Published on Sep 10, 2023 Commentaries 0 Hours ago
पुस्तक चर्चा, युद्धविरहीत जग : लेखक – संदीप वासलेकर

‘युद्धविरहीत जग’ (ए वर्ल्ड विदाउट वॉर) या संदीप वासलेकर यांच्या पुस्तकात इतिहास आणि युद्धाचे राजकारण यांचा अभ्यास करण्यात आला असून शस्त्रास्त्रांच्या स्पर्धेला हद्दपार करून जागतिक शांतता व जागतिक प्रगतीचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी उपाययोजनाही सूचववण्यात आली आहे. हे पुस्तक युद्ध आणि शस्त्रास्त्रांची उत्पत्ती यांवर भाष्य करते, अण्वस्त्रांच्या धोक्यांची माहिती देते आणि राष्ट्रवाद व युद्ध यांच्यामधील दुवा दाखवून देते. वासलेकर यांनी आपल्या पुस्तकासंबंधात ‘ओआरएफ’चे सन्माननीय फेलो व्हाइस ॲडमिरल गिरीश लुथ्रा यांच्याशी चर्चा केली. या वेळी त्यांनी व्यापक शस्त्रास्त्र संघर्ष भडकवू शकणाऱ्या प्रज्वलनशील घटकांनी युक्त असलेल्या जगात आपल्या पुस्तकाची निर्मिती, संदर्भ आणि उद्देश यांसंदर्भाने संवाद साधला. ओआरएफकडून दि. १७ जानेवारी २०२३ रोजी मुंबई येथे आयोजिलेल्या पुस्तकावरील चर्चेमध्ये महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह ८० पेक्षाही अधिक लोकांनी सहभाग नोंदवला. विशेषतः आंतरराष्ट्रीय संबंध आणि धोरणात्मक अभ्यास करणाऱ्या अभ्यासकांना या चर्चेविषयी अधिक उत्सुकता होती.

युद्धाची निरर्थकता या विषयासंबंधाने चर्चा करताना वासलेकर म्हणाले, आपण युद्धामध्ये सहेतूक अथवा निर्हेतूक कोणत्याही पद्धतीने सहभागी झालो, तरी युद्धामुळे झालेल्या विनाशाचे साक्षीदार होण्यास आपल्याला केवळ काही मिनिटांचाच अवधी लागतो. सायबर, जैवतंत्रज्ञान आणि अणुउर्जा या क्षेत्रातील तंत्रज्ञानविषयक प्रगतीचा मानवजातीला लाभच झाला आहे; परंतु त्याचा हिंसाचार आणि अनागोंदीसाठी गैरवापरही झाला आहे. त्याचा परिणाम म्हणजे, जागतिक विनाशापासून मानवता केवळ पाऊलभर लांब आहे, असे वासलेकर म्हणाले.

जगातील प्रमुख लष्करी सत्तांनी केवळ राष्ट्रवादी भावनेतून आपल्या संरक्षण खर्चात वाढ केली आहे, या मुद्द्यावर वासलेकर यांनी भर दिला. मात्र शस्त्रास्त्रांची निर्मिती करणाऱ्या आणि शस्त्रास्त्रे बाळगणाऱ्या देशांवर कधीही आक्रमण होत नाही. जे देश शस्त्रास्त्रांची निर्मिती करीत नाहीत त्यांच्यावर मात्र सातत्याने हल्ले होत असतात आणि त्यामुळे असमतोल निर्माण होतो, याकडे लक्ष वेधून हाच असमतोल आजच्या प्रातिनिधिक व वांशिक युद्धांच्या केंद्रस्थानी आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

अण्वस्त्रांना प्रतिबंध केल्याने हिरोशिमा आणि नागासाकी नंतर आणखी एक आण्विक शोकांतिका टळली. या सर्वसाधारण समजाला छेद देत आण्विक प्रतिबंध गृहितक हे ‘खोटे आहे,’ असे वासलेकर म्हणाले. जगाने केवळ योगायोगाने आणखी आण्विक आपत्ती टाळली आहे आणि ‘शस्त्रनिर्मितीची स्पर्धा अजूनही सुरू आहे व ती वाढतच आहे,’ त्यामुळे ‘मानवतेला अद्यापही आण्विक शोकांतिकेचा धोका आहे,’ असे वासलेकर म्हणाले. लष्करी औद्योगिक संकुलांचा सरकारच्या धोरणावर आणि खर्चावर लक्षणीयरीत्या परिणाम होतो, हा मुद्दा त्यांनी अधोरेखित केला. तातडीचे लष्करी धोके नसतानाही संरक्षण क्षेत्रातील कंपन्या सतत किंवा वाढीव लष्करी खर्चासाठी लॉबिंग करीत आहेत. आर्थिक वाढ आणि रोजगारासंबंधाने लष्करी औद्योगिक संकुलांना चालना मिळू शकते. मात्र जागतिक शांततेवर त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात.

सायबर, जैवतंत्रज्ञान आणि अणुउर्जा या क्षेत्रातील तंत्रज्ञानविषयक प्रगतीचा मानवजातीला लाभच झाला आहे; परंतु त्याचा हिंसाचार आणि अनागोंदीसाठी गैरवापरही झाला आहे.

