Author : Manoj Joshi

Expert Speak Space Tracker
Published on Mar 18, 2024 Updated 0 Hours ago

रशियाकडून नव्या अवकाश तंत्रज्ञानाचा वापर करण्यासंबंधातील अलीकडे प्रसिद्ध झालेल्या अहवालामुळे जगभरातील देशांमध्ये धोक्याची घंटा वाजली आहे.

अंतराळातील युद्ध: एक नवीन आघाडी

भविष्यातील युद्धे स्वयंचलित शस्त्रे, रोबो आणि एआय (AI) यांच्या साह्याने खेळली जातील; परंतु अलीकडे उदयास आलेली आणखी एक गोष्ट म्हणजे अवकाशावर वर्चस्व गाजवण्याची स्पर्धा. युद्धसामग्री व मानवासाठी जीपीएस मार्गदर्शन, कोणत्याही हालचालींवर पाळत ठेवणे, अधिकार व नियंत्रण यांसारख्या पृथ्वीवरील लढाऊ यंत्रणांना विविध प्रकारच्या क्षमता देण्याचे काम अवकाशातील उपग्रह करतात. त्या नष्ट केल्या किंवा निकामी केल्या, तर पृथ्वीवर त्याचा कित्येक पटीने परिणाम होऊ शकतो.

रशियाच्या अवकाश तंत्रज्ञानात होणारी नवी घडामोड ‘गंभीर राष्ट्रीय धोका’ आहे, अशी टिप्पणी अमेरिकेच्या ‘हाउस इंटेलिजन्स कमिटी’चे अध्यक्ष मायकेल आर. टर्नर यांनी या महिन्याच्या सुरुवातीला केली होती. या संबंधातील माहिती अमेरिकेच्या गुप्तचर समितीला देण्यात आली होती आणि काँग्रेसमधील अन्य सदस्यांनाही ती उपलब्ध करून देण्यात आली होती, याला अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा मंडळाचे प्रवक्ता जॉन किर्बी यांनी दुसऱ्याच दिवशी दुजोरा दिला. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांना याबद्दलची माहिती पूर्वीच देण्यात आली होती आणि त्यांनी सभागृहातील वरिष्ठ लोकप्रतिनिधींना ही माहिती देण्यात यावी, असे आदेश राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सुलिवान यांना दिले होते. रशियाचे प्रवक्ता दिमित्री पेस्कोव्ह यांनी हा इशारा फेटाळला आणि त्यास ‘द्वेषयुक्त खोटेपणा’ असे संबोधले; तसेच रशियाशी संघर्ष करण्यासाठी युक्रेनला अधिक अर्थपुरवठा मंजूर करता यावा, यासाठी सरकारची ही युक्ती आहे, असा दावा त्यांनी केला.

तेव्हापासून कोणताही तपशील समोर आला नसला, तरी या घडामोडीमुळे अमेरिकेचे गुप्तचर खाते आणि दळणवळण उपग्रहांना अण्वस्त्रांचा मोठा धोका निर्माण होऊ शकतो, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. अण्वस्त्राचा वापर करण्यात आला, तर संपर्क, अवकाशाधारित पाळत ठेवणे आणि लष्करी कमांड व नियंत्रक यंत्रणा नष्ट होऊ शकते. मात्र, रशियाकडून अण्वस्त्राचा वापर होण्याची शक्यता धूसर आहे. त्याऐवजी रशियाच्या अणुशक्तीवर चालणाऱ्या साधनांबद्दलची माहिती अधिक असू शकते. ते अमेरिकेच्या उपग्रहांमधील इलेक्ट्रॉनिक भाग निकामी करू शकतात, बंद पाडू शकतात किंवा आतील इलेक्ट्रॉनिक भाग बिघडवू शकतात अथवा इलेक्ट्रोमॅग्नेटिक पल्सचा वापर करून एका विशिष्ट मर्यादेपर्यंत सर्व उपग्रह इलेक्ट्रॉनिक्स नष्ट करू शकतात.

