Expert Speak Raisina Debates
Published on May 26, 2025 Updated 0 Hours ago

ऑपरेशन सिंदूर हे भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेतील एक सिद्धांतात्मक बदल दर्शवते, ज्यामध्ये आक्रमक वायुशक्तीला एक विश्वासार्ह, नियंत्रित आणि प्रभावी प्रतिरोधक साधन म्हणून पुन्हा प्रतिष्ठा प्राप्त होते.

'बालाकोट प्लस प्लस’- भारताच्या आक्रमक वायुशक्तीचे नवे समीकरण

Image Source: Getty

    वातावरण शांत होत असताना, पाकिस्तानने घडवून आणलेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्याला भारताने दिलेल्या मोजक्‍या आणि ठोस प्रत्युत्तरानंतर अनेक धडे पुढे येऊ लागले आहेत. केवळ ९० तासांच्या आत पार पडलेल्या या संक्षिप्त, वेगवान, घातक आणि अभूतपूर्व हवाई कारवाईने भारतीय वायुशक्तीला राष्ट्रीय सुरक्षेच्या केंद्रस्थानी पुन्हा एकदा आणले आहे. ब्रेकिंग न्यूज, गरमागरम चर्चा आणि तीव्र प्रतिक्रिया यांचा मीडिया गदारोळ ओसरत असताना, राष्ट्रीय सुरक्षेच्या व्यापक दृष्टिकोनातून काही प्राथमिक निष्कर्षांवर विचार करण्याची ही योग्य वेळ आहे. काही महत्त्वाचे पैलू आता ठळकपणे समोर येत असून, त्यावर अधिक चिंतन आणि चर्चेची गरज आहे.
    ब्रेकिंग न्यूज, गरमागरम चर्चा आणि तीव्र प्रतिक्रिया यांचा मीडिया गदारोळ ओसरत असताना, राष्ट्रीय सुरक्षेच्या व्यापक दृष्टिकोनातून काही प्राथमिक निष्कर्षांवर विचार करण्याची ही योग्य वेळ आहे.
    जलद लष्करी प्रत्युत्तराच्या काही मर्यादा असतात, विशेषतः जेव्हा आश्चर्य राहिलेले नसते आणि प्रतिस्पर्धकाला प्रतिक्रिया येणार याची अपेक्षा असते. याकारणाने नियोजन आणि तयारीसाठी उपलब्ध असलेला कालावधी मर्यादित असल्यामुळे, प्रत्युत्तराच्या व्याप्तीवर आणि परिमाणावरही बंधन येते. याउलट, स्वतःच्या वेळेनुसार आणि स्वतःच्या पद्धतीने दिलेले मोजके प्रत्युत्तर हे व्यापक राष्ट्रीय शक्तीच्या सर्व घटकांना एकत्र आणण्याची संधी देते, ज्यातून एक समन्वयित, नियंत्रित आणि टप्प्याटप्प्याने वाढणाऱ्या संघर्षावर नियंत्रण ठेवणारी रणनीती तयार होते. या वेळी प्रत्युत्तर देण्याच्या वेळेत आश्चर्य असण्याऐवजी, कारवाईच्या व्याप्ती आणि तीव्रतेत आश्चर्य होते. हे पारंपरिक ‘जश्यास तसे' अशा प्रकारचे मोजके प्रत्युत्तर नव्हते, जे अणुशक्तीच्या सावटामुळे पूर्वी मर्यादित राहत असे. याउलट, हे प्रत्युत्तर अधिक तीव्र आणि एकतर्फी कठोर होते — संघर्षाच्या प्रत्येक टप्प्यावर गंभीर नुकसान घडवण्याच्या हेतूने. भारताच्या पारंपरिक संरक्षणात्मक सुरक्षादृष्टीकोनाची जागा आता आक्रमक भूमिकेने घेतली आहे, जीने पाकिस्तानची पूर्वापार असलेली अणु धमक्यांची बंधने आता झुगारून टाकली आहेत.
