जम्मू आणि काश्मीरमध्ये दहशतवादी हिंसाचार पुन्हा डोके वर काढताना दिसत आहे. गेल्या काही आठवड्यांत जम्मूमध्ये दहशतवादी हल्ले आणि चकमकी झाल्या. इथे कार्यरत असलेल्या सुरक्षा दलांना लक्ष्य करण्यासाठीच या कारवाया पुन्हा सुरू झाल्याचा अंदाज आहे.
9 जून 2024 रोजी अतिरेक्यांनी रियासी येथे यात्रेकरूंना घेऊन जाणाऱ्या बसवर हल्ला केला. त्यात 10 जण मृत्युमुखी पडले तर 33 जण जखमी झाले. दोनच दिवसांनंतर डोडा आणि कठुआ इथे झालेल्या दुहेरी हल्ल्यात 6 सैनिक जखमी झाले. 7 जुलै रोजी राजौरी-पुंछ परिसरात दहशतवाद्यांनी सुरक्षा चौकीवर हल्ला केला. त्यात एक लष्करी जवान जखमी झाला होता. त्यानंतर आणखी एक हल्ला 8 जुलै रोजी झाला. सशस्त्र अतिरेक्यांनी कठुआ जिल्ह्यात केलेल्या हल्ल्यात एका अधिकाऱ्यासह पाच सैनिक शहीद झाले तर सहा जण जखमी झाले. डोडा जिल्ह्यात एका चकमकीत चार सैनिक, एक अधिकारी आणि एक जम्मू आणि काश्मीर विभागाचे पोलीस अधिकारी मारले गेले. जैश-ए-मोहम्मदशी संबंधित गट, काश्मीर टायगर्स आणि पीपल्स अँटी फॅसिस्ट फ्रंट यांनी या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.
2019 पासून काश्मीर खोऱ्यातील दहशतवादी हिंसाचाराचा मुकाबला करण्यात सुरक्षा दले मोठ्या प्रमाणात यशस्वी ठरली. तरीही अलीकडेच पीर पंजालच्या दक्षिणेकडील भागात हल्ले झाले. त्यामुळे या हल्ल्यांचे गांभिर्य लक्षात घ्यायला हवे.
2019 पासून काश्मीर खोऱ्यातील दहशतवादी हिंसाचाराचा मुकाबला करण्यात सुरक्षा दले मोठ्या प्रमाणात यशस्वी ठरली. या पार्श्वभूमीवर पीर पंजालच्या दक्षिणेकडील भागात झालेल्या या हल्ल्यांचे गांभिर्य लक्षात घ्यायला हवे. काश्मिरी तरुणांच्या मनोवृत्तीत लक्षणीय बदल झाल्याने दहशतवादी हिंसाचारात घट झाली आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत तरुणांनी सक्रिय सहभाग दाखवला. यावरूनही हे स्पष्ट झाले. केंद्रशासित प्रदेशात 58 टक्के मतदान झाले. या बदलामुळेच पाकिस्तान आणि इथल्या दहशतवादी संघटना लोकांवर दबाव आणू पाहात आहेत.
2019 नंतरची मोहीम
ऑगस्ट 2019 नंतर सुरक्षा यंत्रणांनी दक्षिण काश्मीरमधील दहशतवादी तळांना लक्ष्य केले. सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांच्या नेटवर्कवर हल्ला चढवला आणि अनेक दहशतवाद्यांचा खात्मा केला.
या कारवाईमध्ये ओव्हर ग्राउंड वर्कर्स (OGWs) आणि जमात-ए-इस्लामी (JeI) च्या कॅडरसह दहशतवाद निधी आणि दहशतवाद्यांना पाठिंबा देणाऱ्या किंवा त्यांना आश्रय देणाऱ्या व्यक्तींना लक्ष्य करण्याचे उद्दिष्ट होते. हिजबुल मुजाहिद्दीनशी संबंधित या धार्मिक संघटनेने काश्मीर खोऱ्यात आपले जाळे दूरवर पसरवले होते. सुरक्षा दलांनी दिलेल्या माहितीनुसार, 2019 आणि 2021 दरम्यान जम्मू काश्मीर पोलिसांनी सार्वजनिक सुरक्षा कायदा आणि बेकायदेशीर व्यवहार प्रतिबंध कायद्यानुसार 900 हून अधिक जणांना अटक केली. याव्यतिरिक्त राष्ट्रीय तपास संस्थेने दहशतवादी वित्तपुरवठा प्रकरणांमध्ये अनेक तपास सुरू केले. यातून पाकिस्तानी लष्कराची गुप्तचर यंत्रणा आणि दहशतवादी संघटना यांच्यातील संबंध उघड झाले.
