7 ऑक्टोबर 2023 रोजी हमासने इस्रायलवर हल्ला केल्यानंतर जे युद्ध भडकलं ते गाझा पट्टीमध्ये यापूर्वी कधीही न पाहिलेलं होतं. यात भडकलेला हिंसाचार, बाह्य शक्तींचा सहभाग, प्रादेशिक शक्तींच्या भू-राजकीय महत्त्वाकांक्षेचा पाठपुरावा अशा सर्व गोष्टींमुळे पश्चिम आशियाच्या स्थिरतेला धोका बसला आहे. मात्र भू-राजकीय परिणामांच्या पलीकडे जाऊन या संघर्षाचा परिणाम बघितला तर यातून दहशतवादी हिंसाचार आणि कट्टरतावादाचा धोका उद्भवू शकतो.
दक्षिण इस्रायलमधील सुरुवातीच्या हिंसाचारातील व्हिडिओ आणि प्रतिमांचा वापर हमासने अगदी चतुराईने केला. नंतर गाझा पट्टीमध्ये इस्रायल संरक्षण दलाच्या मोहिमेमुळे झालेले मृत्यू आणि विनाश यामुळे अनेक देशांमध्ये हमासला समर्थन देणारी भावना निर्माण झाली. यामुळे झालं असं की अल-कायदा (AQ) आणि इस्लामिक स्टेट (IS) सारख्या पॅन-इस्लामिक दहशतवादी गटांना तसेच इतर प्रादेशिक दहशतवादी संघटनांना उत्तेजन मिळालं. पश्चिम आशियातील घडामोडींचा वापर करून दक्षिण आशियामधल्या दहशतवादी संघटनांनी कट्टरतावादाला चालना देण्यास सुरुवात केली. त्यांनी प्रभावशाली तरुणांना आपल्या तंबूत ओढण्याचे प्रयत्न सुरू केलेत.
जागतिक परिस्थिती
जगभरातील दहशतवादविरोधी तज्ञांच्या मते, इस्रायल-हमास संघर्षामुळे दहशतवादी धोक्याचं पुनरुत्थान होऊ शकतं. गाझा पट्टीमध्ये इस्रायलच्या प्रत्युत्तराच्या हल्ल्यांचे स्वरूप आणि प्रमाणामुळे संपूर्ण मुस्लिम जगतामध्ये संताप आणि निषेधाची लाट उसळली आहे. अल कायदा सारख्या दहशतवादी संघटनांनी या भावनांचा उपयोग त्यांच्या प्रासंगिकतेसाठी केला आहे. इस्रायलने हमासवर केलेल्या हल्ल्यानंतर उत्तर आणि पश्चिम आफ्रिकेतील अल कायदाने ज्यूंविरुद्ध अधिक हिंसाचाराचे आवाहन केले आहे. त्याचप्रमाणे, अल कायदाच्या सोमाली सहयोगी संघटना अल-शबाबने हमासच्या लढवय्यांचे कौतुक केले असून ही "संपूर्ण मुस्लिम जमातीची लढाई" असल्याचं म्हटलंय.
गाझा पट्टीमध्ये इस्रायलच्या प्रत्युत्तराच्या हल्ल्यांचे स्वरूप आणि प्रमाणामुळे संपूर्ण मुस्लिम जगतामध्ये संताप आणि निषेधाची लाट उसळली आहे.
युरोपमध्ये, आधीच पश्चिम आशियाई घडामोडींचा प्रसार झाला आहे. 7 ऑक्टोबरपासून फ्रान्समध्ये दोन दहशतवादी हल्ले झाले आहेत. 13 ऑक्टोबर रोजी उत्तर फ्रान्समध्ये एका शिक्षकाचा शिरच्छेद करण्यात आला. त्यानंतर 3 डिसेंबर रोजी पॅरिसमध्ये एका पर्यटकावर चाकूने वार करण्यात आला. तर 16 ऑक्टोबर ब्रुसेल्स, बेल्जियममध्ये हल्ला झाला या हल्ल्यांमुळे सुरक्षा एजन्सींमध्ये चिंता वाढली आहे की इस्रायल-हमास शत्रुत्व दहशतवादी कट्टरपंथीयतेसाठी एक उत्प्रेरक म्हणून काम करत आहे. यामुळे दहशतवादी हिंसाचाराची नवीन लाट येऊ शकते.
