Image Source: Getty
चीनच्या सेंट्रल मिलिटरी कमिशन (CMC) मधील वरिष्ठ लष्करी अधिकारी ॲडमिरल मिआव हुआ यांना २८ नोव्हेंबर २०२४ रोजी भ्रष्टाचाराच्या आरोपावरून आणि शिस्तभंगावरील कारवाई म्हणून अटक करण्यात आली, असे वृत्त समोर आले आहे. अध्यक्ष शी जिनपिंग यांच्या भ्रष्टाचारनिर्मूलन मोहिमेत कारवाई करण्यात आलेले ॲडमिरल मिआव हुआ हे चौथे उच्चस्तरीय जनरल आहेत. या वर्षाच्या प्रारंभी चीनचे माजी संरक्षण मंत्री ली शांगफू आणि वे फेंघ यांना न्यायालयीन कारवाईला सामोरे जावे लागले; तसेच सध्याचे संरक्षण मंत्री ॲडमिरल डोंग जान यांचीही भ्रष्टाचाराच्या आरोपावरून चौकशी सुरू असल्याचे समजते. ली शांगफू यांची हकालपट्टी होण्याच्या आधी सात महिने त्यांनी आपल्या खात्याचा कार्यभार सांभाळला होता, तर डोंग जान आपला पदभार अकरा महिनेही पूर्ण करू शकणार नाहीत, अशी शक्यता आहे. भ्रष्टाचाराच्या आरोपावरून अटक आणि खटले चालवण्यासह वेगाने होणाऱ्या घडामोडींमुळे ‘पीपल्स लिबरेशन आर्मी’मधील (पीएलए) खोलवर असलेली अस्वस्थता आणि अंतर्गत सत्ता संघर्ष अधोरेखित होतो. या घडामोडींमुळे ‘पीएलए’च्या संघर्षक्षमतेबद्दल गंभीर चिंता निर्माण झाली आहे. त्याचप्रमाणे शी जिनपिंग यांच्या लष्करावरील विश्वासाबद्दल आणि चीनच्या सुरक्षा व परराष्ट्र धोरणावर होणाऱ्या व्यापक परिणामांबद्दलही काळजी निर्माण झाली आहे.
भ्रष्टाचाराच्या आरोपावरून अटक आणि खटले चालवण्यासह वेगाने होणाऱ्या घडामोडींमुळे ‘पीपल्स लिबरेशन आर्मी’मधील (पीएलए) खोलवर असलेली अस्वस्थता आणि अंतर्गत सत्ता संघर्ष अधोरेखित होतो.
भ्रष्टाचाराचा DNA
‘पीएलए’मधील भ्रष्टाचार हा सखोल संरचनात्मक असून सैन्याने स्वावलंबी असावे आणि अर्थव्यवस्थेत मदतीचा हात पुढे करावा, या चीनच्या पूर्वापार चालत आलेल्या तत्त्वज्ञानात त्याचे मूळ आहे. त्यामुळे ‘पीएलए’ने स्वतःचे अन्न स्वतः पिकवले, जनावरांचे संगोपन केले, स्वतःच्या गणवेषांचे स्वतः उत्पादन केले आणि १९८० पर्यंत ६,५६००० एकर कृषिक्षेत्रावर नियंत्रण ठेवले. या क्षेत्रातून त्यांनी वार्षिक ५,०००,००० टन धान्याचे उत्पादन घेतले, ६,५०,००० टन भाजीपाल्याचे उत्पन्न मिळवले आणि १,०४,००० टन मांसाचे उत्पादन घेतले.
