Author : Soumya Bhowmick

Published on Feb 02, 2024 Updated 0 Hours ago

बांगलादेशमध्ये अवामी लीगने सलग चौथ्यांदा विजय मिळवला. या फेरनिवडणुकीचे देशाच्या आर्थिक भविष्यावर मोठे परिणाम होणार आहेत.  

बांगलादेशचे आर्थिक भविष्य : 7 मुद्द्यांचा अजेंडा

1971 मध्ये स्वातंत्र्य मिळाल्यानंतर या देशाने उल्लेखनीय आर्थिक परिवर्तन घडवून आणले आहे. जगातील सर्वात गरीब देशांपैकी एक असलेला बांगलादेश आता सर्वात वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थांपैकी एक बनला आहे.मानव विकास निर्देशांक (HDI) आणि शाश्वत विकास उद्दिष्टे (SDGs) यांसारख्या क्षेत्रांत देशाची सकारात्मक कामगिरी असूनही कोरोनाची महामारी आणि रशिया-युक्रेन संघर्षामुळे उद्भवलेले  आर्थिक धक्के या देशाच्या आर्थिक सुरक्षेसाठी हानिकारक ठरले.  2020 मध्ये कोरोनाच्या साथीने उभ्या केलेल्या आव्हानांचा सामना करताना बांगलादेशने 3.4 टक्के सकारात्मक विकास दर गाठला आणि अनेक विकसनशील देशांना मागे टाकले. यामुळे या देशाच्या सत्ताधाऱ्यांचीही प्रशंसा झाली. 

आकृती 1: BIMSTEC राष्ट्रांचा वार्षिक GDP वाढीचा दर (2010-2021 मधली टक्केवारी)

स्रोत: लेखिकेने स्वतः मिळवलेला आणि जागतिक बँकेचा डेटा

तथापि 2022 च्या उत्तरार्धात बांगलादेशने आंतरराष्ट्रीय नाणेनिधी कडून अंदाजे 4.5 अब्ज अमेरिकी डाॅलर्स कर्जाची मागणी केली. यामुळे श्रीलंका आणि पाकिस्तानबरोबरच बांगलादेशकडेही जगाचे लक्ष वेधले गेले. बांगलादेशचा आर्थिक मदतीचा हा शोध सावधगिरीचा उपाय म्हणून पाहिला जात असला तरी बांगलादेशच्या सध्याच्या आर्थिक परिस्थितीची मूळ कारणे या देशाच्या अर्थव्यवस्थेच्या संरचनेत खोलवर गुंतलेली आहेत. बांगलादेशमध्ये 7 जानेवारी 2024 रोजी 12वी संसदीय निवडणूक झाली. पंतप्रधान शेख हसीना यांच्या अवामी लीगने सलग चौथ्यांदा विजय मिळवला. या निकालाचे या देशाच्या आर्थिक भविष्यावर काय परिणाम होतात याकडे सगळ्यांचे लक्ष आहे. 

1. निर्यातीमधले वैविध्य

बांगलादेशच्या वाढीचा दर प्रभावी आहे. तरीही त्यांच्या निर्यात व्यवस्थेमध्ये वैविध्य नसल्यामुळे आव्हानेही आहेत. बांगलादेश  सध्या निर्यातीसाठी वस्त्रोद्योग व तयार कपड्यांच्या निर्यातीवर जास्त अवलंबून आहे. 2019-2020 मधील बांगलादेशच्या एकूण निर्यात कमाईपैकी 84 टक्क्यांहून अधिक रक्कम कपड्यांच्या निर्यातीतून आली. वस्त्रोद्योगाची देशाच्या आर्थिक स्थितीत महत्त्वाची भूमिका आहे हेच यावरून अधोरेखित होते. तथापि, जागतिक मागणी आणि श्रम-केंद्रित उत्पादन पद्धतींमधील सध्याची अस्थिरता यामुळे या क्षेत्रातही आव्हाने आहेत. सेवा क्षेत्राकडून अल्पकालीन मदत मिळते. त्यामुळे बांगलादेशला निर्यातीसाठी एक दीर्घकाळाची योजना आखावी लागणार आहे. त्यातही निर्यातीमध्ये विविधता आणणे महत्त्वाचे आहे.

