Author : Shoba Suri

Published on Sep 21, 2020 Commentaries 0 Hours ago

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हे लक्षात ठेवायला हवे की, आईमधील कुपोषणामुळे आईच्या व उद्याच्या पिढीचीही शारीरिक क्षमता कमी होते. त्यामुळे संसंर्गाची शक्यता वाढते.

कुपोषणाच्या चक्रव्युहात भारत

भारतातील माणसांची आणि त्यांच्या खाण्यापिण्याची आकडेवारी आपल्याला गांभीर्याने विचार करायला भाग पाडते आहे. विशेषतः लहान मुलांच्या जन्माचे (आणि मृत्यूचेही) आणि त्यांच्या नशिबी येणाऱ्या कुपोषणाचे आकडे नीट समजून घ्यायला हवेत. एकीकडे वाढणारी शहरे आणि ओसाड होत जाणाऱ्या गावांमुळे गरिबांच्या हालअपेष्टांमध्ये फारसा फरक पडलेला नाही. सकस आहाराचा अभाव, सक्तीने लादलेले मातृत्व यामुळे कमी वजनाच्या मुलांचा जन्म होण्याची शक्यता बळावते. यामुळेच कुपोषणाचे चक्र हे पिढ्यानपिढ्या सुरू आहे.

भारतात १५ ते ४९ वर्षे या वयोगटातील (प्रजोत्पादक वयातील) एकूण महिलांपैकी २३ टक्के महिला या कृश (बारीक) आहेत. म्हणजेच त्यांचा बॉडी मास इंडेक्स प्रति चौरस मीटर १८.५ किलोग्रॅमपेक्षा कमी आहे. हे प्रमाण शहरी भागाच्या (१६ टक्के) तुलनेत ग्रामीण भागात (२७ टक्के) जास्त आहे आणि कुटुंबाची मिळकत देखील ग्रामीण भागात कमी होत जाते.

जवळजवळ एक तृतीयांश महिलांचे (२६.८ टक्के) वयाच्या १८ वर्षापूर्वीच लग्न झालेले आहे. अपुऱ्या आणि अयोग्य आहाराचे सेवन हेच बऱ्याचदा स्त्रियांच्या कमकुवततेचे कारण असते. अर्ध्याहून कमी स्त्रिया पौष्टिक आहार घेतात. ज्यात दररोज फक्त ४७ टक्के स्त्रियांच्या आहारात दररोज हिरव्या पालेभाज्यांचा समावेश असतो. ४६ टक्के स्त्रियांच्या आहारात आठवड्यातून एकदाच फळांचा समावेश असतो आणि ४५ टक्के स्त्रियांच्या आहारात डाळींचा समावेश असतो.

पिढ्यानपिढ्याचे कुपोषणचक्र

भारतात प्रत्येक तिसऱ्या मुलाचे वजन कमी (३५.७ टक्के) किंवा स्थिर (३८.४) राहिले आहे. राष्ट्रीय कौटुंबिक आरोग्य सर्वेक्षणाच्या (२०१५-१६) आकडेवारीनुसार पाच वर्षांखालील अर्ध्याहून अधिक मुले (५८.४ टक्के) अशक्त आहेत. अपुऱ्या आहाराचे हे चक्र गरीबी, सामाजिक बहिष्कार आणि लैंगिक भेदभाव या कारणांमुळे वाढले आहे. या घटकांचा शारीरिक विकासावर कायमस्वरुपी परिणाम होत आहे. महिलांमधील कुपोषण हे संसर्गाची प्रवृत्ती निर्माण करते. याचा प्रजननावर परिणाम होतो आणि बाळंतपणासाठीची क्षमताही कमी होते.

शाश्वत विकासाचे लक्ष्य (एसडीजी) गाठण्यासाठी सकस पोषण आहारातील गुंतवणूक अतिशय महत्वाची आहे. विशेषत: एसडीजी-३ म्हणजेच उत्तम आरोग्य, बालमृत्यू कमी करणे आणि माता मृत्यूदर कमी करण्याचे लक्ष्य गाठण्याच्या दृष्टीने सकस आहार पोषण अत्यंत महत्वाचे आहे.

पौगंडावस्थेतील मुलांपैकी (१० ते १९ वर्षे) अर्ध्यापेक्षा अधिक मुले ही कृश किंवा जास्त वजनदार आहेत. तर ८० टक्क्यांहून अधिक पौष्टिक आहाराच्या अभावामुळे त्रस्त आहेत, अशी सर्वसमावेशक माहिती राष्ट्रीय पोषण सर्वेक्षण अहवालात नमूद आहे.

सुमारे ४० टक्के किशोरवयीन मुलींना अशक्तपणाचा त्रास होतो. एक चतुर्थांश किशोरवयीन मुली या शालेय सेवांपासून वंचित आहेत. ज्यात माध्यान्ह भोजन, द्विवार्षिक आरोग्य तपासणी, जंत तपासणी, साप्ताहिक लोह आणि फोलिक अॅसिड पूरक आहार या सेवांचा समावेश आहे.

किशोरवयीन मातांच्या मुलांमधील कुपोषणाचा धोका किती गंभीर आहे हे भारतातील पौगंडावस्थेतील गर्भधारणा आणि मुलांमधील कमी पोषण यांच्यातील संबंधांवरील अभ्यासात स्पष्टपणे दिसून येते. प्रौढ मातांच्या तुलनेत पौगंडावस्थेतील मातांमध्ये कमी वजनाच्या मुलांचा धोका १० टक्क्यांनी जास्त आहे.

