Author : Aditi Ratho

Published on Nov 13, 2020 Updated 0 Hours ago

अमेरिकेच्या उपाध्यक्षपदासाठी एका महिलेची निवड होणे, ही घटना अमेरिक इतिहासातील क्रांती आहेच. पण, हा विजय जागतिक राजकारणातील महिलांसाठीही फार महत्त्वाचा आहे.

अमेरिकन इतिहासातील ‘कमला’क्रांती!

अमेरिकेच्या नवनिर्वाचित उपाध्यक्षा कमला हारिस यांच्यासमोर पूर्णपणे विभाजित आणि राजकीयदृष्ट्या खंडित झालेल्या देशाला मूळपदावर आणण्याचे दुष्कर काम करण्याचे आव्हान उभे आहे. हारिस या अध्यक्ष जो बायडन यांच्या समवेत पुन्हा एकदा अमेरिकेला स्वतःची ओळख निर्माण करण्यास मदत करतील. त्याच वेळी त्यांच्या ऐतिहासिक विजयाच्या आधारे स्वतःची ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न जगभरातील तरुण स्त्रियांकडून केला जाईल. महिला नेत्या जगाला काही नव्या नाहीत. मग कमला हारिस यांचा विजय का महत्त्वाचा आहे, हे समजून घेणे आवश्यक आहे.

ऐतिहासिक विजय

भारत आणि इस्रायलमध्ये इंदिरा गांधी आणि गोल्डा मायर यांनी आपापल्या देशांचे पंतप्रधानपद भूषवले होते. हा सन्मान जगातील पहिलाच (आणि त्यांच्या देशांतील एकमेव) होता. या दोन्ही स्त्रिया शक्तीशाली आणि करारी पोलादी स्त्रिया होत्या. त्यांनी आपापल्या देशांच्या आर्थिक, राजकीय आणि परराष्ट्र धोरणांना आकार दिला. त्यासाठी त्यांनी अनेकदा कठोर पाऊलेही उचलली.

गोल्डा मायर इस्रायलच्या चौथ्या पंतप्रधान बनल्या, तेव्हा त्यांची त्यांच्या पक्षाकडून एकमताने निवड (तत्कालीन पंतप्रधान लेव्ही एश्कोल यांचा अकाली मृत्यू झाल्यानंतर) झाली होती. मात्र, त्यापूर्वीही त्या इस्रायलच्या स्वातंत्र्याच्या जाहीरनाम्यावर सह्या करणाऱ्या नेत्यांपैकी एक होत्या आणि देशाच्या संस्थापक मंत्रिमंडळात त्यांनी कामगारमंत्रिपद आणि परराष्ट्रमंत्रिपद भूषवले होते. याच पद्धतीने इंदिरा गांधीही आपल्या देशाच्या स्थापनेशी जोडलेल्या आहेत. कारण त्या देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या कन्या होत्या आणि त्या पक्षाच्या निवडून आलेल्या नेत्याही होत्या.

या दोघीही नेत्या मतदारांनी निवडून दिलेल्या होत्या आणि आज आपण पाहात आहोत, तसा सत्ताविरोध किंवा आजच्यासारखे समस्या आधारित विभाजनवादी पक्षातीत राजकारण त्या वेळी एवढ्या मोठ्या प्रमाणात दिसत नव्हते. राष्ट्रउभारणीत ओळखीच्या व अनुभवी चेहऱ्यांना प्राधान्य दिले जात होते आणि लिंगभेद हा अनावश्यक मानला जात होता.

जगभरात वंश, धर्म आणि लिंगभेदाच्या स्वरूपात सांस्कृतिक समस्या निर्माण झाल्या आहेत, अशा वेळी कमला सत्तेवर आल्या आहेत. आजच्या उलथापालथीच्या काळात जमेका आणि भारतीय स्थलांतरितांच्या कन्येचा हा विजय महत्त्वपूर्ण आहे, कारण भविष्यकाळात हे यश आणखी स्त्रियाही अखेरीस मिळवू शकतात, हे त्यांच्या विजयाने दाखवून दिले आहे. देश अशा मतभेदांमधून पुढे जायला हवा आहे, अशी आशाही या विजयातून निर्माण झाली आहे.