2019-2020 मधील बांगलादेशच्या एकूण निर्यात कमाईपैकी 84 टक्क्यांहून अधिक रक्कम कपड्यांच्या निर्यातीतून आली. वस्त्रोद्योगाची देशाच्या आर्थिक स्थितीत महत्त्वाची भूमिका आहे हेच यावरून अधोरेखित होते.

2. कराचे व्यवस्थापन

सध्या बांगलादेशात GDP च्या 8 टक्के उत्पन्न करातून येते.   यामध्ये हा देश दक्षिण आशियातील दुसऱ्या सर्वात खालच्या क्रमांकावर आहे आणि बहुतेक निम्न-मध्यम उत्पन्न असलेल्या देशांपेक्षा बांगलादेश अंदाजे 5 टक्क्यांनी मागे आहे. बांगलादेशातील कर प्रशासनाला संस्थात्मक भ्रष्टाचाराच्या आव्हानांचा सामना करावा लागतो. त्यामुळे महसूल जमा होण्यात अडथळा निर्माण होतो. कर आणि GDP चे गुणोत्तरही संतुलित राहात नाही. यामुळे करदात्यांच्या इच्छाशक्तीवर नकारात्मक परिणाम होतो. याव्यतिरिक्त अपुऱ्या पायाभूत सुविधा, वाढता खर्च आणि रखडलेले प्रकल्प यामुळे इथे वित्तीय तूटही वाढली आहे. भ्रष्टाचार रोखण्यासाठी तातडीचे उपाय, प्रगतीशील कर प्रणाली आणि खर्चाचे तर्कसंगतीकरण हे वित्तीय स्थैर्यासाठी आणि असमानतेच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी तसेच आर्थिक विकासास मदत करण्यासाठी आवश्यक आहेत.

3.  महसुलाचे घटते प्रमाण

बांगलादेश आर्थिक आव्हानांच्या मालिकेला तोंड देतो आहे. आयात-निर्यात जुळत नसल्यामुळे त्याच्या चालू खात्यातील समस्या आणि एकूणच आर्थिक परताव्याच्या समस्याही वाढतात. राजकोषीय तुटीचा थेट परिणाम अर्थव्यवस्थेवर होतो. कमी झालेली निर्यात आणि वाढलेले आयात बिल यामुळे आर्थिक परिस्थितीवर ताण येतो. थेट परकीय गुंतवणुकीत घट झाल्याने भांडवली खात्यातील शिल्लक कमी होते. बांगलादेशने आयात मर्यादित करण्याचे प्रयत्न केले. परंतु तरीही  2023-24 च्या जुलै-सप्टेंबर तिमाहीत व्यापारात 3.8 अब्ज अमेरिकी डाॅलर्स एवढी तूट नोंदवण्यात आली. त्यामुळे व्यापारातला असमतोल वाढतोच आहे. हा असमतोल दूर करण्यासाठी निर्यातीला प्रोत्साहन देणे, आयातीवरचे अवलंबित्व कमी करणे आणि व्यवसायाचे वातावरण सुधारणे आवश्यक आहे.

4. फॉरेक्स कमी करणे

जागतिक घडामोडींचा सूक्ष्म अर्थव्यवस्थेवरही परिणाम होत असतो. यामध्ये रेमिटन्स कमी होणे, फॉरेक्स कमी होणे असे घटक येतात.  बांग्लादेशची परकीय गंगाजळी 2023 मध्ये 27 टक्क्यांच्या घसरणीसह सहा महिन्यांत 39 अब्ज अमेरिकी डाॅलर्सवरून 32  अब्ज अमेरिकी डाॅलर्सच्या खाली घसरली. या संकटांचा व्यवसायांवर विपरीत परिणाम झाला. कमी होत असलेल्या साठ्याचे रक्षण करण्यासाठी सरकारने सर्व अनावश्यक आयात थांबवणे आणि व्यावसायिक बँकांना डॉलर्सचा पुरवठा मर्यादित करणे यासारख्या उपाययोजना लागू केल्या. परिणामी बँकांना क्रेडिट अर्जांची नवीन पत्रे नाकारण्याची सक्ती तर झाली. पण भूतकाळातील आयातीसाठी विदेशी पुरवठादारांना वेळेवर पेमेंट करण्याचे आश्वासनही पूर्ण होँण्याची शक्यता नाही.  सामाजिक सुरक्षेचे उपाय योजून देशांतर्गत अर्थव्यवस्था स्थिर करण्यासाठी आणि असुरक्षित सामाजिक गटाचे संरक्षण करण्यासाठी तातडीची सरकारी कारवाई महत्त्वाची आहे.

