Author : Soumya Awasthi

Expert Speak Raisina Debates
Published on Jan 27, 2026 Updated 5 Hours ago

स्वतःचा भूभाग किंवा प्रदेश गमावलेला असला तरी, ISIS आजही डिजिटल माध्यमांच्या जाळ्याद्वारे आपला जागतिक प्रभाव टिकवून आहे. थेट संपर्क किंवा नियंत्रणाशिवाय कट्टरता पसरवणे, तरुणांना संघटित करणे आणि हिंसेसाठी प्रवृत्त करण्यात ही डिजिटल यंत्रणा यशस्वी ठरत आहे.

बंदुकीऐवजी मोबाईल: डिजिटल युगातील ISIS चा धोकादायक खेळ

Image Source: Getty Images

    द इस्लामिक स्टेट अर्थात आयसिसने इराक आणि सिरियातील आपली स्वयंघोषित हुकुमत (खलिफत) गमावून सुमारे अर्धं दशक लोटलं, पण आजही जागतिक स्तरावर विचारसरणी म्हणून आयसिसने आपलं वर्चस्व मात्र गमावलेलं नाही. अल नबा या आपल्या वार्तापत्रात द प्राईड ऑफ सिडनी या लेखात आयसिसने लोकांची माथी भडकवण्यासाठी, त्यांना एकत्र आणण्यासाठी आणि हल्ले घडवून आणण्यासाठी ऑनलाईन प्लॅटफॉर्म्सचा वापर कसा केला जातो, याचे ऑस्ट्रेलियातील बॉंडी बीचवर झालेला दहशतवादी हल्ला हे एक चपखल उदाहरण आहे. 2025 मध्ये आयसिसचे डिजिटल ऑपरेशन हा त्यांच्या मोडस ऑपरेंडीचा एक महत्त्वाचा भाग राहिले आहेत. आपली उद्दीष्ट साध्य करण्यात, स्वतःचा जागतिक प्रभाव टिकवण्यात आणि खास करुन बहुतांश वेळ ऑनलाईन असलेल्या आणि मूलतत्तवादी कारवायांबाबत असुरक्षिततेच्या सावटाखाली असलेल्या तरुण लोकसंख्येला लक्ष्य करणं त्यांना सहज शक्य होत आहे.

    2025 मध्ये आयसिसचे डिजिटल ऑपरेशन हा त्यांच्या मोडस ऑपरेंडीचा एक महत्त्वाचा भाग राहिले आहेत. आपली उद्दीष्ट साध्य करण्यात, स्वतःचा जागतिक प्रभाव टिकवण्यात आणि खास करुन बहुतांश वेळ ऑनलाईन असलेल्या आणि मूलतत्तवादी कारवायांबाबत असुरक्षिततेच्या सावटाखाली असलेल्या तरुण लोकसंख्येला लक्ष्य करणं त्यांना सहज शक्य होत आहे.

    ऑस्ट्रेलियातील बाँडी बीचपासून ते युरोप, उत्तर अमेरिकेपासून सर्वत्र सुरु असलेले तुरळक कट अशा सर्व समकालीन जिहादी कारवायांमधून एक गोष्ट प्रकर्षाने दिसून येते, ती म्हणजे माणसांच्या थेट संपर्कात न येता, फक्त ऑनलाईन अवलंबून त्यांना हिंसेकडे वळवता येते हे स्पष्ट झाले आहे.

    ईमेज: अल नबा 526, डिसेंबर 2025

    Staying In The Feed The Islamic State S Digital Survival Strategy

    स्रोत: MEMRI आणि गुगल ट्रान्सलेट

    आयसिसचं डिजिटल अस्तित्व तीन परस्परव्यापी थरांमध्ये कार्यरत आहे. सगळ्यात आधी ते हिंसेचं समर्थन करणारे, उपदेशपर व्हिडिओ, वार्तापत्र, भित्तीपत्र असा मजकूर प्रसारित करतात. हिंसेला धार्मिक मान्यता आहे आणि समाजासाठी ती आवश्यक आहे असे ते भासवतात. दुसरे म्हणजे सहानुभुतीदारांना नैतिक बळ देण्यासाठी, त्यांचे मनोधैर्य वाढवण्यासाठी ते ऑनलाईन स्पेसचा वापर करतात. त्यासाठी माणसे नेमण्याऐवजी समुह संवादावर त्यांचा भर असतो. तिसरी आणि सर्वात चिंतेची गोष्ट म्हणजे कमीत कमी मार्गदर्शन, संसाधन किंवा संघटनात्मक रचनेची गरज नसलेल्या कृतीचं मॉडेल त्यासाठी विकसित केलं जातं.  

