-
CENTRES
Progammes & Centres
Location
रशिया युक्रेन संघर्ष सुरू झाल्यानंतर रशियाच्या ड्रोन युद्धपद्धतीत मोठे बदल झाले आहेत. रशियाची ड्रोनकडे पाहण्याची भूमिका आता पूर्णपणे बदलली आहे. पूर्वी लष्करी रणनितीतील दुय्यम घटक मानले जाणारे ड्रोन आता युद्धाच्या एकूण रणनीतीचा महत्त्वाचा भाग बनले आहेत. आधी मर्यादित आणि प्रामुख्याने टेहळणीसाठी वापरला जाणारा मानवरहित हवाई वाहनांचा ताफा आता बहुस्तरीय स्वरूपात वाढवण्यात आला आहे. हा ताफा आता धोरणात्मक हल्ले करणे, रणांगणावर शत्रूची ताकद कमी करणे आणि इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर यांसारखी महत्त्वाची कामे करू शकतो. त्याचबरोबर गुप्तचर, पाळत आणि सर्वे सारखी पारंपरिक कामेही तो करत आहे. रणांगणातील सतत बदलणारी परिस्थिती, तांत्रिक प्रगती आणि युद्धातून मिळालेला अनुभव यामुळे हा बदल घडून आला आहे. पुढील विश्लेषणात युक्रेनमधील रशियन ड्रोन मोहिमेचा कालानुक्रमे आढावा घेण्यात आला आहे.
रशियाच्या ड्रोन कार्यक्रमाची सुरुवात 1960 च्या दशकात झाली, जेव्हा टेहळणीसाठी वापरल्या जाणाऱ्या यूएव्हींचा विकास सुरू झाला. मात्र 2008 मधील जॉर्जिया युद्धात उघड झालेल्या कमतरतेनंतर रशियाने आपल्या ड्रोन कार्यक्रमाकडे गंभीरपणे लक्ष देण्यास सुरुवात केली. या युद्धातून रशियन ड्रोन ताफ्यातील संख्या आणि गुणवत्तेतील मर्यादा तसेच त्यांची कमी कार्यक्षमता स्पष्ट झाली. यानंतर रशियाने व्यापक ड्रोन साठा उभारण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली. यामध्ये देशांतर्गत तयार केलेले तसेच बाहेरून आयात केलेले ड्रोन यांचा समावेश होता (तक्ता 1 पहा).
तक्ता 1 : 2008–2022 दरम्यान रशियन ड्रोन ताफ्याचा विकास (Drone Fleet)
स्रोत: अनेक स्त्रोतांकडून लेखकांनी संकलित केलेले
रशियाने 2014 मध्ये पूर्व युक्रेनमध्ये आणि 2015 मध्ये सीरियामध्ये यूएव्हींचा वापर केला होता. या मोहिमांमधून रशियाला रणांगणाचा महत्त्वाचा अनुभव मिळाला. मात्र तरीही काही मूलभूत मर्यादा कायम राहिल्या. ड्रोन वापरण्यासाठी स्वतंत्र पथके तयार केली असली तरी त्यांच्या वापरासाठी स्पष्ट आणि सुसंगत अशी युद्धसिद्धांताची चौकट अस्तित्वात नव्हती. रशियाचा ड्रोन साठा मुख्यतः टेहळणीवर केंद्रित होता आणि त्यात लढाऊ ड्रोन तसेच घिरट्या घालणारे स्फोटक ड्रोन यांची कमतरता होती. याशिवाय देशांतर्गत ड्रोन उत्पादनासाठी आवश्यक अशी औद्योगिक क्षमता पुरेशी नव्हती आणि युरोप, अमेरिका, इस्रायल, जपान अशा देशांकडून आयात केलेल्या घटकांवर मोठ्या प्रमाणावर अवलंबून राहावे लागत होते.
याचा अर्थ असा की युक्रेनवर पूर्ण प्रमाणात हल्ला करण्यापूर्वी रशियाकडे असलेली ड्रोन व्यवस्था मर्यादित स्वरूपाची होती. गुप्तचर, पाळत आणि टेहळणी क्षमता मजबूत असली तरी लढाऊ ड्रोनचा साठा अत्यंत कमी होता. मॉस्कोला वाटले होते की युद्धात ड्रोन फक्त सहाय्यक भूमिका बजावतील, पण युद्धाच्या पुढील घडामोडींनी हा अंदाज चुकीचा ठरवला.