दरम्यान अतिरेकी संघटनांचा बीमोड करण्याची मोहीम सुरूच राहिली. यात दहशतवाद्यांच्या म्होरक्यांना लक्ष्य करण्यात आले. 2021 ते 2023 दरम्यान सुरक्षा दलांनी 127 परदेशी दहशतवाद्यांसह तब्बल 443 दहशतवाद्यांचा खात्मा केला.
स्रोत: सुरक्षा एजन्सींकडून लेखकांनी गोळा केलेला डेटा
या कारवायांचा परिणाम म्हणून 2021 नंतर स्थानिक दहशतवादी संघटनांची भरती घटली. 2022 मध्ये केवळ 100 स्थानिक तरुण दहशतवादी संघटनांमध्ये सामील झाले. 2023 मध्ये हे प्रमाण केवळ 25 पर्यंत खाली आले. जम्मू- काश्मीरमध्ये सध्या सुमारे 110 परदेशी आणि 27 स्थानिक दहशतवादी आहेत, असा सुरक्षा यंत्रणांचा अंदाज आहे.
या बदलत्या परिस्थितीमुळे स्थानिक तरुणांची पाकिस्तानबद्दलची धारणाही बदलली आहे. पाकिस्तानने धर्माच्या नावाखाली शोषण चालवले आहे आणि काश्मीर खोऱ्यातील बंडखोरीला निधी देण्यासाठी कारवाया चालवल्या आहेत हे इथल्या तरुणांच्या लक्षात आले आहे. पाकिस्तानने काश्मिरी तरुणांना अंमली पदार्थांच्या तस्करीसारख्या बेकायदेशीर कामांमध्ये गुंतवून अनेक पिढ्यांची फसवणूक केली आहे हेही आता इथले तरुण जाणून आहेत.
काश्मीर खोऱ्यातून जम्मूपर्यंत
काश्मीर खोऱ्यात सुरक्षा यंत्रणांचा दबदबा होताच पण पाकिस्तानने बंडखोरी टिकवून ठेवण्यासाठी आपले डावपेच आणि क्षेत्र बदलले. 2021 पासूनचे दहशतवादी हल्ले हे मुख्यतः पीर पंजालच्या दक्षिणेला झाले आहेत आणि त्यात परदेशी दहशतवाद्यांचा हात आहे. या अतिरेक्यांनी सुरक्षा दलांवर हल्ला करण्यासाठी इथला जटिल भूभाग आणि घनदाट जंगलांचा वापर केला. 2023 आणि 2024 च्या जूनपर्यंत जम्मू भागात 43 आणि 24 दहशतवादी हल्ले झाले. यात 48 जवानांचा मृत्यू ओढवला.
पाकिस्तान घुसखोरीसाठी नव्या यंत्रणा शोधत आहे. आंतरराष्ट्रीय सीमा आणि उत्तरेकडील नियंत्रण रेषेऐवजी आता जम्मू भागातील नदीच्या क्षेत्रात पाकिस्तानच्या कारवाया सुरू आहेत.
पाकिस्तान घुसखोरीसाठी नव्या यंत्रणा शोधत आहे. आंतरराष्ट्रीय सीमा आणि उत्तरेकडील नियंत्रण रेषेऐवजी आता जम्मू भागातील नदीच्या क्षेत्रात पाकिस्तानच्या कारवाया सुरू आहेत. घुसखोरी करणाऱ्या दहशतवाद्यांनी चार ते पाच जणांच्या गटाने एकत्र येऊन डावपेच आखले आहेत. काही काळ शांत राहणे आणि हल्ले करण्यापूर्वी स्थानिक लोकांशी मिसळणे अशी ही पद्धत आहे. सुरक्षा दलांनी M4 कार्बाइन असॉल्ट रायफल्स, नाईट व्हिजन गॉगल्स यासारख्या उपकरणांच्या वापराचीही नोंद घेतली आहे. यात अद्ययावत दूरसंचार उपकरणेही आहेत. अशी चिनी उपकरणे सहसा पाकिस्तानी लष्कर वापरत असते. याव्यतिरिक्त हे दहशतवादी एन्क्रिप्टेड मेसेजिंग प्लॅटफॉर्म आणि टेलिग्राम, टॅम टॅम, मास्टोडॉन, चिर्पवायर, एनिग्मा असे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सही वापरत आहेत. राजौरी आणि पूंछ जिल्ह्यात अशा नेटवर्कवर आधीच बंदी आहे.
राजौरी आणि पूंछ जिल्ह्यांमध्ये लष्करी यंत्रणा कमकुवत झाली होती. चीनच्या आक्रमणाचा सामना करण्यासाठी पूर्व लडाख सेक्टरमध्ये काही सुरक्षा दलांना पुन्हा नियुक्त केले गेले. दहशतवादी संघटनांनी याच संधीचा फायदा घेतला आणि त्यामुळे हल्ले वाढले.
