Author : Oommen C. Kurian

Expert Speak Health Express
Published on Jan 17, 2026 Updated 0 Hours ago

ऑलिवर सॅक्स यांनी न्यूरोलॉजीला संवेदनशील आणि मानवीय कथांच्या माध्यमातून मांडले आहे. त्यांच्या पुस्तकांमध्ये आजाराला केवळ शेवट न मानता नव्या समजुतीची सुरुवात म्हणून दाखवले गेले. मात्र अलीकडील लेखांनी असा प्रश्न उपस्थित केला आहे की या कथा पूर्णपणे वास्तवावर आधारित होत्या की त्यामध्ये काही अंशी कल्पनारंजन करण्यात आले होते.

जादुई वाटणाऱ्या न्यूरोलॉजीच्या कहाण्या – खरं काय?

    कित्येक दशकांपर्यंत ऑलिवर सॅक्स लोकांच्या नजरेत न्यूरोलॉजीचे एक संवेदनशील आणि मानवी रूप म्हणून ओळखले जात होते. ते असे डॉक्टर मानले जात होते की जे रुग्णांना केवळ वैद्यकीय फाइल्सपुरते मर्यादित ठेवत नसत, तर त्यांच्या संपूर्ण आयुष्यकथेला समोर आणतं. Awakenings आणि The Man Who Mistook His Wife for a Hat यांसारख्या पुस्तकांच्या माध्यमातून सॅक्स यांनी वाचकांना आणि अनेक डॉक्टरांना हा विश्वास दिला की आजाराची ओळख ही कथेचा शेवट नसून तिची सुरुवात असते. मात्र द न्यू यॉर्करमध्ये रॅचेल अवीव यांनी लिहिलेल्या अलीकडील शोधलेखाने एक अस्वस्थ करणारा प्रश्न उपस्थित केला आहे. सॅक्स यांच्या या प्रभावी कथांची ताकद थोडीफार वास्तव बदलण्यावर तर आधारलेली नव्हती ना? अवीव यांच्या मते, अनेक वेळा सॅक्स यांनी रुग्णांच्या खऱ्या बोलण्यामध्ये आणि वागण्यात बदल करून, गुंतागुंतीच्या आयुष्यांना सोप्या आणि स्वच्छ कथांमध्ये रूपांतरित केले.

    ·       ऑलिवर सॅक्स यांनी न्यूरोलॉजीला मानवी कथांच्या माध्यमातून मांडले.

    ·       आजाराला शेवट न मानता नव्या समजुतीची सुरुवात म्हणून दाखवले.

    ·       मात्र अलीकडील लेखांनी या कथांच्या वास्तवतेवर प्रश्नचिन्ह उभे केले आहे.

    “अवीव यांच्या मते, अनेक वेळा सॅक्स यांनी रुग्णांच्या खऱ्या बोलण्यामध्ये आणि वागण्यात बदल करून, गुंतागुंतीच्या आयुष्यांना सोप्या आणि स्वच्छ कथांमध्ये ढाळले.”

    ही अस्वस्थता समजून घेण्यासाठी ‘सोकल प्रकरणा’ची आठवण करून घेता येईल. 1996 मध्ये अ‍ॅलन सोकल यांनी जाणीवपूर्वक एक अर्थहीन आणि निरर्थक लेख एका शैक्षणिक नियतकालिकाला पाठवला, हे तपासण्यासाठी की गुंतागुंतीचे शब्द आणि विचारसरणीची भाषा वापरून ठोस पुराव्यांशिवायही एखादा लेख स्वीकारला जाऊ शकतो का. त्या नियतकालिकाने तो लेख प्रसिद्ध केला आणि नंतर सोकल यांनी तो एक फसवणूक असल्याचे उघड केले. ही तुलना यासाठी नाही की ऑलिवर सॅक्स यांनी काही फसवणूक केली- तसे त्यांनी केले नाही. साम्य इतकेच आहे की सजवलेल्या, प्रभावी कथा लोकांना कशा आकर्षित करतात आणि संस्था व वाचक प्रभावी मांडणीला कसे विश्वासार्ह ज्ञान मानून स्वीकारतात. सोकल यांनी दाखवून दिले की बनावट सिद्धांत गंभीर विद्वत्तेचे रूप धारण करू शकतात, तर सॅक्स यांचे प्रकरण हे दाखवते की वैद्यकीय कथा कशा तथ्यात्मक सत्यासारख्या भासू शकतात. हे महत्त्वाचे यासाठी आहे की सॅक्स वैद्यकीय क्षेत्राच्या आतून लिहीत होते आणि एक डॉक्टर-व लेखक म्हणून त्यांना अतिरिक्त विश्वास दिला जात होता. या अर्थाने हे आतून घडलेले एक “लहान सोकल प्रकरण” आहे—जे इशारा देते की जेव्हा एखादी कथा वैद्यकीय अधिकारासह समोर येते, तेव्हा आपण तिला किती सहज सत्य मानतो.

