Author : Ramanath Jha

Published on Apr 17, 2021 Commentaries 0 Hours ago

ज्या देशांची लोकसंख्या कमी आहे, भौगोलिक क्षेत्रफळ अधिक आहे आणि जे देश श्रीमंत आहेत, अशा देशांमध्ये लोकशाही उत्तम प्रकारे नांदू शकते.

भारतात ‘लोकशाही’ची घसरण, पण…

अमेरिकी सरकारकडून अनुदानित ना-नफा तत्त्वावर चालणाऱ्या ‘फ्रीडम हाउस’ या बिगरसरकारी संघटनेने लोकशाही, राजकीय स्वातंत्र्य आणि मानवी हक्क या विषयांवर वार्षिक अहवाल प्रकाशित केला आहे. ‘जगभरातील स्वातंत्र्य’ असे या अहवालाचे शीर्षक आहे. सन २०२१ च्या अहवालानुसार एकूण १९५ देशांपैकी ८२ देश लोकशाहीदृष्ट्या स्वतंत्र आहेत, ५९ देश लोकशाहीदृष्ट्या अंशतः स्वतंत्र आहेत आणि ५४ देश त्या दृष्टीने स्वतंत्र नाहीत. भारताचा लोकशाही दर्जा ‘स्वतंत्र’पासून ‘अंशतः स्वतंत्र’पर्यंत खाली आला आहे.

भारताच्या घसरणीची प्राथमिक कारणे ‘हिंसाचारात वाढ व भेदभाव करणारी धोरणे’ आणि ‘विरोधी अभिव्यक्तीवर कठोर कारवाई’ ही प्रामुख्याने सांगण्यात आली आहेत. याला भारताच्या परराष्ट्र मंत्र्यांकडून कडक शब्दांत प्रत्युत्तर देण्यात आले आहे, ‘आपल्याकडे काही स्वयंघोषित जागतिक संरक्षक आहेत, त्यांच्या मंजुरीची काही जण दखलच घेत नाहीत, हे पचवणे त्यांना जड जात आहे.’ जगातील ७० देशांना भारताने आपली लस पुरवली आहे, हे त्यांनी या वेळी अधोरेखित केले. ‘सांगा, जागतिकीकरणवादी देशांनी किती लशींचा पुरवठा केला?’ असा सवाल त्यांनी केला.

‘दि इकनॉमिस्ट’ या अर्थकारणाशी संबंधित संस्थेकडून लोकशाहीसंबंधी श्रेणी ठरविण्याचा वार्षिक अहवाल ‘लोकशाही निर्देशांक’ या नावाने प्रसिद्ध करण्यात आला. जागतिक सर्व्हेच्या आधारावर देण्यात आलेल्या श्रेणीसाठी देशांना गुण देण्यात आले आणि त्यासाठी संपूर्ण लोकशाही, दोषपूर्ण लोकशाही, मिश्र राज्यपद्धती आणि हुकूमशाही असे विभाग करण्यात आला होते.

अखेरच्या अहवालानुसार, जगातील ८.४ टक्के नागरिकांना संपूर्ण लोकशाही वातावरण मिळत असते. ४१ टक्के देशांतील नागरिक दोषपूर्ण लोकशाहीत राहातात, १५ टक्के देशांमध्ये मिश्र राजवट आहे आणि ३५.६ टक्के देशांमध्ये हुकूमशाही कारभार चालतो, असे त्यात नमूद केले आहे. अलीकडेच प्रसिद्ध झालेल्या २०२० च्या ‘लोकशाही निर्देशांका’त भारताचे स्थान ५३ वे आहे. गेल्या अहवालाच्या तुलनेत हे स्थान दोन श्रेणींनी खाली आले आहे. ही ‘लोकशाहीची अधोगती’ नागरी स्वातंत्र्यामधील ‘कठोर कारवाई’शी जोडली गेली आहे.

अशी श्रेणी देण्यासाठी ज्या अहवालांचा आधार घेण्यात आला, त्या अहवालांच्या गुण-दोषांचे विश्लेषण करणे किंवा हे निष्कर्ष काढताना वापरण्यात आलेल्या पद्धती किती शुद्ध होत्या याचा विचार करणे, हे या लेखाचे उद्दिष्ट नाही. त्याऐवजी, श्रेणीनुसार, जगातील दहा सर्वोत्कृष्ट लोकशाहींचा विचार करू आणि त्यातून निष्कर्ष काढण्यासाठी त्यांच्या मूलभूत तत्त्वांचे विश्लेषण या लेखात करू.

