Expert Speak Raisina Debates
Published on Jul 15, 2025 Updated 0 Hours ago

जागतिक राजकारणात अनिश्चितता वाढताना, बहुपक्षीय सहकार्याची उणीव आणि राष्ट्रं व त्यांच्या समाजांमधील दुरावा अधिक गडद होत असताना, कूटनीतीचं स्वरूपही झपाट्यानं बदलत आहे.

विश्वासातून जवळीक: भारताची शेजारी राष्ट्रांशी संवेदनशील डिप्लोमसी

जागतिक राजकारणात अनिश्चितता वाढताना, बहुपक्षीय सहकार्याची उणीव आणि राष्ट्रं व त्यांच्या समाजांमधील दुरावा अधिक गडद होत असताना, कूटनीतीचं स्वरूपही झपाट्यानं बदलत आहे. केवळ औपचारिक चर्चांवर आणि सामरिक गणितांवर आधारित पारंपरिक कूटनीती आता अपुरी ठरत आहे; त्याऐवजी माणसांना केंद्रस्थानी ठेवणारी, भावना आणि सहवेदनेवर आधारित संवादाला प्राधान्य देणारी एक नवविचारी कूटनीती उदयास येत आहे. ‘अ‍ॅफेक्टिव्ह डिप्लोमसी’ म्हणजेच भावनांवर आधारित कूटनीती ही संकल्पना राज्यांमधील संबंध नव्यानं परिभाषित करते. ती फक्त धोरणं आणि करारांपुरती मर्यादित नसून, भावनिक संकेत, सामूहिक ओळखीचं भान आणि सहवेदनेलाही तितकंच महत्त्व देते. युद्धानंतरची माफी, दु:खद प्रसंगांवरील सहवेदना किंवा सांस्कृतिक सहानुभूती अशा भावनिक अभिव्यक्तींमुळे राष्ट्रांच्या आंतरराष्ट्रीय वर्तणुकीला नवा आयाम मिळतो, विश्वास पुन्हा जागवला जातो आणि राजकीय वैधतेची व्याख्या देखील बदलते. डिजिटल युगात या भावनिक संकेतांचा प्रसार विलक्षण वेगानं होतो, जो केवळ जनमतावर प्रभाव टाकत नाही, तर राष्ट्रीय प्रतिमा घडवतो आणि प्रादेशिक नातेसंबंधांवरही दूरगामी परिणाम करतो. त्यामुळेच, आधुनिक कूटनीतीत ‘भावना’ ही आता परिघावरची बाब न राहता, राजकीय संवादाचं आणि कृतीचं मध्यवर्ती केंद्रबिंदू बनत आहे.

भावनात्मक कूटनीती (Affective Diplomacy) राष्ट्रांमधील संबंधांची व्याख्या नव्यानं करते. जी केवळ स्वार्थ, धोरणं आणि करारांवर आधारित नसून, भावना आणि सामूहिक ओळखीच्या जाणिवेला केंद्रस्थानी ठेवते.

एक शिल्पकार आणि हितधारक अशा दोन्ही भूमिकांमध्ये भारत आज या बदलत्या कूटनीतीच्या परिपाठात केंद्रस्थानी आहे. शेजारी देशांमध्ये दीर्घकाळापासून सौम्य सामर्थ्यावर (soft power) आधारित कूटनीतीचा वापर करणारा भारत आता ‘Act East’ धोरणाच्या माध्यमातून भावनिक आधारावर आधारित (affective logics) नात्यांना प्राधान्य देत आहे. ASEAN, BIMSTEC आणि मेकोंग–गंगा सहकार्य (MGC) यांसारख्या बहुपक्षीय मंचांवर भारत केवळ सहकार्याची मागणी करत नाही, तर जास्त खोल, विश्वासपूर्ण आणि आठवणींवर आधारित संबंध निर्माण करण्याचा प्रयत्न करतो. जो सहसा सूक्ष्म असतो, पण अधिकाधिक रणनीतिक बनत चालला आहे. या प्रक्रियेतून भारत भावनिक कूटनीती घडवणारा आणि त्यातून विश्वास, ओळख आणि दृश्यमानता मिळवणारा असा दुहेरी फायदा घेणारा देश ठरत आहे.

