की, वृद्ध स्त्रिया करत असलेले बरेचसे काम योग्य स्वरूपाचे नसते आणि म्हणून बहुतेकदा त्या निराश होत काम सोडतात. त्यामुळे वृद्ध महिलांना कामाच्या ठिकाणी होणाऱ्या शोषणापासून वाचवणेही महत्त्वाचे आहे. अखेरीस, सरकारने वृद्ध सेवांचा दर्जा सुधारायला हवा आणि वृद्ध महिलांच्या सामाजिक सुरक्षेसाठी आणि आरोग्यासाठी चांगल्या तरतुदी करायला हव्या.

मलंचा चक्रवर्ती ‘ऑब्झर्व्हर रिसर्च फाऊंडेशन’मध्ये वरिष्ठ फेलो आणि उपसंचालक (संशोधन) आहेत.

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.