Published on Jan 10, 2023 Updated 0 Hours ago

सरकारकडून अलीकडेच सुरू करण्यात आलेला एआयसीटीई (एलआयटीई) कार्यक्रम अभियांत्रिकी शिक्षणातील अध्यपकांच्या व्यावसायिक विकासास मदत करतो.

एआयसीटीई – एलआयटीई : सरकारच्या पुढाकारातून उद्योग-शिक्षण भागीदारी

‘राष्ट्रीय शिक्षण धोरण, २०२०’ अनुसार शिक्षणात तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी चार ढोबळ विभाग करण्यात आले आहेत. त्यामध्ये १) अध्यापन-शिक्षण व मूल्यमापन प्रक्रिया सुधारणे, २) शिक्षकांना तयारीसाठी व व्यावसायिक विकासासाठी सहाय्य करणे, ३) शिक्षणाच्या उपलब्धतेची संधी वाढवणे आणि ४) शैक्षणिक नियोजन, व्यवस्थापन आणि प्रशासन सुविहीत करणे. कोव्हिड-१९ साथरोगामुळे एडटेक (शैक्षणिक तंत्रज्ञान) उद्योगाच्या विकासाचा वेग वाढला आहे आणि एडटेक सेवा देणाऱ्या कंपन्यांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. विशेषतः अध्यापन आणि अध्ययनाच्या विभागात ही वाढ दिसून येते. या विभागातील बहुतेक तंत्र हे ‘चाचणीच्या तयारीवर’ केंद्रित आहे. उच्च व व्यावसायिक शिक्षणासाठी विविध प्रवेश परीक्षांची तयारी करणाऱ्या उच्च व व्यावसायिक शिक्षणासाठी त्यातून मदत केली जाते. शालेय विद्यार्थ्यांसाठी वैयक्तिक अध्ययन सेवाही पुरवण्यात येते. हे ‘बी २ सी मॉडेल’ असून त्यासाठी पालक मूल्य अदा करतात. अनेक कंपन्या आजीवन शिक्षणासाठी सेवा पुरवत असून त्यासाठी त्या ज्या व्यावसायिकांना व तरुणांना आपल्या कौशल्याची उजळणी करायची आहे किंवा ज्यांना स्वतःला अधिक कौशल्ये मिळवायची आहेत, त्यांना लक्ष्य करीत आहेत.

अगदी अलीकडील काळात ‘आयआयटी मद्रास’ने प्रोग्रामिंग व डेटा सायन्समधील बॅचलर ऑफ सायन्स (बीएस्सी) ही पदवी उपलब्ध करून दिली आहे. या अभ्यासक्रमासाठी तब्बल तेरा हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.

उच्च शिक्षणातील अध्यापन-अध्ययन विभागातील अनेक संस्थात्मक मॉडेल्सनी ‘मॅसिव्ह ओपन ऑनलाइन’ अभ्यासक्रमांचे (एमओओसी) रूप धारण केले आहे. ऑनलाइन हा शब्द मूलतः प्रत्यक्ष, एकाच वेळी सर्व ठिकाणी, व्याख्यानांसाठी वापरला जातो. मात्र आता तो इंटरनेटवरील अभ्यासक्रमांसाठी वापरला जातो. हे अभ्यासक्रम एकाच वेळी प्रत्यक्ष सुरू नसतात, तर ते यादृच्छिकपणे उपलब्ध होऊ शकतात. अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय विद्यापीठांकडून असे एमओओसी अभ्यासक्रम उपलब्ध करून दिले जात आहेत. त्यात २०१२ मध्ये हार्वर्ड विद्यापीठ आणि एमआयटी या संस्थांनी ‘एडएक्स’ उपलब्ध करून दिले. हे सुरुवातीचे उदाहरण आहे. भारत सरकारच्या नेतृत्वाखालील उदाहरणांमध्ये एनपीटीईएल व स्वयंम आणि अगदी अलीकडील काळात ‘आयआयटी मद्रास’ने प्रोग्रामिंग व डेटा सायन्समधील बॅचलर ऑफ सायन्स (बीएस्सी) ही पदवी उपलब्ध करून दिली आहे. या अभ्यासक्रमासाठी तब्बल तेरा हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. खासगी संस्थांमधील अशा उपक्रमांनाही मोठी गती मिळाली आहे; परंतु विद्यापीठ अनुदान आयोग (यूजीसी) आणि अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद (एआयसीटीई) या दोन्ही संस्थांनी २०२२च्या म्हणजे चालू वर्षीच्या जानेवारीपर्यंत थांबवल्या.