सन २०२० या वर्षात जगातील सर्वोत्कृष्ट दहा लोकशाही देश म्हणजे, नॉर्वे, आइसलंड, स्वीडन, न्यूझीलंड, कॅनडा, फिनलंड, डेन्मार्क, आयर्लंड, नेदरलँड्स आणि ऑस्ट्रेलिया. या यादीतील पुढील आणखी १३ देश आणि आधीचे दहा देश मिळून एकूण २३ देशांमध्ये श्रेणीनुसार संपूर्ण लोकशाही अस्तित्वात आहे.

लोकसंख्येच्या दृष्टीने विचार केला, तर कॅनडा हा पहिल्या दहा देशांमधील सर्वांत मोठा देश आहे. देशांच्या यादीत त्याचे स्थान ३९ वे आहे आणि सर्वांत लहान आइसलंडचे स्थान १८१ वे आहे. दहापैकी ऑस्ट्रेलिया, आयर्लंड आणि न्यूझीलंड हे तीन देशांची श्रेणी ५० ते १०० दरम्यान येते. उरलेले डेन्मार्क, फिनलंड, नॉर्वे, आयर्लंड आणि न्यूझीलंड हे देश १०० ते १५६ च्या दरम्यान येतात.

राष्ट्रांच्या समूहात, लोकशास्त्रीय परिमाणामध्ये या देशांची सरासरी श्रेणी १०४ आहे. लोकसंख्येनुसार पाहिले, तर पहिल्या दहामधील कॅनडाची लोकसंख्या ३ कोटी ७६ लाख आहे आणि आइसलंड हा सर्वांत लहान देश असून त्याची लोकसंख्या ३ कोटी ६७ हजार आहे. या दहा देशांची सरासरी लोकसंख्या ११ कोटी ७ लाख आहे आणि त्यांची एकूण लोकसंख्या जागतिक लोकसंख्येच्या दीड टक्का आहे. आपण या देशांकडे भारताच्या दृष्टिकोनातून पाहिले, तर या दहा देशांची एकूण लोकसंख्या ही भारताच्या लोकसंख्येच्या ८.५ टक्के आहे. त्यामुळे असे निश्चितपणे सांगता येईल, की या लोकशाही देशांची लोकसंख्या काही फार जास्त नाही.

भौगोलिक क्षेत्राचा विचार केला, पहिल्या दहापैकी कॅनडा आणि ऑस्ट्रेलिया या दोन देशांचे क्षेत्र अनुक्रमे ९.९८ दशलक्ष स्क्वेअर किलोमीटर आणि ७.६९ दशलक्ष स्क्वेअर किलोमीटर आहे. नेदरलँड्सचा अपवाद वगळता अन्य सात देश भौगोलिकदृष्ट्या संपन्न असून त्यांचे क्षेत्र एकूण १९.३४ स्क्वेअर किलोमीटर आहे. हे एकूण क्षेत्र पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या ३.७९ टक्के आहे. याचा अर्थ प्रत्येक व्यक्तीस सरासरी १,१०,७३४ स्क्वेअर मीटर जागा उपलब्ध आहे.

आइसलंडमध्ये दर स्क्वेअर किलोमीटरमागे १.२ व्यक्तींची घनता आहे. ऑस्ट्रेलियाची घनता ३.३ व्यक्ती आणि कॅनडाची घनता प्रती स्क्वेअर किलोमीटर ३.७ व्यक्ती एवढी आहे. दहा देशांची सरासरी घनता प्रति स्क्वेअर किलोमीटरमागे ६.०५ व्यक्ती एवढी आहे. दुसऱ्या शब्दांत सांगायचे, तर जगाच्या एकूण लोकसंख्येच्या १.५ टक्के लोकसंख्या असलेले हे दहा देश पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या २.५ पट क्षेत्र बाळगतात. भारताच्या तुलनेत हे पाहिले असता, या देशांकडे आपल्या क्षेत्राच्या सहापट क्षेत्र असून प्रति व्यक्ती पाचपट जागा व्यापतात. सारांश, या देशांना भौगोलिक क्षेत्राची देणगी लाभलेली आहे. आणि शक्तीशाली लोकशाहीसाठी पृथ्वीवरील जागेचा मोठा वाटा आणि अत्यंत कमी लोकसंख्या पोषक ठरत असते.