देशादेशांमध्ये वाढणारे मतभेद आणि आंतरराष्ट्रीय सुरक्षा आव्हानांना तोंड देण्यास संयुक्त राष्ट्रांची असमर्थता यांमुळे ही परिस्थिती आणखी चिघळत आहे. त्यामुळेच या संयुक्त राष्ट्र पद्धतीत बदल करण्याची वेळ आहे. जागतिक व्यवस्था प्रतिबिंबित करणारी ही पद्धती आता इतिहासजमा झाली आहे. संयुक्त राष्ट्रसंघ हा आता सुधारणावादी राहिलेला नाही आणि नवनव्या आव्हानांना तोंड देणाऱ्या देशांना कोणती मदतही करणारा राहिलेला नाही. कोव्हिड-१९ साथरोगाच्या काळात त्याचा निरुपयोगीपणाही दिसून आला आहे, असे मत वासलेकर यांनी व्यक्त केले. शाश्वत विकास उद्दिष्टे, वित्त आणि अर्थकारणात ही आंतरराष्ट्रीय संस्था आपली कार्यक्षमता सिद्ध करू शकली असती; परंतु संयुक्त राष्ट्रांच्या सनदेनुसार हे पहिले उद्दिष्ट असूनही शांतता आणि सुरक्षा निर्माण करण्यास ही संस्था उणी पडली आहे, असे मतही त्यांनी व्यक्त केले.

युद्ध हा आर्थिक स्पर्धेचा परिणाम असू शकत नाही, तर ती एक निवड असते आणि प्रत्येकाने शांतता हाच पर्याय निवडायला हवा, असे वासलेकर म्हणतात. मात्र चांगली गोष्ट अशी, की याबद्दल जाणीव निर्माण झाली आहे आणि विद्वज्जनांनी शांततेच्या मार्गावरील उपाययोजना सुचवली आहे. मानवतेने नेहमीच युद्धासाठी लवचिकता दर्शवली आहे आणि जागतिक सामाजिक करारांतर्गत लोकसहभाग असलेल्या जागतिक प्रशासनात नागरी प्रतिसादाची आवश्यकता आहे. १९८० च्या दशकात अमेरिकेमध्ये रँडल फोर्सबर्ग या एका नागरिकाने सुरू केलेल्या ‘न्युक्लिअर फ्रीझ’ या मोहिमेचे उदाहरण देत ‘सामान्य लोकच जगात खरा बदल घडवून आणू शकतात,’ असे ते म्हणाले. रँडलच्या मोहिमेने अखेरीस अमेरिका आणि तत्कालीन सोव्हिएत संघराज्य यांच्यात अण्वस्त्रांची चाचणी, उत्पादन आणि सैन्याची तैनात रोखण्यासाठी करार करण्याचा मार्ग मोकळा केला. त्याचप्रमाणे, मानवविरोधी ‘अँटीपर्सोनेल माइन्स’वर बंदी घालण्यात जोडी विल्यम्सचे प्रयत्न अत्यंत महत्त्वपूर्ण ठरले. या कार्यासाठी तिला १९९७ मध्ये नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

वासलेकर यांनी प्रश्नोत्तरांच्या सत्रात युद्ध कसे टाळता येईल, या विषयावर आपले विचार मांडले. सर्व देश आणि परस्पर संमतीने करार करण्याचा निर्णय घेण्यात आला, तरच देश शस्त्रास्त्रांचा त्याग करण्यास तयार होतील, असे ते म्हणाले. राजकीय नेते आपल्या निर्णयक्षमतेमुळे शांततेच्या मार्गाने देशाला नेऊ शकतील. दहशतवाद आणि दारिद्र्य यांमुळे दक्षिण आफ्रिकेवर मोठा परिणाम झाल्याचे उदाहरण त्यांनी दिले. मात्र या क्षेत्रातील देशांनी आपले सार्वभौमत्व या भागात वाहणाऱ्या केवळ एका नदीसाठी समर्पित करण्याचा निर्णय एकमताने घेतला. नदीच्या आसपासच्या देशांनी परस्पर सहमतीशिवाय धरण बांधू नये किंवा पाटबंधारे प्रकल्प राबवू नये, असा करार करण्यात आला, असे त्यांनी स्पष्ट केले.

युद्ध संपणे ही अशक्य गोष्ट आहे, कारण तो मानवी समाजाचा आणि समाजाच्या अस्तित्वाचा एक भाग आहे, असे व्हाइस ॲडमिरल गिरीश लुथ्रा म्हणाले. मात्र जागतिक शांततेच्या स्थैर्याची इच्छा असलेल्या समाजाकडून त्यावर मात केली जाऊ शकते, अशी आशाही लुथ्रा यांनी व्यक्त केली.

(हा कार्यक्रम अहवाल ओआरएफचे उपाध्यक्ष धवल देसाई आणि रिसर्च इंटर्न नुतीका काळे यांनी संकलित केला आहे.)

हे लेखकाचे वैयक्तिक विचार आहेत

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.