आशियाई भावबंध — ASEAN, BIMSTEC आणि MGC मधील भावनात्मक संबंधांची उभारणी

ASEAN (दक्षिण-पूर्व आशियाई राष्ट्रांचा संघ) ने लोक-ते-लोक संपर्काला (people-to-people connectivity) प्रादेशिक एकात्मतेचा मूलभूत पाया मानलं आहे. ASEAN कनेक्टिव्हिटी मास्टर प्लॅन 2025 अंतर्गत शैक्षणिक आणि सांस्कृतिक समज वाढवणं ही दोन प्रमुख उद्दिष्टं मानली गेली आहेत. यासाठी ASEAN करिक्युलम सोर्सबुक (2012) आणि ASEAN व्हर्च्युअल लर्निंग रिसोर्स सेंटर (2015) यांसारख्या उपक्रमांद्वारे प्रादेशिक जाणीवा, शैक्षणिक देवाणघेवाण आणि भावनिक सलोखा वाढवण्याचा प्रयत्न केला जात आहे. पर्यटनालाही येथे केवळ आर्थिक साधन म्हणून पाहिलं जात नाही, तर वारसास्थळांवरील पर्यटन, समुदाय आधारित इको-पर्यटन, आणि होमस्टे नेटवर्क्सच्या माध्यमातून प्रादेशिक एकात्मतेचं प्रभावी माध्यम मानलं जातं. 1997 मध्ये स्थापन झालेली ASEAN फाऊंडेशन ही संस्था कला, शिक्षण, माध्यम, आणि युवक विकासासाठी विविध उपक्रम राबवते, जे भावनिक पातळीवर राष्ट्रांमध्ये संवाद साधण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरतात. अलीकडील ASEAN परिषदांमध्ये हे कार्यक्रम साइडलाइन्सवर मर्यादित न राहता, नीतीनिर्मात्यांशी थेट संवाद घडवून आणणाऱ्या ASEAN यूथ डायलॉग्स उदा. 2022 मध्ये कंबोडियात व 2023 मध्ये जकार्तामध्ये यशस्वीरित्या पार पडले. ASEAN यूथ ऑर्गनायझेशनसारख्या सिव्हिल सोसायटी नेटवर्क्सनी ASEAN यूथ एक्स्चेंजसारख्या मंचांद्वारे सांस्कृतिक सुसंवाद आणि व्यावसायिक कौशल्यविकासाला चालना दिली असून, प्रादेशिक भावनिक बंध मजबूत करण्याच्या दृष्टीने हा एक महत्त्वाचा टप्पा ठरतो आहे. ASEAN मधील या विविध उपक्रमांमुळे भावनिक संवाद, सामायिक ओळख आणि सहकार्य यावर आधारित एक प्रादेशिक आत्मभान आकार घेत आहे. या सकारात्मक प्रवाहाला गती देताना भारतानेही ASEAN मध्ये आपली सांस्कृतिक उपस्थिती अधिक ठळक आणि जाणीवपूर्वक साकारली आहे. 29 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर 2024 या कालावधीत नवी दिल्लीत आयोजित करण्यात आलेला 2024 ASEAN-India संगीत महोत्सव हा भारताचा एक महत्त्वपूर्ण सांस्कृतिक प्रयत्न ठरला. या महोत्सवातून संगीत आणि सामायिक कलांच्या माध्यमातून प्रादेशिक ऐक्याचं प्रभावी दर्शन घडवण्यात आलं. याशिवाय, भारताने ASEAN डिजिटल मास्टरप्लॅन 2025 ला ठोस पाठिंबा दिला असून, काँबोडिया, लाओस, म्यानमार आणि व्हिएतनाम (CLMV) या देशांमध्ये माहिती आणि संप्रेषण तंत्रज्ञान (ICT) प्रशिक्षण केंद्रांची उभारणी करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. या उपक्रमातून केवळ तांत्रिक सहकार्यच नव्हे, तर दीर्घकालीन भावनिक आणि ज्ञानाधिष्ठित भागीदारीचा पायाही अधिक बळकट झाला आहे.