या कट्टरतावादाला हमासकडून दिली जाणारी चुकीची माहिती आणि प्रचाराच्या रणनीतींमधून देखील चालना मिळत आहे. इस्त्रायलने केलेल्या हल्ल्याचे फोटो, व्हिडिओ वापरून सहानुभूती निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. त्याची चुकीची माहिती आणि प्रचार करण्यासाठी त्यांनी 'X' (पूर्वीचे ट्विटर) सोशल प्लॅटफॉर्म आणि टेलीग्राम एन्क्रिप्टेड मेसेजिंग सेवा वापरली आहे. अलीकडे, संशोधकांनी 'X' प्लॅटफॉर्मवर 67 खात्यांचं एक नेटवर्क शोधून काढले जे युद्धाशी संबंधित खोटी, भडकाऊ सामग्री पोस्ट करत होते. हमासश्री संबंधित टेलीग्राम चॅनेल नियमितपणे त्यांच्या हल्ल्याचे हिंसक ग्राफिक्स पोस्ट करतात आणि इस्रायली हल्ल्यांमुळे गाझा पट्टीमध्ये झालेल्या नागरी मृत्यूच्या पैलूवर प्रकाश टाकतात. यामुळे चुकीच्या माहितीसाठी पुरेसं खाद्य निर्माण झालं आहे. आणि जमिनीवर नेमकी परिस्थिती काय आहे याविषयी आंतरराष्ट्रीय समुदायाचे आकलन कमी पडतं आहे.
भारतीय संदर्भ
भारतातही काही वेगळी परिस्थिती नाहीये. हमासच्या हल्ल्यानंतर, सुरक्षा आस्थापनेने इस्रायल-पॅलेस्टाईन मुद्द्यावर देशातील जमा होणार्या जमावावर बारकाईने लक्ष ठेवायला सुरुवात केली आहे. केरळ आणि महाराष्ट्र या दोन राज्यात थोडी काळजी करण्यासारखं कारण आहे. केरळमध्ये जमात-ए-इस्लामची युवा शाखा असलेल्या सॉलिडॅरिटी युथ मूव्हमेंट (SYM) द्वारे मलप्पुरम येथे 27 ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या पॅलेस्टाईन समर्थक रॅलीमध्ये हमासचे माजी प्रमुख खालेद मशाल यांचा सहभाग दिसून आला. हमासवर बंदी नाही, किंबहुना या रॅलीत हिंसाचाराचं आवाहन करण्यात आलेलं नाही मात्र राज्यात पॅलेस्टाईन समर्थक मोहीम काढणं, हमास आणि त्यांच्या नेत्यांचा योद्धा म्हणून गौरव करणं चुकीच आहे. पॅलेस्टाईन आणि हमास समर्थकांच्या भावना एकत्र येणं चिंताजनक आहे. हे लोक दहशतवादी हिंसाचाराचं समर्थन करतात. विशेष म्हणजे, एसवायएमने या कार्यक्रमात "हिंदुत्व आणि वर्णभेदी यहुदीवाद उखडून टाका" असं म्हटलं होतं. सुरक्षा यंत्रणांच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात 7 ऑक्टोबर ते 20 नोव्हेंबर दरम्यान, पुणे , कोल्हापूर आणि ठाणे (मुंब्रा आणि भिवंडी) जिल्ह्यांसह राज्यातील विविध भागात 27 पॅलेस्टाईन समर्थक निदर्शनं झाली. काही निषेध रॅली ऑनलाइनही काढण्यात आल्या.
या घडामोडींमुळे पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया सारख्या संघटनेला देखील अनुमती मिळाली आहे. विशेष म्हणजे या संघटनेवर सप्टेंबर 2022 मध्ये बंदी घातली गेली होती तरीही सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया (SDPI) या राजकीय आघाडीद्वारे त्यांनी आपलं काम चालूच ठेवलं आहे. 20 ऑक्टोबर रोजी एसडीपीआयने पुण्यात पॅलेस्टाईन समर्थक रॅली काढली. प्रत्युत्तरात, काही इस्रायल समर्थक रॅलीही निघाल्या.
इस्रायल-हमास संघर्षावर भारतीय समाज ज्या पद्धतीने विभागला गेलाय तो या ध्रुवीकरणाचा साक्षीदार आहे. मात्र यामुळे धार्मिक समुदायांमधील वैमनस्य देखील वाढत आहे. अतिरेकी संघटना याचा फायदा घेऊन शोषण करण्यास उत्सुक आहेत. म्हणजेच पोलिसांनी काही ठिकाणी पॅलेस्टाईन समर्थक रॅलींवरील कारवाई केली. मात्र समर्थकांनी आपण “शांततापूर्ण निषेध” करत असल्याचं दाखवलं. ज्यामुळे अन्याय आणि पीडित होण्याच्या भावनांना उत्तेजन मिळते.
भारतातील असुरक्षित तरुणांना लक्ष्य करण्यासाठी आयएसने एकत्रित प्रयत्न केल्याने भारतासाठी कट्टरतावादाचा धोका अधिक तीव्र झाला.
पॅन-इस्लामिक दहशतवादी प्रचारामध्ये, भारताला सामान्यतः इस्रायलशी जोडलं जातं. एप्रिल 2006 मध्ये, तत्कालीन अल कायदाचा नेता ओसामा बिन लादेनने त्याच्या एका ऑडिओ संदेशात म्हटलं होतं की, "मुस्लिमांविरुद्ध झिओनिस्ट-हिंदू युद्ध". पाकिस्तान आणि जम्मू आणि काश्मीरमधील यापूर्वी पकडलेल्या लष्कर-ए-तैयबा (एलईटी) दहशतवाद्यांच्या चौकशी अहवालातून असे दिसून आले आहे की इस्रायल-पॅलेस्टाईन संघर्ष आणि पॅलेस्टिनी निदर्शकांवर इस्रायली कारवाई यासारख्या जागतिक घटनांचे फुटेज दाखवून संघटनेत नवीन भरती करण्यात आली आहे. उल्लेखनीय म्हणजे, पॅलेस्टिनी इस्लामी अब्दुल्ला अज्जम हा एलईटीच्या सह-संस्थापकांपैकी एक होता .
