Author : Soumya Bhowmick

Published on Apr 05, 2024 Updated 0 Hours ago
मार्जिनपासून केंद्रापर्यंत: G20 (+1) मध्ये आफ्रिकन युनियन

जी-२० च्या स्थायी सदस्यपदावर आफ्रिकी महासंघाची निवड ही जागतिक आर्थिक प्रशासन क्षेत्रातील एक लक्षणीय टप्पा आहे. या ऐतिहासिक घडामोडीमुळे आफ्रिकेचा वाढता प्रभाव अधोरेखित झाला आहे; तसेच एक उदयोन्मुख जागतिक सत्ताकेंद्र म्हणून या खंडाच्या क्षमतेची जाणीवही जगाला झालेली आहे, हे यातून लक्षात येते. जी-२० गटात जगाच्या एकूण देशांतर्गत उत्पन्नाच्या (जीडीपी) ८५ टक्के आणि आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या ७५ टक्क्यांहून अधिक भागाचा समावेश होतो. तरी या गटावर सर्वसमावेशक प्रतिनिधित्वाचा अभाव असलेली जागतिक संघटना, अशी टीका ‘ग्लोबल साउथ’कडून पूर्वापार केला जाते. आफ्रिकी महासंघाच्या सदस्यत्वाने सर्वसमावेशकतेच्या नव्या युगाची नांदी दिली असून प्रतिनिधित्वाची कमतरता भरून काढण्याच्या दिशेने टाकलेले हे एक पाऊलही आहे. त्याच वेळी या महत्त्वाच्या आर्थिक व्यासपीठावर आफ्रिकेतील ५५ देशांचा एकत्रित आवाज उमटण्यासाठी आश्वस्तही केले आहे.  

जी-२०मध्ये आफ्रिकाही एकवटल्यामुळे या खंडाच्या निर्विवाद आर्थिक महत्त्वावर शिक्कामोर्तब झाले आहे. आफ्रिकेचा जीडीपी जवळजवळ तीन ट्रिलियन डॉलरच्या जवळ असून आफ्रिका नैसर्गिक साधनसंपत्तीने समृद्ध आहे. त्यामध्ये जगातील साठ टक्के अक्षय उर्जेची क्षमता आणि कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण कमीतकमी करण्याच्या तंत्रज्ञानासाठी लागणाऱ्या खनिजांचा वाटाही आफ्रिकेकडे लक्षणीय आहे. या गोष्टींमुळे हा खंड जागतिक अर्थव्यवस्थेत व शाश्वत उर्जेच्या दिशेने होणाऱ्या परिवर्तनातील एक अपरिहार्य भागीदार ठरला आहे.

उपयुक्त आघाडी

आफ्रिकेची लोकसंख्या २०५० पर्यंत दुप्पट होणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर जागतिक स्तरावर वृद्धत्वाकडे कल असल्याच्या बरोबर उलट आफ्रिकेत रोजगारामध्ये तरुणांची संख्या वाढत आहे. त्यामुळे या खंडासाठी ही मोठी संधी समजली जात आहे. आफ्रिकेच्या वाढत्या लोकसंख्येमुळे उत्पादकता आणि आर्थिक वृद्धीची शक्यताही वाढली आहे. त्याचबरोबर यामुळे भरीव रोजगारनिर्मिती व या शक्यतेचा लाभ करून घेण्यासाठी अनुकूल वातावरणनिर्मिती करण्याच्या गरजेवरही प्रकाश टाकला आहे.

