Authors : Sumit Roy | Murli Dhar

Published on Oct 20, 2023 Updated 0 Hours ago

आपण ‘जागतिक कापूस दिन’ साजरा करत असताना, वस्त्रनिर्माण आणि पेहराव उद्योगातील कापसाच्या परिवर्तनीय क्षमतेचे परीक्षण करणे आवश्यक आहे.

शाश्वत अर्थव्यवस्थेकडे वाटचाल करण्याकरता कापूस आणि जैवविविधतेची पुनर्जोडणी

आपण ‘जागतिक कापूस दिन’ साजरा करत असताना, वस्त्रनिर्माण आणि पेहराव उद्योगातील कापसाच्या परिवर्तनीय क्षमतेचे परीक्षण करणे आवश्यक आहे. कापूस, ज्याला अनेकदा ‘शुभ्र सोने’ असे संबोधले जाते, कारण कापूस अब्जावधी-डॉलरच्या वस्त्रनिर्माण आणि पेहराव उद्योगाचा सर्वात महत्त्वाचा कच्चा माल आहे. म्हणूनच, कापसाच्या लागवडीच्या पद्धती बरेच लक्ष वेधून घेतात. टिकाऊ तंतू आणि तयार माल विकसित करण्यासाठी समर्पित अशा प्रतिष्ठित ‘टेक्सटाइल एक्स्चेंज’ या जागतिक ना-नफा कंपनीने प्रदान केलेल्या अंतर्दृष्टीच्या अनुषंगाने, दर वर्षी २६ दशलक्ष टन कापूस प्रामुख्याने वस्त्रनिर्माण आणि पेहराव उद्योगाद्वारे वापरला जातो. या उद्योगाद्वारे वापरल्या जाणार्‍या सर्व तंतूंच्या सुमारे एक चतुर्थांश इतका हा मोठा आकार आहे. परिणामी, फॅशन उद्योगात टिकाऊपणाच्या तत्त्वांच्या एकत्रीकरणामागील प्रमुख प्रेरक शक्ती म्हणून अर्थातच कापसाकडे पाहिले जाते.

 जैवविविधतेला बाधक ठरणाऱ्या अदृश्य गोष्टींचा शोध

आत्तापर्यंत, वस्त्रनिर्माण आणि पेहराव उद्योगातील शाश्वततेचे प्रयत्न प्रामुख्याने हवामान बदल कमी करणे आणि कच्च्या मालाच्या उत्पादनातून उद्भवणारे, तसेच तयार माल बनविताना आणि प्रक्रिया करताना प्रदूषण न होण्याची काळजी घेणे यांवर केंद्रित आहेत. मात्र, उद्योगाचा जैवविविधतेवर जो परिणाम होतो, त्याबाबत तुलनेने कमी शोध घेतला गेला आहे, अथवा अपुरा अहवाल उपलब्ध आहे. याचे कारण असे की, जैवविविधता एक विषय म्हणून बहुआयामी आणि गुंतागुंतीचे क्षेत्र व्यापते, ज्यात जंगल, महासागर, गोड्या पाण्याची ठिकाणे यांचा समावेश आहे. कच्च्या मालाच्या उत्पादनाचा, या परिसंस्थांवर जो परिणाम होतो, त्याचे मूल्यांकन करणे सोपे नाही; त्याकरता विविध निर्देशक आणि जटिल पद्धती आवश्यक ठरतात.

वस्त्रनिर्माण आणि कपड्यांच्या (टी अँड ए) उद्योगातील शाश्वततेचे प्रयत्न प्रामुख्याने हवामान बदल कमी करणे आणि कच्च्या मालाच्या उत्पादनातून उद्भवणारे, तसेच तयार माल बनविताना आणि प्रक्रिया करताना प्रदूषण न होण्याची काळजी घेणे यांवर केंद्रित आहेत.

हवामान बदल कमी करण्यासाठी लक्ष्ये आणि मोजमाप स्थापित करणे शक्य आहे. सामान्यत: हवेतील विषारी वायूंचे उत्सर्जन आणि प्रदूषण नियंत्रण, रासायनिक किंवा सांडपाण्याच्या भाराच्या संदर्भात हे मूल्यांकन केले जाते. हे कार्य जैवविविधतेच्या बाबतीत बरेच आव्हानात्मक बनते.

तरीही, येथे थेट तुलना करणे अथवा हवामानावरील व जैवविविधतेवरील व्यावसायिक कृतींच्या परिणामांचे मोजमाप करण्याच्या जटिलतेतील फरक अधोरेखित करणे हा उद्देश नाही. खरे तर, जैवविविधतेची हानी आणि पर्यावरणीय संकट या दोन्हींना स्वतंत्र समस्यांऐवजी परस्परांशी जोडलेली आव्हाने म्हणून संबोधित करण्यासाठी भागधारकांना उद्युक्त करणे हा उद्देश आहे.