    "बालाकोट प्लस प्लस" प्रकारच्या प्रत्युत्तरात, भारताने केलेल्या प्रतिकारात्मक कारवाईत एकूण नऊ लक्ष्यांवर हल्ला केला — यापैकी पाच पाकिस्तानने अधिकृतपणे कब्जा केलेल्या जम्मू आणि काश्मीरमध्ये (PoJK) आणि चार पाकिस्तानच्या मुख्य प्रदेशातील पंजाबमध्ये होते. ही सर्व लक्ष्ये केवळ आणि विशेषतः दहशतवाद केंद्रे व त्यांच्या पायाभूत सुविधांपुरती मर्यादित होती. ही कारवाई समन्वयित आणि नियोजित आक्रमक मोहिमेच्या स्वरूपात पार पडली, जिथे कोलॅटरल डॅमेज अत्यंत मर्यादित ठेवण्यात आले — आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे, पाकिस्तानी हवाई हद्दीत प्रवेश न करताच ही कारवाई पार पडली. भारतीय हवाई दलाने (IAF) ही हवाई कारवाई ७ मे २०२५ रोजी पहाटे १:१५ वाजता सुरू केली. फक्त तेवीस मिनिटांची ही कारवाई भारताच्या दहशतवादविरोधी धोरणातील एक निर्णायक वळण ठरली, जिथे विविध एअर लाँच स्टँड-ऑफ शस्त्रांनी भारताच्या संतापाची तीव्रता दाखवली. एकाच वेळी वेगवेगळ्या भौगोलिक क्षेत्रांतील अनेक लक्ष्यांवर हल्ला करण्यात आल्यामुळे भारतीय हवाई दलाच्या जटिल नियोजनशक्तीचा, संसाधनांच्या योग्य ताळमेळाचा, अचूक समन्वयाचा आणि व्यावसायिक अंमलबजावणीचा प्रत्यय आला. ही कारवाई जागतिक स्तरावर अद्वितीय ठरते कारण ती अशा प्रतिस्पर्ध्यावर करण्यात आली होती, ज्याची हवाई शक्ती भारताच्या तुलनेत जवळपास समकक्ष मानली जाते आणि जो स्वतःला अभेद्य मानत होता. 'ऑपरेशन सिंदूर' हे भारताच्या लष्करी धोरणात आणि राष्ट्रीय सुरक्षेच्या साधनांमध्ये आक्रमक वायुशक्तीच्या महत्त्वाचे पुनरुत्थान होते.
    फक्त तेवीस मिनिटांची ही कारवाई भारताच्या दहशतवादविरोधी धोरणातील एक निर्णायक वळण ठरली, जिथे विविध एअर लाँच स्टँड-ऑफ शस्त्रांनी भारताच्या संतापाची तीव्रता दाखवली.
    त्यानंतरच्या संघर्षात, पाकिस्तानच्या फारच प्रसिद्ध असलेल्या हवाई दलाने (PAF) भारताच्या नागरी ठिकाणांवर आणि आघाडीच्या हवाई तळांवर ड्रोन आणि क्षेपणास्त्रांच्या मदतीने केलेले हल्ले भारतीय हवाई दलाच्या विस्तारित एकात्मिक हवाई संरक्षण प्रणालीने (एक्सटेंडेड इंटिग्रेटेड एअर डिफेन्स सिस्टम EIADS) रोखले. पूर्णपणे स्वदेशी असलेल्या नेटवर्क-आधारित रचनेत विकसित करण्यात आलेली एकात्मिक हवाई आदेश व नियंत्रण प्रणाली (इंटिग्रेटेड एअर कमांड अँड कंट्रोल सिस्टीम IACCS) ही EIADS ची मुख्य रचना आहे. या प्रणालीत जमिनीवरील आणि हवेतून काम करणाऱ्या सेन्सर्सचा समावेश आहे, जी शत्रूच्या हवाई क्षेत्रावर त्रिमितीय देखरेख प्रदान करते. हे सेन्सर्स विविध प्रकारच्या हल्लेखोर साधनांशी समन्वय साधून कार्य करतात – ज्यामध्ये S-400 सारखी दीर्घ पल्ल्याची क्षेपणास्त्र