Author : Rahul Rawat

Expert Speak Raisina Debates
Published on Jul 29, 2025 Updated 0 Hours ago

मे 2025 मधील पहलगामनंतरचा संघर्षवाढ हा एक रणनैतिकदृष्ट्या निर्णायक टप्पा ठरला, ज्यामुळे चीन–भारत–पाकिस्तान या त्रिकुटातील स्पर्धा प्रत्यक्षात आली आणि भारताच्या संरक्षण धोरणाच्या पुनर्रचनेचा मार्ग मोकळा झाला.

ऑपरेशन सिंदूर: सामरिक विजयानंतरची धोरणीय सजगता

Image Source: Getty

    7 ते 10 मे 2025 दरम्यान घडलेल्या भारत-पाकिस्तान तणावपूर्ण संकटाने, पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर, भारताच्या संरक्षण धोरणात एक महत्त्वाचा निर्णायक टप्पा निर्माण केला. पाकिस्तानविरुद्ध नवी दिल्लीचा संघर्ष सुरू असतानाच चीनचा प्रभाव राजनैतिक संकेतांमध्ये आणि रणभूमीवरील क्षमतांमध्ये स्पष्टपणे दिसून आला, ज्याचा उद्देश भारतावर दबाव टाकणे होता. 2020 मधील गलवान संघर्षानंतर प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (LAC) चीनची आक्रमकता वाढत असून त्यामुळे भारताच्या लष्करी मनुष्यबळावर आणि क्षमतांवर भौगोलिकदृष्ट्या दोन वेगवेगळ्या दिशांनी ताण आला आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्ताननेही भारताच्या सामरिक संयमाची परीक्षा घ्यायला सुरुवात केली असून भारताला एका दीर्घकाळ चालणाऱ्या त्रिकोणी भू-राजकीय संघर्षात अडकवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. चीनने ‘ऑपरेशन सिंदूर’ला ‘दुर्दैवी’ म्हटले असून त्यांनी हेही स्पष्ट केले की ते पाकिस्तानच्या सार्वभौमत्व, स्वातंत्र्य आणि प्रादेशिक अखंडतेचे रक्षण करतील. या घडामोडींमुळे नवी दिल्लीतील धोरणकर्त्यांवर अतिरिक्त दबाव निर्माण झाला आहे, विशेषतः भौगोलिक रचनेच्या पार्श्वभूमीवर चीन-पाकिस्तान यांच्या ‘थ्रेशोल्ड अलायन्स’ म्हणजेच सीमेवरील युतीचा सामना करण्याच्या दृष्टिकोनातून.

    थ्रेशोल्ड आघाडी आणि लष्करी क्षमतेची कसोटी

    चीन-पाकिस्तान संबंध गेल्या काही दशकांमध्ये विकसित होऊन आता एक सर्वसमावेशक सामरिक भागीदारी म्हणून पूर्णतः परिपक्व झाले आहेत. पाकिस्तानच्या लष्करी बळवाढीसाठी चीनने दिलेले सातत्यपूर्ण पाठबळ हे नवी दिल्लीसाठी अधिक गहन आणि गुंतागुंतीचे रणनीतीक आव्हान बनले आहे. ऑपरेशन सिंदूर – ऑपरेशन बाणियन – उम मर्सूस या साखळीने चीन-भारत-पाकिस्तान यांच्या त्रिकुटातील स्पर्धा प्रत्यक्ष कृतीच्या स्वरूपात कार्यान्वित केली आहे. 7 ते 10 मे 2025 दरम्यान भारत आणि पाकिस्तानने त्यांच्या लष्करी क्षमतांचा एकत्रित वापर कसा केला आणि त्या क्षमतांची अंमलबजावणी कशी झाली, यावरून बळाचा उपयोग आणि या त्रिकुटातील संबंधांचा भविष्यकालीन आढावा यासाठी एक महत्त्वाचा संदर्भ तयार झाला आहे. ही घटना भारत-पाकिस्तान दरम्यानच्या पारंपरिक युद्धपद्धतींपासून एक निर्णायक वळण मानली जात आहे. यामध्ये युद्धाचे स्वरूप अधिक प्रक्षोभक आणि दूरवरून लढवले जाणाऱ्या स्टँड-ऑफ वॉरफेअरमध्ये बदलले आहे. दोन्ही देशांनी तंत्रज्ञानाधिष्ठित क्षमतांचा मोठ्या प्रमाणावर संचय केला आहे. चीन-पाकिस्तान संयुक्त लष्करी सराव ज्यात हार्डवेअरचे एकत्रित शिक्षण, कार्यपद्धतीतील सुसंगतता आणि संयुक्त नियोजनाचा समावेश आहे या त्यांच्या युद्धकाळातील सहकार्याचा मूलभूत आधार आहे. पाकिस्तानने भारताविरुद्ध वापरलेल्या क्षमतांमध्ये चीनी बनावटीची JF-17 आणि J10C लढाऊ विमाने, PL-15E बीव्हीआर एअर-टू-एअर क्षेपणास्त्रे, FM-90 लघुपल्ल्याचे क्षेपणास्त्र (SRSAM), LY-80 (HQ16A) मध्यम पल्ल्याचे क्षेपणास्त्र (MRSAM), HQ-9/P दीर्घ पल्ल्याचे क्षेपणास्त्र (LRSAM) आणि मानवरहित ड्रोन्स (UAVs) यांचा समावेश होता.