भारताने ASEAN मधील आपली सांस्कृतिक उपस्थिती आणखी बळकट केली आहे. याचा ताजाताजा दाखला म्हणजे 2024 ASEAN-India संगीत महोत्सव, जो 29 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर 2024 दरम्यान नवी दिल्ली येथे पार पडला. या महोत्सवात संगीत आणि सामायिक कलांमधून ऐक्य साजरं करण्यात आलं, जे केवळ कलात्मकतेचं नव्हे तर प्रादेशिक भावनिक ऐक्याचंही प्रतीक ठरलं.

BIMSTEC नेही जनसामान्यांमधील परस्पर संबंध प्रादेशिक सहकार्याचा मूलभूत भाग मानला आहे. 2018 च्या काठमांडू घोषणापत्रात, थिंक टँक, शिक्षण संस्था, माध्यमं आणि सांस्कृतिक संस्थांमधील सशक्त संबंध प्रस्थापित करण्यावर भर देण्यात आला. या उद्दिष्टांना पूरक ठरतील असे बौद्ध तीर्थक्षेत्रांचे परिपथ (pilgrimage circuits), सांस्कृतिक महोत्सव, तसेच पर्यटनसुलभ उपाययोजना हाती घेण्यात आल्या. जसे की प्रवासासाठी सुरक्षितता, चांगली कनेक्टिव्हिटी आणि खास थीमआधारित पर्यटन मार्गांची आखणी. या संकल्पनांना BIMSTEC ची Track-II डिप्लोमसी बळ देत आहे. विशेषतः BIMSTEC Network of Policy Think Tanks (BNPTT) च्या सातव्या आवृत्तीच्या परिषदेत मे 2025 मध्ये काठमांडूत आयोजित ‘पर्यटन, संस्कृती आणि जनसंपर्क’ या विषयावर सखोल चर्चा झाली. लोककेंद्रित दृष्टिकोन अधिक बळकट करत, भारताने फेब्रुवारी 2025 मध्ये पहिल्या BIMSTEC युवा संमेलनाचं आयोजन केलं. ‘BIMSTEC अंतर्गत परस्पर देवाणघेवाणीचा पूल’ या संकल्पनेवर आधारित या संमेलनात संसदसदस्य, मंत्री, कलाकार, उद्योजक अशा 70 हून अधिक प्रतिनिधींनी सहभाग घेतला. हे उपक्रम सांस्कृतिक आणि सामाजिक अनुभवांकडे कूटनीतिक साधन म्हणून पाहण्याची वाढती संस्थात्मक जाण अधोरेखित करतात.
भारताने ‘BODHI’ ही योजना सुरू केली असून, दरवर्षी 300 युवांना प्रशिक्षण देण्याचं लक्ष्य आहे. याशिवाय सांस्कृतिक आणि क्रीडा देवाणघेवाण वाढवणे, नालंदा विद्यापीठासारख्या संस्थांद्वारे शैक्षणिक संबंध बळकट करणे यावरही भर देण्यात आला आहे. याशिवाय, भूकंपग्रस्त म्यानमारला दिलेली मदत आणि BIMSTEC आपत्ती व्यवस्थापन केंद्रासाठी भारताने मांडलेला प्रस्ताव, मानवतावादी ऐक्य आणि सामायिक आशावाद अधोरेखित करतात.

भारताने या सहवेदनाशील प्रादेशिक भावनेला चालना देताना मेकोंग क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी दरवर्षी 50 ICCR सांस्कृतिक शिष्यवृत्ती आणि 10 AYUSH फेलोशिप्स उपलब्ध करून दिल्या आहेत. या उपक्रमांमुळे भारत-मेकोंग भागातील शैक्षणिक आणि सांस्कृतिक देवाणघेवाण वृद्धिंगत झाली आहे. याशिवाय भारत सार्वजनिक आरोग्य, शाश्वत शेती आणि पाणी व्यवस्थापन यांसारख्या जीवनस्पर्शी क्षेत्रांतील वर्कशॉप्स आणि सामूहिक प्रशिक्षण कार्यक्रमही नियमित आयोजित करतो.