प्रणाली, स्वदेशी व आयात केलेली मध्यम व लघुपल्ल्याची क्षेपणास्त्र प्रणाली, शेवटच्या क्षणी मारा करणारी हत्यारे आणि दृश्यपलीकडे लक्ष्य भेदणाऱ्या (बियाँड व्हिज्युअल रेंज BVR) क्षमतांसह लढाऊ विमाने यांचा समावेश होतो. या प्रणालीमुळे PAF ला कोणतीही आक्रमक कारवाई करण्यापासून परावृत्त केले गेले आणि शत्रूच्या हवाई धमक्या यशस्वीपणे निष्क्रीय झाल्या. एक वेगळा महत्त्वाचा टप्पा म्हणजे भारतीय लष्कराच्या हवाई संरक्षण प्रणालीचे EIADS मुख्य प्रणालीशी 'आकाशतीर' या दुसऱ्या स्वदेशी प्रणालीद्वारे यशस्वीपणे एकत्रीकरण झाले. यामुळे मोठ्या संख्येने पाठवलेल्या मानवरहित हवाई प्रणालींना लक्ष्य करता आले, जे एका मर्यादित हवाई शक्ती असलेल्या शत्रूकडून पाठवले गेले होते. खरे पाहता, भारताची हवाई संरक्षण प्रणाली फक्त PAF ला परावृत्त करण्यातच यशस्वी ठरली नाही, तर शत्रूचे ड्रोन आणि क्षेपणास्त्र पाडण्यातही प्रभावी ठरली. याचमुळे शत्रूच्या हवाई क्षेत्रावर नियंत्रण मिळवण्यासाठी आवश्यक परिस्थिती तयार झाली. त्याचा लाभ घेत सुखोई आणि राफेल सारख्या लढाऊ विमानांनी शत्रूच्या हवाई सामर्थ्याच्या मूलभूत केंद्रांवर अचूक हल्ले केले. एकंदरीत हवाई सामर्थ्याच्या दृष्टिकोनातून पाहता, हवाई संरक्षण आता एक आक्रमक संकल्पना बनली आहे – जी आक्रमक हवाई शक्तीची जोड आहे. हे दोघे परस्परावलंबी, अविभाज्य आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे – राष्ट्रीय सुरक्षेसाठी अत्यावश्यक घटक बनले आहेत, कारण ते धोरणात्मक यश निश्चित करतात.
    चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मी एअर फोर्स (PLAAF) चे एका धोरणात्मक हवाई शक्तीत रूपांतर अतिशय वेगाने होत आहे आणि हे अमेरिकेच्या चीनच्या समुद्रकिनाऱ्यांवरील वर्चस्वाला विरोध करण्यासाठी वापरले जात आहे.
    माध्यमांमध्ये चीनकडून पाकिस्तानला पुरवलेले प्लॅटफॉर्म्स आणि शस्त्रांच्या कार्यक्षमतेबाबत बऱ्याच गोष्टी समोर आल्या आहेत, आणि हे अपेक्षितच होते, कारण बीजिंग आणि इस्लामाबाद यांच्यातील दीर्घकालीन धोरणात्मक, लष्करी आणि संरक्षण क्षेत्रातील भागीदारी यामागे आहे. चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मी एअर फोर्स (PLAAF) चे एका धोरणात्मक हवाई शक्तीत रूपांतर अतिशय वेगाने होत आहे आणि हे अमेरिकेच्या चीनच्या समुद्रकिनाऱ्यांवरील वर्चस्वाला विरोध करण्यासाठी वापरले जात आहे. अधिक आक्रमक होत चाललेले PLAAF आणि PLA नौदल (PLAN) एकत्र येऊन तैवान आणि दक्षिण चीन समुद्राच्या दिशेने असलेल्या अमेरिकेच्या प्रभावाला दूर, दुसऱ्या बेट साखळीपलीकडे ढकलण्याचा प्रयत्न करत आहेत. कोरियन युद्धानंतर (1950 च्या दशकाच्या