एआयसीटीई (एलआयटीई) अभ्यासक्रम

शिक्षकांना विशेषतः उच्च शिक्षणातील शिक्षकांसाठी तयारीसाठी व्यावसायिक विकासासाठी फारच कमी अभ्यासक्रम आहेत. एडटेक कंपन्या किंवा अगदी अन्य शैक्षणिक संस्थांकडेही फारसे अभ्यासक्रम उपलब्ध नाहीत. अभियांत्रिकी शिक्षणातील शिक्षकांच्या व्यावसायिक विकासासाठी एक आश्वासक उद्योग-शैक्षणिक भागीदारी म्हणजे जून २०२१ मध्ये जाहीर करण्यात आलेला सरकारच्या नेतृत्वाखालील एआयसीटीई लीडरशिप इन टीचिंग एक्सलन्स (एलआयटीई) हा अभ्यासक्रम. जाहीर केल्यानुसार, एलआयटीई अभ्यासक्रमाची निर्मिती ही साथरोगाच्या काळात ‘नॅशनल इंजिनीअरिंग लीडरशिप केडर फॉर पब्लिक सर्व्हिस’ तयार करण्याचे ‘एआयसीटीई’चे प्रयत्न होते. त्यामध्ये ‘फुल स्टॅक डिव्हेलपर्स’चाही समावेश होतो. अशी व्यक्ती डिजिटल सार्वजनिक मालासाठी खासगी व सार्वजनिक दोन्ही प्रकाराने सॉफ्टवेअरचा स्रोत उपलब्ध करून देऊ शकते. या अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांची निवड करण्यासाठी एक प्रमाणित सॉफ्टवेअर प्रोग्रामिंग चाचणी घेण्यात आली. या चाचणीसाठी ५० हजार ४८२ विद्यार्थी बसले होते. त्यातील केवळ २४ विद्यार्थी पात्र ठरले. या निकालाने या विद्यार्थ्यांमधील दुबळेपणा अधोरेखित केला. निवडलेल्या विद्यार्थ्यांचे यशस्वी प्रशिक्षण व निवडलेल्या विद्यार्थ्यांना नोकरी याच्याशी उच्च प्रशिक्षित सॉफ्टवेअर अभियंत्यांना असलेली जागतिक स्तरावरील मागणी व मोठ्या संख्येने शैक्षणिक संस्थांमध्ये असलेल्या ऑनलाइन अध्यापन-अध्ययन पद्धतींचा समावेश करण्याचे ‘एनईपी’चे उद्दिष्ट आहे. एक लाख प्राध्यापक आणि २ कोटी ४० लाख विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्याच्या उद्देशाने अभियांत्रिकी महाविद्यालये व विद्यापीठे यांच्या भागीदारीत एलआयटीई कार्यक्रम जाहीर करण्यास ‘एआयसीटीई’ला प्रवृत्त केले आहे.