जागतिक घडामोडींचा परस्परसंबंधित मॅक्रो इकॉनॉमिक पॅरामीटर्सवर परिणाम झाला आहे, ज्यात रेमिटन्स कमी होणे, फॉरेक्स कमी होणे आणि कमकुवत होणारा बांगलादेशी टक्का यांचा समावेश आहे.

5. ऊर्जा क्षेत्र

बांगलादेशमध्ये 2009 मधल्या 5 GW वरून 2022 मध्ये 25.5 GW पर्यंत वीज निर्मिती क्षमतेत लक्षणीय 80 टक्के वाढ झाली. एवढी ऊर्जानिर्मिती होऊनही देशात 2022 मध्ये विजेचे प्रमाण सार्वकालिक नीचांकी पातळीवर पोहोचले आहे. तंत्रज्ञानाच्या सुधारणांद्वारे आणि पर्यायी ऊर्जेच्या संक्रमणाद्वारे मागणी आणि पुरवठ्यातील तफावतीचा सामना करणे अत्यंत आवश्यक आहे.एकूण आर्थिक वाढीमध्ये अडथळा न आणता विजेची मागणी सामावून घेण्याचा हा दृष्टिकोन आहे. चलनवाढीचे दबाव, अन्न आणि इंधनाच्या वाढत्या किंमती ही सगळी आव्हाने रशिया-युक्रेन संघर्षामुळे आणखी तीव्र झाली. यामुळे अल्प-मध्यम मुदतीचे आर्थिक धोकेही निर्माण झाले.  यामुळे देशांतर्गत क्षमता वाढवण्याची आणि विविध पातळीवर जागतिक भागीदारी वाढवण्याची गरज अधोरेखित झाली. या महत्तावाच्या क्षेत्रांमध्ये लवचिकताही आवश्यक आहे.  

6. महागाईचा दबाव आणि बँकिंग क्षेत्र:

बांगलादेशची अर्थव्यवस्था सातत्याने चलनवाढीने ग्रस्त आहे. यामुळे लोकांचे रोजचे जगणे कठीण होऊन बसले आहे. त्यांना आर्थिक स्थैर्य मिळालेले नाही. विशेषत: विनिमयाचा दर घसरला आणि यामुळे 2023 च्या आर्थिक वर्षात उच्च चलनवाढ झाली. जागतिक चलनवाढीच्या दरात घट होऊनही बांगलादेशमध्ये 2023 मध्ये महागाईचा दर सुमारे 10 टक्के आहे.  देशातील बँकिंग क्षेत्र मोठ्या उलथापालथीला सामोरे जाते आहे. बांगलादेशमधली सर्वात मोठी खाजगी बँक असलेल्या इस्लामी बँकेला आर्थिक साह्य द्यावे लागले आहे. कर्जाची परतफेड न झाल्याने झालेली फसवणूक,  कुरघोडी आणि नोकरशाहीच्या भ्रष्टाचारामुळे उद्भवलेल्या संकटामध्ये ठेवीदारांचा विश्वास पुन्हा मिळवण्यासाठी या बँकेला आर्थिक साह्य मागावे लागले आहे.  ही आर्थिक आव्हाने बांगलादेशातील राजकारणाच्या दृष्टिकोनातून अतिशय गुंतागुंतीची आहेत. या समस्या सोडवण्यासाठी देशांतर्गत आणि जागतिक आर्थिक गतीशीलतेचे सर्वसमावेशक आकलन आवश्यक आहे.