    एकट्या महान व्यक्तीने घडवलेली कथा

    रॅचेल अवीव यांचे सर्वात ठोस विश्लेषण Awakenings मधील “लिओनार्ड एल” या पात्राच्या मांडणीशी संबंधित आहे. ऑलिवर सॅक्स यांनी लिओनार्डला एकटा, दु:खी आणि पुस्तकांमध्ये बुडालेला माणूस म्हणून दाखवले. त्याच्या भावना अधिक खोल वाटाव्यात म्हणून रिल्केच्या कवितेतील एक ओळही त्याच्या नावाशी जोडली. मात्र अवीव सांगतात की सॅक्स यांच्या क्लिनिकल नोंदींमध्ये याचा कोणताही पुरावा आढळत नाही. उलट, तीच ओळ सॅक्स यांनी यापूर्वी स्वतःसाठी त्यांच्या खासगी पत्रांमध्ये वापरलेली होती. खरा फरक तेव्हा समोर येतो, जेव्हा कळते की उपचारानंतर लिओनार्डने स्वतःची आत्मकथा लिहिली होती. त्यात तो स्वतःला मित्रांशी जोडलेला दाखवतो आणि आपल्या आयुष्यातील अधिक गुंतागुंतीचे, कधी कधी त्रासदायक पैलूही मांडतो. सॅक्स यांना हे सर्व माहीत होते, तरीही त्यांनी ते आपल्या पुस्तकात समाविष्ट केले नाही. परिणामी, रुग्णाचे नव्याने घडवलेले रूप तयार झाले—असे रूप जे वाचकांची सहानुभूती टिकवून ठेवते, पण सत्याची संपूर्ण चित्रे दाखवत नाही.

    अवीव हेही दाखवतात की सॅक्स आपल्या कामाबाबत भोळे नव्हते. त्यांच्या खासगी डायरीमध्ये त्यांनी कबूल केले आहे की त्यांनी रुग्णांना असे काही “गुण” दिले होते जे प्रत्यक्षात त्यांच्याकडे नव्हते, आणि काही गोष्टी पूर्णपणे काल्पनिक होत्या. ही कबुली संपूर्ण चर्चेची दिशा बदलते. आता प्रश्न केवळ साहित्यिक सजावटीचा राहत नाही, तर सॅक्स यांच्या हातात “केस स्टडी” म्हणजे नेमके काय होते, हा मूलभूत प्रश्न उभा राहतो.

    जेव्हा कथा वास्तवापेक्षा पुढे जाते

    ऑलिवर सॅक्स यांच्या सर्वात प्रसिद्ध लेखनांपैकी एक असलेली “द ट्विन्स” ही रचना याचे स्पष्ट उदाहरण आहे, जिथे कथा पुराव्यांपेक्षा पुढे जाते. सॅक्स यांनी दोन ऑटिस्टिक जुळ्या भावांचा उल्लेख केला आहे, जे एकमेकांशी मोठमोठ्या अभाज्य संख्यांच्या माध्यमातून “संवाद” साधत असत. त्यांनी असा दावा केला की या संख्यांची पडताळणी ते आपल्या जुन्या पुस्तकाच्या मदतीने करत असत. हे वर्णन एखाद्या परीकथेप्रमाणे वाटते—जणू दोन मेंदू एका खास, गूढ भाषेत एकमेकांशी जोडले गेले आहेत.

