Published on Aug 08, 2019 Commentaries 0 Hours ago

काश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित करताना मानसिक स्वास्थ्य हा निकष वापरला तर पुनर्वसन आणि स्थैर्य निर्माण होणे सोपे होईल.

काश्मिरींचे मानसिक आरोग्य धोक्यात

जम्मू-काश्मीरच्या खोऱ्यात बऱ्याच वर्षांपासून सुरु असलेल्या भारतीय सुरक्षा यंत्रणा आणि दहशतवाद्यांमधील संघर्षामुळे तेथील लोकांचे मानसिक स्वास्थ्य बिघडत चालले आहे. मेडिसिन्स सन्स फ्रंटियर्स (MSF) इंडिया, काश्मीर युनिव्हर्सिटी आणि युनिव्हर्सिटी ऑफ मेंटल हेल्थ अँड न्यूरोसायन्स यांच्या काश्मीर मेंटल हेल्थ सर्व्हे २०१५ नुसार राज्यात तब्बल १८ लाख काश्मिरी लोकांमध्ये मानसिक तणावाची लक्षणे दिसून आली.

या सर्वेक्षणामधून असेही दिसून आले की, राज्यात ४.१५ लाख लोक हे गंभीर मानसिक ताणतणावाने ग्रस्त होते. म्हणूनच काश्मीरच्या खोऱ्यातील लोकांच्या मानसिक स्वास्थ्यात सुधारणा घडवून आणण्यासाठी सर्व संबंधित राजकीय पक्षांनी पुढाकार घेतला पाहिजे. या संकटामुळे काश्मीरमध्ये प्रिस्क्रिप्शन्स घेऊन औषधे वापरण्याचे प्रमाण वाढले आहे. काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणात चालू असलेल्या अवैध औषधांच्या विक्रीमागे बेरोजगारी प्रशासनाचे दुर्लक्ष आणि भ्रष्टाचार ही काही कारणे आहेत. ही कारणे लक्षात घेता राज्यातील ‘बेंझोडियॅझेपाईन्स’ नामक औषधाची लक्षणीय वाढती मागणी हे काळजीचे कारण ठरत आहे.

काश्मीर खोऱ्यातील लोकांमध्ये सतत संघर्षपूर्ण वातावरणात राहिल्याने मानसिक आरोग्यासंदर्भातील विकार वाढत आहे. येथे सामान्य नागरिकांचे राजनैतिक आणि सैन्याच्या संघर्षावर नियंत्रण नाही. भारत आणि पाकिस्तान या राष्ट्रांमध्ये काश्मीरवरून बऱ्याच काळापासून सुरू असलेला वादविवाद आणि दहशतवाद्यांमुळे या राज्यातील निवासी क्षेत्रामध्येही लष्कर तैनात केले गेले आहे. या परिस्थितीमध्ये सामान्य जनता हतबल असते. परंतु अशा प्रकारच्या जीवनशैलीमुळे काश्मिरी लोकांना तणाव जाणवू लागतो आणि ते कशाहीप्रकारे परिस्थितीशी जुळवून घ्यायचा प्रयत्न करतात. या मानसिक अवस्थेचा सखोल अभ्यास होणे आवश्यक आहे.

गेल्या वर्षी सप्टेंबर-ऑक्टोबरच्या महिन्यात प्रस्तुत लेखकाने पदव्युत्तर अभ्यासक्रमातील संशोधनासाठी १८-२५ वयोगटातील काश्मिरी व गैर-काश्मिरी विद्यार्थ्यांचा अभ्यास केला. या अभ्यासाचा विषय असा होता की, दैनंदिन जीवनात या विद्यार्थ्यांना ज्या तणावाला सामोरे जावे लागते, त्याचा ते सामना कशाप्रकारे करतात. या अभ्यासासाठी ६० पदवीधर विद्यार्थ्यांचा समावेश करण्यात आला. यातील ३० काश्मीरचे आणि तेवढेच दिल्लीचे विद्यार्थी होते. अभ्यासात २० विद्यार्थ्यांच्या मुलाखतीही समाविष्ट करण्यात आल्या. या अभ्यासासाठी लागणारे प्रश्न ‘सीओपीई इन्व्हेंटरी’च्या आधारे  तयार करण्यात आले.

बऱ्याच काळापासून मानसशास्त्रीय संशोधनात या प्रश्नांचा उपयोग करून अशा परिस्थितींना सामोरे जाण्यासाठी उपाय शोधले जात आहेत. या अभ्यासामध्ये शैक्षणिक परीक्षा आणि वैयक्तिक नात्यांमधून निर्माण होणाऱ्या तणावांचाही विचार केला गेला. युद्धप्रणित क्षेत्रांमध्ये राहणाऱ्या लोकांवर अशा प्रकारचे संशोधन क्वचितच केले गेले असेल. यातून तणाव, पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसॉर्डर (PTSD) आणि अस्वस्थता यांसोबतच अन्य कारणांमुळे मानसिक स्वास्थ्यावर प्रभाव पडणाऱ्या घटकांची माहिती मिळवण्यात मदत झाली.