संयुक्त राष्ट्रांच्या विकास कार्यक्रमाच्या ‘मानव विकास अहवाल २०२०’साठी मानवी विकास मोजण्यासाठी तीन मापके वापरण्यात आली आहेत. ती म्हणजे, दरडोई एकूण राष्ट्रीय उत्पत्न, जन्मावेळेपासूनचे संभाव्य आयुर्मान आणि शिक्षण घेण्याचा संभाव्य काळ. या सर्व दहा देशांच्या दरडोई राष्ट्रीय उत्पन्नाचे प्रमाण खूप अधिक आहे. ते ४०,७९९ डॉलर (न्यूझीलंड) आणि ६८,३७१ डॉलरच्या (आयर्लंड) दरम्यान आहे. आणि या दहा देशांचे सरासरी दरडोई राष्ट्रीय उत्पन्न ५८,२७१ डॉलरच्या घरात आहे. आदर्श लोकशाही नांदण्यासाठी श्रीमंती पूरक ठरते, हे यावरून स्पष्ट होते.

या दहा देशांमधील जन्मावेळपासूनचे संभाव्य आयुर्मान खूप चांगले आहे. सन २०२० च्या अहवालानुसार दहा देशांमधील हे प्रमाण ८०.९५ वर्षे (डेन्मार्क) आणि ८३.४ वर्षे (ऑस्ट्रेलिया) असे असून दहा देशांची सरासरी ८२.४ वर्षे आहे. भारताशी तुलना केली, तर भारतीयांच्या सरासरी आयुष्याच्या तुलनेत या दहा देशांमधील लोक १२.७ वर्षे अधिक जगतात.

या देशांची शैक्षणिक पार्श्वभूमीही तेवढीच प्रभावी आहे. शिक्षणाची संभाव्य वर्षे या मापकामध्ये ऑस्ट्रेलियाचा क्रमांक अव्वल आहे. या देशात हे प्रमाण २२ असून कॅनडामध्ये सर्वांत कमी म्हणजे १६.२ आहे. दहा देशांची सरासरी १८.८८ वर्षे आहे. या सर्व देशांमध्ये साक्षरतेचे प्रमाण सर्वांधिक आहे. त्यांचा साक्षरतेचा सरासरी दर १०० टक्क्यांपेक्षा किंचित कमी म्हणजे ९९.२ टक्के आहे. तेही या देशांच्या अर्थव्यवस्थेला हातभार लावण्यासाठी तिसऱ्या जगातून येणाऱ्या स्थलांतरितांमुळे संपूर्ण साक्षरता दिसत नाही.

वांशिकतेच्या दृष्टीने पाहिले, तर प्रत्येक देशात एकाच प्रकारच्या समाजाचे वर्चस्व आहे. फिनलंडमध्ये सर्वाधिक म्हणजे ९१.३ टक्के लोकसंख्या ‘फिनिश मूळ’ असलेली आहे आणि दहा देशांमधील सरासरी ८२.१९ टक्के नागरिक थोडेफार सामायीक वांशिक पार्श्वभूमी असलेले आहेत. या दहा देशांमधील सुमारे ६४ टक्के नागरिक हे एकाच धर्माचे पालन करतात. या देशांमध्ये प्रमुख धर्माच्या समाजाच्या जवळपासच नव्हे, तर दहा टक्के लोकसंख्याही अन्य धर्माच्या समाजाची नाही.

आश्चर्य म्हणजे, या समाजातील नागरिकांचा एक मोठा भाग अश्रद्ध आहे. सरासरी २८.२ टक्के नागरिकांनी आपण कोणत्याही धर्माचे नाही, असे आपल्या उत्तरामध्ये नमूद केले आहे. नेदरलँड्समधील सर्वांधिक म्हणजे ५४.१ टक्के नागरिकांनी आपण कोणत्याही धर्माचे नाही, असे उत्तर नोंदवले आहे. आणि सर्वांत कमी म्हणजे आयर्लंडमधील १०.१ टक्के नागरिक आपण कोणत्याही धर्माचे नाही, असे स्पष्ट केले आहे.