मातृ पौष्टिकतेची वाईट स्थिती, आरोग्य सेवा सहज उपलब्ध न होणे आणि पूरक आहार पद्धतीचा अभाव ही काही यासाठीची कारणे आहेत. बांगलादेशमधील अभ्यासानुसार, मातांची उंची आणि पाच वर्षांखालील मुलांच्या मृत्यूदराचा संबंध असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

पौगंडावस्थेतील तरुण आणि प्रौढांचे जीवन समजून घेताना पोषण आहार हा अतिशय महत्वाचा घटक असल्याचे अभ्यासाच्या निष्कर्षातून समोर आले आहे. पौगंडावस्थेतील मुले आणि तरुण मुली कुपोषणाच्या चक्रात कसे अडकले जातात हे देशभरातील विविध केस स्टडिजरुन लक्षात येते. लवकर विवाह, गरीब सामाजिक-आर्थिक परिस्थिती, योग्य पोषणाचा अभाव आणि शिक्षणाचा अभाव यासह अनेक घटकांचा यात समावेश आहे. पिढ्यानपिढ्या चालत आलेले कुपोषणाचे चक्र भेदण्यासाठी पौष्टिक आहारात गुंतवणूक होणे किती महत्वाचे हे यातून स्पष्ट होते. कारण, याचा परिणाम पुढील अनेक पिढ्यांवर होत असतो.

आंतर-पिढीचा दृष्टीकोन स्त्रियांमधील दारिद्र्य आणि शिक्षण पातळीवरील मूलभूत घटकांवर कायमचा प्रभाव आणू शकतो. पौगंडावस्थेतील अशक्तपणाचा कायमस्वरुपी परिणाम होतो. ज्यामुळे माता मृत्यूचा धोका, कमी वजनाचे मूल आणि नवजात मुलामध्ये अशक्तपणाचा धोका जास्त असतो. पौगंडावस्थेतील अशक्तपणा नियंत्रित करण्यासाठी लोह आणि फॉलिक अॅसिड पूरक साप्ताहिक आहार हे प्रभावी माध्यम आहे. यातूनच कुपोषणाच्या आंतर-पिढी चक्राला भेदण्यात मदत होईल.

पहिल्या १ हजार दिवसात लक्ष न दिल्यास बाळाची वाढ खुंटण्याची समस्या कायमस्वरुपाचे रुप धारण करू शकते, हे पुराव्यांनिशी सिद्ध झाले आहे. पौगंडावस्थेतील कालावधी हा संततीवाढीचा आणि विकासासाठी अत्यंत महत्वाचा असतो.

पौगंडावस्थेतील मुला-मुलींमध्येच कुपोषणाचे पिढ्यानपिढ्या चालणारे चक्र भेदण्याची संधी असते. आहाराची गुणवत्ता आणि प्रमाण या दोन गोष्टी सुधारुन बाळाचे जन्माच्या वेळीचे वजन सुयोग्य राखले जाऊ शकते, असे युनायटेड नेशन्स स्टँडिंग कमिटी ऑफ न्यूट्रिशनने म्हटले आहे. अशक्तपणाचा सामना आणि गर्भवती मातांच्या आहारात सुधारणा केल्याने जन्माला येणाऱ्या बाळाच्या आरोग्यावर नक्कीच सकारात्मक परिणाम होतो.

लवकर विववाह, शिक्षणाचा अभाव आणि दारिद्र्य ही अशी काही आव्हाने आहेत जी महिलांच्या आरोग्यावर परिणाम करतात आणि कुपोषणाला कारणीभूत ठरतात. शारीरिक वाढ आणि विकासासाठी अतिशय महत्वाच्या काळात लक्षपूर्वकपणे पौष्टिक आहारावर भर देण्याच्या नॅशनल न्यूट्रिशन स्ट्रेटीजीचा जीवनशैलीत समावेश होणे गरजेचे आहे.

लवकर होणारे विवाह रोखणे, पौगंडावस्थेतील गर्भधारणा टाळणे आणि स्त्रियांची पौष्टिक स्थिती सुधारणे या मूलभूत गोष्टींचा अवलंब केल्यास कुपोषणाच्या चक्राला ब्रेक लावण्यात बऱ्याचअंशी मदत होऊ शकते. किशोरवयीन प्रजनन रोखणे आणि लैंगिक आरोग्य कार्यक्रम राबवल्यामुळे कुपोषणाची साखळी तोडली जाऊ शकते. यातूनच किशोरवयीन मुलींच्या आरोग्याचे संरक्षणही होऊ शकते.

आरोग्य, पोषण, शिक्षणातील सुधारणेसह मातृ पोषणात गुंतवणूक आणि समग्र दृष्टीकोन ठेवल्याने पंतप्रधानांच्या महत्वाकांक्षी समग्र पौष्टिक आरोग्य योजना (पोषण) अभियान २०२२ लक्ष्य प्राप्तीसाठी महत्वपूर्ण योगदान देणारे ठरेल. यासोबतच जागतिक आरोग्य संघटनेचे जागतिक लक्ष्य २०२५ आणि शाश्वत विकास ध्येय २०३० (एसडीजी) यासाठीही हातभार लागेल.

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.