डेंग शाओपिंग यांनी १९७८-८० या कालावधीत केलेल्या सुधारणांच्या दरम्यान संरक्षण खर्चात लक्षणीय कपात केली. त्यानंतर १९८५ मध्ये डेंग यांच्या सूचनांनुसार जनरल लॉजिस्टिक्स डिपार्टमेंट (जीएलडी)ने ‘पीएलए’च्या विभागांना लघू, मध्यम आणि मोठ्या प्रमाणात उद्योगाची उभारणी करण्याचे अधिकार दिले. गरज असल्यास उद्योगासाठी लागणारे बीज भांडवल (सीड मनी) पुरवण्याचीही परवानगी दिली. या धोरणामुळे ‘पीएलए’चे चार सामान्य विभाग व सेवा संस्थांनी चार प्रमुख उद्योगांची निर्मिती केली. ते म्हणजे, पॉली ग्रुप, कायली कॉर्पोरेशन, शिंगशिंग कॉर्पोरेशन आणि चायना युनायटेड एअरलाइन्स. या बहुतेक सर्व उद्योगांचे नेतृत्व वारसदारांकडेच (पक्षातील वरिष्ठ पदस्थांच्या नातेवाइकांकडे) गेले. डेंग यांच्या कन्येला ‘पॉली ग्रुप’मध्ये अधिक रस होता. या उद्योगांवर नाममात्र म्हणजे दहा टक्के कर आकारण्यात आला होता; परंतु त्यातून मिळालेल्या नफ्याचा मोठा भाग परदेशी बँक खात्यांमध्ये जमा करण्यात आला होता. यामुळे भ्रष्टाचाराला पद्धतशीरपणे चालना मिळाली. चीनचे राजकीय नेतृत्व आणि ‘पीएलए’च्या उच्चपदस्थांमधील साटेलोट्यामुळे परस्परावरील अवलंबित्व आणि व्यापक भ्रष्टाचाराचे एक चक्र तयार झाले.
‘पीएलए’च्या विभागांनी काही वर्षांच्या काळात हॉटेल, बांधकाम आणि रुग्णालयांसह विविध क्षेत्रांमध्ये आपल्या अर्थकारणाचा विस्तार केला. काहींनी धाडस करून वेश्याव्यवसाय, स्मगलिंग रॅकेट आणि अन्य गुन्हेगारी धंदेही चालवले. ‘पीएलए’वरील लष्कराच्या वर्चस्वामुळे या अवैध धंद्यांना संरक्षण मिळाले. परिणामतः मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार, नफेखोरी, तस्करी, सट्टा, बेकायदा विक्री आणि खरेदी या गोष्टींना चालना मिळाली. या प्रकारांनी ‘पीएलए’च्या मुख्य कार्यातही शिरकाव केला. त्यामुळे बढतीसाठी लाच देणे-घेणे, एकाच वेळी अनेक कंपन्यांसाठी काम करणे, पर्यायांचा वापर करणे, खोटे प्रशिक्षण अहवाल देणे आणि तोफखान्यासाठी व लष्करी संसाधनांसाठी लागणाऱ्या तेलाची अवैध विक्री करण्यासह लष्कराचे स्रोत व्यापारासाठी वळवण्यात येण्याचे प्रकार घडले.
१९८५ मध्ये डेंग यांच्या सूचनांनुसार जनरल लॉजिस्टिक्स डिपार्टमेंट (जीएलडी)ने पीएलएच्या विभागांना लघू, मध्यम आणि मोठ्या प्रमाणात उद्योगाची उभारणी करण्याचे अधिकार दिले. गरज असल्यास उद्योगासाठी लागणारे बीज भांडवल (सीड मनी) पुरवण्याचीही परवानगी दिली.
या पार्श्वभूमीवर, चीनच्या नेत्यांनी १९९३ व १९९५ मध्ये ‘पीएलए’च्या व्यावसायिक कामांवर निर्बंध आणले आणि त्यानंतर १९९८-९९ मध्ये संपूर्णपणे बंदी आणली. मात्र, बंदीमुळे किती परिणाम झाला, याबद्दल वादच आहे. कारण पीएलएमध्ये भ्रष्टाचाराची वृत्ती कायम राहिली आहे. पीएलएमधील निवृत्त जनरलनी २०१५ मध्ये केलेल्या गौप्यस्फोटानुसार, पीएलएमधील जवळजवळ प्रत्येक हुद्द्यासाठी किंमत मोजावी लागते आणि सर्व महत्त्वाची पदे जवळच्या लोकांसाठी राखीव ठेवण्यात येतात. विशेषतः वरिष्ठ पदस्थांच्या वारसदारांकडे. सर्रास सुरू असलेल्या लाचखोरीचे प्रमाण वाढत वाढत रक्कम लाखांमध्ये पोहोचली होती. उदाहरणार्थ, एका जनरलने आपल्या पदोन्नतीसाठी माजी उपाध्यक्ष शु केहाऊ यांना २.७५ लाख डॉलर देऊ केले होते. भ्रष्टाचारामुळे पीएलएमधील व्यावसायिकतेला ग्रहण लागले.
