Author : Anirban Sarma

Expert Speak Digital Frontiers
Published on May 17, 2025 Updated 0 Hours ago

6G वरील वर्चस्वाची शर्यत तीव्र होत असताना, कोणताही एक देश एकटा या कनेक्टिव्हिटीचे भविष्य घडवू शकत नाही, हे स्पष्ट झाले आहे.

6G साठीची शर्यत: अकाली चिंता की कालसुसंगत निर्णय?

Image Source: Getty

हा लेख नेशन्स, नेटवर्क्स, नरेटिव्हज: वर्ल्ड टेलिकम्युनिकेशन अँड इन्फॉर्मेशन सोसायटी डे 2025 या लेख मालिकेचा भाग आहे.


भारत 6G युगात प्रवेश करण्यासाठी स्वतःला तयार करत आहे, असे २०२३ च्या स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात देशाला संबोधित करताना पंतप्रधान मोदी यांनी घोषित केले आहे. ही बाब इतर अनेक यशांवर आधारित आहे. जगातील पाच सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थांमध्ये स्थान मिळवण्यासोबतच, भारताने जागतिक स्तरावर काही सर्वात परवडणाऱ्या इंटरनेट सेवा आणि मोबाइल डेटा योजना प्रदान केल्या आहेत. शिवाय, 5G चा रोलआउट जगातील सर्वात जलद आणि सर्वात व्यापक आहे. पंतप्रधान म्हणाले की, 6G मुळे दूरसंचार क्षेत्राला नवीन दिशा मिळणार आहे आणि ते घडवून आणण्यासाठी भारताने कसे काम सुरू केले आहे ते त्यांनी स्पष्ट केले आहे. 6G म्हणजे काय? आणि ते का महत्त्वाचे आहे? हे आधी समजून घ्यायला हवे.

6G समजून घेताना

6G किंवा सहाव्या पिढीतील वायरलेस हे मोबाईल कम्युनिकेशनसाठीचे आगामी मानक आहे. 5G नंतर आलेले हे तंत्रज्ञान २०३० च्या दशकाच्या सुरुवातीला आणि कनेक्टिव्हिटीमध्ये क्रांती घडवून आणेल अशी अपेक्षा आहे. 5G च्या क्षमतांवर आधारित असलेल्या 6G नेटवर्क्समध्ये अभूतपूर्व डेटा स्पीड, अल्ट्रा-लो लेटन्सी, मोठ्या संख्येने उपकरणांना समर्थन देण्याची क्षमता आणि बिग डेटा ॲनालिटिक्स, आर्टिफिशियल इंटेलिजेंस (AI), एक्सटेंडेड रिॲलिटी (XR) आणि सर्वव्यापी सेन्सिंग यासारख्या पूर्वीच्या भिन्न प्रगत तंत्रज्ञानांना अखंडपणे एकत्रित करण्याची क्षमता आहे.

इंटेलिजन्ट नॉलेज सिस्टिम्स मजबूत कम्प्युटेशन क्षमतांसह एकत्रित केले जाईल. तसेच नेटवर्क, अप्लिकेशन आणि प्रोसेसर रोल्सचे विलीनीकरण होईल.

बेल लॅब्स यांच्या म्हणण्याप्रमाणे, “6G नेटवर्क हे डिजिटल, भौतिक आणि मानवी जग एकत्र करणार आहे, परिणामी, एक्स्ट्रासेन्सरी अनुभवांचे दरवाजे उघडणार आहेत. यात इंटेलिजन्ट नॉलेज सिस्टिम्स मजबूत कम्प्युटेशन क्षमतांसह एकत्रित केले जाईल. तसेच नेटवर्क, अप्लिकेशन आणि प्रोसेसर रोल्सचे विलीनीकरण होईल.”

