Author : Shairee Malhotra

Expert Speak Raisina Debates
Published on May 15, 2024 Updated 0 Hours ago

युरोपियन निवडणुकांपूर्वी मॅक्रॉनचे भाषण हे त्यांच्या संरक्षणावरील मतांची पुनरावृत्ती असल्याचे दिसते. या संबोधनात मॅक्रॉन यांनी सुरक्षेच्या बाबतीत युरोपच्या स्वावलंबनावर तसेच युरोपीय देशांच्या धोरणात्मक स्वायत्ततेवर विशेष भर दिला.

मॅक्रॉनचा दृष्टिकोन युरोपचे पतन टाळेल का?

२०१७ मध्ये, फ्रान्सचे अध्यक्ष म्हणून निवडून आल्यानंतर काही महिन्यांनी, इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी पॅरिसमधील सोरबोन विद्यापीठात केलेल्या एका भाषणात, युरोपियन धोरणात्मक संस्कृतीच्या निर्मितीसह एक सामायिक संरक्षण दलाचा समावेश असलेल्या ‘सार्वभौम युरोप’च्या निर्मितीची आवश्यकता व्यक्त केली. येत्या जून महिन्यात होणाऱ्या युरोपियन निवडणुका अगदी तोंडावर आल्या असताना, २५ एप्रिल रोजी, मॅक्रॉन सोरबोनमध्ये परतले आणि तिथे केलेल्या सविस्तर भाषणात समान विषयांना त्यांनी स्पर्श केला, परंतु यावेळी अधिक निकड आणि गांभीर्य लक्षात घेऊन त्या विषयांवर मॅक्रॉन बोलत होते.

जागतिक संदर्भ मूलभूतपणे बदलले असून, आर्थिक आणि बदलत्या आंतरराष्ट्रीय संबंधांतील अनेक आव्हाने युरोपियन युनियनसमोर उभी आहेत. मॅक्रॉन यांनी आपल्या भाषणात अंतिम विनाश जवळ येऊन ठेपल्याचा जो इशारा दिला, त्यामुळे या भाषणाचा बोलबाला झाला, ते म्हणाले, "युरोप नश्वर आहे; तो मरू शकतो. युरोपला वाचवणे हे केवळ आपण जी निवड करू, त्यावर अवलंबून आहे.” आजमितीस युरोपियन समृद्धीला आधार देणारे जे त्रिकुट आहे, ज्यामुळे युरोपच्या समृद्धीला बळ मिळते, त्याबाबत मॅक्रॉन म्हणाले, "चीनमध्ये आपले उत्पादन निर्माण करण्याचे, अमेरिकेकडे आपले संरक्षण सोपवण्याचे आणि रशियाकडून आपली ऊर्जा मिळवण्याचे युग संपले आहे."

आजमितीस युरोपियन समृद्धीला आधार देणारे जे त्रिकुट आहे, ज्यामुळे युरोपच्या समृद्धीला बळ मिळते, त्याबाबत मॅक्रॉन म्हणाले, "चीनमध्ये आपले उत्पादन निर्माण करण्याचे, अमेरिकेकडे आपले संरक्षण सोपवण्याचे आणि रशियाकडून आपली ऊर्जा मिळवण्याचे युग संपले आहे."

मॅक्रॉन यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे

रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्याने मॅक्रॉन यांच्या संरक्षणासंदर्भातील कल्पनांना आणि युरोपियन धोरणात्मक स्वायत्तता आणि सुरक्षेतील आत्मनिर्भरता याकरता त्यांनी केलेल्या उत्कट प्रयत्नांना अधिक स्वीकृती मिळाली आहे. त्यांच्या दोन तासांच्या भाषणातील सर्वात महत्त्वाच्या विषयांपैकी मुख्य विषय युरोपला मध्यवर्ती ठेवून संरक्षण हा होता. अमेरिकेचे डगमगते समर्थन आणि डोनाल्ड ट्रम्प व्हाइट हाऊसमध्ये परत येण्याची भीतीदायक शक्यता यांवरही त्यांनी भाष्य केले. मॅक्रॉन यांनी विश्वासार्ह संरक्षण रणनीती स्थापन करून युरोपला आपल्या लष्करी तयारीला बळकटी देण्याची गरज असल्याचे सांगितले, ज्यात "युरोपियन संरक्षण विषयक उपक्रमांसाठी पुढाकार" घेणे आणि क्षेपणास्त्रविरोधी प्रणाली मजबूत करणे या गोष्टी समाविष्ट आहेत. फ्रेंच राष्ट्राध्यक्षांनी, ‘युरोप फर्स्ट’ पद्धतीचा अवलंब करून, स्थानिक युरोपियन उत्पादकांना लष्करी उपकरणे खरेदी करण्यास आणि समूहाच्या संरक्षण उद्योगाला चालना देण्यास प्राधान्य देण्याची आवश्यकता व्यक्त केली.

रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यामुळे मॅक्रॉन यांच्या संरक्षणासंदर्भातील कल्पनांना आणि युरोपियन धोरणात्मक स्वायत्तता आणि सुरक्षेत आत्मनिर्भरतेसाठी त्यांनी केलेल्या उत्कट प्रयत्नांना अधिक स्वीकृती मिळाली आहे.

गेल्या वर्षी त्यांच्या चीनच्या दौऱ्यात तैवानवर केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा पुनरुच्चार करत, मॅक्रॉन यांनी पुन्हा एकदा अमेरिका-चीन या महाशक्तींमधील शत्रुत्वाच्या दरम्यान तिसरा मार्ग तयार करण्याचे वचन दिले. त्यांनी असा दावा केला की, युरोप कधीही अमेरिकेला एकनिष्ठ असलेले म्हणून काम करणार नाही आणि ट्रान्सअटलांटिक युतीची ताकद असूनही युरोप अमेरिकेला प्राधान्य देत नाही.

व्यापाराबाबत, मॅक्रॉन यांनी स्थानिक उद्योगाला चालना देण्यासाठी दोन शक्तींद्वारे वापरल्या जाणाऱ्या वाढत्या सबसिडींच्या संदर्भात अमेरिका आणि चीन यांच्यावर जागतिक नियमांचा आदर न केल्याचा आरोप केला. ऑक्टोबर २०२३ मध्ये, युरोपियन युनियनने इलेक्ट्रिक वाहनांच्या चिनी उत्पादनांवरील सबसिडीविरोधी चौकशी सुरू केली, जी आता सौर पॅनेलसारख्या इतर क्षेत्रांमध्ये विस्तारण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, युरोपीय कंपन्यांना ‘यूएस इन्फ्लेशन रिडक्शन अॅक्ट’च्या प्रभावाची भीती वाटते, जी अमेरिकी व्यवसायांना हरित संक्रमणाला गती देण्यासाठी सबसिडी प्रदान करते. प्रत्युत्तरादाखल, मॅक्रॉन यांनी युरोपियन युनियनच्या व्यापार धोरणात सुधारणा करण्याचे आवाहन केले, ज्यामध्ये हरित ऊर्जा आणि तंत्रज्ञान यांसारख्या प्रमुख क्षेत्रांत देशांतर्गत कंपन्यांना अधिक सार्वजनिक गुंतवणुकीद्वारे समर्थन देणे, तसेच युरोपियन युनियनमधील बोजड नियमन कमी करणे या गोष्टी समाविष्ट आहेत.

मॅक्रॉन यांच्या भाषणात समाविष्ट असलेल्या इतर संकल्पनांमध्ये अणुऊर्जेसारख्या फ्रान्सला प्रिय असणाऱ्या बाबींचा समावेश होता, त्या व्यतिरिक्त रशिया आणि इराणसारख्या प्रादेशिक शक्तींद्वारे युरोपला ‘वेढलेले’ इशारे आणि युरोपियन सेंट्रल बँकेच्या वाढीवर लक्ष केंद्रित न केल्याची टीका यांवर त्यांनी भाष्य केले. एआय, स्पेस, बायोटेक, ग्रीन एनर्जी आणि क्वान्टम कॉम्प्युटिंगसह २०३० सालापर्यंत युरोपियन युनियनने जगाचे नेतृत्व करायला हवे, अशा पाच महत्त्वपूर्ण क्षेत्रांची रूपरेषा मॅक्रॉन यांनी मांडली. त्यांनी ‘युरोपियन युनियन कार्बन टॅक्स’द्वारे युरोपियन युनियनच्या संसाधनांना चालना देण्याचे मार्ग सांगितले आणि युरोपियन युनियनच्या ३०० अब्ज युरो कोविड साथीच्या पुनर्प्राप्ती निधीप्रमाणेच नवीन संयुक्त युरोपियन कर्ज संपादनासही समर्थन दिले.

