Author : Abhijit Singh

Expert Speak Raisina Debates
Published on Mar 26, 2024 Updated 0 Hours ago

लक्षद्वीपमधील नवीन नौदल तळ हा भागीदारांना आणि शत्रूंना संकेत आहे की, पूर्व हिंदी महासागरात भारत ही प्रमुख शक्ती आहे.

INS जटायू: समुद्रातील एक पहारेकरी

६ मार्च रोजी, लक्षद्वीप बेटांच्या गटातील मिनीकॉय या ठिकाणी भारतीय नौदलाचा जटायू हा तळ कार्यान्वित झाला. ‘जटायू’ हा रामायणातील पौराणिक पक्षी आहे, ज्याने सीतेचे अपहरण रोखण्याचा प्रयत्न केला होता. या नवीन तळाचे उद्घाटन नौदल प्रमुख ॲडमिरल हरी कुमार यांच्या उपस्थितीत करण्यात आले. त्यांच्या शब्दांत सांगायचे तर, “जटायू हा 'प्रथम प्रतिसाद देणारा' होता. अगदी स्वत:च्या जीवाला धोका पत्करून- त्याने सीताजींचे अपहरण थांबवण्याचा प्रयत्न केला. स्वतःआधी सेवा हा वस्तुपाठ त्याने शिकवला. सुरक्षेची पाळत ठेवणे आणि निःस्वार्थ सेवा प्रदान करण्याच्या भावनेची ही एक योग्य ओळख आहे," असे त्यांनी त्यांच्या उद्घाटनपर भाषणात नमूद केले.

एडेनच्या आखातात आणि अरबी समुद्रात समुद्री चाच्यांच्या वाढत्या हालचालींमुळे आणि लाल समुद्रातील हुथींच्या हल्ल्यांमुळे, भारतीय नौदल- या बेटावरील विद्यमान सुविधा पूर्ण विकसित करून, श्रेणी सुधारणा करण्यासाठी हालचाल करत आहे.

हा उपक्रम भारतीय नौदलाकरता एक महत्त्वाचा क्षण आहे, जो हिंद महासागरातील प्रमुख सुरक्षा प्रदाता म्हणून आपली ओळख पटवू पाहत आहे. मिनीकॉय हे ‘नाइन-डिग्री चॅनेल’सह, हिंद महासागरातील प्रमुख नौकानयन मार्गावर असून, महत्त्वपूर्ण नौकानयनाचा मार्ग असलेल्या मिनीकॉयमध्ये आधीपासूनच भारतीय नौदलाची एक तुकडी कार्यरत आहे. एडेनच्या आखातात आणि अरबी समुद्रात समुद्री चाच्यांच्या वाढत्या हालचालींमुळे आणि लाल समुद्रात हुथींच्या हल्ल्यांमुळे, भारतीय नौदल बेटावरील विद्यमान सुविधा पूर्ण विकसित तळात विकसित करून, श्रेणीसुधारणा करण्यासाठी हालचाल करत आहे. नौदलाच्या मोहिमा आखणाऱ्यांना विश्वास आहे की, मिनीकॉयमधील एक पाळत ठेवणारी चौकी किनारपट्टीतील बेकायदेशीर उपक्रमांचा मागोवा घेण्यास मदत करेल आणि सागरी प्रदूषण व बेकायदेशीर मासेमारी यांसारख्या जोखीमांवर लक्ष ठेवेल.

जटायूचे कार्य मात्र समुद्रात जागरूक राहण्याहून अधिक आहे. या तळाचा उद्देश भारतीय नौदलाच्या कार्यक्षमतेला चालना देणे, सैन्य जलद रीतीने तैनात करणे आणि सामरिक उपस्थिती राखणे हे आहे. अहवालानुसार, मिनिकॉय येथील नौदल सुविधा अरबी समुद्रात आणि त्यापलीकडे रसद पुरवठ्यासाठी आणि सहाय्यकारी मोहिमांसाठी जोडणीच्या प्रमुख बिंदूत बदलण्याची योजना आहे. योगायोगाने, जटायू हा कावरत्ती बेटावरील आयएनएस द्विपरक्षक नंतरचा लक्षद्वीपमधील दुसरा नौदल तळ आहे. नौकावहनाला वाढता धोका निर्माण झालेला असताना, मिनिकॉय येथील हा नवा तळ महत्त्वाच्या सागरी प्रदेशातील भारतीय नौदलाची एक उपयुक्त आघाडीची चौकी आहे.