जैवविविधतेबाबत धोक्याची घंटा

जैवविविधतेची हानी हा एक प्रमुख समकालीन धोका म्हणून उदयास आला आहे, ज्यामुळे कृषी आणि इतर आर्थिक व व्यावसायिक उपक्रमांचेही नुकसान होते, याचे ठोस पुरावे आहेत. ‘जैवविविधता आणि परिसंस्था सेवा’ याबाबत संयुक्त राष्ट्रांचे समर्थन लाभलेल्या ‘आंतरसरकारी विज्ञान धोरण व्यासपीठा’च्या २०१९च्या अहवालानुसार, जैवविविधता घटण्याचा दर आता मानवपूर्व इतिहासाच्या तुलनेत सुमारे हजार पटीने अधिक आहे. या अहवालात, पृथ्वीवरील ८० लाख ज्ञात प्रजातींपैकी दहा लाख प्रजातींना सध्या नामशेष होण्याचा धोका असल्याची चिंताजनक वस्तुस्थिती अधोरेखित करण्यात आली आहे. २०२२ मध्ये जागतिक वन्य जीव निधीच्या ‘लिव्हिंग प्लॅनेट’ निर्देशांक अहवालात असेच चित्र रंगवले आहे. या अहवालातून गेल्या अर्धशतकात जगभरातील सस्तन प्राणी, पक्षी, उभयचर प्राणी, सरपटणारे प्राणी आणि मासे यांच्या संख्येत ६९ टक्के घट झाल्याचे स्पष्ट होते.

जैवविविधतेची हानी हा एक प्रमुख समकालीन धोका म्हणून उदयास आला आहे, ज्यामुळे कृषी आणि इतर आर्थिक व व्यावसायिक उपक्रमांचेही नुकसान होते, याचे ठोस पुरावे आहेत.

हे अहवाल एकत्रितपणे जैवविविधतेच्या हानीचे गंभीर आर्थिक परिणाम अधोरेखित करतात, कारण यामुळे परागीकरण, पाणी झिरपण्याची, गाळण्याची प्रक्रिया, पूर नियंत्रण आणि पोषक तत्त्वांचा पुनर्वापर यांसारख्या निसर्ग-आधारित सेवांवर गंभीर परिणाम होतो. या सेवांकरता एकत्रित मूल्य प्रति वर्ष १२५ ते १४० ट्रिलियन अमेरिकी डॉलर्स इतके मोजावे लागते, हे प्रायोगिक पुराव्यांतून स्पष्ट होते. हे सुस्पष्टपणे दिसून येते की, जैवविविधतेच्या रक्षणाला प्राधान्यक्रम देणे ही केवळ पर्यावरणीय चिंता नसून आपल्या जागतिक अर्थव्यवस्थेला अधिक शाश्वत दिशेने आकार देण्याच्या दिशेने उचललेले एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.

घातक धागे

आधी चर्चा केल्याप्रमाणे, वस्त्रनिर्माण आणि पेहराव उद्योग जमीन-आधारित कच्च्या मालावर, विशेषतः कापसावर अवलंबून आहे. कापूस उत्पादन व्यवस्था ही थेट जमिनीचा ऱ्हास व नैसर्गिक व्यवस्थेत होणारे बदल, भूभागावर आणि गोड्या पाण्याच्या परिसंस्थेवर विषारी भार टाकण्यासारख्या समस्यांशी निगडित आहेत, ही वस्तुस्थिती आहे. वस्त्रनिर्माण आणि पेहराव उद्योग जैवविविधतेच्या हानीत भरीव योगदान देणारा ठरतो.

कापसाच्या आधुनिक शेतीत कीटकनाशकांचा सर्वात जास्त वापर केला जातो, हे सर्वश्रुत  आहे. या संदर्भातील आकडेवारीतून स्पष्ट चित्र दिसून येते: २०१९ मधील ‘आंतरराष्ट्रीय कापूस सल्लागार समिती’च्या आकडेवारीनुसार, जागतिक स्तरावर एकूण कीडनाशकांच्या विक्रीच्या ४.७१ टक्के विक्री ही कापसाच्या पिकाकरता होते, विशेषत: १०.२४ टक्के इतका चिंता करण्याजोगा वाटा कीटकनाशकांकरता वापरला जातो. ‘देवी आणि इतर’ यांच्या २०१७ मधील नोंदींनुसार, भारतासारख्या देशांमध्ये, कीटकनाशकांच्या ५० टक्के वापरासाठी केवळ कापूस लागवड जबाबदार आहे. महत्त्वाच्या जैवविविधता क्षेत्रांशी कापूस उत्पादक प्रदेशांची भौगोलिक समीपता असणे, हे बहुतांश वेळा ही समस्या वाढण्यामागचे आणि जागतिक स्तरावर परिणाम होण्यामागचे प्रमुख कारण असते.

