Author : Rajeev Jayadevan

Published on Apr 14, 2023 Commentaries 3 Days ago

कोविड-19 चा फैलाव आणखी रोखण्यासाठी एकाच प्रकारचे बूस्टर डोस देण्याचा निर्णय दीर्घकालीन उपाययोजनेच्या  दृष्टीने योग्य आहे का ?

कोविड 19 बूस्टर डोस : खरेच दीर्घकालीन उपाय योजना आहे का ?

बूस्टर डोस (वर्धक मात्रा) म्हणजे काय?

ज्या व्यक्तीने कोविडच्या लसीचे प्राथमिक टप्पे पूर्ण केले आहेत अशा व्यक्तीची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी दिल्या जाणाऱ्या लसीला बूस्टर डोस म्हणजे वर्धक मात्रा असं म्हणतात.

फ्लू आणि कोविड 19 

यासाठी इन्फ्लुएंझा म्हणजे फ्लू चं उदाहरण घेऊ. SARS CoV2 हा आजार एकाच विषाणूमुळे होतो तर इन्फ्लुएंझा म्हणजेच फ्लू वेगवेगळ्या प्रकारच्या विषाणूंमुळे होतो.  दरवर्षी फ्लू चा फैलाव होण्याच्या दिवसांत एक प्रकारची लस दिली जाते. इन्फ्लुएंझाला कारणीभूत ठरणाऱ्या चार विषाणूंचा धोका ओळखून ही लस तयार करण्यात आली आहे.   

इन्फ्लुएंझा विषाणूच्या रचनेत अचानक बदल होऊन त्यापासून आणखी वेगळ्या प्रकारचे विषाणू तयार होतात. पण SARS CoV2 या विषाणूचं वर्तन अजून तरी अशा प्रकारे आढळलेलं नाही. या विषाणूमध्ये एकाच प्रकारचा पॅटर्न नाही. त्यात हळूहळू बदल होताना दिसत आहेत. याला अँटिजेनिक ड्रिफ्ट असं म्हणतात.

 ओमायक्राॅन विषाणूमध्ये होणारे बदल 

संशोधकांच्या मते, ओमायक्राॅन विषाणूच्या बाबतीत अशा प्रकारचे बदल होताना दिसत आहेत. त्यामुळे इन्फ्लुएंझा विषाणूच्या रचनेत अचानक बदल होण्याचा पॅटर्न याही विषाणूमध्ये दिसू शकतो.  कोविड – 19 च्या विषाणूची बाधा एकदाच होते, असं या महामारीमध्ये सुरवातीला बऱ्याच जणांना वाटत होतं. त्यामुळे  एकदा लसीकरण झालं की पुन्हा कोविड होऊ शकत नाही, असाही अनेकांचा समज होता.  

पण जसजसा कोविडचा काळ वाढत गेला तसतसं हे स्पष्ट झालं की, याआधी विषाणूची बाधा होऊन गेलेल्या आणि लसीकरण पूर्ण झालेल्या व्यक्तींनाही कोरोनाची बाधा पुन्हा होऊ शकते.

दुसऱ्या शब्दांत सांगायचं तर, कोरोनाची बाधा झाल्यानंतर त्याच्याशी सामना करण्यासाठी आपली रोगप्रतिकारक क्षमता कमी पडली तर त्याची बाधा पुन्हा होऊ शकते. असं होण्यामागे तीन कारणं आहेत.

कोरानाची पुन्हा बाधा होण्याची 3 कारणं

हा विषाणू एकदा का माणसांच्या शरीरात शिरला की तो त्याच्या वाढीच्या अनेक शक्यता निर्माण करतो. आपल्या शरीरातल्या अँटिबाॅडीज म्हणजेच प्रतिपिंडं या विषाणूशी कशा प्रकारे लढू शकतात याचा अंदाज घेत हा विषाणू यातून सुटकेचे मार्ग शोधून काढतो. त्यानुसार या विषाणूच्या अॅमिनो अॅसिड रचनेमध्ये काही बदल घडून येतात आणि त्यामुळे या विषाणूला माणसाच्या शरीरात ठाण मांडणं शक्य होतं. यालाच आपल्या रोगप्रतिकारक क्षमतेतून विषाणूची सुटका असं म्हणतात. ओमायक्राॅन या विषाणूमध्ये ही क्षमता जास्त आहे, असं आढळून आलं आहे.