दहशतवादाचा प्रतिकार
जम्मूमधील दहशतवादी हिंसाचाराच्या या चढाओढीला आवर घालणे आवश्यक आहे. कठुआ, डोडा, राजौरी आणि पूंछ या दहशतवादग्रस्त सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये सुरक्षा दलांची तैनाती करण्याला प्राधान्य दिले पाहिजे. यासाठी काश्मीर खोऱ्यातील अनुभवी लष्करी आणि पोलीस अधिकारी या प्रदेशात तैनात करणे आवश्यक आहे. दहशतवादविरोधी दलांची पुनर्रचना करणे महत्त्वाचे आहे. तसेच वेगवेगळ्या यंत्रणांमध्ये समन्वय साधणेही तितकेच आवश्यक आहे.
जम्मूमधील दहशतवादी हिंसाचाराच्या या चढाओढीला आवर घालणे आवश्यक आहे. कठुआ, डोडा, राजौरी आणि पूंछ या दहशतवादग्रस्त सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये सुरक्षा दलांची तैनाती करण्याला प्राधान्य दिले पाहिजे.
परकीय दहशतवाद्यांनी हल्ला करण्याच्या पद्धतीचा अवलंब केल्यामुळे केंद्रीय राखीव पोलीस दल आणि जम्मू काश्मीर पोलिसांचे विशेष कारवाई गट अशा हल्ल्यांना प्रभावीपणे तोंड देण्यासाठी संयुक्त टीम तयार करू शकतात. CRPF चे कोब्रा (COBRA) कमांडो त्यांच्या जंगल आणि गनिमी युद्धाच्या अनुभवासाठी ओळखले जातात. त्यांना विशेष कारवाई गटांच्या कर्मचाऱ्यांशी एकत्र केले जाऊ शकते. यापैकी काहींना पीर पंजाल आणि चिनाब बेल्ट प्रदेशात 2000 ते 2010 च्या दशकातील लष्करी लढाईचा अनुभव आहे. याशिवाय लष्कराने उंचावरच्या भागात वर्चस्व राखण्यासाठी, नियंत्रण रेषेवर सतर्कता वाढवण्यासाठी आणि सीमेवरील सुरक्षा कडक करण्यासाठी आपल्या ताकदीचा उपयोग केला पाहिजे. लष्कर, CRPF, सीमा सुरक्षा दल आणि जम्मू काश्मीर पोलीस यांच्यातील समन्वय सुधारणे महत्त्वाचे आहे.
तसेच नवीन रणनीती विकसित करण्यासाठी सुरक्षा दलांनी आपल्या सैनिकांना विशेष प्रशिक्षणही दिले पाहिजे. गेल्या सात किंवा आठ वर्षांमध्ये तांत्रिक माहिती वापरून अतिरेक्यांविरुद्धच्या कारवाया यशस्वीपणे पार पाडल्या गेल्या आहेत. मात्र आता हे अतिरेकी सुरक्षा यंत्रणांची दिशाभूल करण्यासाठी एन्क्रिप्टेड ॲप्स आणि ऑनलाइन व्यवहारांचा वापर करत आहेत. याचा प्रतिकार करण्यासाठी लष्करानेही आधुनिक साधनांचा वापर केला पाहिजे. गुप्तचर यंत्रणांनी 2019 नंतर एकमेकांच्या यंत्रणा सुरक्षित केल्या.
अशा कठोर उपाययोजनांमुळेच सुरक्षा दले सक्षम होतील. त्याशिवाय सुरक्षा यंत्रणांना स्थानिकांचा विश्वासही जपावा लागेल. यासाठी लष्कराने काश्मीर खोऱ्यात काही उपक्रमही सुरू केले आहेत. ISI च्या प्रचार यंत्रणेने ऑगस्ट 2019 नंतर काश्मीरमध्ये हे माहिती युद्ध छेडले आहे. त्यामुळे दहशतवाद्यांचा प्रतिकार करण्यासोबतच आता या माहिती युद्धाचे आव्हान सुरक्षा यंत्रणांसमोर आहे.
समीर पाटील हे सेंटर फॉर सिक्युरिटी, स्ट्रॅटेजी अँड टेक्नॉलॉजीचे वरिष्ठ फेलो आणि ऑब्झर्व्हर रिसर्च फाउंडेशनचे उपसंचालक आहेत.
अजाझ वाणी हे ऑब्झर्व्हर रिसर्च फाऊंडेशनच्या स्ट्रॅटेजिक स्टडीज प्रोग्राममध्ये फेलो आहेत.
The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.