विद्यापीठे आणि एआयसीटीई संलग्न अभियांत्रिकी महाविद्यालयांना ‘एआयसीटीई’च्या माध्यमातून एलआयटीई अभ्यासक्रमासाठी आमंत्रण दिले जाते. त्यामुळे हा अभ्यासक्रम शिकवणाऱ्या अध्यापकांना ‘एआयसीटीई’च्या भागीदार प्युपिलफर्स्ट डॉट ऑर्ग (Pupilfirst.org) या संस्थेकडून नव्या व उदयोन्मुख क्षेत्रांसाठी प्रशिक्षण घेणे शक्य होईल. त्यामुळे निवडलेल्या संस्था आणि त्यांमधील अभ्यासक हे ‘एआयसीटीई’चे ‘ब्रँड अँम्बेसेडर ऑफ चेंज’ बनतील आणि एनईपी २०२० च्या आखणीनुसार त्यांच्या संस्थांमध्ये ऑनलाइन शिक्षणातील सर्वोत्तम पद्धती आणण्यासाठी ‘चेंज एजंट’ म्हणून काम करतील. प्रशिक्षित अध्यापकांना त्यांच्या मूळच्या संस्थांमध्ये संबंधित विषयांमध्ये मायनर डिग्री (१८ ते २० क्रेडिट्स)साठी नेतृत्व करणे अपेक्षित आहे. अशा प्रकारे, उद्योगातील भागीदाराने त्यांच्या वर्गात विकसित केलेला अभ्यासक्रम व सामग्री मुख्य प्रवाहात आणण्यासाठी मदत होईल. सहभागी विद्यापीठे आणि महाविद्यालयांमधील सर्व शैक्षणिक विषयांच्या विद्यार्थ्यांसाठी मायनर डिग्री उपलब्ध आहे. पहिल्या फेरीत, ज्या दोन विषयांना मागणी आहे, ते विषय म्हणजे, ॲडव्हान्स्ड वेब डिव्हेलपमेंट आणि इलेक्ट्रिक वाहने हे दोन विषय उद्योगातील भागीदाराला नियुक्त करण्यात येतात. मात्र अद्याप एलआयटीई अभ्यासक्रमांतर्गत ‘एआयसीटीई’ने यासाठी केवळ एकच भागीदार निवडला आहे.

एक लाख प्राध्यापक आणि २ कोटी ४० लाख विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्याच्या उद्देशाने अभियांत्रिकी महाविद्यालये व विद्यापीठे यांच्या भागीदारीत एलआयटीई कार्यक्रम जाहीर करण्यास ‘एआयसीटीई’ला प्रवृत्त केले आहे.

