Author : Jhanvi Tripathi

Expert Speak Raisina Debates
Published on Jul 17, 2025 Updated 0 Hours ago

ब्राझीलचे सलग G20, BRICS आणि COP अध्यक्षपद हे दक्षिण-दक्षिण धोरणात्मक सहकार्य व्यापार, आरोग्य, हरित विकास आणि डिजिटल प्रशासन या क्षेत्रांना एकत्रित करण्याची संधी देते.

BRICS 2025: दक्षिणेकडून उगवणारी जागतिक नेतृत्वाची नवी पहाट

Image Source: Getty

ब्राझीलमध्ये 17 वी BRICS (Brazil, Russia, India, China, South Africa) परिषद जुलैच्या 6 आणि 7 तारखेला संपन्न झाली आणि ती अनेक कारणांनी महत्त्वपूर्ण आहे. पहिले कारण म्हणजे, COP-30 चे अध्यक्षपद दुसऱ्या तिमाहीत असल्यानं ब्राझीलला एका वर्षाचे काम केवळ सहा महिन्यांत उरकावे लागत आहे. दुसरे कारण म्हणजे, BRICS चे अध्यक्षपद ब्राझीलने G20 च्या अध्यक्षपदानंतर लगेच स्वीकारले आहे, जे ऐतिहासिकदृष्ट्या खूपच खास आहे. त्यामुळे ब्राझीलला BRICS मध्ये एकमत साधून G20 मध्ये झालेली प्रगती—जसे की आरोग्य सहकार्य आणि जागतिक प्रशासन सुधारणा पुढे नेण्याची अनोखी संधी मिळाली आहे.

ब्राझीलने COP-30 मुळे वर्षभराचे काम अवघ्या 6 महिन्यांत पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे.

“Strengthening Global South Cooperation for More and Inclusive and Sustainable Governance” (सर्वसमावेशक आणि शाश्वत प्रशासनासाठी जागतिक दक्षिण देशांमधील सहकार्य अधिक बळकट करणे) या मुख्य विषयाखाली ब्राझीलने केवळ घोषणा न करता कृतीशीलतेवर भर दिला आहे. त्याचा मुख्य उद्देश विकास आणि वाढ कायम ठेवण्याचा आहे. BRICS मधील राजकीय मतभेद असूनही, या संघटनेने आर्थिक विकास आणि विशिष्ट मुद्द्यांवर आधारित सहकार्य यासाठी एक मर्यादित पण योग्य व्यासपीठ तयार केले आहे. BRICS मध्ये निर्णय प्रक्रियेचा मुख्य पाया म्हणजे सर्व सदस्यांचे एकमत, जो या सहकार्याला दिशा देतो.

बंधुत्व आणि जबाबदारी

BRICS ने आतापर्यंत सदस्य देशांच्या अंतर्गत गरजांची जबाबदारी घेण्याचे टाळले आहे. त्यामुळेच ग्लोबल साउथशी संबंधित महत्त्वाच्या मुद्द्यांवर BRICS चा प्रगतीचा वेग मर्यादित आहे.

या महत्त्वाच्या मुद्द्यांमध्ये सर्वात आधी व्यापार सुलभतेचा विषय येतो, जो परिषदेत नेत्यांच्या घोषणेत येण्याची शक्यता आहे. ब्राझीलने भारत आणि दक्षिण आफ्रिकेच्या मदतीने व्यापार सहकार्याच्या चर्चेला पर्यायी पेमेंट प्रणालीमार्फत सकारात्मक मार्गावर नेले आहे, ज्यात डिजिटल पेमेंट्स आणि स्थानिक चलनातील व्यवहारांचा समावेश आहे. परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीतील अध्यक्षीय निवेदनात हे स्पष्ट होते की आंतरराष्ट्रीय व्यवहारांसाठी पेमेंट प्लॅटफॉर्म तयार करण्यावर चर्चा सुरू आहे. मात्र BRICS च्या अंतर्गत एकसमान चलनावर कोणतीही चर्चा झालेली नाही. हे एक काल्पनिक आणि अवास्तव चित्र होते. BRICS चे अलीकडे झालेले विस्तार पाहता, एकच चलन शक्यच नाही हे पुन्हा अधोरेखित झाले आहे.

लसीकरणाची स्वयंपूर्णता हा BRICS च्या सहकार्याचा मुख्य मुद्दा राहिला आहे.

दुसरा मुद्दा म्हणजे जागतिक आरोग्य सहकार्य. ब्राझीलने सतत अपयशी ठरत असलेल्या शाश्वत विकास उद्दिष्टांच्या (SDGs) दिशेने एकेक मुद्द्यावर भर देत काम केले आहे. G-20 अध्यक्षपदादरम्यान ब्राझीलने Global Alliance Against Hunger and Poverty सुरू केली. BRICS अध्यक्षपदासाठी ब्राझीलने लसीकरण सहकार्य आणि “socially determined diseases” जसे की क्षयरोग (TB), मलेरिया आणि इतर उष्णकटिबंधीय आजारांना नष्ट करणे हा विषय निवडला. TB सारख्या आजारांकडे जागतिक पातळीवर दुर्लक्ष होत असतानाच, BRICS चे विस्तार झालेले असल्यामुळे असे आजार पुन्हा चर्चेत आले आहेत. नवीन सदस्य देश अजूनही या जुन्या रोगांपासून मुक्त होण्यासाठी झगडत आहेत, हेच यातून दिसून येते. आरोग्य तंत्रज्ञान शेअर करणे हे देखील याच चर्चेचा भाग आहे, आणि यामध्ये BRICS सदस्य देशांकडे विशिष्ट कौशल्य आहे. 2018 मध्ये सुरू झालेल्या उपक्रमानुसार प्रत्येक BRICS सदस्य देशाकडे एक Vaccine Research & Development Centre आहे, जे आपल्या भागीदार देशांसोबत सहकार्य करण्यासाठी तयार करण्यात आले आहे.

