Author : Nilanjan Ghosh

Published on Dec 07, 2020 Commentaries 0 Hours ago

यारलंग सँगपो म्हणजेच ब्रह्मपुत्रा धरणावरून, भारत-चीनदरम्यानच्या राजकीय आगीत तेल पडत आहे. भारताच्या दृष्टीने ही दुर्लक्षिण्याजोगी बाब नक्कीच नाही.

चीनच्या यारलंग प्रकल्पाने भारताला डोकेदुखी

यारलंग सँगपो म्हणजेच ब्रह्मपुत्रा धरणावरून, भारत आणि चीनदरम्यान सुरू असलेल्या राजकारणात जलवर्चस्ववादी चीनकडून भारताच्या हिताला बाधा आणली जात आहे, अशी चर्चा सध्या सुरू आहे. यापूर्वीही, गायका परगण्याच्या वायव्येकडील स्वायत्त तिबेटच्या प्रदेशात चीनच्या यारलंग सँगपो/ ब्रह्मपुत्रा धरणाच्या महत्त्वाच्या प्रकल्पावरून निरनिराळे तर्कवितर्क लढविण्याची स्पर्धा प्रसारमाध्यमांमध्ये सुरू होती.

भारताच्या हद्दीत असलेल्या ब्रह्मपुत्रा नदीसंबंधीच्या चीनकडून सुरू असलेल्या भारतविरोधातील कारवाया वेगवेगळ्या घटनांमधून स्पष्ट झाल्या आहेत. सियांगमधील (अरुणाचल प्रदेशात असलेल्या यारलंग सँगपो नदीचे नाव) पाणी गढूळ व अस्वच्छ करणे, पाण्याची पातळी वाढली असेल तर डोकलाम करारानुसार भारत व चीनमध्ये माहितीची देवाणघेवाण केली जाते, ही देवाणघेवाण रोखणे आणि तिबेटच्या सीमेवर बांधण्यात येणाऱ्या धरण प्रकल्पांच्या बातम्या अशी काही उदाहरणे देता येतील.

तिबेटमधील प्रत्यक्ष ताबारेषेजवळ यारलुग सँगपो नदीच्या सखल भागात ‘सुपर’ धरण बांधण्याचा चीनचा विचार आहे, अशा बातम्यांनी भारत आणि जागतिक प्रसारमाध्यमांमध्ये पूर आला आहे. चीनच्या या पावलांमुळे भारताच्या ईशान्येकडील जलसुरक्षा धोरणांवर दीर्घकालीन परिणाम होऊ शकेल, असा दावा काही वृत्तांमध्ये करण्यात आला होता. हे धरण टीएआरमधील मेडॉग परगण्यात अरुणाचल प्रदेशाजवळ प्रस्तावित आहे. या हस्तक्षेपाची तीव्रता आणि त्याचा भारतावर होणारा परिणाम पाहता, सध्याच्या जलविज्ञानाच्या आणि पर्जन्यवृष्टी व्यवस्थापनाच्या दृष्टिकोनातून त्याचाविचार व्हायला हवा.

पाऊस; तसेच हिमवृष्टी व हिमनगाच्या वितळण्यावर यंत्रणा अवलंबून असली, तरी यारलंग सँगपो-ब्रह्मपुत्रेसंबंधीचे जलविज्ञान आणि पर्जन्यवृष्टी या दोहोंचा परस्परसंबंध खूप जवळचा आहे, हे लक्षात घेणे आवश्यक आहे. या एकूण पट्ट्यातील नदीप्रवाहात हिमवृष्टी आणि हिमनग वितळण्याचे प्रमाण खूपच कमी आहे, तरीही नदीच्या वरच्या भागातील प्रवाहात याचे प्रमाण अधिक आहे. कारण हा भाग पर्जन्यवृष्टीच्या छायेतील प्रदेश आहे.