दुसरं म्हणजे, सध्या वापरात असलेल्या लसीच्या द्वारे या विषाणूचा प्रतिकार करण्यासाठीचं औषध शरीरात सोडता येतं. याचा प्रभाव बराच काळ टिकतो आणि त्यामुळे शरीराची रोगप्रतिकारक क्षमता वाढवता येते. या लसीमुळे एखादा अवयव निकामी होण्यापासून आपलं संरक्षण होतं.

पण त्याचवेळी हेही लक्षात घ्यायला हवं की, या लसीमुळे विषाणूला माणसाच्या शरीरात शिरण्यापासून प्रतिबंध करता येत नाही. ही सल घेतली आणि नाक आणि घशाद्वारे हा विषाणू शरीरात शिरण्याला अटकाव झाला असं होत नाही.  त्यामुळे विषाणूचा संसर्ग होऊच नये याची खबरदारी घ्यायलाच हवी. 

आपल्या शरीरातल्या अँटिबाॅडीज म्हणजेच प्रतिपिंडं प्रमाण दोन महिन्यांनी किंवा त्यापेक्षा जास्त काळानंतर खाली येतं. त्यामुळे या काळात पुन्हापुन्हा विषाणूची बाधा होण्याची शक्यता निर्माण होते. आपली रोगप्रतिकारक शक्तीही कमी होत जाते. पण लसीचा जादा डोस घेतला तर मात्र ही प्रक्रिया आपण रोखू शकतो. 

तिसरं आणि फारशी चर्चा न झालेलं कारण म्हणजे माणसांचं वर्तन. या विषाणूची बाधा होऊ नये म्हणून केल्या जाणाऱ्या उपाययोजनांचा माणसांना ठराविक काळानंतर कंटाळा येतो.

लसीकरणानंतरही कोरोनाची लाट

उदाहरणार्थ बंदिस्त जागांमध्ये मास्कशिवाय अनेक लोकांच्या संपर्कात आलं तर या विषाणूच्या फैलावाचा धोका वाढतो. जिथे खूप चांगल्या प्रकारे लसीकरण झालं आणि लसीचे जादा डोसही देण्यात आले तिथेही अशा समुदायांमध्ये विषाणूचा फैलाव होण्याच्या घटना घडलेल्या आहेत. 2022 च्या सुरुवातीला पश्चिम युरोपमध्ये पुन्हा एकदा कोरोनाची लाट आली होती हे आपण लक्षात घ्यायला हवं. म्हणूनच रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी लसीचे डोस पुन्हापुन्हा देण्याची गरज निर्माण झाली आहे. 

60 वर्षांच्या वरच्या वयोगटात COVID-19 मुळे मृत्यू होँण्याचं प्रमाण जास्त आहे. म्हणूनच या वयोगटातले लोक आणि रोगप्रतिकारकशक्ती कमी असलेल्या व्यक्तींना लसीद्वारे संरक्षण देण्याची गरज आहे. अर्थात, सगळ्याच लोकांना एकाच प्रकारचा बूस्टर डोस देणंही चुकीचं ठरेल.

बूस्टर डोसचा नेमका काय परिणाम होतो हे आपण MRNA लसीच्या उदाहरणावरून लक्षात घेऊ. ज्या व्यक्तींना MRNA लस देण्यात आली त्यांना पुढच्या काही महिन्यांत विषाणूची बाधा होण्याचं प्रमाण कमी होतं. या लसीमुळे या वयोगटातल्या लोकांचा विषाणूमुळे मृत्यू होण्याचं प्रमाणही खाली आलं.

