Published on Dec 28, 2020 Commentaries 0 Hours ago

‘कोविड १९’ नंतरच्या जगात शहरांमधील सांस्कृतिक जीवन फुलवण्यासाठी अनेक प्रयोग करणे गरजेचे आहे. यातून शारीरिक आणि मानसिक अनुबंध दृढ होतील.

भविष्यातील शहरांची ‘संस्कृती’

मागच्या उन्हाळ्यातील एका शनिवारच्या दुपारी तेल अविव शहराच्या मध्यवर्ती भागात फेरफटका मारताना, अनेकांच्या कानावर सौम्य संगीत पडले असेल. कोविड १९ चा संसर्ग रोखण्यासाठी इस्रायलने कठोर लॉकडाऊन पुकारलेले असताना व कोरोना मृतांची संख्या वाढत असतानाचा तो दिवस होता.

एका जुन्या, बंद पडलेल्या कारखान्याजवळ हे संगीत वाजत होते. सुटसुटीत आणि सुव्यवस्थित रांगेत पार्क केलेल्या कारमध्ये बसून लोक या संगीताचा आस्वाद घेत होते. प्रत्येक संगीतप्रेमी ग्रूप आपल्याच धुंदीत, आसपासचा कुठलाही आवाज आपल्यापर्यंत येऊ नये, अशी व्यवस्था करून या तात्कालीक संगीत मेळ्यात सहभागी झाला होता. ‘कोविड १९’ नंतरच्या जगातील सांस्कृतिक जीवन फुलवण्यासाठी हे आणि असे अनेक प्रयोग गरजेचे आहेत. या प्रयोगांना शहरी कल्पनांची जोड देऊन शारीरिक व मानसिक अनुबंध दृढ करण्याच्या दृष्टीने देखील याकडे पाहिले पाहिजे.

कितीही मोठ्या संकटाचा काळ असला आणि अनिश्चिततेची पकड कितीही घट्ट असली तरी, सांस्कृतिक जीवन त्यातही झळाळून उठते. सांस्कृतिक जीवन वा सांस्कृतिक प्रवाहीपण माणसाला व्यक्तिगत आणि सामाजिक आपत्तींशी सामना करण्याची व त्यावर मात करण्याची शक्ती देते. केवळ व्यक्तिगत पातळीवरच नाही तर एकंदर सामाजिक-सांस्कृतिक वर्तुळातही एक चैतन्य निर्माण करते. भाषा, परंपरा, सामाजिक व सांस्कृतिक मूल्यांच्या माध्यमातून प्रतिकूलतेवर मात कशी करता येईल, याचा विचार सांस्कृतिक जीवनात होतो.

संस्कृतीकेंद्री बदलाची व्याख्या करताना क्लॉज-इहलर्स म्हणतात, ‘सांस्कृतिक आणि सामाजिक पर्यावरणाचे परिणाम सकारात्मक असतात. टिकून राहण्याची, बदलाशी जुळवून घेण्याची आणि नवचैतन्य निर्माण करण्याची शक्ती त्यात असते. जगभरातील शहरे महामारीच्या विविध परिणामांशी झगडत असताना सांस्कृतिक जीवनाचा फायदा कसा उठवता येईल, याचा शोध घेणे महत्त्वाचे आहे. नगररचनेच्या साध्या-साध्या संकल्पनांची जोड त्यास द्यायला हवी. हे सगळे प्रयत्न नगर रचनेतील बदलाला नवा आयाम देऊ शकतात आणि वंचित, असुरक्षित व अल्पसंख्य घटकांना वा समाजाला ओळख देऊ शकतात. त्यांच्या अस्तित्त्वाचे संरक्षण, संवर्धन करू शकतात.