मुलाखतीदरम्यान काश्मिरी विद्यार्थ्यांनी ‘सुसंबद्ध अभ्यासक्रमाची कमी’ आणि सततच्या बंदमुळे उपस्थितीसंदर्भातील (attendance) अनिश्चिततेबद्दल काळजी व्यक्त केली.

एका विद्यार्थ्याने सांगितले,’ सामान्यपणे वर्षातून २५० दिवस शाळा चालू असतात. परंतु यातील १५० दिवस शाळा बंद असते. आमचे शैक्षणिक आयुष्य हे असेच आहे.’ काश्मीरमधील सततच्या संघर्षमय वातवरणामुळे शाळा नियमितपणे सुरु नसतात. यामुळे विद्यार्थी एकमेकांमध्ये मिळून मिसळून राहू शकत नाहीत. उदा. एका विद्यार्थ्याने सांगितले की, जेव्हा त्यांचे वय शाळांमध्ये शिकायचे होते, तेव्हा ते घरी बसून दूरदर्शनवर कार्यक्रम बघत वेळ काढत होते. त्यांनी सांगितले, ‘आम्ही कर्फ्यूमुळे घरातून बाहेर पडू शकत नाही. येथे अन्य शिकवण्यांची सोयही नसते. त्यामुळे घरी बसल्या बसल्या आम्ही आळशी बनलो आहोत.’

नियमितपणे शाळा सुरु नसल्यामुळे विद्यार्थ्यांनी असेही सांगितले की ‘सामाजिक संरचनांमुळे तणाव वाढतो.’ काश्मिरी समाजात सामूहिक मूल्यांवर भर दिला जातो. यामुळे विद्यार्थी किंवा कोणत्याही व्यक्तीच्या वैयक्तिक आवडी-निवडींना महत्त्व दिले जात नाही. जर काश्मीरमध्ये एखाद्याचा मृत्यू झाला तर तेथील सामाजिक रचनेमुळे ती बातमी सगळ्यांपर्यंत पोहोचते. हेच विद्यार्थ्यांमध्ये मानसिक तणावाचे सर्वात मोठे कारण बनते. राजकीय संघर्ष आणि सामूहिक हितसंबंध यावर बोलताना विद्यार्थी म्हणाले की त्यांच्यासाठी या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत.

राज्यात चालू असलेल्या संघर्षामुळे आणि सुरक्षादलांच्या उपस्थितीमुळे तरुण मुले एकमेकांना भेटू शकत नाहीत आणि नियमितपणे शाळांमध्ये जाऊ शकत नाहीत. त्यामुळेच ही मुले आपल्या परिवारावर अधिकाधिक अवलंबून असतात. त्यांचे सर्वाधिक संभाषण केवळ घरातल्या व्यक्तींसोबतच होते. या परिवारांच्या अशा भूमिकेमुळे ही मुले सामूहिक हितसंबंधांबद्दल खूप जागरूक असतात आणि त्यामुळे काश्मिरी विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक परीक्षांबद्दल तणाव वाढतो. एका विद्यार्थ्याने सांगितले की जेव्हा ती मुले परीक्षा द्यायला जातात, तेव्हा त्याचे कुटुंब शाळेबाहेर उभे असते. मुले जशी बाहेर पडतात, तसे त्यांना त्यांच्या परीक्षेबद्दल विचारले जाते!

काश्मीरमधील लोक तणावाला कसे सामोरे जातात?

विद्यार्थ्यांसोबत संभाषण केल्यावर कळले की ‘सीओपीई इन्व्हेंटरी’ मध्ये तणावाला सामोरे जाण्यासाठी जे १३ उपाय दिले आहेत, त्यातील चार उपाय (धर्म, स्वीकृती, सामाजिक पाठिंबा मिळवणे आणि प्रतिबंध)  त्यांनी अवलंबले. खाली दिलेल्या तक्त्यात दिसून येते की सर्वाधिक विद्यार्थ्यांनी धर्म स्वीकारण्याचा पर्याय निवडला आहे. त्यानंतरचा पर्याय म्हणजे स्वीकृती वाढवणे होय.