सुरुवातीला) चीनने प्रत्यक्ष युद्धात आपली हवाई शक्ती आक्रमकपणे वापरलेली नाही. त्यामुळे आपली संरक्षण औद्योगिक उत्पादने किती प्रभावी आहेत, याबद्दल निर्माण होणारे संशय दूर करण्यासाठी चीन खूप प्रयत्न करत आहे. पाकिस्तान एअर फोर्स (PAF) च्या माध्यमातून चीन आपली शस्त्र प्रणाली युद्ध-सिद्ध असल्याचे चित्र निर्माण करू पाहतो आहे. जरी त्यांच्या शस्त्र प्रणालींमध्ये आणि त्यांच्या कार्यपद्धतींच्या समन्वयात काही कमतरता स्पष्टपणे दिसत असल्या, तरी दोन्ही देश — एक कथित PAF विजयाच्या आंतरराष्ट्रीय कथानकाच्या आडून — या त्रुटी आणि कमतरतांचा बारकाईने अभ्यास करून त्यावर लवकरात लवकर उपाय शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. या दोन्ही देशांमधील, तसेच त्यांच्या हवाई दलांमधील समन्वयाचा सखोल अभ्यास आणि सतत निरीक्षण करणे अत्यावश्यक आहे, कारण यावरून भारतासमोर भविष्यात निर्माण होणाऱ्या लष्करी धोके कशा प्रकारचे असतील, याचा अंदाज बांधता येईल.
    अधिक आक्रमक होत चाललेले PLAAF आणि PLA नौदल (PLAN) एकत्र येऊन तैवान आणि दक्षिण चीन समुद्राच्या दिशेने असलेल्या अमेरिकेच्या प्रभावाला दूर, दुसऱ्या बेट साखळीपलीकडे ढकलण्याचा प्रयत्न करत आहेत.
    शेवटी, युद्धातील हानी ही प्रोफेशनल मिलिट्रीसाठी सामान्य गोष्ट असते. भारताच्या सशस्त्र दलांनीही ही बाब नेहमीच स्वीकारली आहे आणि ती पार करत मोठ्या राष्ट्रीय उद्दिष्टांसाठी आणि धोरणात्मक यशासाठी सैनिकी विजय मिळवले आहेत. आकड्यांची तुलना किंवा खोटे कथानक तयार करून दोन मूलभूत गोष्टी झाकता येत नाहीत. पहिली म्हणजे, पाकिस्तान एअर फोर्स (PAF) ने आपल्या ऐतिहासिक परंपरेनुसार लगेचच माघार घेतली. यामुळे त्यांची बचाव करण्याची क्षमता — आक्रमण तर दूरचीच गोष्ट — समोर आली आणि त्यांच्या आक्रमक-स्वरक्षण धोरणावर प्रश्नचिन्ह उभे राहिले. दुसरी गोष्ट म्हणजे, भारताच्या हवाई शक्तीने एक धाडसी आणि स्वागतार्ह आक्रमक दृष्टिकोन आत्मसात केला आहे. तिने स्वतःला एक प्रभावी आणि परिणामकारक लष्करी साधन म्हणून सिद्ध केले आहे — जे अर्धशांततेच्या काळात ‘ग्रे झोन’मध्येही कार्यक्षम आहे आणि पारंपरिक युद्धातही धमक्यांना निष्क्रीय करू शकते. आता वेळ आली आहे की देशाच्या प्रतिरोध क्षमतेला आर्थिक वाढीच्या गतीप्रमाणेच बळकटी दिली जावी, आणि हवाई शक्तीतील दीर्घकालीन तुटवड्यांना तातडीने आणि दृढ निश्चयाने भरून काढले जावे.
    एअर मार्शल (डॉ.) दिप्तेन्दु चौधुरी, पीव्हीएसएम, एव्हीएसएम, व्हीएम, व्हीएसएम, हे नवी दिल्लीतील नॅशनल डिफेन्स कॉलेजचे माजी कमांडंट आणि एक एअर पॉवर स्ट्रॅटेजिस्ट आहेत.
    The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.