6G सध्या संशोधन आणि विकासाच्या (रिसर्च अँड डेव्हलपमेंट – R&D) टप्प्यामध्ये आहे. इंटरनॅशनल टेलिकम्युनिकेशन युनिअन (ITU) आणि थर्ड जनरेशन पार्टनरशिप (3GPP) सारख्या संस्थांकडून 6G साठी मानके आणि फ्रेमवर्क परिभाषित करण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांसह, होत असलेली स्थिर प्रगती पाहता पुढील पाच वर्षांमध्ये 6G नेटवर्क्स कमर्शिअल डिप्लॉयमेंट आणि अडॉप्शनसाठी तयार असेल, अशी अटकळ लावण्यात येत आहे.

5G आणि 6G यांच्यातील तुलना 

फीचर

5G

6G (अपेक्षित)

1

पीक डेटा रेट

~10 Gbps

1 Tbps पर्यंत

2

लेटन्सी

~1 मिलीसेकंद

<0.1 मिलीसेकंद

3

बँडविड्थ

mm WAVE (24 - 100 गिगाहर्ट्झ)

टेराहर्ट्झ (100 गिगाहर्ट्झ – 10 टेराहर्ट्झ)

4

एआय इंटिग्रेशन

अपुर्ण

नेटिव्ह आणि पर्सिस्टंट

5

कनेक्टिव्हीटी डेन्सिटी

~1 दशलक्ष डिव्हायसेस/km2

10 दशलक्षहून अधिक डिव्हायसेस/km2

6

एनर्जी एफिशीअन्सी

4G पेक्षा सुधारित

उत्तम फोकस

स्रोत: वरील तक्ता लेखकाने विविध स्त्रोतांच्या मदतीने तयार केला आहे.

वर्चस्वाची स्पर्धा

आधी 5G आणि सध्या AI प्रमाणेच, 6G वरील वर्चस्वाची शर्यत सुरू झाली आहे. जगभरात सुमारे ३२० नेटवर्कसह 5G वर काम अद्यापही सुरू आहे आणि २०२४ च्या अखेरीस जागतिक लोकसंख्येच्या केवळ ५५ टक्के लोकांना त्याचा ॲक्सेस आहे, हे पाहता ही स्पर्धा अकाली वाटू शकते. परंतू, 6G हे तांत्रिक, आर्थिक आणि भू-राजकीय शक्तीची एक नवीन सीमा दर्शवत असल्याने 6G विकासातील तीव्र स्पर्धात्मक प्रयत्न प्रत्यक्षात दूरदर्शी आणि धोरणात्मक आहेत.

२०३० नंतर वायरलेस कम्युनिकेशनसाठी 6G जागतिक बेंचमार्क स्थापित करेल, यात शंका नाही. त्यामुळे जो देश किंवा एखादे कोअलिशन या विकासाच्या अश्वावर आरूढ होतील त्यांना आंतरराष्ट्रीय तांत्रिक मानकांना आकार देता येईल. यात त्यांच्या कंपन्या आणि तंत्रज्ञान महत्त्वाची भुमिका बजावेल. अशाप्रकारचा प्रभाव हुआवेई 5G च्या मानकांवर पाडते आहे. खरेतर, एखाद्या देशाच्या 6G इकोसिस्टमचा जागतिक स्वीकार हा त्या देशावरील दीर्घकालीन अवलंबित्व निर्माण करतो आणि प्रचंड भू-राजकीय प्रभाव आणतो. याशिवाय, 6Gमुळे रोबोटिक्स, ऑटोनॉमस सिस्टीम, स्मार्ट मॅन्युफॅक्चरिंग आणि एक्सआर यासारख्या क्षेत्रांमध्ये औद्योगिक अनुप्रयोगांची एक नवीन पिढी निर्माण होत असल्याने, 6G वर वर्चस्व गाजवणारे देश प्रमुख आर्थिक क्षेत्रांची स्पर्धात्मकता वाढवू शकणार आहेत. शेवटी, 6G वरील वर्चस्व हे संरक्षण तंत्रज्ञान आणि सायबर ऑपरेशन्सच्या बाबतीत राष्ट्रीय सुरक्षेच्या फायद्यात रूपांतरित होणार आहे.

6G हे तांत्रिक, आर्थिक आणि भू-राजकीय शक्तीची एक नवीन सीमा दर्शवत असल्याने 6G विकासातील तीव्र स्पर्धात्मक प्रयत्न प्रत्यक्षात दूरदर्शी आणि धोरणात्मक आहेत.