सहकार्याचा पूल बांधणे (Building Bridges)

BRICS सहकार्याचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे संपर्क (connectivity) आणि पुरवठा साखळीची (supply chain) स्थिरता वाढवणे. कोविड महामारी आणि पश्चिम आशियातील संकटांमुळे पर्यायी व्यापार मार्गांची गरज अधोरेखित झाली आहे. तसेच, आफ्रिकेतील अंतर्गत जोडणी महत्त्वाची असल्याचेही पुन्हा स्पष्ट झाले आहे, कारण हा खंड भविष्यातील विकासाचा केंद्रबिंदू ठरू शकतो. आफ्रिकेतील स्थैर्य आणि प्रगतीचा जागतिक अर्थव्यवस्थेवर परिणाम होतो, विशेषतः जेव्हा चीनसारखी मोठी अर्थव्यवस्था हळूहळू मंदावते आहे.

मजबूत पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूक आणि त्या कार्यान्वित करण्याच्या उपायांवर BRICS नेत्यांमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे. हे एक असे क्षेत्र असू शकते, जे BRICS पुढे नेऊ शकते.

सर्व उभरत्या अर्थव्यवस्थांना, म्हणजेच BRICS देशांनाही, अत्यावश्यक वस्तूंसाठी स्थिर आणि विश्वासार्ह पुरवठा साखळ्या हव्याच आहेत. ‘गरज’ म्हणजे काय, याची व्याख्या वेळेनुसार बदलत असली तरीही. इंडोनेशिया आणि व्हिएतनामसारखे नवीन सदस्य आणि भागीदार देश "friend-shoring" (म्हणजे विश्वासार्ह मित्रदेशांमध्ये उत्पादन ) आणि पुरवठा साखळी बदलांवर होणाऱ्या चर्चेचा भाग बनले आहेत. “BRICS-2030 Economic Partnership Strategy” मध्ये स्पष्टपणे नव्या व्यापार विषयांवर चर्चा करण्याची तयारी दर्शवली आहे जसे की 'डिजिटल प्रशासन' तसेच BRICS देशांमधील व्यापार खर्च कमी करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. या धोरणात पायाभूत सुविधा उभारणी, वाहतूक व बंदर सुविधा सुधारणा, तसेच ऊर्जा आणि अन्न सुरक्षा वाढवण्यासंबंधी स्पष्ट योजना नमूद केल्या आहेत.

BRICS-2030 आर्थिक धोरणात ‘डिजिटल प्रशासन’ यासारख्या नव्या व्यापार विषयांवर चर्चा करण्यास तयार असल्याचे स्पष्टपणे नमूद आहे आणि BRICS देशांतील व्यापार खर्च कमी करण्यावर भर दिला गेला आहे.

शेवटी, डिजिटल अर्थव्यवस्था आणि डिजिटल परिवर्तन हे आजच्या आर्थिक सहकार्याचे मुख्य भाग बनले आहेत. यामध्ये स्थानिक उद्योगांना चालना देणे, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना (MSMEs) पाठबळ देणे आणि आधुनिक उत्पादन क्षेत्रात सहकार्य वाढवणे यांचा समावेश होतो—विशेषतः जेव्हा BRICS मधील जुने आणि नविन सदस्य त्यांच्या मूल्यसाखळीत बदल अनुभवत आहेत.

महत्त्वाकांक्षा

भारतीय दृष्टीकोनातून पाहिले तर, BRICS हा एक महत्त्वाचा संवाद मंच आहे कारण तो विकास आणि प्रगतीसंबंधी मुद्द्यांवर थोड्याशा अपेक्षा असलेल्या पण व्यापक सहमतीसाठी उपयुक्त ठरतो. हा मंच ग्लोबल साउथच्या समस्यांना एक मान्यता देतो, पण त्याचवेळी भारताच्या पश्चिम देशांशी असलेल्या सहभागात कोणतीही अडचण निर्माण करत नाही. भारताची मुक्त आणि न्याय्य आंतरराष्ट्रीय व्यापार व्यवस्थेसाठी असलेली वचनबद्धता आणि BRICS च्या मंचावरही जुन्या बहुपक्षीय संस्थांना बळकट करण्यासाठी केलेले आवाहन हे याचेच उदाहरण आहे. BRICS मधील इतर सदस्य, विशेषतः नविन सदस्य, या मंचाच्या बंधनरहित पण सहमती तयार करणाऱ्या स्वभावामुळेच त्याकडे आकर्षित होत असावेत.


जान्हवी त्रिपाठी ह्या ऑब्झर्वर रिसर्च फाउंडेशनच्या असोसिएट फेलो आहेत.

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.