Author : Shoba Suri

Published on Jun 12, 2023 Commentaries 0 Hours ago

या वर्षीच्या जागतिक अन्न सुरक्षा दिनाच्या निमित्ताने  हा लेख, आपल्या अन्न पुरवठ्याची सुरक्षा, गुणवत्ता आणि अखंडता सुनिश्चित करण्यासाठी अन्नपदार्थांच्या मानकांचं काय महत्त्व आहे यावर प्रकाश टाकतो.

जागतिक अन्न सुरक्षा दिवस 2023 : अन्नपदार्थांच्या मानकांचं महत्त्व

जागतिक अन्न सुरक्षा दिवस दरवर्षी 7 जून रोजी साजरा केला जातो. अन्न सुरक्षेबद्दल जागरुकता आणि याबद्दलच्या कृतीला प्रोत्साहन देणे हे याचे उद्देश आहे. सार्वजनिक आरोग्य आणि कल्याणासाठी सुरक्षित अन्नाचे महत्त्व अधोरेखित करण्याच्या दृष्टीने डिसेंबर 2018 मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या महासभेने जागतिक अन्न सुरक्षा दिनाची घोषणा केली.सुरक्षित, पौष्टिक आणि शाश्वत अन्नपुरवठ्याच्या  जागतिक गरजेकडे लक्ष वेधणे तसेच अन्नपदार्थांना निर्माण होणारे धोके शोधून ते कमी करण्याच्या आणि त्याचे व्यवस्थापन करण्याच्या प्रयत्नांना प्रोत्साहन देणे हा या दिवसाचा उद्देश आहे. अन्न सुरक्षा ही जागतिक पातळीवरच एक गंभीर चिंतेची बाब आहे. असुरक्षित अन्नामुळे वेगवेगळे आजार होऊ शकतात. याचे  आरोग्यावर गंभीर परिणाम होतात. अंदाजे 600 दशलक्ष लोकांमध्ये 10 पैकी 1 जण दरवर्षी अन्नातून होणाऱ्या आजारांमुळे मृत्युमुखी पडतो. दरवर्षी 4 लाख 20 हजार लोकांना प्राण गमवावा लागतो. परिणामी 33 दशलक्ष वर्षांचं निरोगी जीवन संपुष्टात येतं. असुरक्षित अन्नाचे आर्थिक परिणाम देखील होतात.  हे घटक व्यापार आणि पर्यटनावरही विपरित परिणाम करू शकतात. त्यामुळे राष्ट्रीय अर्थव्यवस्था आणि अन्न उद्योगात गुंतलेल्या व्यक्तींच्या उपजीविकेवरही परिणाम होतो.

कमी-उत्पन्न आणि मध्यम-उत्पन्न असलेल्या देशांमध्ये असुरक्षित अन्नामुळे उत्पादकतेत घट आणि आरोग्यसेवा खर्चामध्ये होणारी वाढ पाहिली तर ही किंमत दरवर्षी 110 अब्ज अमेरिकी डाॅलर असल्याचा अंदाज आहे.

दरवर्षी जागतिक अन्न सुरक्षा दिनाच्या निमित्ताने अन्न सुरक्षिततेच्या विविध पैलूंवर लक्ष केंद्रित करण्यासाठी विशिष्ट संकल्पना राबवली जाते. 2023 ची थीम ‘अन्न मानके जीव वाचवतील’, अशी आहे. अन्न मानके हे अन्न उत्पादनांची सुरक्षा आणि गुणवत्ता सुनिश्चित करण्यासाठी डिझाइन केलेल्या नियमांचे संच आहेत आणि अशा प्रकारे ते सार्वजनिक आरोग्याचे संरक्षण आणि लोकांचे जीवन वाचविण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. अन्न उत्पादनांची सुरक्षित आणि स्वच्छ हाताळणी सुनिश्चित करण्यासाठी शेतकरी आणि खाद्यपदार्थांवर प्रक्रिया करणाऱ्या उद्योजकांसाठी एक नियमावली आखून दिली आहे. फूड कोड म्हणजेच ‘कोडेक्स अ‍ॅलिमेंटारियस’ ही ग्राहकांच्या आरोग्याचे रक्षण करण्यासाठी आणि अन्न उद्योगातील नैतिक पद्धतींना प्रोत्साहन देण्यासाठी डिझाइन केलेली आंतरराष्ट्रीय मानके नियम आणि सराव संहिता आहे.