कापसाच्या आधुनिक शेतीत कीटकनाशकांचा सर्वात जास्त वापर केला जातो, हे सर्वश्रुत आहे.

या सहअस्तित्वामुळे महत्त्वाच्या जैवविविधता क्षेत्रांमधील भूभागावरील आणि गोड्या पाण्यातील परिसंस्थांच्या जैवविविधतेला तात्काळ आणि गंभीर धोका निर्माण झाला आहे, ज्यातून वस्त्रनिर्माण आणि पेहराव उद्योगातील शाश्वत पद्धती आणि काळजीपूर्वक व जबाबदार व्यवस्थापनाची तातडीची गरज अधोरेखित होते.

फॅशन आणि जैवविविधता यांना जोडणे: एक जागतिक बांधिलकी

म्हणूनच, जैवविविधतेचे संरक्षण, जतन, पुनर्संचयन आणि पुनरुज्जीवन यात सक्रिय राहणे ही वस्त्रनिर्माण आणि पेहराव उद्योग क्षेत्राची महत्त्वपूर्ण जबाबदारी आहे. सुदैवाने, विविध अधिवेशने आणि उपक्रमांद्वारे या उद्दिष्टांच्या प्रती एक आश्वासक जागतिक वचनबद्धता आहे. विशेष म्हणजे, जैवविविधतेबाबत संयुक्त राष्ट्र संघाचा करार, त्याच्या ‘आईची जैवविविधता लक्ष्यां’सह (जगभरातील जैवविविधतेच्या हानीला संबोधित करण्यासाठी आणि ती हानी कमी करण्यासाठी २० विशिष्ट लक्ष्यांचा यात समावेश आहे), जैवविविधतेच्या संवर्धनासाठी व्यापक दृष्टिकोन वाढवून, संयुक्त राष्ट्रांच्या शाश्वत विकास उद्दिष्टांशी जोडते.

या व्यतिरिक्त, कीटकनाशकांचे वितरण आणि वापर या संदर्भातील आंतरराष्ट्रीय आचारसंहिता, संयुक्त राष्ट्रांच्या अन्न आणि कृषी संघटना परिषदेने स्वीकारली आहे. परिसंस्थेच्या संरक्षणासाठी जबाबदार कीटकनाशकांच्या वापराचे महत्त्व त्यातून अधोरेखित होते. ‘निसर्गाशी संबंधित आर्थिक तपशील देणाऱ्या दस्तावेजांच्या कृती गटा’सारख्या रचना अस्तित्वात आल्याने, त्यातून जैवविविधता संरक्षणाच्या आर्थिक परिणामांबद्दल व्यवसायांमध्ये वाढती जागरूकता दिसून येते.

कीटकनाशकांचे वितरण आणि वापर या संदर्भातील आंतरराष्ट्रीय आचारसंहिता, संयुक्त राष्ट्रांच्या अन्न व कृषी संघटना परिषदेने स्वीकारली आहे. परिसंस्थेच्या संरक्षणासाठी कीटकनाशकांच्या जबाबदार वापराचे महत्त्व त्यातून अधोरेखित होते.

‘निसर्गाशी संबंधित आर्थिक तपशील देणाऱ्या दस्तावेजांचा कृती गट’ (टीएनएफडी) व्यवसायांना जैवविविधता हानी आणि परिसंस्थेचा ऱ्हास यांमुळे होणाऱ्या जोखमींबद्दल अहवाल देण्याकरता एक नियमांची चौकट प्रदान करते. या महत्त्वपूर्ण घडामोडी, निसर्गासाठी विज्ञान-आधारित लक्ष्यांच्या उदयासह, आशेचा किरण देतात. या विकासामुळे वस्त्रनिर्माण आणि पेहराव उद्योग स्वत:करता सर्वसमावेशक जैवविविधता उद्दिष्टे स्थापित करण्यास सक्षम होईल.

शाश्वत पर्याय: टी अँड ए मध्ये जैवविविधतेला प्राधान्य देणे

वस्त्रनिर्माण आणि पेहराव उद्योगाला त्यांचे प्राधान्यक्रम तातडीने पुन्हा निश्चित करण्याची गरज आहे. जैवविविधतेचे संरक्षण आणि संवर्धन अग्रस्थानी ठेवून त्यांच्या शाश्वततेसंदर्भातील धोरणांत सुधारणा करणे आवश्यक आहे. हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की, ही नवी सुरुवात नाही; कापूस क्षेत्रात शाश्वततेच्या मानकांच्या विस्ताराकरता भरीव गुंतवणूक आधीच केली गेली आहे. या मानकांमध्ये मूलत: कृषी स्तरावर जैवविविधतेच्या समस्यांचे निराकरण करण्याच्या उद्देशाने घटक समाविष्ट आहेत.

