रणांगणातील गरजेमुळे युक्रेनने स्वयंसेवी ड्रोनपासून (volunteer drones) AI-सक्षम, मोठ्या प्रमाणावर चालणाऱ्या मानवरहित युद्धाकडे वाटचाल केली.
2022 मधील रशियन ब्लिट्झक्रिगने लष्करीदृष्ट्या अधिक सक्षम शत्रूविरुद्ध युक्रेनला अपारंपरिक प्रतिसाद स्वीकारण्यास भाग पाडले. विशेषतः रशियाच्या हवाई वर्चस्वामुळे युक्रेनला आपल्या लढाऊ रणनितीत बदल करावे लागले. त्या टप्प्यावर युक्रेनने विखुरलेल्या ड्रोन परिसंस्थेवर अवलंबून राहणे पसंत केले. यात तात्पुरते रूपांतर केलेले व्यावसायिक ड्रोन, मर्यादित साठे आणि वॉलिंटर बिल्ड प्लॅटफॉर्म्स यांचा समावेश होता. या अनुकूलनक्षम लवचिकतेने आधुनिक युद्धाचे स्वरूप बदलले; मानवरहित हवाई वाहने (अनमॅन्ड एरियल वेहिकल्स - UAVs) ही केवळ तात्पुरती प्रतिकारक साधने न राहता, रशियन आक्रमणाविरुद्ध युक्रेनच्या रणनीतीचा संरचित आणि केंद्रिय घटक बनली.
2014 पर्यंत, युक्रेनच्या सशस्त्र दलांकडे (आर्म्ड फोर्सेस ऑफ युक्रेन - AFU) कोणतीही आधुनिक UAV क्षमता नव्हती. त्याऐवजी, ते काही कालबाह्य सोव्हिएत-कालीन ड्रोनवर अवलंबून होते, उदा. Tupolev Tu-143 जे आधुनिक लष्करी कारवायांसाठी प्रामुख्याने अप्रभावी ठरले. क्रिमियाचे विलीनीकरण आणि त्यानंतर डोनबासमधील संघर्ष हे निर्णायक वळण ठरले; त्यानंतर UAVs युक्रेनच्या लष्करी कारवायांचा नियमित भाग बनले. तरीही, युक्रेनचा ड्रोन कार्यक्रम दीर्घकाळ अपुरा विकसित राहिला आणि त्यामध्ये महत्त्वपूर्ण क्षमतात्मक दरी कायम होती.
याला प्रत्युत्तर म्हणून, युक्रेनमधील उत्पादक आणि नागरी गटांनी लष्कराला थेट बाजारात उपलब्ध असलेले व्यावसायिक तसेच घरगुती पातळीवर तयार केलेले ड्रोन पुरवण्यास सुरुवात केली. स्वयंसेवकांच्या नेतृत्वाखालील (Volunteer-led) उपक्रमांनी यात महत्त्वाची भूमिका बजावली. उदाहरणार्थ, पीपल्स प्रोजेक्ट या उपक्रमाने क्राउड-फंडिंगच्या माध्यमातून व्यावसायिक UAVs खरेदी करून दिले, तर एरोरोझविडका (Aerorozvidka) प्रकल्पाने, जो 2014 मध्ये सुरू झाला, सुधारित टेहळणी ड्रोन पुरवले. याशिवाय, आर्टेम विहुन्नक (Artem Vyhunnuk) यांसारखे खाजगी घटक युक्रेनच्या ड्रोन क्षमतांचे प्रमुख पुरवठादार म्हणून पुढे आले.
मात्र, ही खालीपासून वर (बॉटम-अप) पद्धत रणांगणावर लवचिकता दाखवणारी असली, तरी तिने संस्थात्मक मर्यादाही उघड केल्या. या ड्रोनना अधिकृतपणे लष्करी साठ्यात समाविष्ट करण्याची प्रक्रिया मंद आणि असमान होती. उदाहरणार्थ, कीव्ह-स्थित अथलॉन एव्हिया (Athlon Avia) या कंपनीने 2014 मध्ये विकसित केलेला फ्युरिया टेहळणी ड्रोन (UAV) प्रत्यक्षात 2019–20 पर्यंत अधिकृतरीत्या स्वीकारण्यात आला नव्हता.