चीन आणि अमेरिका (यूएस) आधीच 6G वरील वर्चस्वासाठी तीव्र संघर्षात गुंतलेले आहेत. नोव्हेंबर २०२० मध्ये, चीन सरकारने जगातील पहिला 6G उपग्रह प्रक्षेपित केला आहे. अल्ट्रा-हाय-फ्रिक्वेन्सी बँड एक्सप्लोर करण्यासाठी आणि 6G साठी स्पेस-आधारित इंटरनेट इंटिग्रेशनचे मूल्यांकन करण्यासाठी हा उपग्रह डिझाइन करण्यात आला आहे. चायना मोबाईल, हुआवेई आणि झेडटीई यांसारखे टेलिकॉम ऑपरेटर सुरुवातीच्या टप्प्यातील 6G चाचण्या घेत आहेत. २०२३ पासून, अनेक चिनी आणि परदेशी टेलिकॉम आणि स्मार्टफोन कंपन्यांनी देशातील 6G चाचण्या आणि तांत्रिक चाचण्यांमध्ये भाग घेतला आहे. एकूणच पाहता, 6G एक्सपरिमेंटेशनमध्ये चीन आघाडीवर असल्याचे दिसून येत आहे.

"6G वरील चिनी वर्चस्वाच्या आपत्तीला केवळ अमेरिकन नेतृत्वच रोखू शकेल," असे युनायटेड किंग्डम (यूके) च्या द टेलिग्राफमधील एका लेखात म्हटले आहे. 5Gच्या उदयादरम्यान काहीशा मागे पडलेल्या आणि बदलत्या परिस्थितीशा जुळवून घेण्यासाठी धडपडणाऱ्या अमेरिकेने नवीन दूरसंचार युद्धात त्याच चुका पुन्हा न करण्याचा निर्धार केला आहे. अलायन्स फॉर टेलिकम्युनिकेशन्स इंडस्ट्री सोल्युशन्स (एटीआयएस) च्या नेतृत्वाखालील नेक्स्ट जी अलायन्स हा अमेरिकेचा प्रमुख 6G कार्यक्रम आहे. ॲपल, गुगल, मायक्रोसॉफ्ट, इंटेल, एटी अँड टी आणि क्वालकॉमसारख्या दिग्गज टेक कंपन्या एटीआयएसमध्ये समाविष्ट आहेत. एटीआयएस 6G रोडमॅपमध्ये नेटवर्कची विश्वासार्हता, जागतिक स्पर्धात्मकता आणि शाश्वतता यांना प्राधान्य देण्यात आले आहे. त्याचबरोबर, अमेरिकेचे संरक्षण विभाग हा 6G वरील संशोधन आणि विकास उपक्रम राबवत आहे. यामध्ये सुरक्षित एज कंप्युटिंग आणि बॅटलफिल्ड कम्युनिकेश यासारख्या 6G च्या लष्करी आणि दुहेरी-वापर असलेल्या अनुप्रयोगांमध्ये गुंतवणूक केली जात आहे.

युरोपियन युनियन (इयू) ने देखील त्यांच्या होरायझन युरोप उपक्रमांतर्गत 6G वरील संशोधन आणि नवोपक्रमासाठी मोठ्या प्रमाणात निधी देण्याचे वचन दिले आहे. नोकियाच्या समन्वयाने युरोपातील एक अग्रणी 6G संशोधन उपक्रम असलेला हेक्सा-एक्स हा 6G आर्किटेक्चर, एआय-चालित नेटवर्क आणि नवीन स्पेक्ट्रम केसेस तयार करण्यासाठी २५ उद्योग भागीदारांना एकत्र आणत आहे. फॅक्टरी ऑटोमेशन आणि इंडस्ट्री ४.० ला पुढे नेणे हे 6G ब्रेन्सचे केंद्रबिंदू आहे, हा एक ईयू-निधीत उपक्रम आहे जो 6G वातावरणात एआय आणि सेन्सिंग एकत्रित करण्याचा प्रयत्न करत आहे.