हंटिंग टायगर्स अँड फ्लाइज
शी जिनपिंग यांनी चीनचे अध्यक्ष या नात्याने भ्रष्टाचारनिर्मूलन हा मुद्दा आपल्या सरकारचा सर्वाधिक महत्त्वाचा मुद्दा म्हणून समोर आणला. त्यांच्या ‘टायगर्स अँड फ्लाइज’ या मोहिमेला अलीकडील काळात पीएलएमध्ये मोठी गती मिळाली. गेल्या वर्षभरात सेंट्रल कमिशन फॉर डिसिप्लिन इन्स्पेक्शन (सीसीडीआय)ने चार प्रमुख आणि काही सीएमसी सदस्यांसह नऊ पीएलए जनरलना अटक केली आहे. या व्यतिरिक्त संरक्षण उद्योगातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची हकालपट्टी झाली आहे किंवा त्यांना अटक झाली आहे. उदाहरणार्थ, एव्हिएशन इंडस्ट्री कॉर्पोरेशन ऑफ चायना (एव्हीआयसी)चे माजी अध्यक्ष टान रुईसोंग यांना भ्रष्टाचाराच्या आरोपावरून नुकतेच बडतर्फ करण्यात आले. निकृष्ट दर्जाचा माल वापरून गुणवत्तेशी तडजोड केल्याचा आरोप त्यांच्यावर होता; तसेच हंगामी तत्त्वावरील कामगारांचे, उत्पादनासाठी आउटसोर्सिंग केल्याने सदोष आणि धोकादायक घटकांची निर्मिती केल्याचा आरोपही त्यांच्यावर करण्यात आला होता.
या मोहिमेत कारवाई करण्यात आलेल्या वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांची एक सूची टेबल १ मध्ये तपशीलवार दिली आहे.
टेबल १ : वरिष्ठ पीएलए अधिकाऱ्यांवर भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली खटला भरण्यात आला
वर्ष
|
नाव
|
रँक
|
पद
|
नोव्हेंबर २०२४
|
मिआव हुआ
|
ॲडमिरल
|
सीएमसी सदस्य
|
नोव्हेंबर २०२४
|
डोंग जान
|
ॲडमिरल
|
संरक्षणमंत्री
|
ऑगस्ट २०२३
|
ली शांगफू
|
जनरल
|
संरक्षणमंत्री
|
ऑगस्ट २०२३
|
ली युछाव
|
जनरल
|
पीएलए रॉकेट फोर्स कमांडर (पीएलएआरएफ)
|
ऑगस्ट २०२३
|
लेओ गाँगबिन
|
जनरल
|
डीवाय कमांडर, पीएलएआरएफ
|
ऑगस्ट २०२३
|
शू झोंगबो
|
जनरल
|
पोलिटिकल कमिशनर, पीएलएआरएफ
|
ऑगस्ट २०२३
|
राव वेनमिन
|
जनरल
|
इक्विपमेंट डिव्हेलपमेंट डिपार्टमेंट
|
ऑगस्ट २०२३
|
शा चिंगुए
|
जनरल
|
इक्विपमेंट डिव्हेलपमेंट डिपार्टमेंट
|
ऑगस्ट २०२३
|
वाँग डेझाँग
|
ॲडमिरल
|
इक्विपमेंट डिव्हेलपमेंट डिपार्टमेंट
|
ऑगस्ट २०२३
|
झेंग झेनझाँग
|
जनरल
|
डेप्युटी चिफ, जॉइंट स्टाफ डिपार्टमेंट ऑफ द सीएमसी
|
ऑगस्ट २०२३
|
झेंग फ्युशेंग
|
जनरल
|
पीएलए रॉकेट फोर्स
|
ऑगस्ट २०२३
|
वू गोहुआ
|
जनरल
|
डीवाय कमांडर, पीएलएआरएफ (सुसाईड)