    ऑपरेशन सिंदूर – ऑपरेशन बाणियन – उम मर्सूस या साखळीने चीन-भारत-पाकिस्तान यांच्या त्रिकुटातील स्पर्धा प्रत्यक्ष कृतीच्या स्वरूपात कार्यान्वित केली आहे.

    7 मे 2025 रोजी "किल-चेन" प्रक्रियेत ग्राउंड आणि अवकाश-आधारित सेन्सर डेटाचे समन्वयितीकरण करून फ्रंटलाइन फायटर जेट्ससह वापर केल्याने भारतासाठी गंभीर ऑपरेशनल आव्हान निर्माण झाले. इलेक्ट्रोमॅग्नेटिक युद्धक्षेत्राचा वापर पाकिस्तानने प्रभावीपणे केला असून, या क्षेत्रात चीनकडून मिळणाऱ्या तांत्रिक मदतीमुळे आणि प्रशिक्षणामुळे हा धोका आणखी गडद झाला आहे. याच तांत्रिक समाकलनामुळे पाकिस्तानने भारतीय फायटर जेट्स पाडल्याचा दावा देखील केला आहे. याशिवाय, चीनच्या बेइदौ उपग्रह प्रणालीने रिअल-टाइम इंटेलिजन्स, सर्व्हेलन्स आणि रीकॉनिसन्स (ISR) क्षमतांच्या माध्यमातून भारताविरुद्ध अचूक शोध व लक्ष्यीकरणासाठी सहाय्य केले.

    दुसरीकडे, भारताने ब्राह्मोस आणि फ्रेंच बनावटीच्या SCALP-EG क्रूझ क्षेपणास्त्रांसह HAMMER ग्लाइड बॉम्बचा वापर करून दूरवरून हवाई हल्ले केले. 8 ते 10 मे दरम्यान, भारताच्या एकत्रित हवाई आणि क्षेपणास्त्र संरक्षण प्रणालीने पाकिस्तानला त्यांच्या आक्रमक कारवायांद्वारे भारतावर दबाव टाकण्याची कोणतीही संधी दिली नाही. ही बहुस्तरीय प्रणाली दीर्घ-पल्ल्याच्या (S-400), मध्यम-पल्ल्याच्या (Barak-8), लघु-पल्ल्याच्या (आकाश, SPYDER), आणि अतिलघु-पल्ल्याच्या पारंपरिक आणि आधुनिक प्रणालींचा (Igla-M, Igla-S, L-70) समावेश करते. यामध्ये भारतीय हवाई दलाची एकत्रित हवाई आदेश व नियंत्रण प्रणाली (IACCS) आणि भारतीय लष्कराची आकाशतीर प्रणालीही अंतर्भूत आहे. ‘होल ऑफ ऑपरेशन्स’ दृष्टिकोनातून भारतीय लष्कराच्या तिन्ही दलांमधील समन्वय आणि सहकार्य स्पष्ट झाले.