Mekong-Ganga Cooperation (MGC) ही भारत आणि CLMV देशांतील प्राचीन सांस्कृतिक नातेसंबंधांवर आधारित भागीदारी आहे, जी लोककेंद्रित उपक्रमांद्वारे प्रत्यक्ष अंमलात आणली जाते. 2019-22 या कालावधीतील कृती आराखड्यात पुष्कर व हॉर्नबिल महोत्सवांमधील परस्पर सहभाग, तसेच सिएम रीपमधील पारंपरिक वस्त्रसंग्रहालयात वस्त्रप्रदर्शने आयोजित करून सांस्कृतिक वारशावर आधारित देवाणघेवाण घडवून आणण्यात आली. CLMV देशांमध्ये Quick Impact Projects (QIPs) द्वारे तळागाळात प्रभाव टाकणारे उपक्रम राबवण्यात आले असून, 2015 पासून एकूण 38 प्रकल्प पूर्ण झाले असून त्यांची अंदाजे किंमत 1.9 दशलक्ष अमेरिकी डॉलर्स इतकी आहे. 2019 व 2021 मधील 10वी व 11वी MGC मंत्रीस्तरीय बैठका हेच दाखवतात की MGC आता पर्यटन, आरोग्य, शिक्षण व संस्कृती या क्षेत्रांतील सहकार्याला केंद्रस्थानी ठेवून प्रादेशिक धोरण राबवत आहे. या उपक्रमांमुळे केवळ धोरणस्तरीय चर्चांवर भर न राहता सामान्य लोकांमध्ये प्रत्यक्ष अनुभव आणि सामायिक आठवणींवर आधारित विश्वासाचं वातावरण तयार केलं जात आहे. भारताने मेकोंग-गंगा सहकार्य (MGC) उपक्रमात केवळ धोरणात्मक नव्हे, तर सांस्कृतिक आणि सहवेदनाशील गुंतवणूकदार म्हणून आपली भूमिका ठामपणे बजावली आहे. दरवर्षी 50 ICCR सांस्कृतिक शिष्यवृत्ती आणि 10 AYUSH फेलोशिप्स मेकोंग देशांतील विद्यार्थ्यांसाठी दिल्या जात असून, सार्वजनिक आरोग्य, शाश्वत शेती आणि पाणी व्यवस्थापन यासारख्या विषयांवर नियमित कार्यशाळा देखील राबवण्यात येतात. या पुढाकारांद्वारे भारत MGC ला केवळ एक धोरणात्मक व्यासपीठ म्हणून न पाहता, ती एक "आपल्या दीर्घ आणि समृद्ध व्यापारी, सांस्कृतिक व लोकसहभागाच्या इतिहासाचं उत्सवमूलक रूप" मानतो. या देवाणघेवाणी भारताच्या सांस्कृतिक वारशाच्या जाणीवेचा भावनिक व कूटनीतिक वापर दर्शवतात आणि त्याचबरोबर भारताची ओळख एक सभ्यतामूल्य जपणारा मार्गदर्शक आणि विश्वासार्ह शेजारी म्हणून अधिकच बळकट करतात.