    एकाकी किंवा आत्मघाती हल्ले करणाऱ्यांना शोधणं अवघड आहे. असे हल्ले घडवणं तुलनेने स्वस्तही आहे.

    या बदलामध्ये एक हिशेबी व्यूहरचना आहे. एकाकी किंवा आत्मघाती हल्ले करणाऱ्यांना शोधणं अवघड आहे. असे हल्ले घडवणं तुलनेने स्वस्तही आहे. नेतृत्वाला नामोहरम करण्यासाठी ते अधिक उपयुक्तही आहेत. त्यामुळे आयसिसचं भौतिक अस्तित्व उद्ध्वस्त झालं तरी आपली छाप कायम ठेवणं त्यांना शक्य होतं. 

    पारंपरिक संदेशवहनापलीकडील ऑनलाईन प्रपोगंडा

    आयसिसची ऑनलाईन संज्ञापनाची रणनिती नेहमी बहुआयामी राहिली आहे. उच्च दर्जाचे व्हिज्युअल मेसेज एकाच वेळी विविध खंडांतील, विविध भाषक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवले जातात. 2015 मध्ये आयसिसची सुमारे 46,000 ट्विटर अकाउंट्स होती. या अकाउंट्सद्वारे विविध भांषांतील मजकूर एकाच वेळी प्रसारित केला जात असे. आता या अकाउंट्सची संख्या कमी झाली आहे. अर्थात आजही एक्स, टेलिग्राम, टिकटॉक, फेसबुक, इंस्टाग्राम आणि युट्यूब सारख्या व्यासपीठांवरुन ते आपले काम करत आहेत.    

    2024 पर्यंत आयसिसशी संलग्न अकाउंट्सची अंदाजे संख्या - 

    सोशल मीडिया 

    खात्यांची संख्या 

    केले जाणारे काम

    टेलिग्राम 

    6 ते 8,000 ॲक्टिव अकाउंट्स आणि चॅनल्स

    कार्यात्मक संदेशवहन. विचारसरणीचा प्रचार प्रसार. पडझडीनंतर पुन्हा तातडीने काम पुन्हा सुरु करण्यासाठी. 

    एक्स (ट्विटर)

    1,500 ते 3,000 ॲक्टिव अकाउंट्स

    ओरिजिनेटर्स नव्हेत तर ॲंप्लिफायर्स. प्रचंड चर्चा आणि वैचारिक घुसळण.     

    टिकटॉक

    6 ते 8,000 ॲक्टिव अकाउंट्स. चॅनेल्स.

    अल्पवयीनांसाठी परिणामकारक कंटेंट तयार करणे आणि पसरवणे. 

    फेसबुक, इन्स्टाग्राम 

    1,000 पेक्षा जास्त

    लो व्हिजिबिलिटी समर्थक आणि पुनर्वापर केलेले साहित्य

    युट्यूब 

    300 पेक्षा जास्त

    री अपलोड्स, संग्राह्य साहित्य, दीर्घ प्रवचने इत्यादी.

    रॉकेटचॅट्स, हूप, मॅट्रिक्स आणि इतर

    संख्येची नेमकी नोंद नाही. 

    विकेंद्रित आणि एन्क्रिप्टेड परिसंस्थेच्या दिशेने मार्गक्रमण.

    स्रोत - लेखक आणि युनिस करिमी, 2024

    ऑनलाईन माध्यमातील ही सातत्यपूर्ण ऑनलाईन उपस्थिती दोन कारणांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. आयसिस आणि तिच्याशी संलग्न संस्था दहशतवाद हे धर्मकार्य असल्याचे, पाश्चात्य हस्तक्षेप हा संस्कृतीवरील, अस्तित्वावरील घाला असल्याचे आणि बलिदान हेही धर्मकार्य असल्याचा विचार सांस्कृतिक आणि भाषिक संदेशांतून माथी मारण्यासाठी हे सातत्य महत्त्वाचं ठरतं. दुसरं म्हणजे या प्रकारच्या संदेशांचा समांतर प्रचार इंटरनेटवरील शेअर, रिपोस्ट, कमेंट थ्रेड्स मार्फत अधिक प्रभावी होतो, त्यासाठी मुख्य प्रवाहातील माध्यमांवर अवलंबून राहावं लागत नाही. 