  

या वयोगटाशिवाय ज्या व्यक्तींना कोरोनाची बाधा होण्याचा धोका जास्त आहे त्या गटातल्या लोकांनाही ही बाधा होण्याचं प्रमाण कमी झालं आणि त्यामुळे कोरोनाचा मृत्यूदरही खाली आला. तरुण आणि सशक्त व्यक्तींमध्ये कोरोनामुळे मृत्यू होण्याचा धोका कमी होता. त्याही लोकांना जादा संरक्षण देण्याच्या लसीमुळे आणखीनच फरक पडला आहे. कामाच्या ठिकाणी होणाऱ्या संसर्गाचा धोका किंवा या विषाणूची जास्त काळ होणारी बाधा योग्य त्या उपाययोजनांमुळे कमी झाली.  

बूस्टर डोसशिवाय आणखाही काही उपाययोजना आहेत. बंदिस्त जागी मास्कचा वापर किंवा हवा खेळती राहील अशी व्यवस्था केली तरीही संसर्ग कमी करता येईल. त्यासाठी कोणत्याही औषधाची गरज नाही.

बूस्टर डोसमुळे नेमकं काय होतं?

वाढीव लसीमुळे मिळणारं संरक्षण हे अनेक उद्दिष्टं साध्य करणारं असतं. आपण अँटिबाॅडीजबद्दल नेहमीच ऐकत असलो तरी आपल्या शरीराची रोगप्रतिक क्षमता नेमकी किती आणि कशी आहे हे जाणणं तितकं सोपं नाही.

 आपल्या शरीरात जास्त काळ काम करणाऱ्या आणि गटातल्या स्मरण पेशी असतात. शरीराला गरज असेल तर त्यांच्या संख्येत वाढ होते. आपल्या शरीरात अँटिबाॅडीज कमी प्रमाणात तयार झाल्या तरी या स्मरणपेशींमुळे आपल्या अंतर्गत अवयवांना असणारा धोका टाळता येतो. लसीचा वाढीव डोस दिला तर आपल्या शरीराची ही क्षमता वाढते का हे अजून तितकंसं स्पष्ट झालेलं नाही.

बूस्टर डोस दिल्यानंतर सुरुवातीचे काही महिने तरी अँटिबाॅडीजमध्ये तात्पुरती का होईना पण चांगली वाढ होते. त्यामुळे कोरोनाची संसर्ग होण्याचा धोका कमी होतो. अर्थात हा प्रभाव काही काळच टिकतो. त्यामुळे आणखी एक लस घ्यावी का याबद्दल संभ्रम आहे.  

mRNA लसीच्या तिसऱ्या डोसपेक्षा चौथ्या डोसमुळे मिळणारं संरक्षण हे दीर्घकालीन आहे, असं संशोधनात आढळून आलं आहे. पण मूळात काही महिन्यांच्या अंतराने आपण बूस्टर डोस घेत राहावे का हाही एक प्रश्नच आहे आणि याचं स्पष्ट उत्तर कुणाकडेच नाही.या विषयावर शास्त्रज्ञांमध्येच मतभेद आहेत. कमीत कमी प्रभावी डोस घ्यावेत अशा मताचे काही जण आहेत आणि काहींच्या मते, बूस्टर डोस घेण्याला कोणताही पर्याय नाही. 

बूस्टर डोस मध्ये सुधारणा कराव्या का?  

यातली सगळ्यात मोठी गुंतागुंत म्हणजे दर काही महिन्यांनी कोरोनाचे वेगवेगळे विषाणू उद्भवत आहेत आणि त्याबद्दल आधीच भाकित करणं कठीण आहे. पुढच्या विषाणूचा पॅटर्न मागच्या विषाणूसारखाच असेल याचा अंदाज लावता येत नाही. याउलट डेल्टा आणि ओमायक्राॅनसारख्या विषाणूंचा विचार केला तर त्यांचा जन्म रिमोट जीनोम ट्री’ मधून झाला आहे. एकदा हा नवा विषाणू उद्भवला की मग पुढच्या काही आठवड्यांमध्ये त्याचीच वेगवेगळी रूपं समोर येतात.  यामुळेच कोरोनाच्या एकाच प्रकारच्या विषाणूंवर आधारित लस बनवणं व्यवहार्य नाही.  

