एकेकाळी सॉफ्ट पॉवर म्हणून ओळख असलेली आणि आंतरराष्ट्रीय सहकार्याचा आधारस्तंभ बनलेली जागतिक आरोग्य मुत्सद्देगिरी एका वळणावर उभी आहे. जागतिक आरोग्य संघटनेतून अमेरिकेने माघार घेण्यासारख्या घडामोडींमुळे यात नवी आव्हानं निर्माण झाली आहेत. या लेखात लक्ष्मी रामकृष्णन यांनी भू-राजकीय तणाव आणि जैविक संकटांच्या या काळात जागतिक आरोग्य मुत्सद्देगिरी का अपरिहार्य आहे हे मांडले आहे. त्याचबरोबर चीन आणि भारत यासारख्या वाढत्या शक्ती या परिस्थितीला कसा आकार देऊ शकतात याचाही शोध घेतला आहे.
Image Source: Getty
ऐतिहासिकदृष्ट्या अमेरिका हा जागतिक आरोग्य प्रयत्नांना आणि तांत्रिक आरोग्य साह्याला सर्वात मोठा निधी देणारा देश होता. अमेरिकेने इतर देशांसोबत आणि आंतरराष्ट्रीय संस्थांसोबत भागीदारी केली आहे आणि व्यापक संशोधनही केले आहे. परंतु राष्ट्राध्यक्ष ट्रम्प हे व्हाईट हाऊसमध्ये पुन्हा सत्तेत आल्यानंतर अभूतपूर्व गोंधळाला सुरुवात झाली.
ट्रम्प प्रशासनाने कोविड 19 च्या उत्पत्तीबाबत पारदर्शकतेचा अभाव असल्याचा आरोप केला. त्यानंतर त्यांनी जागतिक आरोग्य संघटनेतून औपचारिकपणे बाहेर पडण्यासाठी पावले उचलली. ट्रम्प यांनी विकास निधीची एक प्रमुख भागीदार असलेली युनायटेड स्टेट्स एजन्सी फॉर इंटरनॅशनल एड ही संस्था बरखास्त केली. या संस्थेचे अनेक करार अमेरिकन हितांशी विसंगत असल्याची चिंताही त्यांनी व्यक्त केली.
सध्याच्या अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणात जागतिक आरोग्य हा महत्त्वाचा विचार नसेलही. जागतिक आरोग्य मुत्सद्देगिरी ही एक शक्तिशाली साधन आहे. त्याकडे सॉफ्ट पॉवर म्हणूनही पाहिले जाते. तरीही ट्रम्प प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले आहे. व्हिएतनाम युद्धादरम्यान अमेरिकेच्या नेतृत्वाखालील वैद्यकीय नागरी कृती कार्यक्रम आणि 1960 च्या दशकात आफ्रिका आणि लॅटिन अमेरिकेत चीन आणि क्युबाची वैद्यकीय मुत्सद्देगिरी असे उपक्रम पूर्वी राबवण्यात आले होते.
अलिकडेच संयुक्त राष्ट्रांनी त्यांच्या शाश्वत विकास उद्दिष्टांमध्ये आरोग्याचा समावेश केला आहे. G7 आणि G20 मध्येही आरोग्याची चांगली स्थिती जागतिक धोरणावर कसा प्रभाव पाडते हेच दिसले आहे. जागतिक सार्वजनिक हित म्हणून आरोग्याच्या उपक्रमांना प्राधान्य देण्यामागे एक नैतिक युक्तिवाद आहे. परंतु जागतिक आरोग्य मुत्सद्देगिरीचे इतरही फायदे आहेत. यामध्ये राष्ट्रीय हितसंबंध आणि परराष्ट्र धोरण उद्दिष्टांचा प्रचार करणे आणि देशाचा आंतरराष्ट्रीय दर्जा वाढवणे यांचा समावेश आहे.
जगभरात आरोग्याच्या क्षेत्रात अनेक आव्हाने निर्माण झाली आहेत. अनेक देशांना नवे संसर्गजन्य रोग, जैविक दहशतवाद आणि अपघाती जैविक घटनांना तोंड द्यावे लागते आहे. अशा आव्हानांचा सामना करण्यासाठी बहुपक्षीय संघटनांच्या नेतृत्वाखाली अनेक भागधारकांचा समावेश असलेल्या एकत्रित जागतिक कृतीची आवश्यकता आहे.
कोविड- 19 महामारीने जागतिक सार्वजनिक हितासाठी आरोग्य धोरणे पुढे नेण्यासाठी समन्वयित आंतरराष्ट्रीय प्रयत्नांची आवश्यकता आहे हे अधोरेखित केले. ऑक्सफर्ड विद्यापीठ, अॅस्ट्राझेनेका आणि सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया यांच्या सहकार्याने कोविशिल्ड लस तयार करण्यात आली होती हे त्याचे चांगले उदाहरण आहे.
COVAX ही WHO, UNICEF आणि कोअलिशन फॉर एपिडेमिक प्रिपेयर्डनेस इनोव्हेशन्स यांच्यातील एक नवीन भागीदारी होती. या भागीदारीमुळे जागतिक स्तरावर लसीकरणाच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी परवाना आणि तंत्रज्ञान हस्तांतरण कराराच्या अंतर्गत कोविड- 19 लसींचे वितरण करणे शक्य झाले. जागतिक आरोग्य सुरक्षेसाठी देशांच्या सीमा ओलांडून जैविक माहितीची देवाणघेवाण महत्त्वाची आहे. तसेच वैद्यकीय संशोधन आणि विकासात नव्या उपक्रमांना प्रोत्साहन दिले पाहिजे.
