Author : Oommen C. Kurian

Published on Jul 13, 2020 Commentaries 0 Hours ago

शहरी भागातील लोकसंख्येची घनता पाहता संसर्गजन्य रोगांचा धोका वाढतो. यामुळे जगभरातील शहरांमधील आरोग्यसेवा अधिक सक्षम करणे आता महत्वाचे झाले आहे.

पाच शहरांच्या कोरोना लढ्याची गोष्ट

देशात कोरोनाच्या एकूण रुग्णांपैकी दोन तृतीयांश रुग्ण हे महाराष्ट्र, तामिळनाडू, गुजरात आणि दिल्लीत आहेत. यासोबत एकूण पाच मृत्यूंपैकी चार मृत्यू या चार राज्यात झाले आहेत. कोरोना व्हायरसचा प्रसार हा शहरी भागात सर्वाधिक झाल्याचे अगदी सुरुवातीच्या टप्प्यापासून संपूर्ण जगभरात दिसून आले आहे. लोकसंख्येची घनता, सार्वजनिक सेवेवरील ताण, प्रवाशांचे मोठे प्रमाण आणि सोशल डिस्टंन्सिग राखण्याच्या मर्यादा या प्रमुख कारणांमुळे कोरोना रुग्ण वाढण्याचे प्रमाण, हे शहरी भागात सर्वाधिक आहे. यामुळे जगभरातील शहरांमध्ये अस्तित्वात असलेल्या आरोग्य सेवेला अधिक सक्षम करणे आता महत्वाचे झाले आहे.

लोकसंख्येचे वाढते प्रमाण आणि मुख्यत्वे शहरी भागातील लोकसंख्येची घनता पाहता, संसर्गजन्य रोगांचा धोका जास्त वाढतो. कोविड-१९ सारख्या रोगाची लागण होण्याचीही दाट शक्यता निर्माण होते. दिल्ली व्यतिरिक्त महाराष्ट्र, तामिळनाडू आणि गुजरात ही सर्वाधिक कोविड-१९ रुग्ण असलेली राज्ये देशातील सर्वाधिक शहरीकरण झालेली राज्ये आहेत. राजस्थान, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश यांसारख्या राज्यांमध्ये शहरीकरण कमी झालेले असले तरी, या राज्यांमधील जयपूर, इंदूर आणि एनसीआर या महत्वाच्या भागांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या अधिक आहे. तर दुसऱ्या बाजूला देशात शहरीकरण कमी असलेल्या भागांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या तुलनेने कमी असल्याचेही आढळून आले आहे. देशाच्या आर्थिक स्थैर्यावर विनाशकारी परिणाम केलेल्या या साथीच्या रोगाने शहरी आरोग्यावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.

देशातील पाच महत्वाच्या शहरांची स्थिती एप्रिलच्या मध्यापासून नेमकी कशी आहे याचा आढावा घेण्याचा प्रयत्न या लेखातून आपण करणार आहोत. कोरोना रुग्ण बाधितांची आकडेवारी नियमीतपणे जिल्हा पातळीवरुन उपलब्ध होत असल्याने, आपण तेच आकडे संबंधित शहरांसाठी वैध मानले आहेत. बेंगळुरुमध्ये सुरुवातीच्या टप्प्यात रुग्णांचे आकडे लक्षणीय पद्धतीने वाढले असले तरी, मुंबई, दिल्ली, अहमदाबाद आणि चेन्नईसोबतच बेंगळुरुचा देखील साथीच्या कार्यक्षम व्यवस्थापनाचा मापदंड ठरलेल्या शहरांमध्ये समावेश केला आहे. खरंतर मार्चच्या शेवटच्या आठवड्यात कर्नाटकचा सर्वाधिक रुग्णसंख्या असलेल्या पहिल्या तीन राज्यांमध्ये समावेश होता आणि यातील बहुतेक रुग्ण हे एकट्या बंगळुरूतील होते.

एप्रिलच्या मध्यापर्यंत म्हणजेच ‘लॉकडाऊन १’ संपेपर्यंत मुंबई, दिल्ली आणि चेन्नई ही तीन शहरे कोरोनाची हॉटस्पॉट झाली. तर ‘लॉकडाऊन-२’ च्या मध्यापर्यंत म्हणजेच एप्रिलच्या अखेरीस अहमदाबाद, जयपूर आणि इंदूरसारखी शहरे चेन्नईला मागे टाकून नवे हॉटस्पॉट शहरे झाली. ‘लॉकडाऊन-४’ मध्ये म्हणजेच मे महिन्याच्या अखेरीस अहमदाबाद शहराने कोरोना रुग्णांमध्ये चेन्नईला मागे टाकले होते.