अर्थात, ध्रुवीकरण आजही कायम आहे, ही गोष्ट या विजयामुळे लपून राहिलेली नाही. त्यातच साथरोगामुळे उत्पन्न झालेल्या आर्थिक अस्थिरतेचा मिलाफ झाला आहे. त्यामुळे नाराज गटांना तिचा वंश आणि तिचे स्त्री असणे तिच्या विरोधात वापरणे सहज शक्य आहे. गेल्या चार वर्षांत कुटुंब नियोजन आणि पुनरुत्पादन सेवासुविधांसाठी निधीचा पुरवठा अपुरा आहे. स्त्रिया आणि पुरुषांच्या वेतनामधील दरीवर नजर ठेवण्यासाठी कर्मचाऱ्यांच्या आर्थिक प्राप्तीची माहिती नोंदवणे कंपन्यांसाठी बंधनकारक करण्यात आले होते. यासह अन्य अनेक धोऱणांमुळे स्त्रियांची मते तांत्रिकदृष्ट्या कमला यांच्या पारड्यात पडली. मात्र, लिंगभाव, वंश आणि वयाशी संबंधित मतदारांची एकत्रित माहिती अद्याप नीट बाहेर आलेली नाही. मात्र, सुरुवातीला जे आकडे समोर आले आहेत, त्यानुसार महिलांपेक्षाही तरुण वर्गाने बायडन-हारिस यांच्या उमेदवारीला अधिक उत्स्फुर्तपणे मतदान केले.

कमला यांनी आता आपल्या प्रतिकात्मक विजयाचे सुधारणावादी कृतीत रूपांतर करायला हवे. त्यासाठी अधिक चांगले प्रतिनिधित्व, एकात्मता आणि विभागलेल्या मतदारांमध्ये सुसंवाद या दृष्टीने प्रयत्न करायला हवेत. कमला या अधिक सुधारणावादी विचारांच्या असून त्यांची धोरणे ही नव्या अध्यक्षांच्या धोरणांपेक्षा पूर्णपणे वेगळी आहेत. नवा हरित करार, शस्त्र नियंत्रण, करांतून मिळालेल्या निधीतून होणारे गर्भपात, मोठ्या कंपन्यांना समान वेतनासाठी प्रमाणपत्रे आणि नोंदणी न झालेल्या नागरिकांना नागरिकत्व या धोरणांच्या त्या समर्थक आहेत.

जानेवारीमध्ये होणाऱ्या ‘रन-ऑफ’ (काही ठिकाणांच्या बाबतीत वाद झाल्यामुळे होणारी दुसरी फेरी) निवडणुकांमध्ये डेमॉक्रॅटिक पक्षाने सत्ता खेचण्यात यश मिळवले, तरीही या सुधारणावादी धोरणांवर रिपब्लिकन पक्षातील सदस्यांकडून जोरदार प्रतिक्रिया उमटू शकतात. जर सत्तेचा समतोल साधला गेला, तर कमला हारिस यांची भूमिका कायदा मंजूर करण्यातील टाय-ब्रेकरची, अधिक महत्त्वाची ठरेल. ही भूमिका त्यांना उपाध्यक्ष म्हणून आपली शक्ती दाखवण्यासाठी वापरता येऊ शकते.

कमला हारिस यांच्यासमोरचा मार्ग आव्हानात्मक आणि लाभाचा असा दोन्ही प्रकारचा आहे. २१ नेटवर्क्सच्या माध्यमातून सुमारे ५६ कोटी ९० लाख नागरिकांनी पाहिलेल्या या शक्तिशाली निवडणुकांमधील त्यांचे विजयी भाषण दुमदुमत राहील आणि प्रेरणा देत राहील. या कठीण काळाला दिशा देणारा त्यांचा प्रवास जगभरात पाहिला जाईल. मात्र, महिलांच्या राजकीय नेतृत्वाच्या संदर्भाने त्यांच्या विजयाकडे आज कसे पाहिले जाईल?

नव्या दशकातील स्त्रियांचे नेतृत्व

गेल्या काही वर्षांत राजकीय आणि आर्थिक अवकाशात महिलांनी केलेली महत्त्वपूर्ण प्रगती पाहायला मिळाली आहे. गेल्या वर्षी, २०१९ मध्ये झुझाना कॅप्युटोव्हा या स्लोव्हाकियाच्या पहिल्या महिला अध्यक्ष झाल्या आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या पहिल्या महिला मुख्य अर्थतज्ज्ञ म्हणून गीता गोपीनाथ यांची निवड झाली. चालू २०२० या वर्षाच्या प्रारंभी समा मारिन या फिनलंडच्या पंतप्रधानपदावर आरुढ झाल्या.