अन्न आणि कृषी संघटना (FAO) आणि जागतिक आरोग्य संघटना (WHO) यांनी 1963 मध्ये ग्राहकांच्या आरोग्याचे रक्षण करण्यासाठी आणि अन्न उद्योगातील नैतिक मानकांना प्रोत्साहन देण्यासाठी कोडेक्स एलिमेंटेरियस कमिशनची स्थापना केली होती. कोडेक्स मानके अन्न सुरक्षेचा आधारस्तंभ आहेत. ही 60 वर्षांहून अधिक काळ लागू आहेत. दरवर्षी ‘फूड कोड’ विस्तारत राहतो. नवीन मानके ठरवली जातात आणि नवीन माहिती उपलब्ध झाल्यामुळे विद्यमान मानकांमध्ये सुधारणा केली जाते.

स्रोत: WHO-जागतिक अन्न सुरक्षा दिन 2023

WHO च्या अन्न सुरक्षा 2022-2030 च्या जागतिक रणनीतीनुसार सदस्य राष्ट्रांनी अन्न सुरक्षा आणि गुणवत्तेचा ताळमेळ साधून एकात्मिक दृष्टिकोनासह त्यांच्या राष्ट्रीय अन्न सुरक्षा फ्रेमवर्कचा अवलंब करायचा आहे. यामुळे ही संरचना अनुकूलनावर आधारित करून ती आणखी बळकट करण्याचे काम केले जाते. पर्यावरण, शेती आणि आरोग्य या तिन्हींचा समन्वय यात साधला जावा, असा विचार आहे. कोडेक्स मानके आणि कोडेक्सचा मजकूर बंधनकारक नसल्यामुळे तो लागू होण्यासाठी राष्ट्रीय कायदे किंवा नियम म्हणून संहिताबद्ध करणे आवश्यक आहे. भारतात अन्न मानके आणि नियम भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (FSSAI) द्वारे नियंत्रित केले जातात.

FSSAI अन्न सुरक्षा सुनिश्चित करण्यात आणि अन्नाशी संबंधित व्यवहारांवर देखरेख आणि पर्यवेक्षणाद्वारे सार्वजनिक आरोग्याला चालना देण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावते. भारतातील खाद्य व्यवसाय आणि ग्राहकांसाठी या मानकांची आणि नियमांची जाणीव असणे आणि अन्न सुरक्षा राखण्यासाठी त्यांचे पालन सुनिश्चित करणे महत्त्वाचे आहे.

निर्माण होणाऱ्या आजारांना प्रतिबंध करण्याव्यतिरिक्त, अन्न मानके ही अन्न उत्पादन, प्रक्रिया, हाताळणी आणि साठवणुकीसाठी मार्गदर्शक तत्त्वे आणि नियम घालून देतात. अन्नाची गुणवत्ता आणि पौष्टिक मूल्य राखणे;  त्यातल्या अॅलर्जिक घटकांचे  लेबलिंग करणे आणि संभाव्य धोके टाळणे या बाबींचा विचार यात केला आहे.