पाच शहरांची कोविड-१९ रुग्णांची आकडेवारी…

मुंबई, दिल्ली, अहमदाबाद, चेन्नई आणि बंगळुरू (आलेख क्र. १)

Data available till 25 June. Source: https://www.orfonline.org/covid19-tracker/

पुढे, अहमदाबादमध्ये साथ प्रसाराच्या गतीमध्ये तुलनेने घट होताना दिसली. दिल्ली आणि चेन्नईच्या तुलनेत अहमदाबादमध्ये रुग्णसंख्या वाढीचे प्रमाण कमी झालेले दिसले. पण अहमदाबादमधील कोरोना चाचण्यांच्या प्रमाणात घट झाल्यानेही हे आकडे कमी झाल्याची शक्यता आहे. उपलब्ध माहितीनुसार, गुजरातमधील प्रत्येक १० लाख नागरिकांमागे फक्त ५,०८२ इतक्या कोरोना चाचण्या झाल्या आहेत. तर तामिळनाडूमध्ये हीच संख्या १० लाख नागरिकांमागे १३,३२९ इतकी जास्त आहे.

अहमदाबादमध्ये सुरुवातीपासूनच चेन्नईच्या तुलनेत मृत्यूंची संख्या सातत्याने जास्तच राहिली आहे (आलेख क्र. २), यामुळेच अहमदाबादमध्ये रुग्ण वाढीचे प्रमाण कमी होण्यावर शंका उपस्थित होते. विशेष म्हणजे, पहिल्या आलेखात अहमदाबादमधील रुग्णसंख्या चेन्नईपेक्षा कमी असल्याचे दिसत असताना मृत्यूच्या आकडेवारीच्या आलेख क्र. २ मध्ये मात्र जूनच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत अहमदाबादमध्ये चेन्नईपेक्षा जास्त मृत्यूची नोंद झाल्याचे दिसून येते.

पाच शहरांमधील कोविड-१९ मृत्यूंची आकडेवारी…

मुंबई, दिल्ली, अहमदाबाद, चेन्नई आणि बंगळुरू (आलेख क्र. २)

Data available till 25 June. Source: https://www.orfonline.org/covid19-tracker/

तामिळनाडूतील चाचणी क्षमतेचे (आलेख क्र. ३) खरंतर कौतुक करायला हवे. गेल्या काही आठवड्यांत चेन्नईत कोरोनाच्या नव्या रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे (आलेख क्र. १). पण, नव्या रुग्णांचा मोठ्या प्रमाणावर भार असतानाही मृत्यू दरावर नियंत्रण ठेवण्यात चेन्नईला यश आले आहे. त्यामुळेच मृत्यूदर कमी आणि रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण आपल्याला जास्त पाहायला मिळते. जवळपास सर्व रुग्णालायांमध्ये केंद्रीय सूचनांचे पालन आणि उपचाराचे, प्रोटोकॉलचे काटेकोरपणे पालन केले जात असल्यानेच उपचारांच्या निकालात सुधारणा झाली आहे.

तामिळनाडूत दिवसागणिक होणाऱ्या चाचण्या (आलेख क्र. ३)

Data available till 25 June. Source: https://www.covid19india.org/state/TN

मृत्यूचे प्रमाण कमी राखण्यात सक्षम असल्याचे बंगळुरू शहराने दाखवून दिले. पण चेन्नई शहरसुद्धा आंतरराष्ट्रीय प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात असतानाही विषाणू संक्रमणाला मर्यादित ठेवू शकले आहे. दोन्ही शहरांची लोकसंख्या जवळपास तुल्यबळ असतानाही बंगळुरुवर चेन्नईतील रुग्णांचा केवळ ४ टक्के इतकाच भार आहे. पॉझिटीव्ह रुग्णांना तातडीने क्वारंटाइन करणे आणि २३ तासांच्या आत कोरोना रुग्णांच्या संपर्कातील लोकांचा शोध घेण्यामुळेच हे साध्य होऊ शकले आहे. वेळेवर उचलल्या गेलेल्या पावलांमुळे बंगळुरूला प्रसाराचे प्रमाण कमी ठेवणे आणि त्याचे व्यवस्थापन ठेवता आले. इतर बऱ्याच शहरांनी रुग्णांची संख्या फुगल्यानंतर उपाययोजनांचे काटेकोरपणे पालन करण्यास सुरुवात केल्याने त्यांना असे करता आले नाही.