या प्रयत्नांना अधिक बळकट करण्यासाठी, निसर्गावर आधारित उपक्रमांचे रक्षण, समर्थन करण्याची गरज आहे. यात कृषी पर्यावरणीय पद्धतींचा प्रचार, पुनरुत्पादक शेती आणि नैसर्गिक शेती यांचा समावेश होतो. या सर्व पद्धती जमिनीची गुणवत्ता वाढविण्यात महत्त्वपूर्ण योगदान देतात, ज्यामुळे मातीचे आरोग्य, झाडे-झुडपे- वनस्पती सुधारून आणि हानिकारक कृषी रसायनांवरील अवलंबित्व कमी करून जैवविविधतेचे मौल्यवान लाभ मिळतात.

व्यवसाय, धोरणकर्ते आणि उत्पादक यांची सामाजिक, आर्थिक आणि पर्यावरणीय उद्दिष्टे साध्य करण्यासाठी एकत्रित कृती स्तरावरील सहकार्य हे आर्थिक विकास आणि पर्यावरणीय कल्याण या दोहोंना प्राधान्य देणार्‍या अधिक शाश्वत वाटचालीकरता मार्ग तयार करू शकते.

सहयोगी आणि शाश्वत सामाजिक, आर्थिक आणि पर्यावरणीय उद्दिष्टे साध्य करण्यासाठी एकत्रित कृती-स्तरीय उपक्रमांद्वारे दृष्टिकोन अधिक वृद्धिंगत केला जाऊ शकतो, ज्यात अनेक भागधारक सहभागी होऊ शकतात. हे उपक्रम जैवविविधतेची हानी संबोधित करण्यासाठी आणि जैविक समुदाय व परिसंस्था पर्यावरणीयदृष्ट्या पुनर्संचयित करण्यासाठी उचलण्यात आलेले एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. व्यवसाय, धोरणकर्ते आणि उत्पादक यांची सामाजिक, आर्थिक आणि पर्यावरणीय उद्दिष्टे साध्य करण्यासाठी एकत्रित कृती स्तरावरील सहकार्य हे आर्थिक विकास आणि पर्यावरणीय कल्याण या दोहोंना प्राधान्य देणार्‍या अधिक शाश्वत वाटचालीकरता मार्ग तयार करू शकते.

आपण या आठवड्यात ‘जागतिक कापूस दिन’ साजरा करण्यासाठी सज्ज झालो आहोत, चला, वस्त्रनिर्माण आणि पेहराव उद्योगातील कापसाची परिवर्तनीय क्षमता ओळखू या. फॅशन उद्योगातील परिवर्तनाचे एक शक्तिशाली प्रतीक असलेले ‘शुभ्र सोने’ हे लागवडीच्या पद्धतींत खरोखरच अधिक ‘फॅशनेबल’ बनू शकते आणि उद्याच्या अधिक शाश्वत आणि जैवविविधतेकरता आशेचा किरण बनू शकते.

एकत्रित प्रयत्नांद्वारे आणि सामूहिक कृतींद्वारे, आपण केवळ उद्योगाच्या शाश्वततेचा ठसा बदलू शकतो, असे नाही, तर पृथ्वीवरील जीवनाच्या समृद्ध अशा परस्परांशी विणलेल्या जीवनाच्या सर्व पैलूंच्या एका समग्र चित्राचे संरक्षण आणि जतनदेखील करू शकतो. वस्त्रनिर्माण आणि पेहराव उद्योगातील व्यावसायिक वरचेवर म्हणतात की, फॅशन ही प्रामुख्याने निसर्ग आणि नैसर्गिक वातावरणाद्वारे प्रेरित आहे. अशी वेळ आली आहे की, फॅशनने त्याच्या निर्मात्याला समृद्ध करण्यासाठी योगदान द्यायला हवे. स्वतःच्या शाश्वत अस्तित्वासाठी हे आवश्यक आहे. जैवविविधतेशी सुसंगत फॅशन भरभराटीला येईल, असे भविष्य घडवायला हवे.

सुमित रॉय हे ‘जागतिक वन्य निधी, भारत’ या संस्थेचे ‘प्रॉडक्शन लँडस्केप’ विभागाचे प्रमुख आहेत.

मुरली धर हे ‘जागतिक वन्य निधी, भारत’ या संस्थेचे ‘शाश्वत कृषी कार्यक्रमा’चे संचालक आहेत.

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.

Authors

Sumit Roy

Sumit Roy

Sumit Roy is the Head of the Agriculture Production Initiative WWF India

Read More +
Murli Dhar

Murli Dhar

Murli Dhar is the Director of the Sustainable Agriculture Program WWF India

Read More +