अन्नामधून आर्थिक फायद्यासाठी केल्या जाणाऱ्या फसवणुकीला आणि भेसळीला प्रतिबंध करणे आणि उत्पादकांसाठी समान नियमांचा अवलंब करून आंतरराष्ट्रीय व्यापार सुलभ करणे आणि विविध देशांमधली खाद्य उत्पादने सुरक्षित आणि गुणवत्तापूर्ण आहेत की नाही याची खात्री करणे याही गोष्टींचा यात समावेश आहे. वेगवेगळे देश या सामान्य मानकांचे पालन करून सार्वजनिक आरोग्याचे रक्षण करू शकतात आणि अन्न उत्पादनांची आयात आणि निर्यातही सुलभ होते. असे झाल्याने एकमेकांच्या अन्न सुरक्षा प्रणालींवर परस्पर विश्वास निर्माण होतो. कोडेक्स द्वारे आंतरराष्ट्रीय समुदायाला शास्त्रीय मानकांचा एक संच दिला जातो. या जागतिक अन्न सुरक्षा मानकांचे राष्ट्रीय कायद्यात रूपांतर करून अनेक देश आपली शाश्वत विकास उद्दिष्टे साध्य करू शकतात. यामुळे दारिद्र्य निर्मूलनाचे शाश्वत विकास उद्दिष्टही साध्य करता येऊ शकते. यामुळे स्थानिक व्यापाऱ्यांना नवीन बाजारपेठेत प्रवेश करता येतो आणि त्यांचा व्यवसाय वाढवता येतो. अशा प्रकारे अप्रत्यक्षपणे सगळ्यांची भूक भागवण्याचे उद्दिष्टही गाठता येते. ग्राहकांच्या आरोग्याचे रक्षण करण्यासाठी आणि अन्न-जनित आजारांचे प्रमाण कमी करण्यासाठी अन्न सुरक्षा व्यवस्था मजबूत करून चांगले आरोग्य आणि सगळ्यांच्या कल्याणाचे उद्दिष्ट पूर्ण होऊ शकते. व्यापारातील अडथळे दूर करून अन्न क्षेत्रातील न्याय्य व्यापार पद्धतींना प्रोत्साहन दिले तर सभ्य कार्य आणि आर्थिक वाढीचे उद्दिष्ट साध्य होते. अन्न कचरा आणि रसायनांचे व्यवस्थापन हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी  अचूक आणि विश्वासार्ह अन्न लेबलिंग करता येते. 2030 साठी शाश्वत विकास उद्दिष्टे साध्य करताना कोणीही मागे राहू नये हे उद्दिष्ट साधण्यासाठी अन्न सुरक्षा हे एक चांगले माध्यम आहे.

अन्न सुरक्षा ही सार्वजनिक आरोग्यामधली सर्वात महत्त्वाची बाब आहे. अन्न सुरक्षा साध्य करण्यासाठी अन्न मानके ही आवश्यक घटक आहेत. अन्न सुरक्षा आणि समुदायांची सुरक्षा एकमेकांना पूरक आहेत आणि त्यांचं आपल्या शाश्वत भविष्यात मोठं योगदान आहे.

अन्नपदार्थांच्या किंमतींवर नियंत्रण

सुरक्षितता परिमाण प्रवेश हे अन्न पदार्थांच्या परवडणाऱ्या किंमतींवरही लक्ष ठेवते. जगातील प्रत्येकाला पुरेसे अन्न मिळेल याचीही हमी देते. अन्न सुरक्षेमुळे अन्न दूषित होण्यापासून किंवा खराब होण्यापासून वाचवता येते. ग्राहकां यामुळे पौष्टिक आणि सुरक्षित अन्न मिळते. 2050 मध्ये 10 अब्ज लोकांना पोसण्यासाठी आपल्याला संयुक्त राष्ट्रांची शाश्वत विकास उद्दिष्टे पूर्ण करणे गरजेचे आहे. त्यासाठी अन्न सुरक्षा आणि टिकाऊ अन्नपदार्थांसाठी नवनवीन उपाय करण्याची आवश्यकता आहे.

अन्न सुरक्षेला प्राधान्य दिले तर आपण आरोग्याला निर्माण होणारे धोके कमी करू शकतो. अन्नाचा अपव्यय टाळू शकतो. यामुळे ग्राहकांचा आत्मविश्वास वाढवतो आणि कृषी उत्पादकतेलाही प्रोत्साहन मिळते. परिणामी जागतिक व्यापार सुलभ होतो. असे प्रयत्न एकत्रितपणे अन्न सुरक्षा साध्य करण्यासाठी योगदान देतात. यामुळे सर्व व्यक्तींना त्यांच्या आहाराच्या गरजा आणि प्राधान्ये पूर्ण करण्यासाठी सुरक्षित, पौष्टिक आणि पुरेसे अन्न उपलब्ध होते. एकूणच आपल्या अन्न पुरवठ्याची सुरक्षा, गुणवत्ता आणि अखंडता सुनिश्चित करण्यासाठी अन्न मानके महत्त्वाचे योगदान देतात. या मानकांचे पालन करून, अन्न उत्पादक, खाद्य पदार्थांवर प्रक्रिया करणारे उद्योजक, वितरक आणि किरकोळ विक्रेते अन्न-जनित आजारांना प्रतिबंध करण्यात आणि ग्राहकांच्या कल्याणामध्ये त्यांचे योगदान देतात.

 शोभा सुरी या ऑब्झर्व्हर रिसर्च फाऊंडेशनमध्ये वरिष्ठ फेलो आहेत.

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.