जगाच्या दुसऱ्या बाजूला, पूर्व आशियामध्ये, जपान आणि दक्षिण कोरियाचे 6G कौशल्य देखील अधिकाधिक स्पष्ट होत आहे. ही दोन्ही राष्ट्रे शक्तिशाली संशोधन आणि विकास तसेच पायलट कार्यक्रम राबवत आहेत.

शांत स्पर्धक

महासत्तांच्या स्पर्धांच्या झगमगाटापासून दूर, भारत 6G क्षेत्रात पहिला पाऊल टाकण्याच्या दिशेने सातत्याने काम करत आहे. "4G मध्ये जगाचे अनुसरण करणारा आणि 5G मध्ये त्यासोबत पुढे जाणारा भारत 6G मध्ये जगाचे नेतृत्व करेल, असा आम्हाला विश्वास आहे." असे देशाचे दळणवळण मंत्री ज्योतिरादित्य सिंदिया यांनी म्हटले आहे.

यामुळे भारताला कोणता फायदा होणार आहे हे समजून घेण्यासाठी अधिक वेळ जावा लागणार आहे. भारत दूरदर्शी धोरणात्मक चौकटींना धोरणात्मक गुंतवणुकीचा आधार देत आणि सरकार, शैक्षणिक संस्था आणि उद्योग यांच्यातील भागीदारीला प्रोत्साहन देऊन त्याच्या 6G परिसंस्थेच्या विकासासाठी सक्रियपणे पाया निर्माण करत आहे.

मार्च २०२३ मध्ये, पंतप्रधान मोदींनी भारत 6G व्हिजन डॉक्युमेंटचे अनावरण केले आहे. भारत 6G व्हिजन डॉक्युमेंट हा 6G विकासासाठीचा रोडमॅप आहे. हा रोडमॅप स्वस्त, शाश्वत आणि सर्वव्यापी तंत्रज्ञान अशा तीन तत्वांवर भर देतो. व्हिजन डॉक्युमेंटच्या रचनेत मल्टीस्टेकहोल्डरिझमची कल्पना गुंफण्यात आली आहे. ही कल्पना विविध मंत्रालये, संशोधन संस्था, मानकीकरण संस्था, दूरसंचार सेवा प्रदाते आणि इतर तंत्रज्ञान कंपन्यांचे प्रतिनिधी यांचा समावेश असलेल्या 6G वरील टेक्नॉलॉजी इनोव्हेशन ग्रुप (टीआयजी – 6G) ने तयार केली आहे. या दृष्टिकोनाचा प्रमुख उद्देश म्हणजे भारत केवळ 6G तंत्रज्ञान विकसित करत नाही तर त्याच्या उत्क्रांतीत एक प्रमुख योगदानकर्ता बनतो याची खात्री करणे हा आहे. त्याच वेळी, भारताने शिक्षण क्षेत्र, औद्योगिक क्षेत्रातील महत्त्वाचे घटक आणि स्टार्टअप्ससाठी उदयोन्मुख 6G तंत्रज्ञानाची चाचणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी एक व्यासपीठ म्हणून 6G R&D टेस्टबेड सुरू केला आहे. या टेस्टबेडमुळे 6G इनोव्हेशन, क्षमता बांधणी आणि अवलंबनाला गती मिळण्यास मदत होईल अशी अपेक्षा आहे.

महासत्तांच्या स्पर्धांच्या झगमगाटापासून दूर, भारत 6G क्षेत्रात पहिले पाऊल टाकण्याच्या दिशेने सातत्याने काम करत आहे.

या बहु-हितधारक दृष्टिकोनाला पूरक म्हणून, सरकारने भारत 6G अलायन्स (B6GA) ची देखील स्थापना केली आहे. या अलायन्सचे सदस्य परवडणाऱ्या आणि आंतरराष्ट्रीय मानकांशी सुसंगत असलेल्या 6G तंत्रज्ञानाची डिझाईन आणि डिप्लॉयमेंट करत आहेत. मानके संरेखित करण्याच्या या मोहिमेचा एक भाग म्हणून १०० हून अधिक देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय 6G संशोधन प्रस्तावांना मान्यता देण्यात आली आहे आणि B6GA ने युरोपच्या 6G स्मार्ट नेटवर्क्स अँड सर्व्हिसेस इंडस्ट्री असोसिएशन (6G-IA) सोबत संयुक्त संशोधन प्रकल्प, ज्ञान विनिमय कार्यक्रम आणि मानकांच्या सह-विकासासाठी एक सामंजस्य करार (MoU) देखील केला आहे.