|
ऑगस्ट २०२३
|
च्यू गनशेंग
|
जनरल
|
पीएलए रॉकेट फोर्स
|
ऑगस्ट २०२३
|
शांग हाँग
|
जनरल
|
पीएलए रॉकेट फोर्स
|
मार्च २०२३
|
वे फेंघ
|
जनरल
|
संरक्षणमंत्री
|
जून २०१४
|
शू कायहाऊ
|
जनरल
|
उपाध्यक्ष, सीएमसी (डेड)
|
जुलै २०१५
|
गाव बॉक्शंग
|
जनरल
|
सीएमसी सदस्य
|
एप्रिल २०१४
|
गू जनशांग
|
जनरल
|
डीवाय चिफ, जीएलडी
|
स्रोत : लेखकाने गोळा केलेला डेटा
पीएलएमधील सर्व पदोन्नतींवर देखरेख करणाऱ्या ‘पोलिटिकल वर्क डिपार्टमेंट’चे प्रमुख असताना पदोन्नती देण्यासाठी गैरव्यवहार केल्याच्या आरोपावरून ॲडमिरल मिआव हुआ यांच्यावर कारवाई केल्याचे समोर आले. त्याचप्रमाणे पीएलएमधील भ्रष्टाचाराचे केंद्र असलेल्या ‘इक्विपमेंट डिव्हेलपमेंट डिपार्टमेंट’मधील भ्रष्टाचारातील सहभागाबद्दल ॲडमिरल डोंग जान यांच्यावर खटला चालवण्यात येण्याची शक्यता आहे.
मात्र, या साफसफाईच्या धडाक्यात शी जिनपिंग यांनी ‘सीएमसी’मधील दुसऱ्या क्रमांकाचे नेते जनरल जांग योशा यांच्यावर कारवाई करणे टाळले आहे. जांग यांनी ‘इक्विपमेंट डिव्हेलपमेंट डिपार्टमेंट’ आणि ‘जनरल आर्मामेंट्स डिपार्टमेंट’चे दीर्घ काळ प्रमुखपद भूषवले आहे. जांग हे जपानशी झालेल्या युद्धात आणि चीनमधील यादवीत लढा दिलेल्या जनरल जांग जोंग्शन यांचे चिरंजीव असून शी जिनपिंग यांच्याशी त्यांचे घनिष्ठ कौटुंबिक संबंध आहेत. या दोन्ही नेत्यांच्या वडिलांनी ‘फर्स्ट फिल्ड आर्मी’मध्ये एकत्र काम केले असून जांग आणि शी जिनपिंग हे एकाच प्रांतातील उच्चपदस्थांचे वारसदार आहेत. लढाईचा अनुभव असलेल्या मोजक्या पीएलए अधिकाऱ्यांमध्ये जांग यांचा समावेश होतो. या सर्व गोष्टींमुळे त्यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता नाही. त्यापेक्षा जांग यांचा कार्यकाळ शांतपणे पूर्ण होईपर्यंत शी जिनपिंग वाट पाहणे पसंत करतील.
प्रत्येक स्तरावर विश्वासाचा अभाव
पीएलएमध्ये होणारा भ्रष्टाचार आणि संघटनात्मक अस्वस्थतेमुळे कनिष्ठ अधिकारी, सैनिक आणि त्यांचे वरिष्ठ यांचा आपसातील विश्वास कमी होऊ शकतो. कारण यांपैकी अनेकांनी पैसे, वशिला आणि वारसाहक्काने मिळालेल्या संधींच्या जोरावर आपली पदे मिळवली आहेत. या अविश्वासामुळे मनोबलाचे खच्चीकरण होऊ शकते आणि भ्रष्टाचारनिर्मूलनाच्या दृष्टीने शंकाही उपस्थित होते.