ओमायक्राॅनच्या रचनेवर मात करण्यासाठी म्हणून काढलेल्या लसींची तपासणी केली तर असं लक्षात येतं या लसी कोरोनाच्या वेगवेगळ्या विषाणूंचा प्रतिकार करतील अशा प्रकारे बनवल्या आहेत. त्यामुळे या लसी मूळच्या लसींपेक्षा फारशा प्रभावी नाहीत.

  

ज्याला कोरोनाची लस पहिल्यांदाच घ्यायची आहे त्याला यामुळे एक महत्त्वाचा प्रश्न पडतो. मूळची कोरोना प्रतिबंधक लस घ्यायची की दीर्घकालीन संरक्षण देणारा बूस्टर डोस घ्यायचा यामध्ये त्याचा गोंधळ होऊ शकतो. 

दुसरी गोष्ट म्हणजे, कोरोनाच्या एका विशिष्ट प्रकारच्या विषाणूवर मात करण्यासाठी एखादी लस बनवली तर तोपर्यंत दुसऱ्या प्रकारचा विषाणू तयार झालेला असतो. त्यातही ओमायक्राॅनच्या आधी तयार झालेल्या विषाणूंपेक्षा हे नव्याने तयार झालेले विषाणू आपल्या रोगप्रतिकारशक्तीवर मात करायला शिकले आहेत.याचा अर्थ, BA.1 या ओमायक्राॅनच्या विषाणूसाठी बनवलेली लस फक्त BA.1 याच विषाणूचा सामना करू शकेल. ती लस BA.4 किंवा  BA.5 या विषाणूंचा प्रतिकार करू शकणार नाही.

ही सगळी परिस्थिती पाहता, आता नाकातून किंवा तोंडावाटे घेता येणाऱ्या लसी, कोरोनाच्या सगळ्या विषाणूंवर प्रभावी ठरतील अशा लसी किंवा दोन दोन प्रकारच्या प्रतिपिंडांवर मात करतील अशा एकत्रित लसी तयार करण्यात येत आहेत. 

या लसी एकाच प्रकारच्या विषाणूला लक्ष्य न करता वेगवेगळ्या प्रकारती कामं करतील. हे कागदावर जरी सोपं वाटत असलं तरी प्रत्यक्षात त्यात बरीच आव्हानं आहेत. म्हणूनच या लसी वापरात आल्यानंतर त्या किती प्रभावी ठरतील हे आत्ताच सांगता येणार नाही आणि त्याचे परिणाम दिसून येण्यासाठी आपल्याला वाट पाहावी लागेल.

बूस्टर डोस म्हणजे बुलेटप्रूफ जॅकेट नव्हे

एकदा बूस्टर डोस घेतला की संसर्ग होण्यापासून पूर्ण संरक्षण होईलच असं नाही हे आपण या लेखात आधी पाहिलंच आहे. इटली आणि फरोहा बेटांवर झालेल्या विशेष संशोधनानुसार, आरोग्य सेवेमधल्या लोकांनी mRNA चा बूस्टर डोस घेतला होता पण ते जेव्हा लोकांमध्ये मिसळले तेव्हा त्यांना ओमायक्राॅन विषाणूची बाधा झाली. 

यावरून हेच सिद्ध होतं की, विषाणूची बाधा होईल अशा ठिकाणी गेलं तर बूस्टर डोसही तुम्हाला संसर्गापासून रोखू शकत नाही. त्यामुळेच हवेचा संपर्क येऊ न देणारे मास्क सारखे उपाय दूर सारून चालणार नाही. विषाणूचा संसर्ग होण्याचा धोका टाळण्यासाठी मास्कसारख्या उपाययोजना खूपच महत्त्वाच्या आहेत. 