यारलंग सँगपो/ब्रह्मपुत्रेच्या एकूण २,८८० किलोमीटर लांबीच्या प्रवाहापैकी तिबेटच्या पाठारवरून वाहणाऱ्या १,६२५ किलोमीटर प्रवाहाला यारलंग सँगपो असे संबोधले जाते, तर नदीच्या भारतातील ९१८ किलोमीटरच्या पट्ट्याला ब्रह्मपुत्रा असे नाव असून सिआंग व दिहंग या तिच्या उपनद्या आहेत. बांगलादेशातील गोअलनाडोजवळील गंगा नदीला जाऊन मिळेपर्यंतच्या उरलेल्या ३३७ किलोमीटरचा पट्ट्याला जमुना असे संबोधले जाते. या नदीच्या लांबीचा भौगोलिक वाटप पाहता हा प्रवाह चीनमधील टीएआर प्रदेशात अधिक प्रमाणात आहे, असे वाटते; परंतु ते खरे नाही. उलट नदीचा प्रवाह सखल भागातून जसा जातो, तसा तो अधिक शक्तीशाली आणि विस्तीर्ण बनतो. येथे हे लक्षात घ्यायला हवे, की आसाममध्ये सादियाजवळील लुहित, दिबंग आणि दिहंग या ब्रह्मपुत्रेच्याच उपनद्या आहेत.

पर्जन्यवृष्टी आणि पाणी वाहून जाण्यामध्ये मोठ्या प्रमाणात बदल आढळतो. नदीच्या तिबेटमधील पात्राचा मोठा भाग हिमालयाच्या उत्तरेकडील पर्जन्यछायेच्या प्रदेशातील लांबलचक यारलंग पट्ट्यामध्ये स्थित आहे. म्हणूनच दक्षिणेकडील भागाच्या तुलनेत येथे पर्जन्यमान कमी आहे. त्यामुळे हिमालयाच्या प्रदेशातील सरासरी वार्षिक पर्जन्यवृष्टी सुमारे ३०० मिलीमीटर होत असेल, तर केवळ पर्वतरांगा ओलांडून असलेल्या दक्षिणेकडील भागात सरासरी वार्षिक पर्जन्यवृष्टी सुमारे ३ हजार मिलिमीटरवर पोहोचते. पर्जन्यवृष्टीमधील विसंगतीमुळे पायथ्याशी पाणी साठून मोठ्या प्रमाणात पूर येण्याची शक्यता असते. आसाममधील ब्रह्मपुत्रेच्या खोऱ्यात ईशान्येकडील भागांमधील सरासरी पर्जन्यवृष्टी अधिक आहे आणि पश्चिमेकडील भागांमध्ये ती हळूहळू कमी होत जाते. ज्या वेळी पाण्याची पातळी सर्वाधिक वाढलेली असते, त्या वेळी ब्रह्मपुत्रेमध्ये मॉन्सूनचे पाणी असते.

तिबेटच्या पठारावर असलेल्या नुक्सिया आणि सेला झाँग या पर्जन्यमापक केंद्रांमध्ये प्रति सेकंद सुमारे पाच हजार आणि १० हजार क्युबिक मीटर पर्जन्यमान नोंदविण्यात येते. आसाममधील गुवाहाटी येथे पाण्याचा सर्वोच्च प्रवाह ५५ हजार प्रति सेकंद नोंदवण्यात आली. जेव्हा पाऊस नसतो, तेव्हा पाण्याचा प्रवाह ३०० ते ५०० प्रतिसेकंद वाहात असतो. मात्र, पाऊस नसण्याच्या काळात देशातील पसिघाट येथे पाण्याचा प्रवाह प्रतिसेकंद २००० पेक्षाही अधिक नोंदवण्यात येतो आणि गुवाहाटीमध्ये हीच नोंद प्रतिसेकंद सुमारे ४००० पेक्षाही अधिक नोंदवण्यात आली आणि बहादुराबादमध्ये ती प्रतिसेकंद ५००० नोंदली गेली.