2019 मध्ये युक्रेनने तुर्की बनावटीचे बेरख्तर (Bayraktar) TB2 ड्रोन मिळवले, तेव्हा एक महत्त्वाचे वळण आले. हे ड्रोन 2021 मध्ये कार्यरत सेवेत दाखल झाले आणि त्याच वर्षी ऑक्टोबरमध्ये एका रशियन तोफखाना प्रणालीवर कारवाई करत त्यांनी आपली प्रभावी क्षमता दाखवून दिली. यामुळे युक्रेनचा प्रवास तात्पुरत्या, तडजोडींच्या उपायांवर आधारित ड्रोन वापरातून पुढे जात अधिक संरचित आणि संघटित मानवरहित क्षमतांकडे वळल्याचे स्पष्ट झाले.
युक्रेनची ड्रोन परिसंस्था (2014–2022)
स्रोत: विविध स्रोतांमधून लेखकांनी संकलित केलेले
2022 च्या सुरुवातीला रशियन “विशेष लष्करी मोहिमे”च्या प्रारंभापर्यंत, युक्रेनने एक विकेंद्रित पण प्रभावी ड्रोन परिसंस्था उभारली होती. नागरी तंत्रज्ञानावर अवलंबित्व आणि हल्लेखोर UAVsची मर्यादित उपलब्धता यांसारख्या काही अडचणी असूनही, लहान टॅक्टिकल ड्रोनमधील कीव्हची ताकद ही युक्रेनच्या सुरुवातीच्या प्रतिकाराची एक महत्त्वाची घटक ठरली.
युद्धाच्या प्रारंभिक टप्प्यात, युक्रेन मोठ्या प्रमाणावर Bayraktar TB2 ड्रोनवर अवलंबून राहिले. या ड्रोनने गुप्तचर, देखरेख आणि टेहळणी (इंटेलिजन्स, सर्व्हिलन्स अँड रेकनॉन्सन्स – ISR) तसेच अचूक हल्ले अशी दुहेरी भूमिका बजावली. तुलनेने मर्यादित क्षमतांनंतरही, रशियन रणगाड्यांवर आणि पुरवठा ताफ्यांवर केलेल्या प्रभावी हल्ल्यांमुळे TB2 ने महत्त्वपूर्ण कार्यकारी लाभ मिळवून दिले. मात्र, रशियाने आपल्या हवाई संरक्षण प्रणालींचे अनुकूलन केले आणि इलेक्ट्रॉनिक युद्ध (EW) उपाययोजना तैनात केल्यानंतर, TB2 ड्रोनची प्रभावीता हळूहळू कमी होऊ लागली.
यामुळे युक्रेनने आपल्या कार्यकारी रणनितीचा केंद्रबिंदू लहान, कमी किमतीच्या ड्रोनच्या तैनातीवर आणला. बाजारात सहज उपलब्ध असलेले DJI Mavic सारखे ऑफ द शेल ड्रोन जलदगतीने लष्करी वापरासाठी रूपांतरित करण्यात आले. त्याचवेळी, युक्रेनने आधीपासून अस्तित्वात असलेल्या स्वयंसेवक-नेतृत्वाखालील ड्रोन स्टार्टअप्सच्या परिसंस्थेचा प्रभावी वापर केला. Aerorozvidka समूहाने विकसित केलेला R18 ड्रोन हे याचे महत्त्वाचे उदाहरण ठरले. होस्टोमेल विमानतळाच्या संरक्षणात या ड्रोनने निर्णायक भूमिका बजावली आणि लहान ड्रोन कसे निर्णायक सामरिक परिणाम घडवू शकतात, हे दाखवून दिले.