    डिजिटल स्पेसमधील भरती

    आधीच्या दशकातील विविध स्तरीय भरती प्रक्रियेपेक्षा वेगळी, आधुनिक आणि ऑनलाईन चॅनेल्स, प्रायोरिटी नेटवर्क्सच्या आधारावर माणसांना एकत्र आणण्यावर आयसिसची सध्याची व्यूहरचना भर देते. त्यामुळे या समुहाला सायबर खलिफत असं बिरुदही मिळालं आहे. या डिजिटल इकोसिस्टिममुळे केवळ विचारसरणीचा प्रचार प्रसार होतो असं नाही तर समविचारी आणि सहानुभूतीदारांना एकमेकांशी जोडण्यास पण ही इकोसिस्टिम उपयुक्त ठरते.    

    या डिजिटल इकोसिस्टिममुळे केवळ विचारसरणीचा प्रचार प्रसार होतो असं नाही तर समविचारी आणि सहानुभूतीदारांना एकमेकांशी जोडण्यास पण ही इकोसिस्टिम उपयुक्त ठरते.    

    उदा. युरोपूल 2023 च्या अहवालानुसार बहुतेक जिहादी प्रचार हा आता सोशल मीडिया आणि टेलिग्राम, रॉकेट चॅट, डिस्कॉर्ड सारख्या एनक्रिप्टेड व्यासपीठांवरुन होतो. त्यामुळे प्रामुख्याने ऑनलाईन माध्यमातून माथी भडकवण्यात आलेले एकेकटे आयसिस प्रेरित एकाकी हल्लेखोर स्वतंत्रपणे हिंसा करण्यास प्रवृत्त होतात. 2020 मधील व्हिएन्ना हल्ला, 2021 मधील ऑकलंड सुपरमार्केटमधील चाकू हल्ल्याची घटना, त्याच वर्षीचा नॉर्वेतील धनुष्यबाणाचा वापर करुन केलेल्या हल्ल्याचा प्रकार अशा अनेक घटना या आयसिस प्रेरित हिंसाचाराची उदाहरणं आहेत. ऑस्ट्रेलियात अगदी नुकताच झालेला बॉंडी बीच अटॅक हाही आयसिस प्रेरित दहशतवादाचं उदाहरण आहे. रचनात्मक संघटनात्मक नियंत्रण नसूनही डिजिटल कट्टरपंथी कारवाया कशा वाढीस लागू शकतात तेच या घटनांवरुन स्पष्ट होतं. 

    ऑनलाईन प्रेषक कोण, प्रभावाचे प्रमाण?  

    प्रदेश, भाषा, ऑनलाईन व्यासपीठ इ. निहाय आकडेवारी उपलब्ध नसल्यामुळे त्याचा एकसमान 'डेटा' नाही. त्यामुळेच आयसिसच्या विचाराने प्रभावित झालेल्या नागरिकांच्या संख्येचा अंदाज लावणं अवघड आहे. त्यामुळे असे नवीन प्रयत्न शोधणे आणि रोखणेही दुरापास्त आहे. विशिष्ट कंटेंटचे 'पॅसिव्ह कंझम्प्शन' आणि अतिरेकी विचारांच्या व्यासपीठांवरील सक्रीय सहभाग, कार्यपद्धतीचे नियोजन इ. गोष्टींमुळे आयसिसचा ऑनलाईन उपस्थिती अधिक प्रकर्षाने दिसते.

    जिहादी एकत्रीकरणाच्या पूर्वीच्या कारवायांंमध्ये होती तशी प्रत्यक्ष किंवा समोरासमोर भरतीची गरज राहिलेली नाही. ऑनलाईन व्यवस्थेमुळे एनक्रिप्टेड व्यासपीठांवर जाण्याआधी आयसिसच्या जवळच्या विचारांशी स्वतंत्रपणे विविध व्यासपीठांवर जवळीक साधणं युरोप, दक्षिण आणि पश्चिम आशियातील व्यक्तींना शक्य होत आहे.      

    आयसिसच्या विचारधारेच्या कक्षेकडे आकर्षित होणारे बहुतेक जण हे तरुण आहेत. ते डिजिटली फ्लूएन्टही आहेत. स्वतःच्या आयुष्यात अनेक सामाजिक-राजकीय ओळखींच्या क्लिष्ट प्रश्नांना ते आपापल्या समुदायांमध्ये तोंड देत असतात. त्यामुळे त्यांच्या ऑनलाईन अस्तित्वाची सुरुवातच कुतुहलाने होते. त्यांना आदर्श जगाची स्वप्न दाखवणारं प्रागतिक एक्सपोजर हे त्यानंतर येतं. विविध समाजातल्या तरुणांच्या असुरक्षिततेचा गैरफायदाही घेतला जातो. सोशल मीडिया अल्गोरिदम्समुळे अशा तरुणांना त्यांच्या आतल्या आवाजांचा अतिरेकी प्रतिध्वनी सोशल मीडियावर ऐकू येतो. त्यातून त्यांचा पॅसिव्ह कंझम्प्शन टू ॲक्टिव्ह फॉलोइंग असा प्रवास सुरु होतो.    