थोडक्यात, नुक्सियामधील वार्षिक ३१.२ अब्ज क्युबिक मीटर पाण्याच्या विसर्गाशी पंडू-गुवाहाटीशी (४९४ अब्ज क्युबिक मीटर) किंवा बांगलादेशातील बहादुराबादशी (६२५ अब्ज क्युबिक मीटर) तुलना होऊ शकत नाही. त्याचप्रमाणे तळाशी गाळ साठण्याची पद्धतही सारखीच आहे. पर्जन्यछायेच्या प्रदेशात पाणी ओसरले, तरी तळाशी साठलेला मोठ्या प्रमाणातील गाळ वाहून नेण्यासाठी ते पुरेसे नसते. ब्रह्मपुत्रेच्या पाण्याचा मोठ्या प्रमाणातील प्रवाह आणि तळाशी असलेला गाळ तिच्या दिबंग, दिहंग (सिआंग), लुहिट, सबनसिरी, मानस, संकोष, तिस्ता आदी उपनद्यांमध्ये वाटला जातो.

नुक्सिआमध्ये दर वर्षी तळाशी असलेला गाळ सुमारे ३ कोटी मेट्रिक टन मोजला जातो(‘रिव्हर मॉर्फोडायनॅमिक्स अँड स्ट्रीम इकॉलॉजी ऑफ द शांघाय-तिबेट प्लॅटू’ या वाँग व सहकाऱ्यांच्या २०१६ च्या संशोधनात नमूद केल्यानुसार). बहादुराबादमधील गाळाची आकडेवारी ७३ कोटी ५० लाख मोजण्यात आली आहे.

एक गोष्ट आणखी लक्षात ठेवणे आवश्यक आहे. ती म्हणजे, तत्कालीन जलस्रोत मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार ब्रह्मपुत्रेची संभाव्य वापरण्याजोगी जलसंसाधने २५ टक्के आहेत. या पार्श्वभूमीवर पर्जन्यमान, पाणी ओसरणे आणि तळाशी गाळ साठणे या घटकांचा विचार करता, हिमालयाच्या उत्तरेकडे यारलंग सँगपोमध्ये कोणताही हस्तक्षेप झाला आणि चीनचा हेतू काहीही असला तरीही भारत आणि बांगलादेशांसारख्या प्रवाहाच्या खालच्या भागातील प्रदेशांच्या अर्थव्यवस्थांवर त्याचा कोणताही परिणाम होणार नाही.झांगमू जलविद्युत प्रकल्पाचे स्थान पाहता हे बरेचसे सत्य आहे.

अर्थात, टीएआरमधील मेडोग परगण्यामधील सध्याच्या प्रकल्पाबद्दल मात्र, असे म्हणता येणार नाही. टीएआरमधील मेडोग परगणे हिमालयाच्या दक्षिणेकडे स्थित आहे. येथे यारलंग नदीचा प्रवाह तिच्या अन्य एका पारलुंग सँगपो या उपनदीच्या प्रवाहामुळे विस्तारला आहे. ते आकृती क्रमांक १ मध्ये दिसत आहे. याच पद्धतीने मेडोगच्या आकृती क्रमांक १ मध्ये वार्षिक सरासरी पर्जन्यमान ३ हजार मिलीमीटर दिसत आहे. ते नुक्सियामध्ये नोंदवलेल्या ५०० मिलिमीटरपेक्षा कितीतरी पट जास्त आहे. मात्र, यारलंगमधून दर वर्षी किती प्रमाणात पाण्याचा विसर्ग होतो, तो चीनच्या बाजूने वादाचा मुद्दा आहे.

चीनमधील काही अभ्यासकांच्या मते हा विसर्ग १३५.९ अब्ज क्युबिक मीटर एवढा आहे. मात्र, मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार हा विसर्ग ७८.१ अब्ज क्युबिक मीटर एवढा आहे. दोन्ही आकडेवारींमधील टक्केवारीत खूपच मोठा फरक दिसत आहे. भारतातील एका जुन्या आकडेवारीनुसार, अरुणाचल प्रदेशातील तुतिंगमधील विसर्गाचे प्रमाण १७९ अब्ज क्युबिक मीटर आहे. त्यामुळे टक्केवारीच्या भाषेत बोलायचे तर,जरी आसाममधील पुराचे पाणी ओसरणे किंवा बांगलादेशातील जमुनेचे पाणी ओसरण्यावर फारसा परिणाम होणार नसला, तरीही चीनमधून निर्माण होणाऱ्या समस्येमुळे भारताला होणारे नुकसान नगण्य आहे, असे म्हणता येणार नाही.