कोविड-१९ रुग्ण, चाचणीचे प्रमाण आणि पॉझिटीव्ह रुग्ण टक्केवारी (टेबल क्र. १)

बाधितांची संख्या एकूण चाचण्या पॉझिटीव्ह येण्याचा दर
महाराष्ट्र 1,47,741 8,73,570 16.91%
दिल्ली 73780 4,38,012 16.84%
गुजरात 29,578 3,45,278 8.57%
तामिळनाडू 70,977 10,08,974 7.03%
कर्नाटक 10,560 5,53,325 1.91%

Data available till 25 June. Source: https://www.orfonline.org/covid19-tracker/

दरम्यान, राष्ट्रीय पातळीवर कोरोनाचा प्रभाव नियंत्रित ठेवण्यासाठी ‘लॉकडाऊन’ हे एक निर्णायक रणनितीचे उदाहरण आहे. आंतरराष्ट्रीय प्रवाशांचा मोठ्या प्रमाणात धोका असणाऱ्या शहरांतील हालचालींवर नियंत्रण आणणे आवश्यक झाले आहे. मुंबई आणि दिल्लीने साथ रोगाच्या सुरुवातीच्या टप्प्यात आक्रमकपणे लॉकडाऊन करण्यास दिरंगाई केली. या दोन्ही ठिकाणी आता मृत्यू दर जास्त असून कोरोना व्हायरसच्या अनियंत्रित प्रसाराचे गंभीर परिणाम शहराला भोगावे लागत आहेत. कर्नाटक वगळता चार मोठ्या राज्यांमधील कोविड-१९ चाचणीचे अहवाल पॉझिटीव्ह येण्याची टक्केवारी जास्त असल्याचे टेबल क्र. १ मध्ये आपल्याला दिसून येते. तर कर्नाटकमध्ये त्यामानाने रुग्ण कमी असतानाही चाचणी आणि रुग्णांचे संपर्क शोधून काढण्याचे प्रमाण इतर राज्यांपेक्षा चांगले आहे.

अगदी मुंबईतसुद्धा सार्वजनिक आरोग्यविषयक केल्या गेलेल्या नव्या उपाययोजनांचे चांगले परिणाम दिसून आले आहेत. धारावीसारख्या लोकसंख्येची घनता जास्त असलेल्या ठिकाणी केल्या गेलेल्या उपाययोजना इतर शहरी भागांसाठी मोठा धडा आहेत. एकट्या धारावीमध्ये तब्बल ५ लाख ४८ हजार जणांचे स्क्रिनिंग करण्यात आले आणि नियमांचे अत्यंत कठोरपणे पालन करण्यावर भर देण्यात आला, यामुळेच येथील रुग्ण संख्येचा दैनंदिन आकडा एक अंकी आणण्यावर यश आले.

मृत्यू दराच्या अंतर्गत (सीएफआर) आपल्याला रुग्ण संख्या आणि मृत्यू अशी दोन्ही बाजूंच्या माहितीची पडताळणी करणे शक्य होते. त्यामुळे यातून समोर येणारे आकडे आपल्याला तुलनात्मक विश्लेषण करण्यासाठी उपयुक्त माहिती प्रदान करतात. टेबल क्र. २ मधून पाच शहरांमधील मृत्यू दराची माहिती आपल्याला मिळते. यात चेन्नईत मृत्यूदर सर्वात कमी असल्याचे दिसून येते. मोठ्या प्रमाणात चाचणी, रुग्ण शोधून काढण्यासाठीचे प्रयत्न आणि वेळेवर उपचार यामुळेच रुग्णांचे आयुष्य वाचते. बंगळुरूमध्ये मृत्यूंची संख्या कमी दिसत असली तरी मृत्यूदर मात्र वाढत आहे. बंगळुरूमध्ये झालेल्या ७८ मृत्यूंपैकी ६७ मृत्यू हे केवळ याच महिन्यात झाले आहेत. त्यामुळे ‘अनलॉक-१’ च्या टप्प्याच्या रणनीतीमध्ये बदल करणे आवश्यक आहे.