स्रोत: लेखकाने केलेले प्राथमिक संशोधन

आम्ही मुलाखती घेतलेल्या विद्यार्थ्यांनीही धार्मिकतेचा उपाय सर्वाधिक प्रमाणात अंगिकारला. अशाच एका मुलाखतीतून आम्हाला कळले,’जेव्हा तुम्ही तुमच्या ईश्वराच्या जवळ असता तेव्हा तुमच्या मनाला सर्वाधिक निवांतता मिळते. जेव्हा जेव्हा मी कुराण वाचतो, तेव्हा तेव्हा मला शांतता लाभते. ईश्वरासमोर नतमस्तक झाल्यावर तुम्ही तुमच्या आत्म्याला स्पर्श करता.’ यातून राजकीय संघर्ष आणि हिंसेने पीडित समाजातील धर्माचे महत्त्व कळते. धर्माबरोबरच तणावाशी सामना करण्याच्या उपायांमध्ये ‘स्वीकृती’चा उल्लेखही करण्यात आला. या प्रकारात लोक तणावपूर्ण परिस्थितील वास्तव स्वीकारण्यास तयार असतात,परंतु ते ती परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न मात्र करत नाहीत.

विद्यार्थ्यांच्या मुलाखतींचे विश्लेषण केल्यावर आम्हाला या परिस्थितीतील ‘स्वीकृती’च्या भूमिकेचा अर्थ कळला. ‘मेंटल डिसेंगेजमेंट’ म्हणजे स्वतःला ताण-तणाव वाढवणाऱ्या परिस्थितीपासून दूर ठेवण्याच्या उपायाचा अवलंब करणारे अनेक विद्यार्थी होते. या प्रकारात ज्या गोष्टीमुळे अस्वस्थता किंवा तणाव निर्माण होतो, त्या गोष्टीपासून लक्ष विचलित करण्यासाठी अन्य कोणत्यातरी प्रक्रियेत स्वतःला गुंतवले जाते. उदा. चित्रपट बघणे. काश्मीरमधील धार्मिक आणि सामाजिक संदर्भांचा एका सामान्य काश्मिरी नागरिकांच्या ताण-तणावाशी कशाप्रकारचा संबध आहे, हे या सर्वेक्षणात स्पष्टपणे जाणवते.

अभ्यासातील निकालांचे अर्थ:

या अभ्यासातील निकालांवरून असे दिसून येते की, काश्मिरी विद्यार्थी कशाप्रकारे बाह्य नियंत्रणाचा शोध घेतात. राज्यात सततच्या संपांमुळे आणि कर्फ्यूमुळे सामान्य नागरिकांच्या स्वातंत्र्यावर बंधन लादले जाते. एखादी व्यक्ती काय करू शकते आणि काय नाही हेदेखील ठरवले जाते. ताण-तणावाला सामोरे जाण्याच्या  उपायांच्या विश्लेषणातून हेही दिसून आले की, लोक बाह्य संस्थांची मदत घेऊन तणाव कमी करण्याचा प्रयत्न करतात. तणाव वाढवणाऱ्या गोष्टींपासून लांब राहण्याचा प्रयत्न करणाऱ्या मुलांकडे बघून कळते खरेतर याचा सामना करण्यासाठी विद्यार्थ्यांकडे मर्यादित उपाय आहेत. उदा. काश्मीरच्या खोऱ्यात सिनेमागृहांना बंदी आहे. सामान्यतः मोठ्या शहरांमध्ये लोकांना फिरण्यासाठी मॉल्स असतात, परंतु काश्मीरमध्ये हा पर्यायही नाही. इंटरनेट हा एक उपाय असू शकतो, पण काश्मीरमध्ये कधीही इंटरनेट कनेक्शन बंद पाडले जाते.

निष्कर्ष:

राजकीय संघर्षाने पीडित असलेल्या कोणत्याही व्यक्तीच्या पुनर्वसनासाठी केवळ शारीरिक हिंसेपासून बचाव करणे हाच उपाय नव्हे, तर तो एक महत्त्वाचा भाग आहे. या प्रक्रियेला ‘नकारात्मक शांतता’ म्हणतात. नकारात्मक शांततेच्या पलीकडील पर्यायाचा  केंद्र आणि राज्य सरकारने विचार केला पाहिजे. काश्मीरमध्ये शांतता राखण्याच्या प्रक्रियेत सरकारने या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. यामुळे त्या राज्यात मानसिक स्वास्थ्याच्या संकटावर सुधारित उपाय शोधण्यास मदत होईल. सध्या काश्मीरमधील राजकीय पेचावर त्वरित उपाय शोधणे कठीण असले, तरी तेथील सामाजिक-सांस्कृतिक आणि सामाजिक-धार्मिक परिस्थिती समजून घेतल्यास राज्यातील लोकांचे मानसिक स्वास्थ्य सुधारण्यासाठी खूप मदत होईल. जर शांतता प्रस्थापित करताना मानसिक स्वास्थ्याचे निकष अंगिकारले तर काश्मीरच्या खोऱ्यात पुनर्वसन आणि स्थैर्य निर्माण करणे सोयीचे ठरेल.

(लेखक हे ओआरएफ मुंबई येथे रिसर्च इंटर्न आहेत.)

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.