यासोबतच, उच्च दर्जाच्या 6G R&D साठी १०० समर्पित सहाय्यक प्रयोगशाळांची स्थापना आणि परदेशी तंत्रज्ञान कंपन्यांच्या संशोधन सुविधांमधील प्रवेश हा भारतीय दृष्टिकोनाचा एक आवश्यक घटक आहे. त्याचबरोबर, देश जागतिक 6G पेटंट पूलमध्ये आपले योगदान वाढवण्यासाठी काम करत आहे. भारताने सध्या २०० हून अधिक 6G-संबंधित पेटंट मिळवले आहेत आणि २०३० पर्यंत जागतिक 6G पेटंटमध्ये किमान १० टक्के योगदान देण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे.

निष्कर्ष

6G च्या विकासासाठीची वाटचाल ही अकाली महत्त्वाकांक्षेची बाब नाही तर एक धोरणात्मक गरज आहे. या वाटचालीस केवळ काही तांत्रिकदृष्ट्या प्रगत सत्तांमधील झिरो सम स्पर्धेपर्यंत मर्यादित करणे योग्य ठरणार नाही. चीनच्या अत्याधुनिक प्रयोगांपासून ते अमेरिका आणि युरोपियन युनियनने केलेल्या प्रगतीपर्यंत आणि पूर्व आशियातील हाय इम्पॅक्ट पायलटच्या उदयापासून आणि भारताच्या उदयोन्मुख बाजारपेठेतील प्रयत्नांपर्यंतची वाटचाल पाहता कोणताही एक देश एकाकीपणे कनेक्टिव्हिटीचे भविष्य घडवू शकत नाही, हे स्पष्ट झाले आहे.

6G च्या युगात वेग आणि स्केलसोबत दूरदृष्टी आणि जबाबदारीला अधिक महत्त्व आहे.

पुढे जाऊन, बहुपक्षीय संस्था आणि सदस्य राष्ट्रांनी आंतरराष्ट्रीय मानके सह-निर्माण करण्यासाठी, स्पेक्ट्रमच्या समान प्रवेशावर सहमती दर्शवण्यासाठी आणि समावेशक संशोधन आणि विकास परिसंस्थांना समर्थन देण्यासाठी एकत्र काम केले पाहिजे. सार्वजनिक गुंतवणुकींमध्ये अल्पकालीन व्यावसायिक नफ्यांपेक्षा दीर्घकालीन नवोपक्रम आणि क्षमता विकासाला प्राधान्य देणे गरजेचे असते. संवेदनशीलपणे तयार केलेल्या धोरणात्मक चौकटींमध्ये गोपनीयता, सायबर सुरक्षा, नैतिकता, पर्यावरणीय परिणाम आणि नेटवर्कच्या पूर्वीच्या पिढ्यांसह आंतरकार्यक्षमता यांसारख्या उदयोन्मुख चिंतांना संबोधित करणे ही महत्त्वाचे असते.

6G च्या युगात वेग आणि स्केलसोबत दूरदृष्टी आणि जबाबदारीला अधिक महत्त्व आहे. वर्ल्ड टेलिकम्युनिकेशन अँड इन्फॉर्मेशन सोसायटी डे हा सरकारे, उद्योग आणि इतरांसाठी 'जिंकण्या'पलीकडे विचार करण्याची आणि सहकार्यासाठी नवीन मार्ग शोधण्याची गरज लक्षात आणून देण्याचे एक योग्य औचित्य आहे.


अनिर्बन सरमा ऑब्झर्वर रिसर्च फाउंडेशनच्या डिजिटल सोसायटीज सेंटरचे डिरेक्टर आहेत.

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.