आव्हानं आणि शिकवण

लोकाभिमुख कूटनीतीसाठी विविध उपक्रम सुरू असले तरी, ती सर्वसमावेशक, सुसंगत आणि प्रभावी ठरण्यात अद्याप अनेक अडथळे आहेत. ASEAN स्तरावर, अनेक लोक-केंद्रित पुढाकार अद्याप अधिकारबाध्य नसलेले आहेत. त्यांच्या अंमलबजावणीसाठी लागणारी राजकीय इच्छाशक्ती अपुरी ठरत असून, परिणामी तरुणाईचा सहभागही अनियमित आहे. विविध ‘कनेक्टिव्हिटी’ योजनेनंतरही, सार्वजनिक जागरूकतेचा अभाव दिसतो. बहुतेक दक्षिणपूर्व आशियाई नागरिकांना ASEAN च्या प्रयत्नांची पुरेशी माहिती नाही, तर उच्चस्तरीय परिषदांमध्ये सामान्य जीवनाशी निगडित मुद्दे फारसे चर्चेत येत नाहीत. BIMSTEC च्या बाबतीत, काठमांडू घोषणापत्रातील महत्त्वाकांक्षी उद्दिष्टांनंतरही अंमलबजावणी संथ गतीने सुरू आहे. व्हिसा संबंधित अडचणी, अपुरी भौतिक सुविधा यामुळे प्रवास, विद्यार्थ्यांची हालचाल, सांस्कृतिक देवाणघेवाण व वारसा पर्यटन यामध्ये अडथळे निर्माण झाले आहेत. MGC ची उद्दिष्टंही प्रामुख्याने प्रतीकात्मक स्वरूपात राहिलेली दिसतात. ही उदाहरणं दाखवून देतात की, जनतेशी संबंधित कूटनीती प्रभावीपणे प्रत्यक्षात आणण्यासाठी केवळ घोषणांपेक्षा राजकीय बांधिलकी, भक्कम अंमलबजावणी आणि जनजागृती वाढवण्याची गरज अधिक आहे. 2020 मध्ये सिएम रीप येथे होणाऱ्या प्रस्तावित 20 व्या वर्धापन दिन सोहळ्याची योजना कोविड-19 मुळे पुढे ढकलण्यात आली, त्यामुळे या भागीदारीचा गाडा मुख्यतः भारताच्या द्विपक्षीय पुढाकारांवरच चालू राहिला. ASEAN, BIMSTEC आणि MGC या तिन्ही मंचांमध्ये अजूनही बहुपक्षीय, जनाधारित संवादासाठी आवश्यक असणारी ठोस आणि टिकाऊ संरचना कमकुवत आहे. या क्षेत्रातील एक मोठा अडथळा म्हणजे कूटनीतीतील ‘एलिट बायस’ — Track I आणि II संवादांमध्ये धोरणकर्ते, राजकीय आणि अभ्यासक सहभागी होतात, परंतु सामान्य नागरिकांचा प्रत्यक्ष सहभाग अत्यल्प राहतो. नागरिकांना हायवे, सांस्कृतिक महोत्सव, किंवा पायाभूत सुविधा अनुभवता येतात, पण सामायिक कथा-कथन, स्मृतींची देवाणघेवाण, किंवा पारस्परिक विश्वासनिर्मिती यासाठी फारसे प्रयत्न होत नाहीत.
या संवादातील पोकळ्या अधोरेखित करतात की भागीदारी आणि सहकार्य केवळ धोरणात्मक घोषणांमधून नव्हे, तर प्रत्यक्ष अनुभवांमधून, सांस्कृतिक स्मृतींतून आणि भावनिक समजुतींतून घडतात. त्यामुळे आजच्या घडीला गरज आहे ती अशा कूटनीतीची, जी जनजीवनाला केंद्रस्थानी ठेवते. जिथे संवाद हा संबंधांचा, समतेच्या जाणिवेचा आणि सहवेदनाशीलतेचा दुवा बनतो.