मॉस्कोने मर्यादित ड्रोन ताफ्यासह युद्धात प्रवेश केला होता. सीरियातील अनुभवावरून जिथे ७० पेक्षा अधिक ड्रोन वापरले गेले नव्हते. ड्रोनची गरज मर्यादितच असेल, असा त्यांचा अंदाज होता. मात्र, हा संघर्ष लवकरच वेगवान आणि निर्णायक कारवाईतून बदलून दीर्घकालीन झीज-युद्धात (war of attrition) रूपांतरित झाला. सुरुवातीच्या टप्प्यात रशियाने मध्यम पल्ल्याच्या गुप्तचर आणि पाळत क्षमतांच्या यूएव्हींचा तसेच खोलवर हल्ला करण्यास सक्षम ड्रोनचा वापर करून हवाई वर्चस्व मिळवण्याचा प्रयत्न केला. युक्रेनियन सैन्याने मॅनपॅड्सच्या मदतीने प्रत्युत्तर देत मोठ्या रशियन आयएसआर ड्रोन पाडण्यास सुरुवात केली. रशियाच्या कमांड, नियंत्रण आणि दळणवळण प्रणालीतील कमकुवत रचना आणि अत्यंत केंद्रीकृत निर्णयप्रक्रियेामुळे बदलत्या परिस्थितीशी जुळवून घेण्यात विलंब झाला. यामुळे लहान ड्रोनच्या बाबतीत रशियाची कमतरता उघड झाली कारण या क्षेत्रात पुरेशी गुंतवणूक करण्यात आलेली नव्हती. या उणिवा भरून काढण्यासाठी रशियन सैनिकांनी मोठ्या प्रमाणावर व्यावसायिक डीजेआय क्वॉडकॉप्टर्सचा वापर सुरू केला. 2022 च्या मध्यापर्यंत अधिक लवचिक आणि अनुकूलनक्षम ड्रोन युद्धपद्धती वापरणाऱ्या प्रतिस्पर्ध्याचा सामना करताना रशियाला यूएव्हींबाबतच्या आपल्या धोरणाचा पुनर्विचार करण्याची गरज जाणवली. त्यामुळे मॉस्कोने कमी किमतीचे आणि झीज-युद्धासाठी (war of attrition) उपयुक्त असलेल्या ड्रोनकडे लक्ष केंद्रित केले.
ड्रोन सतत नष्ट होत असल्याने होणारा खर्च वाढत गेला आणि अचूक मार्गदर्शित क्षेपणास्त्रांचा साठा कमी होऊ लागल्यामुळे रशियाने इराणनिर्मित शाहेद ड्रोन वापरण्याचा निर्णय घेतला. शाहेद हे शत्रूच्या प्रदेशात खोलवर जाऊन हल्ला करू शकणारे आत्मघातकी ड्रोन आहेत. हे ड्रोन लोइटरिंग म्युनिशन प्रकारात येतात म्हणजेच ते लक्ष्याच्या परिसरात काही वेळ घिरट्या घालून योग्य क्षणाची वाट पाहून हल्ला करतात. इराणचे शाहेद 131 आणि शाहेद 136 हे ड्रोन रशियामध्ये गेरान 1 आणि गेरान 2 या नावांनी वापरात आणले गेले. मध्यम उंचीवर दीर्घकाळ उड्डाण करू शकणारे ड्रोन असुरक्षित ठरत असताना हे तुलनेने स्वस्त ड्रोन सुमारे वीस हजार अमेरिकी डॉलर्स इतक्या किमतीत प्रभावी हल्ल्याचा पर्याय ठरले. शाहेद ड्रोनचा वापर एकाच वेळी मोठ्या संख्येने समन्वयित हल्ल्यांसाठी करण्यात आला ज्यामुळे युक्रेनच्या हवाई संरक्षण यंत्रणेवर मोठा ताण आला आणि त्यांना महागडी संरक्षणात्मक साधने वापरावी लागली. या ड्रोनच्या मदतीने युक्रेनच्या महत्त्वाच्या पायाभूत सुविधांवरही हल्ले करण्यात आले. यावरून रशियाने केवळ टेहळणीवर आधारित ड्रोन वापरातून पुढे जाऊन सामूहिक आणि रणनीतिक ड्रोन डावपेच स्वीकारल्याचे स्पष्ट होते.
2023 पर्यंत रशियाच्या ड्रोन युद्धपद्धतीत समतोल बदल झाला आणि फर्स्ट पर्सन व्ह्यू ड्रोनचा मोठ्या प्रमाणावर वापर सुरू झाला. या ड्रोनमध्ये बसवलेल्या कॅमेऱ्यांमधून थेट व्हिडिओ प्रसारित होतो त्यामुळे जमिनीवरील ऑपरेटरला प्रत्यक्ष समोरून पाहत असल्यासारखा अनुभव मिळतो. एफपीव्ही ड्रोनमुळे रणांगण अधिक स्पष्टपणे दिसू लागले आणि सर्वत्र नजर ठेवणे शक्य झाले. सुरुवातीला हे ड्रोन पायदळाला मदत करणे आणि गुप्तचर व पाळत कामांसाठी वापरले जात होते. मात्र थोड्याच काळात त्यांचा वापर स्फोटके वाहून नेऊन हल्ले करण्यासाठी होऊ लागला. रशियन उद्योगांनी या ड्रोनचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन सुरू केल्याने हा बदल अधिक वेगाने घडून आला. कार्यपातळीवर रशियाने खास ड्रोन हल्ला पथके तयार केली ज्यांना वेगवेगळ्या भागांत पटकन तैनात करता येत होते. लढाऊ ड्रोनच्या निर्मितीला प्राधान्य देण्यात आले. लॅन्सेट आणि केयूबी एलए या स्वदेशी ड्रोनचे उत्पादन वाढवण्यात आले तसेच अलाबुगा विशेष आर्थिक क्षेत्रात शाहेद ड्रोनचे स्थानिक उत्पादन सुरू करण्यात आले.