नवीन तळ भारताच्या शेजारील राष्ट्रांना स्पष्ट संदेश देतो की, भारतीय नौदल भारताच्या महत्त्वाच्या सागरी हितांचे रक्षण करण्यास सक्षम आहे. विशेषतः भारताचे सुरक्षा व्यवस्थापक मालदीववर बारीक लक्ष ठेवून आहेत. मालदीवने भारताला त्यांच्या बेटांवर तैनात असलेल्या भारतीय लष्करी कर्मचाऱ्यांची तुकडी मागे घेण्यास सांगितल्यानंतर, भारतीय नौदल अरबी समुद्रात चीनच्या मोठ्या उपस्थितीच्या संभाव्यतेबाबत सावधगिरी बाळगून आहे. गेल्या महिन्यात, झियांग यांग हाँग ०३ या चिनी संशोधन जहाजाला मालदीवमध्ये काही वेळ थांबण्याची परवानगी देण्याच्या मालदीवच्या हालचालींमुळे भारतासोबतचा तणाव आणखी वाढला. मालदीव आणि चीनने संरक्षण सहकार्य करारावरही स्वाक्षरी केली आहे, ज्यात मालदीवला मोफत चिनी लष्करी मदत पुरवली जाते. भारतातील अनेकांना, चीनशी मैत्री करण्याचा मालदीवचा हेतू भारताबाबतचा तिरस्कार आणि त्यांच्या देशातील भारतीय अधिकार व प्रभाव झुगारून देणे आहे, असे असल्याचे जाणवते.

मालदीवने भारताला त्यांच्या बेटावर तैनात असलेल्या भारतीय लष्करी कर्मचाऱ्यांची तुकडी मागे घेण्यास सांगितल्यानंतर, भारतीय नौदल अरबी समुद्रात चीनच्या मोठ्या उपस्थितीच्या संभाव्यतेबद्दल सावधगिरी बाळगून आहे.

निश्चितपणे, जटायू कार्यान्वित होण्यामागे एक धोरणात्मक परिमाण आहे. भारत या प्रदेशात क्षमता निर्माण करण्यासाठी आणि विकासाला चालना देण्यासाठी उत्सुक आहे. नवीन तळाच्या उद्घाटनामुळे पायाभूत सुविधांमध्ये लक्षणीय वाढ होऊ शकते. स्थानिक समुदायांना लाभ होण्याकरता संप्रेषण, रसद पुरवठा आणि सहाय्यकारी सुविधा वृद्धिंगत होऊ शकतात. असे म्हटले जाते की, ‘जटायू’मध्ये स्थानिक आर्थिक विकासाला चालना देण्याची, नोकऱ्या निर्माण करण्याची आणि स्थानिक वस्तूंची व सेवांची मागणी वृद्धिंगत करण्याची क्षमता आहे. भारताचे नौदल नियोजक नवीन तळासाठी त्यांच्या पायाभूत सुविधा विकास योजनांमध्ये पर्यावरणीय शाश्वतता समाविष्ट करण्यास उत्सुक आहेत.

लक्षद्वीपमधील भारताच्या सुरक्षाविषयक हालचाली इतर काही बाबींनी प्रेरित आहेत. अलीकडेच, मालदीवच्या राष्ट्रीय संरक्षण दलाने मालदीवच्या अनन्य आर्थिक क्षेत्रात भारतीय मासेमारी नौका जप्त केली. गेल्या काही महिन्यांत दुसऱ्यांदा भारतीय मच्छिमारांना मालदीवच्या सागरात बेकायदेशीर प्रवेश केल्याबद्दल पकडले गेले. भारतीय मच्छिमार माशांच्या शोधात शेजारच्या देशातील समुद्रात भटकणे ही विशेष बाब नसली तरी, मालदीव त्यांच्या अनन्य आर्थिक क्षेत्रात परदेशी मासेमारी नौकांच्या आणि तटरक्षक दलाच्या घुसखोरीबद्दल अतिसंवेदनशील आहे.

असे असले तरी, लक्षद्वीपमध्ये भारताच्या वाटचालीला चालना देणारा मुख्य घटक प्रामुख्याने भौगोलिक घटकांवर आधारित आंतरराष्ट्रीय संबंधाबाबतचा वाटतो. मालदीवचे अध्यक्ष मोहम्मद मुइझ्झू यांनी स्पष्टपणे चीन समर्थनाची बाजू उचलून धरण्याचे स्वीकारल्याने, भारताचा संयम कमी होत चालला आहे. मालदीवच्या अलीकडच्या भारतविरोधी हालचालींमुळे भारतीय निर्णयकर्त्यांना थोडीशी शंका आली आहे की, मुइझ्झू प्रशासनाचे भारतासोबतचे संबंध हे चीनच्या बाजूने सुधारण्याच्या उद्देशाने आहेत, जे भारताला अस्वीकारार्ह आहे.