मात्र गेल्या दशकात, भारतातील असुरक्षित तरुणांना लक्ष्य करण्यासाठी आयएसने एकत्रित प्रयत्न केल्याने भारतासाठी कट्टरतावादाचा धोका आणखी तीव्र झाला. आयएसने किती जरी नकार दिला तरीही, धोका कायम होता. जून 2022 मध्ये उदयपूर, राजस्थान आणि अमरावती, महाराष्ट्र येथे कट्टरपंथी लोकांनी ज्या हत्या केल्या त्यावरून या गोष्टी स्पष्ट होतात. या वर्षीच, राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) भरती आणि कट्टरतावादाच्या आरोपाखाली अनेक संशयितांना अटक केली आहे.
या पार्श्वभूमीवर, भारतीय सुरक्षा आस्थापनेने असे नमूद केले आहे की, पश्चिम आशियातील घडामोडींमुळे दहशतवादी संघटनांना नवीन जीवनदान मिळालं आहे. त्यांच्यापैकी बरेच जण त्यांच्या संभाव्यतेबद्दल उत्साही आहेत. हाच उत्साह त्यांनी तालिबानने अफगाणिस्तान ताब्यात घेतल्यावर दाखवला होता. यामुळे दहशतवादी प्रचार आणि कट्टरता वाढेल. इस्रायलची लष्करी मोहीम सुरू झाल्यानंतर भारतीय उपखंडातील अल-कायदाने अमेरिकन, ब्रिटीश आणि फ्रेंच नागरिक आणि हितसंबंधांवर हल्ले करण्याचे आवाहन आपल्या समर्थकांना केले आहे.
भारतीय सुरक्षा आस्थापनेने नोंदवले आहे की पश्चिम आशियातील घडामोडींमुळे दहशतवादी संघटनांना नवीन जीवनदान मिळालं आहे, त्यांच्यापैकी बरेच जण त्यांच्या संभाव्यतेबद्दल उत्साही आहेत. हाच उत्साह त्यांनी तालिबानने अफगाणिस्तान ताब्यात घेतल्यावर दाखवला होता.
याव्यतिरिक्त, पाकिस्तानस्थित फरारी दहशतवादी फरहातुल्ला घोरी, याचे जैश-ए-मोहम्मदशी संबंधित असलेले व्हिडिओ संदेश देखील एनक्रिप्टेड मेसेजिंग प्लॅटफॉर्मवर फिरत आहेत. यात गाझा पट्टीतील व्हिडिओ क्लिपचा वापर करून, त्याने इस्रायलला पाठिंबा दिल्याबद्दल भारताची निंदा केली आहे. आणि भारतीय मुस्लिमांना इस्रायलविरुद्धच्या लढ्यात एकत्र येण्याचं आवाहन केलं आहे. घोरी 2000 च्या दशकाच्या उत्तरार्धात पर्शियन गल्फमध्ये दहशतवादी भरती नेटवर्कचा एक भाग होता. आणखीन भारतीय तरुणांना आपल्या जाळ्यात ओढण्याचा त्याचा उद्देश आहे.
स्पष्टपणे सांगायचं तर पॅन-इस्लामिक आणि पाकिस्तान-आधारित दहशतवादी संघटनांनी गाझा पट्टीतील फुटेजचं हत्यार बनवून प्रचार करायला सुरुवात केली आहे. त्याचा भारतातील दहशतवादी कट्टरतावादावर दूरगामी प्रभाव पडेल. एनक्रिप्टेड मेसेजिंग प्लॅटफॉर्मची विस्तृत उपलब्धता आणि दहशतवादी हिंसाचार पुनरुज्जीवित करण्याचे पाकिस्तानचे प्रयत्न हा धोका वाढवतात. भारताच्या गृह मंत्रालयाने, विशेषत: एनआयएने दहशतवादी संघटना आणि सहाय्यक इकोसिस्टमवर दबाव कायम ठेवला आहे. मात्र भारतीय एजन्सींना दहशतवादी मास्टरमाईंड आणि त्यांच्या साधनसंपत्तीवर लक्ष ठेवण्यासाठी आपलं संख्याबळ वाढवावं लागेल.
समीर पाटील हे सेंटर फॉर सिक्युरिटी, स्ट्रॅटेजी अँड टेक्नॉलॉजीचे वरिष्ठ फेलो आणि ऑब्झर्व्हर रिसर्च फाउंडेशनचे उपसंचालक आहेत.
The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.