तक्ता : संपूर्ण लोकशाही आणि भारत

संपूर्ण लोकशाही सरासरी लोकशाही (कोटी) सरासरी लोकसंख्या घनता (प्रति स्क्वे. किमी) सरासरी एकूण राष्ट्रीय उत्पन्न (डॉलर) जन्मापासूनचे सरासरी संभाव्य आयुर्मान शिक्षणाची संभाव्य सरासरी वर्षे
पहिल्या दहा स्थानावरील देश १.१७ ६.०५ ५८,२७१ ८२.४ १८.८८
अन्य १३ देश ३.४२८ १६३.६० ४१,५०६ ८१.२ १६.१३
भारत १३८ ३८२ ०६,६८१ ६९.७ १२.२

स्रोत: संयुक्त राष्ट्रे मानवी विकास अहवाल २०२० (एकूण राष्ट्रीय उत्पन्न, आयुर्मान आणि शिक्षण)

या यादीतील संपूर्ण लोकशाही असलेल्या अन्य १३ देशांकडे नजर टाकू या. जपानचे स्थान २१ वे असून लोकसंख्या १२ कोटी ६३ लाख आहे. जर्मनी १४ व्या स्थानावर असून लोकसंख्या ८ कोटी ३७ लाख आहे, तर ब्रिटन सोळाव्या स्थानावर असून लोकसंख्या ६ कोटी ६६ लाख आहे. अन्य सर्व देशांची लोकसंख्या पाच कोटींपेक्षा कमी आहे. या १३ देशांची सरासरी लोकसंख्या ३ कोटी ४२ लाख ८० हजार असून पहिल्या दहा देशांची सरासरी लोकसंख्या १ कोटी १७ लाख आहे.

या १३ देशांचे भौगोलिक क्षेत्रफळ हे पहिल्या दहा देशांच्या भौगोलिक क्षेत्रफळांच्या तुलनेत कमी आहे. त्यांचे सरासरी क्षेत्र २,०९,५६० स्क्वेअर किलोमीटर असून पहिल्या दहा देशांचे क्षेत्र १,९३,३६९६ स्क्वेअर किलोमीटर आहे. या १३ देशांची सरासरी लोकसंख्या पहिल्या दहा देशांच्या तुलनेत अधिक आहे आणि भौगोलिक क्षेत्र मात्र, तुलनेने कमी आहे. त्यामुळे या देशांची प्रति स्क्वेअर मीटर घनता खूप जास्त आहे. पहिल्या दहा देशांच्या प्रति स्क्वेअर किलोमीटर ६.०५ व्यक्तींच्या तुलनेत प्रति किलोमीटर १६३.६० सरासरी घनता आहे. त्यांचे सरासरी एकूण राष्ट्रीय उत्पन्नही खूप कमी आहे. पहिल्या दहा देशांचे सरासरी राष्ट्रीय उत्पन्न ५४,६३५ डॉलर आहे, तर ११ ते २३ स्थानांमध्ये असलेल्या म्हणजे १३ देशांचे दरडोई सरासरी राष्ट्रीय उत्पन्न ४१,५०६ डॉलर किंवा १३,१२९ डॉलर इतके कमी आहे.

या सर्वाचा योग्य निष्कर्ष काढला, तर ज्या देशांची लोकसंख्या कमी आहे, भौगोलिक क्षेत्रफळ अधिक आहे आणि जे देश श्रीमंत आहेत, अशा देशांमध्ये लोकशाही उत्तम प्रकारे नांदू शकते, असे दिसते. ज्या देशांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात आणि गुंतागुंत असलेली लोकसंख्या असते, भौगोलिक क्षेत्रफळ कमी असते आणि जे देश अर्थ, आरोग्य, शिक्षण आणि एकात्मता या घटकांसंबंधाने संघर्ष करीत असतात, त्या मोठ्या देशांना हे घटक लागू पडत नाहीत. असे सर्व्हे करताना सर्व्हेच्या कार्यपद्धतीमध्ये हे सत्य आणि असे ‘अवघड घटक‘ विचारात घेतले जाणार नाहीत, त्यांच्या निष्कर्षांबाबत प्रश्न विचारला जाणारच.

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.

Author

Ramanath Jha

Ramanath Jha

Dr. Ramanath Jha is Distinguished Fellow at Observer Research Foundation, Mumbai. He works on urbanisation — urban sustainability, urban governance and urban planning. Dr. Jha belongs ...

Read More +