आकृती १ : उप-सहारा आफ्रिकेतील लोकसंख्येचे विभाजन. २०५० चा अंदाज

स्रोत : चार्लसन एट अल, संयुक्त राष्ट्रांची लोकसंख्येसंबंधीची माहिती

आफ्रिकेमध्ये जगातील सर्वाधिक तरुण राहतात आणि उप-सहारा आफ्रिकेत ७० टक्के लोकसंख्या तीस वर्षांपेक्षाही कमी वयाची आहे. लोकसंख्येच्या या लाभदायक स्थितीमध्ये आफ्रिकेच्या प्रगतीची प्रचंड क्षमता असून येणाऱ्या तरुण पिढ्यांना त्यांच्या क्षमतांची जाणीव करून देण्यासाठी पूर्णपणे सक्षम करणे गरजेचे आहे. बेरोजगारी आणि मर्यादित संधी यांसारखी आव्हाने असूनही आफ्रिकी तरुण आपल्या समाजाप्रति महत्त्वपूर्ण योगदान देतात, न्याय व समानतेचा पुरस्कार करतात आणि संघर्षग्रस्त भागांमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करतात. आता आफ्रिकी महासंघाला जी-२० मध्ये मिळालेले वरिष्ठ पद पाहता आफ्रिकेच्या विकासात अडथळा आणणाऱ्या गंभीर आव्हानांना तोंड देण्यासाठी हे एक महत्त्वपूर्ण व्यासपीठ म्हणून कार्य करू शकते. आफ्रिकेतील बेकायदा आर्थिक उलाढाल वर्षाला ८८.६ अब्ज डॉलरवर पोहोचली आहे. त्यातून या खंडातील संसाधनांचा ऱ्हास झालेला दिसून येतो; तसेच आर्थिक विकासासह शाश्वत विकास उद्दिष्टे व आफ्रिकी महासंघाच्या स्वतःच्या सन २०६३ पर्यंतच्या कार्यक्रमांमध्ये आलेला अडथळाही यातून स्पष्ट होतो. या बाह्य अडचणी व आफ्रिकेच्या विकासाच्या दिशेने हे स्रोत पुन्हा वळवण्यासाठी जी-२० च्या धोरणावर प्रभाव टाकण्याची क्षमता साह्यकारी ठरू शकते.

आफ्रिकी महासंघाच्या सदस्यत्वामुळे हवामान बदलासंबंधात जागतिक मतप्रवाह तयार करण्यामधील आफ्रिकेची भूमिका अधिक सशक्त होऊ शकते. सध्या जागतिक कार्बन उत्सर्जनामध्ये आफ्रिकेचा वाटा कमी असूनही ही प्रक्रिया क्षीण आहे. विशिष्ट प्रकारची आव्हाने व आफ्रिकी देशांचे योगदान यांचा विचार करून जागतिक पातळीवरील हवामान बदलविषयक उपक्रम आखले जातील, याची खात्री करून आफ्रिकी महासंघ आता जी-२० च्या माध्यमातून हवामान लवचिकता व शाश्वततेच्या बाबतीत आफ्रिका खंडाच्या हितासाठी भरीव प्रयत्न करू शकतो. त्याचप्रमाणे आफ्रिकी महासंघाच्या समावेशामुळे जी-२० देशांकडून निर्यात महसूल वाढण्याची अपेक्षा आहे. गेल्या दशकात तुलनेने तो कमी झाला होता.

 आकृती १ : जी-२० देशांनी आफ्रिकेतून केलेल्या आयातीचे मूल्य (अब्ज डॉलरमध्ये)

स्रोत :  डिव्हेलपमेंट रीइमॅजिन्ड

जागतिक निर्णयांवर अर्थपूर्ण प्रभाव पाडण्यासाठी सदस्य देशांच्या भिन्न हिताच्या गोष्टी एकत्र आणून एक संपूर्ण आफ्रिका खंड म्हणून एक आघाडी उघडण्याच्या क्षमतेवर आफ्रिकी महासंघाचे जी-२० मधील प्रभावी योगदान अवलंबून आहे. जी-२० च्या सर्व तांत्रिक कार्यगटांमध्ये आफ्रिकी हितसंबंध व्यक्त करण्यात व या हितसंबंधांचे प्रतिनिधित्व करण्यात आफ्रिकी महासंघ आयोग, आर्थिक विकास विभाग, व्यापार, पर्यटन उद्योग व खनिज विभाग निर्णायक ठरतील.

आफ्रिकी नेत्यांकडून सदस्यत्वाचे करण्यात आलेले उत्स्फूर्त स्वागत पाहता आफ्रिका खंडाच्या जागतिक स्तरावरील प्रगतीसाठी या नव्या परिस्थितीचा लाभ घेण्याच्या सामूहिक आकांक्षेचे संकेत मिळतात.