अवकाशात हालचाली करणाऱ्या प्रमुख देशांप्रमाणे रशियानेही उपग्रहांना निकामी करण्यासाठीच्या अवकाशाधारित यंत्रणांचा प्रयोग केला होता. जमिनीवरील क्षेपणास्त्रांपासून ते कक्षेत फिरणाऱ्या उपग्रहांना पाडण्यापर्यंत ते अणुउर्जेपर्यंत आणि निर्देशित उर्जेपर्यंत त्यांना निकामी करण्यासाठी ते प्रयोग होते. रशियाने आपला स्वतःचाच उपग्रह नष्ट करण्यासाठी २०२१ मध्ये पृथ्वीवरून एक क्षेपणास्त्र सोडले होते. भारतानेही २०१९ मध्ये याचीच पुनरावृत्ती केली होती. आण्विक स्फोटामुळे एका विशिष्ट मर्यादेतील सर्व उपग्रहांचा अंदाधुंदपणे नाश होऊ शकतो आणि हे उपग्रह रशियनही असू शकतात. अवकाशातील अण्वस्त्रेही संयुक्त राष्ट्रांच्या १९६७ च्या बाह्य अवकाश कराराचे उल्लंघन करू शकतात. या करारान्वये ‘पृथ्वीच्या कक्षेत अण्वस्त्रे अथवा अन्य कोणत्याही प्रकारची सामूहिक संहारक शास्त्रास्त्रे’ पाठवण्यास देशांना मज्जाव करण्यात आला आहे.

मात्र, नको असलेले उपग्रह निकामी करण्यासाठी देशांनी वेगवेगळ्या प्रकारांनी प्रयत्न केले आहेत. त्यापैकी एक म्हणजे, को-ऑर्बिटल अँटी सॅटेलाइट (एएसएटी) प्रणाली. तिची व्याप्ती अस्तित्वात असलेल्या उपग्रहाच्या जवळ पाठवलेल्या लहान उपग्रहापासून स्फोट झालेल्या उपग्रहापर्यंत कितीही असू शकते. आणखी एक तंत्र म्हणजे, लक्ष्य उपग्रहाला पकडण्यासाठी किंवा अस्थिर करण्यासाठी रोबोटिक हाताचा वापर करणे.

लक्ष्य उपग्रहांची हानी करण्यासाठी उच्च शक्तीच्या नियंत्रित किरणशलाका (लेसर) आणि उच्च शक्तीच्या लघुलहरींचाही वापर करता येऊ शकतो. २००६ मध्ये अमेरिकेच्या ‘डिफेन्स न्यूज’ने नोंदवल्यानुसार, चीनने जमिनीवरील नियंत्रित किरणशलाकांचा वापर अमेरिकेच्या ऑप्टिकल देखरेख उपग्रहाला ‘दिपवून’ टाकण्यासाठी आणि अकार्यक्षम करण्यासाठी केला होता. जमिनीवरील लेसर गनच्या साह्याने उपग्रहाला अकार्यक्षम करण्याचा यशस्वी प्रयोग २००५ मध्ये केला असल्याचे चीनने मान्य केले होते. चीनच्या लष्करी कागदपत्रांमध्ये विमान व उपग्रह आधारित किरणशलाकांवर चर्चा झाल्याचे दाखले आढळतात. अशाच प्रकारच्या चर्चा सूक्ष्म लहरींवर आधारित शस्त्रास्त्र यंत्रणांवर उपलब्ध आहेत. त्यांची निर्मिती जहाजावर वापरण्याच्या उद्देशाने केली गेली असली, तरी त्याचा अवकाशातही परिणाम होऊ शकतो. युक्रेनच्या संपर्क यंत्रणा निकामी करण्यासाठी रशियाकडून होत असलेल्या प्रयत्नांच्या पार्श्वभूमीवर रशियाचे हे प्रयत्न मोडून काढण्यासाठी युक्रेनने स्टारलिंक उपग्रह तैनात केले. त्यावर उत्तर म्हणून रशियाच्या बाजूने घडामोडी घडल्या असाव्यात. आणखी म्हणजे, विविध स्रोतांच्या माध्यमातून अमूल्य माहितीचे व्यापारी तत्त्वावरील उपग्रह प्रतिमा ते पश्चिमी देशांची गुप्त माहितीपर्यंत हस्तांतरण करण्याची क्षमता स्टारलिंकने युक्रेनला मिळवून दिली आहे. ही गोष्ट वेगळी, की रशिया-युक्रेन युद्ध २०२३ मध्ये अशा टप्प्यावर आले, की उभय बाजूंची ताकद कमी झाली होती. तरी त्यात युक्रेनला अल्गोरिदमिक (गणना करण्याची पद्धत) लाभ झाल्याचे दिसले; परंतु युक्रेनकडे पुरेसा दारुगोळा नव्हता.