7. असमानता, हवामान बदल आणि शाश्वत विकास

वाढती असमानता आणि हवामान बदलामुळे निर्माण झालेल्या आर्थिक जोखमीचे व्यवस्थापन अशी दुहेरी आव्हानेही देशासमोऱ आहेत. सामाजिक-आर्थिक निर्देशकांच्या बाबतीत प्रगती केलेली असली तरी सामाजिक खर्चासाठी अधिक आर्थिक संसाधनांचे वाटप करावे लागेल. त्याचबरोबर बचत आणि गुंतवणुकीला चालना देऊन आणि सर्वसमावेशक वाढ सुनिश्चित करून असमानता कमी करण्याच्या दिशेने प्रयत्न केले पाहिजेत. त्याच बरोबर देश हवामान बदलाच्या धोक्याशी झुंजतो आहे. समुद्राची वाढती पातळी, शहरीकरण आणि जंगलतोड यामुळे पर्यावरणावर अवलंबून असलेली उपजीविका आणि पर्यावरण सेवा धोक्यात आली आहे.  मे 2020 मध्ये कोविड-19 साथीच्या आजाराच्या सुरुवातीच्या काळात बांगलादेशला आजपर्यंतचे सर्वात शक्तिशाली चक्रीवादळ असलेल्या अम्फान चक्रीवादळाचा सामना करावा लागला. याचा फटका किनारी भागातील नऊ जिल्ह्यांत 10 लाखांहून अधिक लोकांना बसला. या वादळामुळे 1 कोटी 30 लाख अमेरिकी डाॅलर्स  इतके नुकसान झाले. अशा प्रकारच्या पर्यावरण संकटाचा सामना करण्यासाठी आंतरराष्ट्रीय अनुदान आणि तंत्रज्ञानाची मदत घेऊन बांगलादेशला आपली आर्थिक उत्पादकता वाढवावी लागणार आहे.

बांगलादेशात 2009 पर्यंत असाच कल दिसून आला. प्रत्येक निवडणुकीच्या वर्षात अनिश्चितता, रस्त्यावरील आंदोलने, संप आणि हिंसाचार, आर्थिक घडामोडींमध्ये व्यत्यय आणणे आणि GDP मध्ये घट होणे अशी संकटे आली.

राजकीय व्यवसाय चक्र सिद्धांताच्या दृष्टिकोनातून पाहिले तर  विद्यमान सरकारच्या पुनर्निवडणुकीच्या शक्यतांना चालना देण्याच्या उद्देशाने राजकीय हस्तक्षेप होतो आणि आर्थिक व्यवहारांमध्ये चढ-उतार होतात. 1994 मध्ये आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने केलेल्या सर्वेक्षणाचे निष्कर्ष पाहिले तर बांगलादेशसह विकसनशील देशांतील सरकारे निवडणुकीपूर्वी विस्तारात्मक खर्चाची धोरणे स्वीकारतात. बांगलादेशात 2009 पर्यंत असाच कल दिसून आला. प्रत्येक निवडणुकीच्या वर्षात अनिश्चितता, रस्त्यावरील आंदोलने, संप आणि हिंसाचार, आर्थिक घडामोडींमध्ये व्यत्यय आणणे आणि GDP मध्ये घट होणे अशी संकटे आली. 2014 आणि 2018 मध्ये मात्र याच देशात थोडे वेगळे चित्र दिसले. निवडणूक वर्षात GDP मध्ये वाढ झाली. आर्थिक वर्षांच्या मध्यभागी होणाऱ्या निवडणुकांमुळे सत्तेच्या हस्तांतरणाबाबतची अनिश्चितता कमी झाली. आता नव्याने निवडून आलेल्या सरकारने सध्याच्या आव्हानांवर मात केली तर या आर्थिक वर्षाच्या उत्तरार्धात बांगलादेशची अर्थव्यवस्था पुन्हा उभी राहू शकते. यामुळे पुढच्या निवडणूक वर्षात वाढीचा आणखी एक काळ सुरू होण्यास मदत होईल.

 

सौम्य भौमिक हे सेंटर फॉर न्यू इकॉनॉमिक डिप्लोमसी ऑब्झर्व्हर रिसर्च फाउंडेशनमध्ये सहयोगी फेलो आहेत.

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.