पीएलएमध्ये होणारा भ्रष्टाचार आणि संघटनात्मक अस्वस्थतेमुळे कनिष्ठ अधिकारी, सैनिक आणि त्यांच्या वरिष्ठ यांचा आपसातील विश्वास कमी होऊ शकतो. कारण यांपैकी अनेकांनी पैसे, वशिला आणि वारसाहक्काने मिळालेल्या संधींच्या जोरावर आपली पदे मिळवली आहेत.
आपल्याविरोधातील चौकशी दडपण्यासाठी वरिष्ठ अधिकारी एकत्र येत असल्याने शिस्तपालन अधिकाऱ्यांकडे केलेल्या तक्रारी अनेकदा निरर्थक ठरल्या आहेत. त्यावर उपाय म्हणून सीसीडीआय थेट ‘सीएमसी’च्या अंतर्गत आणण्यात आले. याचा परिणाम म्हणजे, उच्चपदस्थ अधिकारी कायम काळजीत राहतात. कारण त्यांचा उदय आणि अस्त शी जिनपिंग व त्यांच्या विश्वासू सहकाऱ्यांच्या जवळीकतेशी जोडलेला असतो. भ्रष्टाचाराच्या तपासात सत्तेचा अमर्याद वापर केलेला दिसतो. बरेचदा त्यात आरोप असलेल्या अधिकाऱ्याचे पूर्णपणे पतन होते, त्याची कौटुंबिक मालमत्ता जप्त केली जाते आणि त्याचा लाभार्थी गट उद्ध्वस्त होतो.
तात्पर्य
शी जिनपिंग यांनी २०१५-१६ मध्ये पीपल्स लिबरेशन आर्मीच्या उच्च कमांडमध्ये सुधारणा सुरू केल्या. दशकभराच्या कालावधीत संरचनात्मक स्थैर्य आणणे, हे त्याचे उद्दिष्ट होते; परंतु कोव्हिड-१९ मुळे त्यांच्या योजनांना सुरुंग लागला. त्यामुळे पीएलएला संक्रमणावस्था आली. शी जिनपिंग यांनी २०२३ मध्ये पीएलए ‘रॉकेट फोर्स’चे नेतृत्व संपूर्णपणे बदलून टाकले आणि २०२४ मध्ये ‘स्ट्रॅटेजिक सपोर्ट फोर्स’ बरखास्त केला. या फोर्सचे माजी कमांडर च्यू चिएनशांग यांच्यावर खटला भरला. गेल्या बारा वर्षांपासून भ्रष्टाचारनिर्मूलन मोहिमेनंतरही शी जिनपिंग यांना पीएलएच्या संरचनात्मक सुधारणांबद्दल खात्री नाही की पीएलएच्या उच्चपदस्थ नेतृत्वाबद्दल विश्वास नाही, असे ॲडमिरल मिआव आणि डोंग यांची सुरू असलेल्या चौकशीवरून लक्षात येते.
लढाईसाठी सज्ज असलेल्या सैन्याचा आधारस्तंभ असलेला घटक म्हणजे विश्वास; परंतु याच विश्वासाबद्दल अविश्वास असून तो पीएलएमध्ये अस्तित्वातच नसल्याचे दिसून आले आहे. सातत्याने सुरू असलेला भ्रष्टाचार आणि अविश्वास यांमुळे पीएलएच्या एकसंधतेवर आणि विश्वासार्हतेवर प्रश्न निर्माण झाले आहेत. पीएलएच्या या गंभीर स्थितीच्या पार्श्वभूमीवर शी जिनपिंग कोणत्याही प्रदेशात सक्रिय संघर्ष सुरू करतील का, याबद्दल अनिश्चितता कायम आहे.
अतुल कुमार हे ‘ऑब्झर्व्हर रीसर्च फाउंडेशन’मध्ये ‘स्ट्रॅटेजिक स्टडीज प्रोग्रॅम’चे फेलो आहेत.
The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.