त्या जगातील सर्वांत कमी वयाच्या पंतप्रधान ठरल्या आहेत. त्या देशातील महिला आघाडीच्याही नेत्या आहेत. आणि हे वर्ष संपत आले असताना, जेसिंडा अर्डन न्यूझीलंडच्या पंतप्रधानपदाची निवडणूक सुमारे ५० टक्के मते मिळवून दुसऱ्यांदा जिंकल्या आणि कमला हारिस उपाध्यक्षपदावर निवडून आलेल्या पहिल्या महिला आणि गौरेतर ठरल्या.

जगभरातील राजकारणात महिलांचा वावर वाढला आहे. उदयोन्मुख अर्थव्यवस्था असलेल्या रवांडा या देशातील संसदेमध्ये महिलांची संख्या ६१ टक्के आहे. क्युबा आणि बोलिव्हियाच्या संसदेत पुरुषांपेक्षाही महिलांची संख्या अधिक म्हणजे अनुक्रमे ५३.२ टक्के आणि ५३.१ टक्का आहे. भारतामध्ये २०१४ मध्ये महिलांचे प्रतिनिधित्व केवळ ११.३ टक्के होते. २०१९ मध्ये ते १४ टक्क्यांनी वाढले. अमेरिकेमध्ये २०१८ मध्ये झालेल्या मध्यावधी निवडणुकांमध्ये महिलांच्या प्रतिनिधीत्वाबाबत मोठी उडी घेतली गेली. त्या वेळी ४३५ जागांपैकी १०२ जागांवर महिलांनी विजय मिळवला होता. तरीही जागतिक आकडेवारीमध्ये अमेरिकेची संख्या या बाबात खूपच कमी आहे.

जागतिक पटलावर कनिष्ठ सभागृहात महिलांचे प्रतिनिधित्व सरासरी २४.१ टक्के आहे. या तुलनेत अमेरिका कमी पडत आहे. मात्र, महिलांचे राजकीय प्रतिनिधित्व वाढत आहे, ही उत्साहवर्धक गोष्ट असली, तरी केवळ लिंगाधारित राजकारणाला विरोध करण्याऐवजी हे प्रतिनिधित्व सक्षम असावे, याकडे लक्ष देण्याची गरज आहे. केवळ कायदा मंजूर करण्याच्या अथवा नामंजूर करण्याच्या प्रक्रियेत मते देण्यापुरते भाग घेण्यापेक्षा महिलांनी निर्णय प्रक्रियेत आणि नियोजनात सहभाग घेणे आवश्यक आहे. जी धोरणे आणि अर्थसंकल्प पुरुष आणि महिलांवर वेगवेगळा परिणाम करीत असतो, त्याची पडताळणीही पुरुष आणि महिलांनी वेगवेगळ्या प्रकारे केली पाहिजे.

आपण समानता असलेल्या जगात राहात आहोत, असा दावा करत असतो. अत्यंत असामान्य यशाच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर महिलांचे राजकीय अवकाशातील यश सामान्य आणि नेहमीची गोष्ट मानली जाते. त्यासाठी  शिक्षण आणि रोजगार या क्षेत्रात मोठे परिवर्तन अपेक्षित आहे. नैसर्गिकरीत्या नेतृत्व निर्माण होण्याची क्षमता येण्यासाठी आपल्या घरांमध्ये आणि शालेय यंत्रणांमध्ये महिलांनासमान संधी उपलब्ध करून द्यायला हवी.

नव्या दशकामध्ये सक्षम महिला नेतृत्व निर्माण करण्याचे आणि सुरक्षित वातावरण निर्माण करण्याचे प्रयत्न व्हायला हवेत. कमला यांच्या स्थलांतरित आई त्यांना सांगतात त्यानुसार, ‘अनेक गोष्टी करणारी तू पहिलीच असणार आहेस. मात्र, तू शेवटची नसशील, याची खात्री द्यायला हवी.’ कमला यांचा विजय ऐतिहासिक आणि असामान्य असला, तरी असे विजय सामान्य असतील, असे वाटणारा समाज निर्माण करण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे.

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.