    अल नबा, अमाक आणि त्यांच्यासारखे अनेक अधिकृत असलेले आणि नसलेले पुरस्कर्ते हे सामाजिक दरी, जागतिक घटना आणि घडामोडी, निवडक संदर्भ यांच्या आधाराने हल्ले करत आणि वैचारिक 'नॅरेटिव्ह' निर्माण करत राहातात. प्रोपगंडा व्हिडिओ, मॅन्युअल्स, चर्चांचे गट त्यांना विविध माध्यमांतून प्रसिद्धी देत राहातात. अशा परिसंस्थेला सातत्याने नवनवीन 'कंटेंट' निर्माण करत बसण्याची गरज नसते. संग्राह्य साहित्याचा पुन्हा पुन्हा मात्र प्रभावी वापर करत राहाणंही त्यांना पुरेसं असतं.  

    टेबल- ऑनलाईन प्रभावाचं प्रमाण (सभासदत्व नसलेले)

    क्षेत्र 

    फॉलोअर्स

    काय करतात? 

    युरोप 

    1.2 - 1.8 मिलिअन

    दुसऱ्या पिढीतील स्थलांतरित आणि तुरुंगातील लोकसंख्येला कट्टरतावादाचा धोका. 

    दक्षिण आशिया

    3.5 मिलिअन

    स्थानिक जिहादी समुहांशी विचारधारेची स्पर्धा.

    पश्चिम आशिया आणि मध्यपूर्व

    8-12 मिलिअन

    लिगसी नेटवर्क्स, संघर्षाच्या स्मृती आणि तक्रारींचं एकत्रीकरण.

    जागतिक

    20-25 मिलिअन

    क्रांतीकारी प्रकरणांचे एक्सपोजर. अल्गोरिदम रिच.

    स्रोत - लेखक स्वतः आणि युनिस करिमी, 2024

    हल्ल्यांचं श्रेय आणि जबाबदारी  

    ऑस्ट्रेलियातील बाँडी बीच वरील दहशतवादी हल्ल्यानंतर आता एक नवंच आव्हान समोर आलं आहे. एखाद्या संघटनेचा त्या हल्ल्यातील प्रत्यक्ष सहभाग आणि त्या हल्ल्यानंतर ऑनलाईन घेतले जाणारे श्रेय यातला फरक ओळखण्याचं ते आव्हान आहे. आयसिस आणि संलग्न संघटना या अनधिकृत व्यासपीठांवर आणि एनक्रिप्टेट चॅनल्सवर त्या हल्ल्यांवर दावा सांगतात. तसा दावा सांगणारे संदेश मेसेजिंग नेटवर्क्सद्वारे जागतिक व्यासपीठांवरुन प्रसारित केले जातात. थेट दुवे पडताळून न पाहताच मग एक सुनियोजित मोहिम राबवल्याचा भास निर्माण केला जातो.

    2024 पर्यंत आयसिस संलग्न माध्यमं आणि त्यांना पाठबळ देणाऱ्या नेटवर्क्सनी जगभरातील, काही वेळा युरोप, दक्षिण आशियातील अशा 400 घटनांवर दावे सांगितले. हे दावे पडताळून पाहण्याआधीच ते मागेही घेण्यात आले. डिजिटली असे दावे करणे हे पुरावा कमी आणि स्ट्रॅटेजिक सिग्नलिंग म्हणूनच वाढताना दिसते. त्यामुळे अशा दावा करण्याला केवळ इन्फॉर्मेशन ऑपरेशनपुरतंच पाहिलं जाणं आवश्यक आहे.

    डिजिटली असे दावे करणे हे पुरावा कमी आणि स्ट्रॅटेजिक सिग्नलिंग म्हणूनच वाढताना दिसते. त्यामुळे अशा दावा करण्याला केवळ इन्फॉर्मेशन ऑपरेशनपुरतंच पाहिलं जाणं आवश्यक आहे.