जागतिक शहरांच्या संदर्भाने पाहिल्यास, एखादी सामूहिक सामाजिक कृती वा उपक्रम हीच संबंधितांची सांस्कृतिक ओळख बनली आहे. सार्वजनिक ठिकाणांवरील भौतिक घटक जसजसे अधिक वैश्विक होत आहेत, त्या प्रमाणात विविध पार्श्वभूमीच्या व वंशाच्या व्यक्ती, संघटना व समाजघटकांकडून त्यांचा होणारा वापर त्याचे वेगळेपण अधोरेखित करत आहे. जगभरात सामान्यत: बहुपयोगी विकास पद्धती स्वीकारण्यात आली आहे. त्या अंतर्गत सार्वजनिक जागा वा ठिकाणे ही ठराविक किंवा अपेक्षित कारणांपेक्षा वेगळ्या कामांसाठी वापरल्या जातात.

उदाहरणार्थ, आठवड्याच्या अखेरच्या दिवशी एखादे खेळाचे मैदान हे शेतमालाच्या बाजारामध्ये रुपांतरित होते. मॉल बंद असताना तेथील मोकळ्या जागेचा वापर चालण्यासाठी वा जॉगिंगसाठी केला जातो किंवा एखादे बॉम्बविरोधी बंकर तात्पुरते कलादालन म्हणून वापरात आणले जाते. बहुविध वापरामुळे जागेची उपयुक्तता आणि मूल्य वाढते. ज्यायोगे बांधकामाची वेगवेगळी प्रारूपे समोर येतात. त्यातून सार्वजनिक अनुभवसंपन्नता वाढते व सांस्कृतिक लवचिकतेला प्रोत्साहन मिळते.

युरोपीय देशांच्या संदर्भात शहरी सार्वजनिक जागांचा विचार करता प्लाझा, चौक, पार्क आणि उद्याने ही वर्षानुवर्षे विविध सामाजिक उपक्रमांसाठी मुख्य व्यासपीठे ठरली आहेत. कोविड १९ च्या पार्श्वभूमीवर आलेल्या सामाजिक अंतराच्या नियमामुळे देखील ही परिस्थिती बदललेली नाही. इतकेच नव्हे, काही शहरांत कधीही वापरात नसलेल्या जागांचा वापर करण्यासही मुभा देण्यात आली आहे. एप्रिल महिन्यात रमझानच्या सुट्ट्यांच्या काळात जाफा येथील पार्किंगची स्थळे प्रार्थनेसाठी वापरली गेली.

भारताच्या संदर्भात तुलनात्मक विचार केल्यास, शहरांच्या विस्ताराला वैधानिक मर्यादा आहेत. विकासाची मर्यादित साधने एखाद्या वास्तूच्या निर्मितीचे व त्या वास्तूमध्ये होऊ शकणाऱ्या उपक्रमांचे स्वरूप ठरवतात. मात्र, अलीकडे मुंबईसारख्या अति घनतेच्या शहरात वेगळा दृष्टिकोन स्वीकारलेला दिसतो. सरकारने मंजूर केलेल्या २०३४ पर्यंतच्या विकास आराखड्यात सार्वजनिक जागांचा विविध उपक्रमांसाठी वापर करण्याची तरतूद करण्यात आली आहे. मात्र, किमान अंमलबजावणी व व्यवस्थापनातील त्रुटींमुळे एक चांगली कल्पना दुर्लक्षित राहिली आहे.

तेल अविव येथील ड्राइव्ह-इन मैफल काही महिन्यांपर्यंत दर आठवड्याला होत होती. मात्र, या मैफलीसाठी वापरला जाणारा जुना कारखाना अलीकडेच जमीनदोस्त करण्यात आला आहे. तिथे नवी इमारत उभी राहणार आहे. कदाचित जगात सध्या होत असलेल्या अमूलाग्र बदलांचे ते प्रतीक ठरावे. महामारीनंतरच्या काळात आपण गेलेल्या वर्षाबद्दल विचार करू, तेव्हा आपल्याला भूतकाळात ओढून नेणारी जुनी व्यवस्था मोडून नव्या सांस्कृतिक अनुभवाची उभारणी करू. त्या माध्यमातून एक समाज म्हणून पुन्हा एकदा बदलांशी जुळवून घेण्याची आपली क्षमता सिद्ध करू.

(तमार अकोव्ह हे इस्रायलच्या आयडीसी हर्लिया येथील ‘स्कूल ऑफ सस्टेनॅबिलिटी’ येथे मानद व्याख्याते आहेत.)

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.