    मात्र रॅचेल अवीव सांगतात की या जुळ्या मुलांवर याआधीच संशोधन झाले होते आणि अमेरिकन जर्नल ऑफ सायकिआट्रीमध्ये प्रकाशित झालेल्या दोन संशोधन लेखांमध्ये अशा अभाज्य संख्यांच्या विलक्षण क्षमतेचा कुठेही उल्लेख आढळत नाही. 2007 मध्ये एका मानसशास्त्रज्ञाने सॅक्स यांच्या या दाव्याला थेट आव्हान दिले, कारण माणूस इतक्या मोठ्या अभाज्य संख्यांचा स्वतःहून शोध लावू शकत नाही. जेव्हा सॅक्स यांना त्या पुस्तकाबद्दल विचारण्यात आले, तेव्हा ते कोणतीही ठोस माहिती देऊ शकले नाहीत. तरीसुद्धा, काही वैज्ञानिकांनी सॅक्स यांचे समर्थन केले- ठोस पुराव्यांच्या आधारे नव्हे, तर त्यांच्या प्रतिभा आणि कल्पनाशक्तीच्या आधारे. हे प्रकरण दाखवून देते की कशी एक प्रभावी कथा, पक्क्या पुराव्यांशिवायही, सत्य म्हणून स्वीकारली जाऊ शकते.

    “आता प्रश्न केवळ साहित्यिक सजावटीचा राहत नाही, तर सॅक्स यांच्या हातात ‘केस स्टडी’चा अर्थ नेमका काय होता, हा प्रश्न उभा राहतो.”

    हे महत्त्वाचे का आहे

    भारतीय समाजात डॉक्टरांच्या शब्दांना किती महत्त्व दिले जाते, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. अनेकदा डॉक्टरांनी सांगितलेली गोष्ट अंतिम सत्य मानली जाते- विशेषतः अशा व्यवस्थेत जिथे कुटुंबांना उपचारासाठी स्वतःच्या खिशातून मोठा खर्च करावा लागतो, अनेक डॉक्टरांकडे सल्ला घ्यावा लागतो आणि गर्दीच्या रुग्णालयांमध्ये आशेच्या आधारावर दिवस काढावे लागतात. अशा वातावरणात ‘नॅरेटिव्ह मेडिसिन’ची स्वतःची महत्त्वाची भूमिका आहे. ती उपचार प्रक्रियेला केवळ व्यवहारापुरते मर्यादित राहू देत नाही आणि डॉक्टरांना आठवण करून देते की आजार हा केवळ आकड्यांचा विषय नसून तो जगलेला अनुभव असतो.

    “जेव्हा एखादी वैद्यकीय कथा स्वतःला सत्याची साक्ष देणारी म्हणून मांडते, तेव्हा तिच्याकडून तथ्यांबाबत प्रामाणिकपणाची अपेक्षाही असते.”

    अवीव यांचा लेख आपल्याला हे आठवण करून देतो की कथा अनेकदा सावधगिरीपेक्षा अधिक वेगाने पसरतात. एखादी प्रभावी वैद्यकीय कथा लोकांच्या अपेक्षा घडवू शकते, विचारांवर परिणाम करू शकते आणि डॉक्टरांच्या मानसिकतेतही स्थान मिळवू शकते. त्यामुळे जर आपण ऑलिवर सॅक्स यांचे लेखन वाचत असू किंवा शिकवत असू, तर आता ते अधिक समजूतदारपणे आणि सावधपणे वाचणे गरजेचे आहे. त्यांच्या योगदानाचे आपण कौतुक करू शकतो, पण त्याच वेळी हेही समजून घेणे आवश्यक आहे की त्यांच्या लेखनशैलीत कुठे वास्तव लपवले जाऊ शकते. ही चर्चा साहित्याला वैद्यकशास्त्रापासून वेगळे करण्यासाठी नाही, तर आपण कोणत्या प्रकारचे लेखन वाचत आहोत, हे ओळखण्यासाठी आहे. साहित्य भावनिक सत्याच्या आधारावर पुढे जाऊ शकते; पण जेव्हा एखादी वैद्यकीय कथा स्वतःला सत्याची साक्ष देणारी ठरवते, तेव्हा तिच्याकडून तथ्यांची प्रामाणिकताही अपेक्षित असते. जसे सोकल प्रकरणाने शैक्षणिक जगाला सावध केले होते, तसेच हे प्रकरण वैद्यक क्षेत्रासाठीही एक इशारा आहे- जे सत्य वाटते, ते नेहमीच पूर्ण सत्य असेल, असे नाही. जेव्हा संवेदना आणि तथ्य वेगळे होतात, तेव्हा सर्वात सुंदर कथा देखील कमकुवत ठरते.


    ओमेन सी. कुरियन हे ऑब्झर्व्हर रिसर्च फाउंडेशनमध्ये हेल्थ इनिशिएटिव्हचे प्रमुख आणि सिनियर फेलो आहेत.

    The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.