रशियाच्या प्रारंभिक मोहिमेची उद्दिष्टे अपयशी ठरल्यानंतर, मॉस्कोने आपली रणनिती बदलली आणि संघर्ष दीर्घकालीन युद्धात (अट्रीशन वॉरफेअर) रुपांतरित झाला. रशियाने Shahed अटॅक ड्रोन तैनात करून सातत्यपूर्ण हल्ल्यांद्वारे युक्रेनच्या हवाई संरक्षण प्रणालींवर आर्थिक आणि कार्यकारी दबाव आणण्याचा प्रयत्न केला. त्याला प्रत्युत्तर म्हणून, युक्रेनने बहुस्तरीय प्रतिउत्तर रणनिती स्वीकारली.
या टप्प्यावर अमेरिकेकडून मिळालेल्या मदतीमुळे युक्रेनला महत्त्वाचा प्रारंभिक लाभ मिळाला. अमेरिकेने सुमारे 700 फिनिक्स घोस्ट ड्रोन तसेच शेकडो स्विचब्लेड लॉयटरिंग मुनिशन्स (Switchblade loitering munitions) पुरवले. विशेषतः स्विचब्लेड ड्रोनमुळे युक्रेनच्या आर्मर-विरोधी क्षमतांमध्ये लक्षणीय वाढ झाली, ज्यामुळे रणगाडे आणि चिलखती वाहनांवर अचूक हल्ले करणे शक्य झाले. देशांतर्गत ड्रोन क्षमतांचा विस्तार करण्यासाठी, कीव्हने ‘आर्मी ऑफ ड्रोन्स’ हा कार्यक्रम सुरू केला. या उपक्रमामुळे युक्रेनच्या स्वदेशी संरक्षण उत्पादन क्षेत्राला चालना मिळाली आणि मानवरहित प्रणालींच्या नवकल्पना व उत्पादन प्रक्रियांना गती मिळाली.
याच काळात लांब पल्ल्याच्या ड्रोनच्या विकासाने युक्रेनच्या रणनितीत महत्त्वाचा बदल घडवून आणला. संरक्षणात्मक कारवायांपुरते मर्यादित न राहता, युक्रेनने रशियन हवाई तळ, तेल साठे आणि कमांड पोस्ट्स यांसारख्या पायाभूत सुविधांवर खोलवर हल्ले करण्यास सुरुवात केली, ज्यातून आक्रमक क्षमतांचा स्पष्ट विस्तार दिसून आला.
2023 मध्ये, युक्रेनने फर्स्ट-पर्सन व्ह्यू (FPV) ड्रोन रणांगणात उतरवले, ज्यामुळे त्याच्या युद्धातील अनुकूलन प्रक्रियेत एक महत्त्वाचा टप्पा गाठला. थेट व्हिडिओ प्रसारणाने सुसज्ज असलेल्या FPV ड्रोनमुळे विशेषतः चलनशील लक्ष्यांवर अचूक हल्ले करणे शक्य झाले. या ड्रोननी रणांगणावरील परिस्थितीची जाणीव आणि हल्ला करण्याची क्षमता वाढवली जणू काही ते प्रत्यक्ष “जमिनीवरचे बूट” असल्याप्रमाणे कार्य करत होते. तुलनेने कमी खर्चाचे असूनही सुमारे US$ 500 ते 700 दरम्यान FPV ड्रोन पायदळ तसेच चिलखती लक्ष्यांविरुद्ध प्रभावी ठरले. जरी ते इलेक्ट्रॉनिक युद्ध आणि जॅमिंग साठी संवेदनशील असले, तरी त्यांनी सुमारे 10 ते 20 किलोमीटर लांबपर्यंत रणांगणातील पारदर्शकता लक्षणीयरीत्या वाढवली. त्याचवेळी, रशियन भूभागावर हल्ल्यांचा विस्तार करण्याच्या उद्देशाने युक्रेनने UJ-22 एअरबोर्न आणि बीव्हर (Beaver) यांसारख्या स्वदेशी लांब पल्ल्याच्या UAVs चा विकास वेगाने पुढे नेला. स्काउट ड्रोन, जे स्वतंत्रपणे रशियन लष्करी साधनसामग्री ओळखण्यास सक्षम आहेत, हे युक्रेनच्या ड्रोन परिसंस्थेतील पुढचे पाऊल ठरले.