आता चिंता दुहेरी स्तरावर आहे. नदीप्रकल्पाचा वार्षिक प्रवाहाच्या पद्धतीवर कोणताही परिणाम होणार नसला, तरीही चीनला हा नदीप्रकल्प सुरू ठेवायचा आहे. पण या प्रकल्पामुळे तिबेटच्या पर्यावरणावर हानीकारक परिणाम होण्याची शक्यता आहे. एवढेच नव्हे, तर त्याला जोडून असलेल्या अरुणाचल प्रदेशातही त्याचे परिणाम जाणवणार आहेत. मात्र, पाऊस नसलेल्या काळात नदीप्रकल्प सुरू ठेवण्यासाठी नदीमध्ये पुरेसे पाणी असेल किंवा नाही, याची खात्री कोणीही देऊ शकत नाही. त्यामुळे पाण्याच्या साठवणुकीतून हा प्रकल्प सुरू ठेवण्यात आला, तर त्याचा परिणाम अरुणाचल प्रदेशात पाण्याचा थोडाफार तुटवडा भासू शकतो. मात्र, सादियानंतरच्या, खालच्या भागात त्याचा परिणाम फारसा जाणवणार नाही; परंतु दुसरा संभाव्य परिणाम हा अधिक काळजीचा भाग आहे.

याचे कारण म्हणजे, आम्ही केलेल्या संशोधनानुसार, असे दिसून आले आहे की, यिगाँग सँगपो, पारलुंग सँगपो आणि खालच्या भागातील यारलंग या नद्यांच्या पात्रांना जोडणाऱ्याया प्रदेशात पावसाळ्यात जोरदार पाऊस, मोठ्या प्रमाणात भूस्खलनाची शक्यता आणि हिमस्खलन यांसारख्या घटनांची दाट शक्यता आहे. अशा धोक्याच्या घटनांची सरासरी वार्षिक वारंवारिता १० किंवा त्यापेक्षा अधिक आहे. पुढे जाऊन, मेडोगमध्ये अशा घटनांची सरासरी १२ ते १५ एवढी आहे. सगळ्यांत मोठी चिंता म्हणजे, पूर्व हिमालयाच्या भागात दिसून येते तशी अत्यंत अनिश्चित भूविवर्तनी, या जागेमध्येही आढळते. त्यामुळे अशा प्रकारच्या कोणत्याही घटनेमुळे धरण फुटणे किंवा असा प्रकारचे कोणतेही संकट खालच्या भागावर विशेषतः अरुणाचल प्रदेशावर ओढवू शकते. येथे कदाचित अचानक पूर येण्याची शक्यता संभवते.

अर्थात, या विवेचनाला माहितीच्या अभावामुळे मर्यादा जाणवतात. अन्यथा अधिक चांगले विश्लेषण करता येणे शक्य होते. उलट वेगवेगळ्या स्रोतांमधून माहिती मिळाली, तर काही निष्कर्ष काढता आले असते. तरीही सारांश काढायचा, तर मेडोगमधील धरणाचा अरुणाचल प्रदेशावर प्रतिकूल परिणाम होऊ शकतो. मात्र, आसाम आणि बांगलादेशावर तसा प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता दिसत नाही. त्यामुळे या धरणामुळे ‘ईशान्य भारतातील पाणीसुरक्षेवर दूरगामी परिणाम होऊ शकतो,’ हा वादाचा मुद्दा अतिरंजित वाटतो. या पार्श्वभूमीवर, भारत सरकारने उभय देशांसंबंधातील माहिती उघड करणे गरजेचे आहे. त्याच्या साह्याने ‘जल-डिप्लोमसी’ समजून घेण्यासाठी स्वतंत्र वस्तूनिष्ठ विश्लेषण करणेही शक्य होणार आहे. चुकीची माहिती अधिक नुकसान होण्यास कारणीभूत ठरते.

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.

Author

Nilanjan Ghosh

Nilanjan Ghosh

Dr. Nilanjan Ghosh is a Director at the Observer Research Foundation (ORF), India. In that capacity, he heads two centres at the Foundation, namely, the ...

Read More +