युद्धाच्या तिसऱ्या वर्षापर्यंत ड्रोनमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर सुरू झाला. युक्रेनच्या इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर क्षमतांमध्ये वाढ झाल्यामुळे रशियाने अधिक प्रगत आणि AI वर आधारित ड्रोन विकसित केले. हे ड्रोन हवाई संरक्षण टाळू शकतात आणि लक्ष्य अधिक अचूकपणे ओळखू शकतात. यामुळे अर्धस्वायत्त आणि ईडब्ल्यूला प्रतिकार करणारी ड्रोन युद्धपद्धती आकाराला आली. 2024 पर्यंत दृश्यमानता आणि पल्ल्यात सुधारणा झाल्याने रशियन यूएव्हींच्या गुप्तचर आणि पाळत क्षमतांमध्ये मोठा बदल झाला. मॉस्कोने रेडिओ सिग्नल ओळखू शकणारे सुपरकॅम टेहळणी ड्रोन तयार करण्यास सुरुवात केली जे संभाव्य धोके ओळखून त्यांना चुकवू शकतात. याशिवाय ड्रोनमध्ये जॅमर आणि मशीन व्हिजन कॅमेरे यांसारख्या तांत्रिक सुधारणा करण्यात आल्या.
सध्या ड्रोन युद्धपद्धती रशियन लष्करी सिद्धांताचा अविभाज्य भाग बनली आहे. ड्रोनच्या वापरावर लक्ष ठेवण्यासाठी मॉस्कोने स्वतंत्र शाखा स्थापन केली आहे. रुबिकॉनसारख्या विशेष ड्रोन पथकांच्या स्थापनेनंतर हा टप्पा गाठण्यात आला असून युक्रेनच्या कुर्स्क आक्रमणाला दिलेल्या रशियन प्रतिसादात या पथकांनी महत्त्वाची भूमिका बजावली. रणनैतिक पातळीवर रशियाने आता अग्रभागावर युक्रेनच्या पुरवठा साखळीवर आघात करण्यावर भर दिला आहे. मॉस्कोने युक्रेनच्या आत सुमारे चाळीस किलोमीटरचे प्रतिबंधक क्षेत्र तयार केले असून त्यामुळे युक्रेनियन दलांचा दळणवळण आणि पुरवठा अडथळलेला आहे. हे खोल प्रतिबंधन सतत सामूहिक ड्रोन हल्ल्यांद्वारे टिकवून ठेवले जात असून सध्या रशिया दररोज सुमारे सातशे ड्रोन विशेषतः एफपीव्ही ड्रोन वापरून हल्ले करत आहे.
ड्रोन युद्धपद्धती आता रशियन लष्करी सिद्धांताचा अविभाज्य भाग बनली आहे. ड्रोनच्या प्रत्यक्ष वापरावर लक्ष ठेवण्यासाठी मॉस्कोने स्वतंत्र विभाग स्थापन केला आहे. रुबिकॉनसारख्या विशेष ड्रोन पथकांची स्थापना झाल्यानंतर हा टप्पा गाठण्यात आला असून, युक्रेनच्या कुर्स्क आक्रमणाला दिलेल्या रशियन प्रतिसादात या पथकांनी निर्णायक भूमिका बजावली.
साध्या टेहळणी ड्रोनपासून AI वर आधारित हल्ला प्रणाली, एफपीव्ही ड्रोनचे समूह आणि मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या क्षीणतेच्या हल्ल्यांपर्यंत रशियाने केलेला वेगवान बदल हे दाखवून देतो की स्वस्त, मोठ्या प्रमाणावर वापरता येणारे आणि हळूहळू अधिक स्वायत्त होत जाणारे तंत्रज्ञान आधुनिक युद्धपद्धती कशी बदलत आहे. संघर्ष पाचव्या वर्षात प्रवेश करत असताना मानवरहित साधनांवर आणि क्षीणतेवर आधारित लढाया वाढत असलेल्या या काळात सैन्यदलांना किती वेगाने स्वतःला बदलावे लागते हे रशियाची ड्रोन रणनीती स्पष्टपणे दर्शवते.
कार्तिक बोम्मकांती हे ऑब्झर्वर रिसर्च फाउंडेशनचे सिनियर फेलो आहेत.
मोहम्मद मुस्तफा ऑब्झर्वर रिसर्च फाउंडेशनमध्ये रिसर्च इंटर्न आहेत.
The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.
Kartik is a Senior Fellow with the Strategic Studies Programme. He is currently working on issues related to land warfare and armies, especially the India ...
Read More +
Mohammad Mustafa is a Research Intern at the Observer Research Foundation. ...
Read More +