या तांत्रिक अनुकूलनांसोबतच, आर्म्ड फोर्सेस ऑफ युक्रेन (AFU) ने संस्थात्मक पातळीवरही पुनर्रचना केली. मानवरहित प्रणालींच्या तैनाती आणि एकत्रीकरणासाठी स्वतंत्र जबाबदारी असलेली अनमॅन्ड सिस्टीम्स फोर्सेस (USF) ही विशेष लष्करी शाखा स्थापन करण्यात आली. यामुळे ड्रोन, मानवरहित भूपृष्ठीय आणि सागरी प्रणालींचा वापर अधिक समन्वित आणि प्रणालीबद्ध पद्धतीने करणे शक्य झाले.
आता 2025 पर्यंत, ड्रोन युद्ध युक्रेनच्या संरक्षणात्मक तसेच आक्रमक रणनीतीचा अविभाज्य भाग बनले आहे.
रणनीतिक पातळीवर, युक्रेनने रशियाच्या महत्त्वाच्या पायाभूत सुविधांवर, विशेषतः संरक्षण-औद्योगिक संकुलांवर, सातत्याने हल्ले सुरू ठेवले आहेत. यामध्ये ड्रोन उत्पादन केंद्रांचा समावेश असून, उद्देश रशियाच्या UAV परिसंस्थेला कमकुवत करणे हा आहे. ऑपरेशन स्पायडरवेब हा या मोहिमेतील एक महत्त्वाचा टप्पा ठरला. या कारवाईत युक्रेनने समन्वित पद्धतीने पाच रशियन हवाई तळांवर हल्ले केले. उपलब्ध माहितीनुसार, या हल्ल्यांमध्ये 41 रशियन विमाने त्यात महत्त्वाची देखरेख विमाने आणि धोरणात्मक बॉम्बवर्षकांचा समावेश होता, असे लक्षणीय प्रमाणात नुकसान झाले.
युक्रेनने आपल्या संरक्षणात्मक रणनीतीचा भाग म्हणून ड्रोनचा समावेश करून एक प्रकारची “ड्रोन वॉल” म्हणजेच मजबूत भिंत उभारली आहे. आघाडीच्या महत्त्वाच्या भागांवर सुमारे 15 किलोमीटरचे ‘किल-झोन’ तयार करण्यात आले असून, त्यामुळे रणांगणावरील दृश्यता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. ही प्रणाली आता सातत्यपूर्ण देखरेख आणि अचूक हल्ल्यांची क्षमता देत आहेत. काही क्षेत्रांमध्ये तर या ड्रोननी पायदळाची आंशिक जागा घेतली आहे.
ड्रोन युद्धातील युक्रेनची प्रगती लक्षणीय असून, ती रणांगणावरील अपरिहार्य गरजा आणि कार्यकारी वास्तवांनी घडवून आणली आहे. ड्रोननी युद्धाचे स्वरूप आणि ते कसे लढले जाते, यामध्ये मूलभूत बदल घडवून आणले आहेत. तथापि, त्यांनी अजूनही तोफखाना आणि हवाई शक्ती यांसारख्या पारंपरिक लष्करी क्षमतांची पूर्णपणे जागा घेतलेली नाही. तरीसुद्धा, एकूण विजय मिळवला गेला नसला तरी, ड्रोन रणनीतिक आणि कार्यकारी पातळीवर निर्णायक परिणाम साध्य करू शकतात, हे युक्रेनच्या अनुभवातून स्पष्ट होते.
कार्तिक बोम्मकांती हे ऑब्झर्व्हर रिसर्च फाउंडेशनच्या स्ट्रॅटेजिक स्टडीज प्रोग्राममध्ये सिनियर फेलो आहेत.
मोहम्मद मुस्तफा आयेज हे ऑब्झर्व्हर रिसर्च फाउंडेशनमध्ये रिसर्च इंटर्न आहेत.
The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.
Kartik is a Senior Fellow with the Strategic Studies Programme. He is currently working on issues related to land warfare and armies, especially the India ...
Read More +
Mohammad Mustafa is a Research Intern at the Observer Research Foundation. ...
Read More +