भारतीय उद्योगक्षेत्रात उच्चप्रशिक्षित व्यावसायिकांना मागणी असल्याने या उपक्रमाच्या माध्यमातून ‘एआयसीटीई’ला संबंधित विषयांसाठी लाभ मिळत आहे. त्यामुळे विद्यार्थी व शिक्षकांना सारख्याच पद्धतीने सक्षम बनवता येईल. प्रशिक्षित अध्यापकांची पहिली तुकडी त्यांच्याशी संबंधित संस्थांमध्ये ‘एआयसीटीई’चे एलआयटीई अध्यापक समन्वयक म्हणून काम करतात आणि विद्यार्थ्यांच्या शिक्षणावरही देखरेख ठेवतात. या कामात त्यांना उद्योगातील भागीदारासह उपलब्ध अभ्यासक्रमाच्या आधीच्या रचनेमधील विद्यार्थ्यांमधून तयार केलेल्या स्वयंसेवक किंवा पगारी शिक्षकांची मदत घेतली जाते. हे अभ्यासक्रम अल्पवयीन पदवीचा भाग आहेत, हे लक्षात घेता प्रशिक्षण सुरू होण्यापूर्वी प्रत्येक सहभागी संस्थेच्या शिक्षण मंडळाची मंजुरी या अभ्यासक्रमासाठी आवश्यक आहे. अभ्यासक्रम ऑनलाइन शिकवले जातात आणि प्राध्यापक व विद्यार्थ्यांच्या संयुक्त दुसऱ्या तुकडीचे प्रशिक्षण सध्या सुरू आहे. ज्या अध्यापकांनी आपले प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केले आहे, त्यांना एआयसीटीई आणि उद्योग भागीदार यांच्याकडून संयुक्तपणे प्रमाणपत्र दिले जाते. विद्यार्थ्यांना नोकरीसाठीही मदत केली जाते. अध्यापकांसाठी प्रशिक्षण मोफत दिले जाते आणि उद्योगातील भागीदाराकडून विद्यार्थ्यांना अनेक शिष्यवृत्त्या उपलब्ध करून दिल्या जातात. एलआयटीई उपक्रमाचे व्यवस्थापन शिक्षण मंत्रालयाच्या ‘राष्ट्रीय शिक्षण तंत्रज्ञान आघाडी’ (एनईएटी) उपक्रमाच्या माध्यमातून केले जाते. त्याची अंमलबजावणी ‘एआयसीटीई’कडून केली जाते. एनईएटी हा ‘एआयसीटीई’ने निर्माण केलेला उपक्रम असून २०१९ च्या सप्टेंबर महिन्यात त्यास सुरुवात झाली होती. या अभ्यासक्रमात खासगी एड-टेक कंपन्यांच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या आणि ‘एआयसीटीई’ने मूल्यांकन केलेल्या अध्यापनशास्त्रातील काही सर्वोत्तम तांत्रिक अभ्यासक्रम एका सामायिक व्यासपीठावरून विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिले जातात. ‘एनईएटी’मुळे विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम निवडणे सोपे होते. कारण एआयसीटीईने त्यांना आधीच मंजुरी दिली आहे. प्रत्येक एड-टेक कंपनीच्या वैशिष्ट्यपूर्ण अभ्यासक्रमांचे शुल्क त्यांच्या स्वतःच्या शुल्क धोरणानुसार आहे. मात्र संबंधित संस्थेने पात्र विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देणेही अपेक्षित आहे. याच्या शिष्यवृत्तीचे प्रमाण ३:१ आहे. त्यामुळे शुल्क भरणाऱ्या प्रत्येक तीन विद्यार्थ्यांमागे सामाजिक व आर्थिकदृष्ट्या वंचित गटातील एका विद्यार्थ्याला पूर्ण शिष्यवृत्ती दिली जाते. नावनोंदणी आणि मोफत शिष्यवृत्तीचे वाटप या दोन्हींवरही ‘एआयसीटीई’चे बारकाईने लक्ष असते. ‘एनईएटी’साठी निवड ही ‘डबल ब्लाइंड प्रक्रिये’च्या माध्यमातून केली जाते. त्यामध्ये अध्ययनाच्या फलिताच्या गुणवत्तेला जास्तीतजास्त महत्त्व दिले जाते. एलआयटीईचा उद्योगक्षेत्रातील भागीदार ‘प्युपिलफर्स्ट डॉट ऑर्ग’ हा ‘एनईएटी’चाही सदस्य असतो.

सुधारणेसाठी वाव

कोणत्याही नव्या उपक्रमामध्ये लहान लहान सुधारणा करता येणे शक्य असते. उदाहरणार्थ, अध्यापक विकास कार्यक्रमा(एफडीपी)ची रचना पाहिली, तर तिच्यात मायनर डिग्रीच्या विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी कोणतीही विशेष तरतूद अस्तित्वात नाही. केवळ तांत्रिक सामग्रीच नव्हे, तर ऑनलाइन शिक्षणासाठी अध्यापनशास्त्रातील सर्वोत्कृष्ट पद्धतींचा समावेश करण्यासाठी अध्यापक विकास कार्यक्रमांची संख्या वाढवून ते साध्य करता येऊ शकते. सध्या एलआयटीई अध्यापक हे त्यांच्या पालक संस्थांकडून नामनिर्देशित केले जातात. याचा अर्थ असा आहे, की या अभ्यासक्रमासाठी त्यांच्याकडे पुरेसा वेळ असेलच असे नाही. या कामासाठी इच्छुक अध्यापकांनी स्वयंस्फूर्तपणे काम करणे श्रेयस्कर ठरू शकते. दोन कोटी ४० लाख विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचे ‘एआयसीटीई’चे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट केवळ संस्थात्मक मॉडेलच्या माध्यमातून साध्य करणे शक्य होणार नाही. नव्या संस्थांमध्ये दाखल होण्याच्या आणि तेथील अध्यापकांना प्रशिक्षित करण्याची प्रक्रिया खूपच धीमी आणि त्रासदायक आहे. ही शिकण्याची संधी केवळ सहभागी संस्थांमधील विद्यार्थ्यांपर्यंतच नव्हे, तर देशभरातील सर्व इच्छूक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याच्या मार्गांचा विचार करायला हवा. अखेरीस प्रशिक्षणाच्या या मॉडेलची खऱ्या अर्थाने चाचणी केली जाईल, जेव्हा माहिती तंत्रज्ञानासंबंधित विषयांव्यतिरिक्त विषयांचेही अध्यापन केले जाईल.