कोविड-१९ देशातील पाच शहरांमधील मृत्यूदर (टेबल क्र. २)

बाधित मृत्यू मृत्यूदर
मुंबई 70878 4062 5.73%
दिल्ली 73780 2429 3.29%
अहमदाबाद 19839 1390 7.01%
चेन्नई 47650 691 1.45%
बेंगळूरू 1791 78 4.36%
देशभरात 491179 15308 3.12%

*District data used. Data available till 25 June. Source: https://www.orfonline.org/covid19-tracker/

दुसऱ्या बाजूला दिल्लीतील परिस्थिती ही तयारीची कमतरता आणि अतिआत्मविश्वासाठीची ‘केस स्टडी’चं म्हणायला हवी. मे महिन्याच्या सुरुवातीच्या काळात दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊन हटवण्याची मागणी केंद्राकडे केली होती. कोविड-१९ च्या महामारीसाठी यंत्रणा सज्ज असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला होता. खरंतर, मे महिन्यात कोरोना रुग्ण आणि मृत्यूंच्या आकडेवारीत पहिल्या तीन राज्यांमध्ये देखील दिल्लीचा समावेश नव्हता. त्यामुळे दिल्लीत कोरोनाच्या रुग्णांमध्ये सध्या झालेली लक्षणीय वाढ अपेक्षितच नव्हती.

दिल्लीला सध्या झटका बसला असला तरी मृत्यूदर मात्र कमी राखण्यात प्रशासनाला यश आले आहे. दिल्लीने मृत्यूदर हा राष्ट्रीय सरासरीच्या तुलनेत कमी ठेवला आहे (टेबल क्र. २).  यासोबतच ‘एनसीआर’सारख्या जवळच्या शहाराने देखील दिल्लीतून होणाऱ्या प्रसारावर नियंत्रण ठेवले हे देखील प्रभावी आहे. दुसरीकडे महाराष्ट्रात मुंबईत सर्वाधिक रुग्णसंख्या असून त्याखालोखाल ठाणे आणि पुण्यातही रुग्णसंख्या वाढते आहे. आतापर्यंत दिल्लीत कोविड रुग्णांच्या संख्येत प्रचंड वाढ दिसत असली तरी एनसीआर भागात मात्र चांगले व्यवस्थापन पाहायला मिळत आहे.

मुंबई, दिल्ली, अहमदाबाद, चेन्नई आणि बंगळुरूमध्ये रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण… (आलेख क्र. ४)

Data available till 25 June. Source: https://www.orfonline.org/covid19-tracker/

अखेरीस आलेख क्र. ४ मधून आपल्याला देशातील पाच महत्वाच्या शहरांमधील कोविड रुग्णांचे बरे होण्याच्या प्रमाणाची तुलनात्मक माहिती मिळते. यात बंगळुरुत ८० टक्के रुग्ण हे अनलॉकच्या पहिल्या टप्प्यात म्हणजेच सध्याच्या जून महिन्यात आढळल्याने या शहराचा रोगमुक्ततेचा दर हा कमी दिसतो. शहरांतील परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर आणण्याची पावले उचलल्यानंतर रुग्णांच्या आकड्यात वाढ होत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे येत्या काही आठवड्यांमध्ये वेगवेगळ्या प्रदेशांवर रुग्ण बरे होण्याच्या दराचे दडपण देखील दिसून येईल.

कोविड-१९ अद्याप शहरी भागांमध्येच मोठ्या प्रमाणावर असूनही सध्याच्या आपत्कालीन परिस्थितीत रुग्ण संख्या, मृत्यू, चाचण्या आणि रुग्णालयातील सुविधांची मूलभूत माहिती मिळणे फार कठीण होत आहे. त्यामुळे चुकीच्या माहितीचा प्रसार होण्याचाही धोका वाढला आहे. पण संवेदनशील माध्यमे आणि राजकीय वातावरण यामुळे कदाचित यावर नियंत्रण मिळवण्यात हातभार लागत असेलही. तरीही चुकीच्या माहिती प्रसारावर तातडीने तोडगा काढण्याची गरज आहे. कोविड संदर्भातील सर्व माहिती दररोज पारदर्शक पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचली, तर चुकीचा अर्थ लावणे किंवा अनुमान लावण्यास वाव राहणार नाही.

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.