नवीन तळाच्या उद्घाटनामुळे पायाभूत सुविधांमध्ये लक्षणीय वाढ होऊ शकते, स्थानिक समुदायांना फायदा होण्यासाठी दळणवळण, रसद पुरवठा आणि सहाय्यकारी सुविधांमध्ये वाढ होऊ शकते.

तरीही, मालदीवच्या उत्तरेकडील प्रवाळापासून फक्त १२५ किमी अंतरावर असलेल्या मिनीकॉयवर नौदल तळ सुरू करण्याचा निर्णय घेताना काळजीपूर्वक विचार कमी केलेला दिसून येतो. एक गोष्ट म्हणजे, भारताच्या परराष्ट्र धोरणात दीर्घकाळ याबाबत एकमत आहे की, भारताने आपल्या बेटांच्या प्रदेशांवर जास्त लष्करीकरण करण्यापासून परावृत्त राहायला हवे, कारण यामुळे भारताचे शेजारी देश अस्वस्थ होऊ शकतात. मात्र, ती धारणा आता प्रचलित राहिलेली नाही. भारत आपल्या सागरी शेजारी देशांमध्ये- प्रामुख्याने चिनी विस्तारवादाने चालवलेल्या मोहिमांमुळे आपली अधिक सामर्थ्यशाली उपस्थिती शोधत असताना- आज बेट प्रदेशांचे लष्करीकरण करण्याची गरज पूर्वीपेक्षा अधिक असल्याचे दिसून येते. तरीही, लक्षद्वीपमध्ये पूर्ण विकसित लष्करी सुविधा गुंतागुंतीची होण्याची शक्यता आहे.

भारताची समस्या मिनिकॉय येथे लष्करी तळ बांधणे ही नाही; अनेक सागरी विश्लेषक दुजोरा देतील की, मुख्य आव्हान असे आहे की, आघाडीचा कामकाज तळ राखणे आणि तो टिकवून ठेवणे. भारताच्या मुख्य भूमीपासून ४०० किमी अंतरावर असलेल्या एका बेटावर लष्करी तळाला सहाय्य देणे, जिथे ताजे पाणीही दुर्मिळ आहे, हा एक कठीण उपक्रम आहे. एका छोट्या बेटावर पाळत ठेवणारी विमाने आणि लढाऊ विमाने यांच्यासाठी आश्रयस्थान असलेले एअरफील्ड बांधणे पुरेसे कठीण आहे; संबंधित पायाभूत सुविधा निर्माण करणे, जसे की कर्मचाऱ्यांसाठी घरे, साठवणीच्या सुविधा आणि छोट्या बेटावर जमिनीखालील ‘फ्युएल डंप’ हे काम गुंतागुंतीचे करते. मिनिकॉयवरील पर्यावरणाची स्थितीही नाजूक आहे, ज्यामुळे निश्चितपणे आणखी अडथळे निर्माण होतील.

भारताच्या मुख्य भूमीपासून ४०० किमी अंतरावर असलेल्या एका बेटावर- जिथे गोडे पाणी मिळणेही दुर्मिळ आहे, अशा ठिकाणी लष्करी तळाला समर्थन देणे, हा एक कठीण उपक्रम आहे.

सध्या, मिनिकॉय येथील नौदल तुकडीने औपचारिक नौदल तळाचा दर्जा प्राप्त केला आहे. आवश्यक परवानग्या मिळाल्यामुळे बेटावर धोरणात्मक पायाभूत सुविधा योग्य वेळी तयार केल्या जातील. बेट चौकी उभारण्याचा हा एक तर्कसंगत मार्ग आहे. जर मिनिकॉय येथे नौदल तळ बांधणे आवश्यक असेल, तर या संदर्भातील वाढीव दृष्टिकोन हा सर्वात व्यावहारिक आणि किफायतशीर मार्ग आहे. जटायूचे सामरिक फायदे निर्विवाद आहेत, यांवर भर देण्यात आला आहे. समुद्रकिनाऱ्यावर पाळत ठेवणे सुलभ करणे आणि समविचारी भागीदारांसह सहकार्यासाठी संधी निर्माण करणे सुनिश्चित आहे. ते दीर्घकाळ राखण्यायोग्य आणि उत्पादक आहे की नाही हे आगामी काळात सुस्पष्ट होईल.


अभिजित सिंग हे ‘ऑब्झर्व्हर रिसर्च फाऊंडेशन’चे वरिष्ठ फेलो आहेत.

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.