    भारतीय लष्कराने शत्रूच्या हवाई संरक्षण क्षमतांचे दमन (SEAD) करत पाकिस्तानच्या आत खोलवर अनेक उच्च मूल्य असलेल्या लक्ष्यांचा नाश करून विजयाचा नवीन निकष प्रस्थापित केला. यामुळे पाकिस्तानी प्रतिस्पर्ध्यांकडून युद्धविरामाची मागणी करण्यात आली. तंत्रज्ञानाच्या युगातील युद्धे, विशेषतः अण्वस्त्र पृष्ठभूमीवर, शक्यतो अल्पकालीन, वेगवान आणि निर्णायक विजयाच्या उद्देशाने मर्यादित राहतील. त्यामुळे पारंपरिक क्षमतांची संख्यात्मक ताकद ही निर्णायक परिणाम घडवण्यास उपयुक्त ठरणार नाही. तंत्रज्ञान, सैद्धांतिक दिशा आणि सामरिक मार्गदर्शन यांसारखे गुणात्मक घटक आधुनिक युद्धाचे स्वरूप ठरवतील. ऑपरेशन सिंदूरमधून पुढे आलेली ही नवी संकल्पना भारताच्या संरक्षण धोरणासाठी महत्त्वपूर्ण धडे देते.

    भारताच्या संरक्षण धोरणासाठी धडे

    इतिहासात भारत-पाकिस्तान संबंध संघर्षप्रवण राहिले आहेत आणि भविष्यात यासारख्या आणखी घटनांची शक्यता आहे, ज्यामध्ये दोन्ही बाजूंना वेगवेगळ्या पातळ्यांवर नुकसान सहन करावे लागेल. चीन-भारत-पाकिस्तान या त्रिकुटातील स्पर्धा आणखी तीव्र होईल कारण चीन आणि पाकिस्तान हे दोघेही त्यांच्या हितानुसार सामरिक समतोल बदलतील, ज्याची किंमत भारताला मोजावी लागेल. ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तान आणि त्याच्या समर्थनार्थ असलेल्या दहशतवादी गटांवर भारताने दिलेला पारंपरिक लष्करी प्रतिसाद यावरून हे स्पष्ट होते की भारताने आपली लष्करी सज्जता आणि भविष्यातील नियोजन सुधारण्यावर भर द्यावा. यासाठी भारताने तीन व्यापक क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे: सामरिक नियोजन, प्राधान्य क्षमतांचा संचय, आणि सैद्धांतिक नवकल्पना.

    संरचनात्मक प्रभाव घडवण्यासाठी, संरक्षण नियोजन आणि सज्जतेमध्ये ‘सिस्टम ऑफ सिस्टिम्स’ दृष्टिकोन आवश्यक आहे. हे व्यापक दृष्टीकोन आणि उदयोन्मुख प्रवाहांचे बारकाईने विश्लेषण करून साध्य होऊ शकते. पुढच्या टप्प्यात, संयुक्तता आणि समाकलन सुधारणा गतीने राबवणे, तसेच संरक्षण संपादन आणि दीर्घकालीन नियोजन समक्रमित करणाऱ्या धोरणात्मक उपाययोजनांना गती देणे आवश्यक आहे. यामुळे संस्थात्मक कार्यक्षमता, कार्यपद्धती नियोजन आणि सामरिक मार्गदर्शन सुधारण्यास मदत होईल. दीर्घकालीन सज्जतेसाठी वेळ आणि क्षमतांची गुणात्मक गुणवत्ता यामधील समतोल हाच महत्त्वाचा निकष ठरेल.