‘एआयसीटीई’ने आपला आदर्श अभ्यासक्रम वेबसाइटवर ठेवून सर्व संस्थांना तो उपलब्ध केला आहे; तसेच देशभरातील या अभ्यासक्रमांच्या अंमलबजावणीच्या गुणवत्तेत एकूण सुधारणा करण्यासाठी योगदान दिले आहे.

एलआयटीई कार्यक्रम हा संकल्पनेच्या दृष्टीने अत्यंत विचारपूर्वक आखला गेल्याने तो उल्लेखनीय आहे. उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञांनी विकसित केलेल्या या दोन्ही अभ्यासक्रमांसाठीचा अभ्यासक्रम आदर्श अभ्यासक्रम म्हणून जाहीर करण्यात आला आहे आणि तो ‘एआयसीटीई’च्या वेबसाइटवर उपलब्ध करून देण्यात आला आहे. या उपक्रमामुळे अनेक शिक्षण संस्थांना आणि तेथे काम करणाऱ्या अध्यापकांना अगदी एलआयटीई कार्यक्रमात सहभागी नसलेल्या अध्यापकांनाही अभ्यासक्रम समजून घेण्यासाठी आणि तो विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी खूप मदत झाली आहे. ही वस्तुस्थिती सहभागी झालेल्या अध्यापकांच्या अभिप्रायांवरून दिसून येते. एआयसीटीई प्रशिक्षण व अध्ययन अकादमी (एटीएएल)या संस्थेअंतर्गत अध्यापक विकास कार्यक्रम आयोजित केला जातो. त्यामुळे सहभागी शिक्षक सदस्यांना त्यांच्या स्वतःच्या व्यावसायिक विकासासाठी प्रशिक्षणाच्या तासाचे क्रेडिट पॉइंट (श्रेयांक) मिळू शकतात. त्यामुळे त्यांना प्रशिक्षणाची संधी घेण्याची इच्छा निर्माण होते.

अत्याधुनिक तंत्रज्ञान क्षेत्रातील विद्याशाखा विकासाच्या आव्हानांना सामोरे जाण्याचा ‘एआयसीटीई’चा प्रयत्न नक्कीच प्रशंसनीय आहे. त्याचप्रमाणे संस्थेने तयार केलेले शाश्वत मॉडेलही स्तुत्य आहे. एलआयटीई उपक्रमाच्या डिझाइनमधील अनेक नवकल्पनांमुळे त्याचे यशही निश्चित झाले आहे. ‘एलआयटीई’मधील शिक्षकांना एटीएएल अकादमीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना व संस्थांना व्यवसाय व नोकरीसाठी सज्ज करणारे अभ्यासक्रम उपलब्ध करून त्यांना अधिक लाभदायक वातावरण तयार केले जाते. ‘एआयसीटीई’ने आपला आदर्श अभ्यासक्रम वेबसाइटवर ठेवून सर्व संस्थांना तो उपलब्ध केला आहे; तसेच देशभरातील या अभ्यासक्रमांच्या अंमलबजावणीच्या गुणवत्तेत एकूण सुधारणा करण्यासाठी योगदान दिले आहे. अध्यापकांनाही असा उद्योगाशी संबंधित व सतत अद्ययावत ठेवणारा अभ्यासक्रम शिकवणे आनंददायक वाटत आहे, असे अनेक अध्यापकांच्या अभिप्रायावरून दिसते. एलआयटीई मॉडेल निश्चितपणे अन्य विषयांसाठी अनुकरण करण्याजोगे असून ते विद्यार्थ्यांना अधिक खुलेपणाने उपलब्धही आहे.

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.