तरीही, प्रत्येक फ्रेमवर्ककडून महत्त्वाच्या शिकवणी घेता येतात. ASEAN ची प्रमुख ताकद म्हणजे त्याची संस्थात्मक उंची व सुसंगतता. ASEAN सचिवालय, विविध क्षेत्रीय समित्या, आणि ASEAN Foundation हे घटक जनतेवर केंद्रित उपक्रमांमध्ये सातत्य व सुसूत्रता राखतात. ASEAN University Network अंतर्गत क्रेडिट ट्रान्सफर प्रणाली आणि गुणवत्ता हमी यंत्रणा सदस्य देशांमधील हजारो विद्यार्थ्यांच्या देवाणघेवाणीला हातभार लावतात आणि शैक्षणिक दर्जा उंचावतात. केवळ 2014 ते 2020 या काळात, ASEAN Foundation ने 25 समुदाय-केंद्रित कार्यक्रम राबवले असून, 75,000 पेक्षा अधिक लोकांपर्यंत यामाध्यमातून ते पोहचले आहे. ही बाब तळागाळातील बांधिलकीचं ठोस उदाहरण ठरते. ही संस्थात्मक रचना BIMSTEC आणि MGC यांसारख्या मंचांसाठी प्रेरणादायक मॉडेल ठरू शकते, कारण या दोन्ही क्षेत्रीय उपक्रमांमध्ये लोक-ते-लोक (People to People) संवादासाठी अद्याप दीर्घकालीन, ठोस व्यासपीठांची उणीव आहे. तसेच, BIMSTEC च्या काही उपक्रमांमध्ये नाविन्यता आढळते. 2025 च्या युवा संमेलनासारखी युवा कूटनीतीची प्रयोगशीलता आणि BNPTT अंतर्गत Track-II संवादांचे संरचीत स्वरूप ही सहभागी कूटनीतीकडे झुकण्याची सुरुवात आहे. जी भविष्यात लोकधारित क्षेत्रीय संवादासाठी अत्यावश्यक ठरू शकते. युवा नेते आणि प्रत्यक्ष कृती करणाऱ्या कार्यकर्त्यांचा संवादात सक्रीय समावेश हा बदललेला आणि अधिक समावेशक दृष्टिकोन ASEAN नेही आता अधिक ठामपणे स्वीकारण्याची गरज आहे, विशेषतः नियमित सिव्हिल सोसायटी फोरम्सच्या माध्यमातून. BIMSTEC प्रमाणेच, MGC नेही अधिक सहभागवादी आणि लोकाभिमुख रचना उभारण्याची प्रेरणा घेणं आवश्यक आहे. जिथे विविध आवाजांना वाव मिळतो आणि जी स्थानिक पातळीवर त्वरित आणि परिणामकारक सहाय्य पोहोचवू शकते. भारताचे QIPs (Quick Impact Projects) हे अशा भावनात्मक कूटनीतीचं ठोस उदाहरण म्हणून उदयास आले आहेत. स्थानिक गरजा थेट पूर्ण करणारे हे उपक्रम समुदायांमध्ये विश्वास निर्माण करतात. लघु प्रकल्प, स्थानिक पायाभूत सुविधांसाठी उपलब्ध करून दिलेल्या क्रेडिट लाईन्स हे सर्व कूटनीतीला एक अधिक मानवी चेहरा देतात, जो सामंजस्य आणि सहवेदनेवर आधारित असतो. ASEAN आणि BIMSTEC ने या भारतीय अनुभवातून शिकून, स्थानिक संस्कृतीशी संबंधित ग्रांट्स किंवा सामाजिक प्रकल्पांसाठी निधी उपलब्ध करून दिल्यास, प्रादेशिक सहकार्य थेट नागरिकांच्या जीवनात पोहोचू शकेल हेच खरे लोकाभिमुख आणि भावनिक कूटनीतीचं सार ठरेल.

BIMSTEC ने ASEAN चे जनसामान्यांशी संपर्क वाढवणारे उपक्रम व शिष्यवृत्ती मॉडेल स्वीकारावे, जेणेकरून शैक्षणिक आणि सांस्कृतिक देवाण-घेवाणीला अधिक गती मिळेल. त्याचप्रमाणे, ASEAN नेही MGC च्या वारसावर आधारित उपक्रमांना आपल्या युवा व पर्यटन कार्यक्रमांत समाविष्ट करावे, यामुळे सांस्कृतिक ओळख आणि प्रादेशिक आत्मीयता यांना बळकटी मिळू शकेल.

ASEAN, BIMSTEC आणि MGC या तीनही प्रादेशिक मंचांमध्ये सांस्कृतिक व भावनिक पातळीवर एक नैसर्गिक आपुलकी आहे. ASEANचं “One Community” ओळख मॉडेल, BIMSTECची बौद्ध वारसा सर्किट्स, आणि MGC चे सांस्कृतिक तीर्थमार्ग हे सर्व सामायिक इतिहास आणि सांस्कृतिक वारशावर आधारलेले आहेत. त्यामुळे हे मंच एकमेकांकडून शिकण्याची मोठी संधी निर्माण होते. BIMSTEC ने ASEANच्या संपर्क धोरणांचा व शिष्यवृत्ती मॉडेलचा अंगीकार करावा, तर ASEAN ने MGC चे वारसाधारित उपक्रम आपल्या युवा व पर्यटन कार्यक्रमांमध्ये समाविष्ट करावेत. कारण खऱ्या अर्थाने परिणामकारक ठरणारे लोकसहभागी उपक्रम हेच असतात जे थेट नागरिकांच्या दैनंदिन आयुष्यात बदल घडवतात. या मंचांनी एकमेकांच्या संस्थात्मक संरचना, भावनिक संवादाचे तत्त्वज्ञान आणि स्थानिक पातळीवरील पोहोच यामधून परस्पर प्रेरणा घेतली, तर ही कूटनीती केवळ औपचारिक चर्चांपुरती मर्यादित राहणार नाही, तर ती जिव्हाळ्याच्या नात्यांवर उभी राहणारी, अनुभवात्मक आणि लोकाभिमुख कूटनीती ठरेल.