मॅक्रॉन यांच्या भाषणात समाविष्ट असलेल्या इतर संकल्पनांमध्ये अणुऊर्जेसारख्या फ्रान्सला प्रिय असणाऱ्या बाबींचा समावेश होता, त्या व्यतिरिक्त रशिया आणि इराणसारख्या प्रादेशिक शक्तींद्वारे युरोपला ‘वेढलेले’ इशारे आणि युरोपियन सेंट्रल बँकेच्या वाढीवर लक्ष केंद्रित न केल्याची टीका यांवर त्यांनी भाष्य केले.

एक अत्यंत आवश्यक दृष्टी

२०१७ पासून, मॅक्रॉन यांची देशांतर्गत स्थिती त्यांच्या संसदीय बहुमताच्या हानीमुळे लक्षणीयरीत्या कमकुवत झाली आहे, ज्यामुळे महत्त्वाचे कायदे मंजूर करणे त्यांना कठीण बनले आहे. उदा. अलीकडेच संमत झालेल्या इमिग्रेशन कायद्यातून ते स्पष्ट होते. त्यांच्या पेन्शन सुधारणांविरूद्ध दीर्घकाळ आंदोलन सुरू होते. अलीकडच्या मतदान विषयक कलातून असे दिसून येते की, फ्रेंच मतदारांपैकी एक तृतीयांशहून कमी मतदारांचा त्यांच्या राष्ट्राध्यक्षांबद्दल अनुकूल दृष्टिकोन आहे. युरोपियन युनियन स्तरावरही, विरोधी पक्ष नेत्या मरीन ले पेन यांचा उजवा रासेम्बलमेंट नॅशनल पार्टी आघाडीवर आहे, ज्याने सध्याच्या युरोपियन संसदेतील तिसरा सर्वात मोठा गट असलेल्या मॅक्रॉन यांच्या मध्यवर्ती नूतनीकरण गटाला आव्हान दिले आहे.

या शिवाय, फ्रेंच राष्ट्राध्यक्षांवर अनेकदा तपशिलांची स्पष्टता आणि ठोस उपाय योजताना मोठेपणाचा आव आणला गेल्याचा आरोप करण्यात आला आहे. फ्रेंच कायद्यांनुसार २०२७ मध्ये ते पुन्हा राष्ट्राध्यक्षपदासाठी अपात्र आहेत, हे लक्षात घेऊन काहीजण या भाषणाला त्यांचा राजकीय वारसा मजबूत करण्याचे साधन म्हणून पाहतात. या व्यतिरिक्त, इतर युरोपीय राष्ट्रांच्या तुलनेत युक्रेनला कमी मदत देणे, कमी युक्रेनियन निर्वासितांना सामावून घेणे, नाटो खर्चाला जीडीपीच्या २ टक्के न देणे यांसारख्या फ्रेंच धोरणाचा कल मॅक्रॉन यांच्या धाडसी वक्तृत्वातील विरोधाभास दर्शवतात. युरोपियन स्वायत्ततेच्या मार्गावर आव्हाने उभी आहेत, युरोपीयन युनियनमधील पौर्वात्येकडील देश अमेरिकेवर धोरणात्मकरीत्या अवलंबून असणे आणि फ्रँको-जर्मन व युनियनमधील इतर मतभिन्नता यासोबत इतर आव्हानेही आहेत.

आणि तरीही, २०१७ मध्ये मॅक्रॉन यांच्या शेवटच्या भाषणानंतर बदललेले आंतरराष्ट्रीय संबंध पाहता, राष्ट्राध्यक्षांचे विचार विशेषत: सुरक्षा आणि संरक्षणाच्या क्षेत्रात उचित ठरले. मर्यादा असल्या तरी, युरोपला त्याच्या आत्मसंतुष्ट बुडबुड्यातून बाहेर काढण्यासाठी आवश्यक असलेली क्रांतीची दृष्टी मॅक्रॉन यांची असू शकते. मात्र, जोवर युरोप आपल्या ४५० दशलक्ष नागरिकांच्या सुरक्षिततेकरता पुढे वाटचाल करू इच्छित नाही, तोवर युरोप अमेरिकी मतदारांच्या इशाऱ्यावर अवलंबून राहतो.


शायरी मल्होत्रा या ऑब्झर्व्हर रिसर्च फाऊंडेशनमध्ये असोसिएट फेलो आहेत. 

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.

Author

Shairee Malhotra

Shairee Malhotra

Shairee Malhotra is Associate Fellow, Europe with ORF’s Strategic Studies Programme. Her areas of work include Indian foreign policy with a focus on EU-India relations, ...

Read More +