    क्षमतांच्या दृष्टीने, युद्धाच्या रणनीतिक क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणात बदल झाला आहे, ज्यामध्ये एअरोस्पेस हे क्षेत्र विशेषत्वाने महत्त्वाचे बनले आहे. हे विशेषतः चालू असलेल्या रशिया-युक्रेन युद्धात स्पष्ट झाले आहे. सामरिक किंमत लादण्यासाठी आणि ती रोखण्यासाठी एअरोस्पेस वर्चस्व अत्यावश्यक आहे. रॉकेट्स, क्षेपणास्त्रे, ड्रोन आणि त्यांचे माहिती, सायबर, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि इलेक्ट्रॉनिक युद्ध या सहाय्यक क्षेत्रांसह सैद्धांतिक समाकलन हे युद्धाचे नवीन स्वरूप ठरत आहे. तांत्रिक प्रगती आणि त्याचे सैद्धांतिक (डॉक्ट्रिनल) विचारसरणीत समाकलन हे लढाऊ कार्यक्षमतेत परिणत होईल. त्यामुळेच सुधारणा प्रक्रियेतील यश आणि युद्धभूमीतील विजय यांचे मोजमाप ठरवले जाईल.

    सिद्धांतिक दृष्टिकोनातून पाहता, भारतीय लष्कर आणि त्याची व्यापक नीती दशकांपासून भू-सैन्यकेंद्रित राहिली आहे. परिणामी, सिद्धांतिक, संस्थात्मक आणि संसाधनांच्या पातळीवर भारतीय लष्कराच्या बाजूने झुकलेला तोल राहिला आहे, तर इतर दोन सेना भारतीय हवाई दल आणि भारतीय नौदल यांच्यापेक्षा भारतीय लष्कराला प्राधान्य मिळाले आहे. दुसरीकडे, पाकिस्तानने विषम (असिमेट्रिक) नीती अवलंबली असून, त्यात उपपारंपरिक (सबकन्व्हेन्शनल) आणि अणु धोरणाचा संमिश्र वापर करून भारताच्या पारंपरिक लष्करी प्रबळतेवर मर्यादा घालण्याचा प्रयत्न केला आहे. भारताच्या लष्करी कारवाईच्या संभाव्यतेसाठी पाकिस्तानकडे भक्कम भू-सैन्य क्षमता असून, निर्णयक्षम विजय टाळण्यासाठी त्याच्याकडे रणनैतिक अण्वस्त्रे आहेत. पाकिस्तानची तांत्रिक लष्करी ताकद चीनच्या लष्करी क्षमतांनी पूरक आणि पर्यायी स्वरूपात वाढवली जात आहे आणि बहुआयामी युद्धकौशल्यांच्या (मल्टी डायमेन्शनल ऑपरेशनल आर्ट) आधारे ती अधिक बळकट होत आहे. पाकिस्तानच्या संदर्भात स्टँड-ऑफ युद्धासारख्या नाविन्यपूर्ण प्रसंगांसाठी भारताने आपली नीती वापरण्याचे पर्याय नव्याने ठरवणे आवश्यक आहे. यामुळे "कोल्ड स्टार्ट डॉक्ट्रिन"मध्ये नव्याने सुरुवात करत संघर्ष कमी वेळात आणि जलद संपवण्याची गरज अधोरेखित होते, विशेषतः भविष्यकालीन नीतीगत नाविन्याच्या दृष्टिकोनातून.

    शेवटी, नवी दिल्लीने आपले धोरणात्मक उद्दिष्ट पुन्हा तपासले पाहिजे, त्याचे पुनर्मूल्यांकन करावे लागेल आणि लष्करी शक्तीचा वापर कितपत करायचा याचा विचार करावा लागेल. चीनच्या पाठबळावर उभ्या राहिलेल्या पाकिस्तानच्या आव्हानाचा पुढील संकटाच्या वेळी कसा सामना करायचा? हे प्रश्न आता भारताच्या सामरिक विचारप्रणालीचा केंद्रबिंदू ठरले पाहिजेत आणि बदलत्या भू-राजकीय वास्तवात शक्तीचा अर्थपूर्ण वापर करण्याचा पाया ठरला पाहिजे. तात्कालिक विजय भविष्यातील दीर्घकालीन आव्हानांसमोर आत्मसंतोषाचे कारण ठरू नये.


    राहुल रावत हे ऑब्झर्व्हर रिसर्च फाउंडेशनच्या स्ट्रॅटेजिक स्टडीज प्रोग्राममध्ये रिसर्च असिस्टंट आहेत.

    The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.