सॉफ्टपॉवर कडून सामायिक हेतूकडे वाटचाल

भारताने हे भावनिक नाते टिकवून ठेवायचं असेल, तर त्याचं संस्थात्मक रूपांतर करणं अत्यावश्यक ठरतं. केवळ व्यवहाराधिष्ठित कूटनीतीपुरती मर्यादा न ठेवता, प्रत्यक्ष लोकसहभाग आणि अनुभवशील संबंध यावर आधारित बंध रचणं ही काळाची गरज आहे. याचा अर्थ असा की, बंगालच्या उपसागर परिसरात स्थानिक मूल्यसाखळ्यांचा विकास करून प्रादेशिक सहकार्य दैनंदिन आर्थिक व्यवहारांशी जोडणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे, रस्ते, शाळा, प्रशिक्षण केंद्रं यासारखी गरजांवर आधारित, लोकाभिमुख आणि शाश्वत पायाभूत रचना उभारणंही तितकंच महत्त्वाचं ठरतं कारण ही भौतिक गुंतवणूक सामाजिक विश्वास आणि भावनिक जडणघडणही घडवते. भारताने ASEAN–BIMSTEC भागांमधील सांस्कृतिक वारसा, डिजिटल पायाभूत सुविधा आणि वाहतूक मार्गांतील सुसंगती यांचा असा वापर करावा की सामायिक ओळख ही फक्त धोरणात्मक संकल्पनापुरती मर्यादित न राहता, नागरिकांच्या रोजच्या अनुभवाचा भाग ठरेल. अशा प्रकारे, प्रादेशिक एकात्मतेची प्रक्रिया ही सामान्य जनतेसाठीदेखील सहभागी, समावेशक आणि स्पृहणीय ठरेल. भारत सध्या असे प्रयत्न करत आहे की, भारत–म्यानमार–थायलंड महामार्ग वेगानं उभारला जात आहे. मात्र, या पायाभूत उपक्रमाकडे केवळ ‘रणनीतिक साधन’ म्हणून न पाहता, प्राचीन नागरी संस्कृतींमधील सांस्कृतिक आणि भावनिक पुनर्जोड म्हणून पाहणं अधिक आवश्यक आहे. अशा दृष्टिकोनातून उभी राहणारी ‘कनेक्टिव्ह डिप्लोमसी’ भारताच्या शेजारी संबंधांना अधिक मानवी आणि दीर्घकालीन अधिष्ठान देईल.


राजेश्वरी दासगुप्ता ओआरएफमध्ये रिसर्च इंटर्न आहेत. ती सध्या प्रेसिडेन्सी युनिव्हर्सिटीमधून आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये पीएचडी करत आहे.

श्रीपर्णा बॅनर्जी ह्या स्ट्रॅटेजिक स्टडीज प्रोग्रामच्या असोसिएट फेलो आहेत.

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.

Authors

Rajeshwari Dasgupta

Rajeshwari Dasgupta

Rajeshwari Dasgupta is a Research Intern at ORF. She is currently pursuing a PhD in International Relations from Presidency University. ...

Read More +
Sreeparna Banerjee

Sreeparna Banerjee

Sreeparna Banerjee is an Associate Fellow in the Strategic Studies Programme. Her work focuses on the geopolitical and strategic affairs concerning two Southeast Asian countries, namely ...

Read More +