अशी उल्लेखनीय भागीदारी असूनही भू-राजकीय स्पर्धा, लसींबद्दलचा राष्ट्रवाद आणि वैद्यकीय पुरवठ्याचा साठा यामुळे जागतिक साथीच्या व्यवस्थापनाला धक्का बसला. या संकटामुळे जागतिक आरोग्य संघटनेवरचा जनतेचा विश्वास कमी झाला. यामुळे त्याची सॉफ्ट पॉवरही कमकुवत झाली. कोविड- 19 ला आंतरराष्ट्रीय स्तरावरची सार्वजनिक आरोग्य आणीबाणी (PHEIC) घोषित करण्यात उशीर विलंब झाला आणि साथीच्या आजाराच्या उत्पत्तीबद्दल अनिश्चितता निर्माण झाली. यामुळे WHO मध्ये पारदर्शकता आणि वाढीव जबाबदारीची आणि तसेच या संघटनेच्या संरचनात्मक सुधारणांची तातडीची गरज दर्शवते.
जागतिक आरोग्य संघटनेचे अनेक सदस्य देश याबद्दलची मागणी करत आहेत. अलिकडेच अमेरिकेसारख्या देशाने अशा प्रकारची आरोग्य आणीबाणी जाहीर करणे, वित्तपुरवठ्याची जबाबदारी घेणे आणि जागतिक आरोग्य कर्मचाऱ्यांचे संरक्षण करणे यासाठी उपाययोजना करण्याबद्दल स्पष्ट मार्गदर्शक तत्त्वांची मागणी केली आहे.
साथीच्या आजाराच्या करारावरील वाटाघाटींमुळे यातील काही चिंता कमी झाल्या. अमेरिकेची अनुपस्थिती असूनही गेल्या महिन्यात महामारी करार स्वीकारण्यात आला. तरीही अजून स्पष्टतेची गरज आहे. उदाहरणार्थ पॅथोजेन ॲक्सेस बेनिफिट शेअरिंग (PABS) यंत्रणेच्या वाटाघाटी अद्याप झालेल्या नाहीत. तसेच कोणताही प्रभावी करार अंमलात आणण्यासाठी वर्षानुवर्षे लागतील आणि त्या काळात दुसरी साथ येण्याचा धोका आहे.
बदलत्या भू-राजकीय परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी जागतिक आरोग्य कूटनीती महत्त्वाची आहे. अमेरिकेने WHO मधून माघार घेणे, USAID ची मोडतोड करणे आणि GAVI या लसीकरण आघाडीला अमेरिकेने प्रस्तावित केलेल्या निधी कपातीचे परिणाम यामुळे तातडीने बदल घडवून आणण्याची आवश्यकता आहे. अनेक स्तरांवरचे लष्करी संघर्ष आणि अमेरिका, चीन, रशिया, जर्मनी आणि भारत यांच्या वाढत्या लष्करी खर्चामुळे जागतिक आरोग्य निधीत घट झाली आहे. तांत्रिक साह्य आणि अमेरिकेसोबत डेटा-शेअरिंगशिवाय जागतिक आरोग्य सुरक्षा खूपच कमकुवत राहते.
जागतिक स्तरावर आपले स्थान उंचावण्यासाठी चीन आणि भारत आफ्रिका, लॅटिन अमेरिका आणि दक्षिण आशियातील आरोग्य उपक्रमांवर प्रभाव पाडत आहेत. विशेषतः भारत संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत कायमस्वरूपी स्थान मिळविण्यासाठी उत्सुक आहे.
भारत हा लस उत्पादक देश आहे. इथे जैवतंत्रज्ञान आणि औषध उद्योग मोठ्या प्रमाणात कार्यरत आहे. जागतिक आरोग्य क्षेत्रात आपला आवाज उठवण्याची एक उल्लेखनीय संधी आता भारताकडे आली आहे. चीनने पुढील पाच वर्षांत WHO ला अतिरिक्त 500 अमेरिकी डाॅलर्स देण्याचे वचन दिले आहे. तथापि अशा बहुपक्षीय मंचांअंतर्गत इतर देश चीनशी कसे संवाद साधू शकतील याबद्दल चिंता कायम आहे.
जागतिक आरोग्य क्षेत्रात मोठे बदल होत आहेत. त्याचबरोबर जैविक संकटांचे धोकेही वाढत चालले आहेत. अमेरिकेच्या आरोग्यविषयक उपक्रमांमधून बाहेर पडण्यामुळे एक पोकळी निर्माण झाली आहे. यातूनच जागतिक आरोग्य क्षेत्राची पुनर्रचना करण्याची तीव्र गरज असल्याचे संकेत मिळतात. भारत आणि चीन या आव्हानांना तोंड देण्यासाठी सज्ज आहेत. परंतु असे करण्यापूर्वी या दोन्ही देशांनी जागतिक आरोग्य प्रशासनात अडथळा आणणाऱ्या समस्या सोडवणे अत्यंत आवश्यक आहे.
हा लेख ‘द लूप’मध्ये प्रकाशित झाला आहे.
The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.
Lakshmy is an Associate Fellow with ORF’s Centre for New Economic Diplomacy. Her work focuses on the intersection of biotechnology, health, and international relations, with a ...
Read More +