भारतातली परिस्थिती 

भारताच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर, तिसरा डोस म्हणजेच बूस्टर डोस म्हणून वापरलेल्या दोन्ही लसी प्रभावी ठरल्या आहेत. कोव्हिशिल्ड या लसीचा तिसरा डोस हा mRNA लसीइतकाच प्रभावी आहे.त्याचप्रमाणे, कोवॅक्सिनचा तिसरा डोसही रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठी उपयोगी ठरला आहे. 

देशभरात नुकत्याच घेतलेल्या एका सर्वेक्षणानुसार, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत संसर्ग झालेल्यांचं प्रमाण पाहिलं तर या दोन्ही लसींच्या प्रभावामध्ये फारसा फरक नव्हता. म्हणजे कोवॅक्सिन घेणाऱ्यांना कोव्हिशिल्डच्या तुलनेत कमी- अधिक बाधा झाली, असं काहीच आढळून आलं नाही. त्याचबरोबर आता या दोन लसींचा एकत्रित डोस दिल्याने काय परिणाम होतात यावरचं संशोधन अजून प्रकाशित व्हायचं आहे. भारतामध्ये बूस्टर डोस म्हणून, Corbevax कोर्बेवॅक्स आणि Covovax कोव्होवॅक्स या दोन प्रोटीन सबयुनिट लसींचं उत्पादन झालं आहे पण त्याला अजून अधिकृत परवानगी मिळालेली नाही.

कोर्बेवॅक्स ही लस बूस्टर डोस म्हणून वापरली तर ती किती प्रभावी ठरेल याची संकलित माहिती उपलब्ध नाही. कोवोवॅक्स या लसीचं अमेरिकेमध्ये नोवाव्हॅक्स नावाने उत्पादन होतं. ही लस इंग्लंडमध्ये तिसरा डोस म्हणून वापरली तेव्हा यामुळे रोगप्रतिकारक क्षमता वाढते, असं आढळून आलं आहे.

कोरोना आणि ग्रामीण भारत 

भारतात बहुतांश लोकांना आतापर्यंत नैसर्गिकरित्या कोरोनाचा संसर्ग झाला आहे. काहींना तर एकापेक्षा अधिक वेळा झाला आहे. भारतातल्या काही भागांत तर ओमायक्राॅन येण्याआधीच 97 टक्के लोकांनी संसर्गाची पातळी गाठलेली होती.  

हा संसर्ग फारसा दिसून येणारा नव्हता. ग्रामीण भारतातल्या बऱ्याच लोकांच्या शरीरात प्रतिपिंडं आढळली पण नंतर मात्र यातल्या 25 टक्के लोकांमध्ये नेमकी काय लक्षणं होती तेही त्यांच्या स्मरणात नव्हतं.  भारतामध्ये कोरोनाच्या तीन लाटांचा सामना केल्यानंतर आणि प्रौढ व्यक्तींचं लसीकरण 87 टक्के एवढं झाल्यामुळे इथल्या लोकांमध्ये कोरोनाशी लढण्याइतकी रोगप्रतिकारक क्षमता तयार झाली आहे.

माणसाच्या शरीरात जेव्हा संसर्ग होतो तेव्हा त्याच्याशी लढण्यासाठीची प्रतिकारक्षमता तयार होते आणि ती आपल्या स्मरणपेशींमध्ये दीर्घकाळ राहते. प्रत्येक व्यक्तीमध्ये याचं प्रमाण कमीजास्त असेल पण त्या रोगाशी लढण्यासाठी आपलं शरीर तयार होतं. 

चांगलं लसीकरण झालेल्या समुदायांमध्ये ही रोगप्रतिकारक क्षमता कायम ठेवणं हा बूस्टर डोस देण्याचा मुख्य उद्देश आहे. पण या प्रक्रियेत अनेक घटकांचा विचार करावा लागत असल्याने सगळ्यांना देता येईल असा एकाच प्रकारचा बूस्टर डोस नेमका कोणता यावर एकमत होणं शक्य नाही. त्यामुळेच बूस्टर डोसच्या निर्णयप्रक्रियेत आत्ताच्या घडीला अनेक आव्हानं आहेत.

हे लेखकाचे वैयक्तिक विचार आहेत

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.