हजारो उपग्रह असलेल्या स्टारलिंक यंत्रणेकडून एएसएटी क्षेपणास्त्रे आणि उद्दिष्टाप्रत जाणारी उर्जा शस्त्रास्त्रे यांसारख्या पारंपरिक उपग्रहविरोधी शस्त्रांविरोधात ताकद मिळते. मात्र अणुस्फोटामुळे हजारो नव्हे, तर शेकडो निकामी होऊ शकतात. अवकाशात होणारा अणुस्फोट मैत्रीपूर्ण उपग्रह आणि प्रतिकूल उपग्रह असा भेद करीत नाही. रशिया तर स्वतःचाच उपग्रह नष्ट करण्याचा आणि युद्धात सहभागी नसलेल्या देशांचे उपग्रह नष्ट करण्याचा धोका पत्करतो.

अमेरिकेने २०१९ मध्ये अमेरिकी अवकाश दलाची स्थापना केली. त्यामागे अवकाशातील असुरक्षितता हे कारण होते. ‘जीपीएस’सारखी उपग्रह आधारित अमेरिकी संपर्क यंत्रणा आणि क्षेपणास्त्र प्रक्षेपणाचा शोध घेण्याची क्षमता याच्याशी संबंधित विकसित केलेल्या क्षमतांशी या दलाच्या निर्मितीचा संबंध लावता येतो. या क्षमतांमध्ये उपग्रह जखडून ठेवण्याचे तंत्रज्ञान, त्यांना मिळणारी माहिती रोखणे, अकार्यक्षम करणे, पाडणे आणि रोबोटिक हाताचा वापर करून उपग्रहांची कक्षा बदलवून त्यांना भरकटवणे यांचा समावेश होतो.

अमेरिकेलाही काही काळापासून या धोक्यांचा सामना करावा लागत आहे. रशियाच्या कथित अवकाश शस्त्राचे वृत्त बाहेर आल्यावर अमेरिकेने ‘प्रोलिफरेटेड वॉरफायटर स्पेस आर्किटेक्चर’ नावाच्या नव्या योजनेची चाचणी घेण्यासाठी क्षेपणास्त्र ‘ट्रॅकिंग सिस्टिम प्रोटोटाइप’ कक्षेत पाठवला. स्टारलिंकसारख्या शेकडो लहान व स्वस्त उपग्रहांसह लोअर अर्थ ऑर्बिटला (एलईओ) आच्छादित करणे हा त्याचा उद्देश होता. त्यांच्यापैकी डझनभर उपग्रह नष्ट झाले, तरी कार्य सुरू ठेवण्यासाठी यंत्रणा सक्षम राहील.

एका अहवालानुसार, रशियाने ड्रोन मोहिमा अयशस्वी करण्यासाठी युक्रेनमधील जीपीएस उपग्रहांचे सिग्नल निकामी केले आहेत; परंतु यंत्रणांचा समावेश असूनही उपग्रहांना अकार्यक्षम करण्यासाठी या यंत्रणांचा वापर करण्यात आला नाही. व्यावसायिक उपग्रह हे अपरिहार्यपणे लक्ष्य होऊ शकतात आणि ‘निमशहरी पायाभूत सुविधा प्रतिकाराचे कायदेशीर लक्ष्य बनू शकतात,’ असा इशारा रशियाच्या एका मुत्सद्द्याने २०२२ च्या ऑक्टोबर महिन्यात आपल्या भाषणात दिला होता.

रशियाच्या हालचालींचा मुद्दा भारतासाठी काल्पनिक नाही. तो दळणवळण, देखभाल आणि दिशादर्शनासाठीच्या उपग्रहांवरही अवलंबून आहेत. एका वृत्तानुसार, अमेरिकेने आपल्या प्रशासनाला या मुद्द्यावर रशियाशी वाटाघाटी करण्याचे निर्देश दिले आहेत आणि रशियाने अशी शस्त्रे तैनात करू नयेत, यासाठी अमेरिकेने भारत व चीनशी संपर्क साधला आहे.

मनोज जोशी हे ऑब्झर्व्हर रीसर्च फाउंडेशनचे सन्माननीय फेलो आहेत.

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.

Author

Manoj Joshi

Manoj Joshi

Manoj Joshi is a Distinguished Fellow at the ORF. He has been a journalist specialising on national and international politics and is a commentator and ...

Read More +