 या विकासाकडे आफ्रिकेचे ठळक अस्तित्व, आवाज आणि आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर प्रभाव वाढविण्यासाठी एक व्यासपीठ म्हणून पाहिले जाते. यामुळे आफ्रिका खंडाच्या सामायिक उद्दिष्टांचा पाठपुरावा करणे आणि सामाजिक-आर्थिक विकासाला गती देणे सुलभ होते.

 आगामी काळात अध्यक्षपद दक्षिण आफ्रिकेकडे

जी-२० चे अध्यक्षपद २०२५ मध्ये दक्षिण आफ्रिकेकडे येणार असल्याने आफ्रिकी महासंघाने आतापासूनच तयारी सुरू केली आहे. हे पाहता अधिक न्याय्य जागतिक आर्थिक स्थितीच्या दिशेने आंतरराष्ट्रीय प्रवाहात आघाडी घेण्याच्या उंबरठ्यावर हा खंड उभा आहे. जी-२० मधील ही नवी भूमिका ‘ग्लोबल साउथ’च्या विकासाच्या गरजांना अधिक अनुकूल असलेल्या धोरणात्मक सुधारणांना प्रेरक ठरण्याची अपेक्षा आहे. या भूमिकेचा आंतरराष्ट्रीय आर्थिक व्यवस्थेवर परिवर्तनीय प्रभाव पडण्याची शक्यता आहे.

दक्षिण आफ्रिकेकडून आफ्रिकेच्या हिताचे मुद्दे बहुराष्ट्रीय पातळीवर पूर्वापार मांडण्यात येत आहेत; तसेच दक्षिण आफ्रिकेने जी-२० मध्ये आफ्रिकेसंबंधातील विकासात्मक मुद्दे पटवून देण्यात यशही मिळवले आहे.

जी-२० च्या अध्यक्षपदासंबंधी देशाचा दृष्टिकोन हा आधीच्या अध्यक्षांच्या म्हणजे भारत आणि ब्राझीलसारख्या लागोपाठच्या देशांच्या यशावर ठरणार आहे. याचा अर्थ नव्या बाजारपेठा आणि विकसनशील देशांच्या गरजा या दृष्टिकोनाच्या केंद्रस्थानी राहतील. त्यामध्ये अन्न व उर्जा सुरक्षा, असमानता, कर्जासंबंधी असुरक्षा, बहुराष्ट्रीय विकास बँका आणि हवामान बदल या घटकांचा समावेश होतो. सन २०३० पर्यंत शाश्वत विकासाची उद्दिष्टे व हवामान बदलविषयक उद्दिष्टे गाठण्यासाठी सध्या झालेला उशीर लक्षात घेता या दोहोंमध्ये समतोल राखण्यासही प्राधान्य देण्यात येऊ शकते.

अखेरीस, आफ्रिकी महासंघाचे जी-२०चे सदस्यपद हे आफ्रिकेला आपला विकासाचा कार्यक्रम आणि व्यापक जागतिक हितसंबंध पुढे नेण्यासाठी नव्याने ओळख झालेल्या आपल्या प्रभावाचा उपयोग करण्याची एक चांगली संधी आहे. आफ्रिका खंडाचे प्रतिनिधित्व आर्थिक, हवामान आणि वित्तीय धोरणावरील संवादाला नवा आकार देण्यासाठी प्रयत्नशील आहे आणि या नव्या रूपात आफ्रिकी महासंघाच्या सदस्य देशांना भरीव लाभ मिळण्याची क्षमताही आहे. जागतिक आर्थिक सहभागातील हे पाऊल सर्वांसाठी प्रगतिशील, न्याय्य आणि शाश्वत भविष्य घडविण्यासाठी सक्रियपणे योगदान देण्याची आफ्रिकेची सज्जता दाखवून देते.


सौम्य भौमिक हे ऑब्झर्व्हर रीसर्च फाउंडेशनचे सहयोगी फेलो आहेत. 

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.