    हल्ल्यांवर दावा करुन त्यांचं श्रेय घेण्याच्या या पद्धतीचे दोन धोरणात्मक परिणाम दिसतात. एका बाजूला त्यामुळे धोक्याचं मूल्यमापन करणं अवघड होतं, प्रेरित किंवा स्वायत्त कृती आणि केंद्रिय समन्वयातून राबवल्या जाणाऱ्या मोहिमा यांच्यात फरक करणंही कठीण होतं. दुसऱ्या बाजूला त्यामुळे या कथित संघटनांचा 'रीच' वाढण्यास त्यांची कृत्रिम मदत होते. त्यामुळेच प्रपोगंडा म्हणून हल्ल्यांवर दावा करणं आणि खरोखरची संघटनात्मक गुंतवणूक यांमध्ये स्पष्ट फरक करता येणं आणि पोकळ गृहितकं आणि दावे यांना पब्लिक डिस्कोर्समध्ये स्थान नसणं अत्यावश्यक आहे. 

    धोरण आणि धोरणात्मक विचार 

    ऑनलाईन माध्यमातील अतिरेकाला परिणामकारकपणे हाताळण्यासाठी धोरणकर्ते आणि नागरिक या दोघांकडूनही एकत्रित कृती आवश्यक आहे. धोरणकर्त्यांनी आता ऑटोमेटेड कंटेंट रिमूव्हल पलिकडे जाऊन थोडा अधिक सूक्ष्मपणे विचार करण्याची गरज आहे. संदर्भ आणि भाषिक विश्लेषण यांच्या मदतीने अतिरेकी कंटेंट कसा तयार होतो आणि तो एका व्यासपीठावरुन दुसऱ्या व्यासपीठावर कसा जातो याचा बारकाईने अभ्यास करणं आवश्यक आहे. या सगळ्याला अल्गोरिदम्सच्या मदतीने एखादा कंटेंट कसा पसरवला जातो, नवीन डिजिटल जगात आणि प्रपोगंडा यांची सांगड कशी घातली जाते आणि माणसं कट्टरतेच्या मार्गावर कशी पुढे जातात अशा मुद्द्यांवरील आंतरशाखीय संशोधनाची जोड देणंही महत्त्वाचं आहे. अशा संशोधनातून समोर आलेले पुराव्यावर आधारित निष्कर्ष हे धोरण ठरवण्यासाठी, ती धोरणं अधिकाधिक अचूक करण्यासाठी आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं महत्त्व कमी न करणारी धोरणं निर्माण करणंही आवश्यक ठरणार आहे. या सगळ्याच्या बरोबरीने पॅसिव्ह वैचारिक सहानुभुती आणि सक्रीय हेतू यांच्यामधील फरक स्पष्ट करता येणं, त्यातून धोक्याचं मुल्यांकन करता येणं, जेणेकरुन सर्व प्रकारची संसाधनं ही विश्वासार्ह जोखमीसाठी वापरता येतील हेही अत्यंत महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर प्रतिबंधात्मक आणि पुनर्वसनात्मक उपाय हे कट्टरतावादाला त्याच्या प्राथमिक टप्प्यावरच संबोधित करु शकतील. या धोरणांबरोबरच डिजिटल साक्षरता, स्थानिक सहभाग आणि सांस्कृतिकदृष्ट्या विश्वासार्ह काउंटर नरेटिव्ह तयार करणे अशा कृतींमधून सामाजिक जाणीव निर्माण करण्यातील नागरिकांची भूमिकाही महत्त्वाची ठरणार आहे. अतिरेकी विचारांच्या प्रचार आणि प्रसाराला आव्हान देणाऱ्या सामाजिक आवाजाला बळकटी देणंही आवश्यक आहे. 

    निष्कर्ष

    आयसिस आणि तिच्या संलग्न संस्था या पोस्ट टेरिटोरियल क्रांतीशी जुळवून घेताना दिसतात. ते करण्यासाठी इंटरनेटचा वापर हे त्यांचं धोरण आहे. डिजिटल युगाने अतिरेकी विचार आणि त्याचा प्रचार प्रसार स्वस्त, वेगवान आणि कस्टमाईजही केला आहे. त्यामुळे सहभागातील मर्यादाही कमी झाली आहे. भरतीचे निकषही त्यामुळे इन्फ्लूएन्सर्स आणि इन्स्पिरेशन या स्तरावर गेले आहेत. हा बदल समजून घेण्यासाठी ऑनलाईन कट्टरतावादाला बळ देणाऱ्या मानवी गतीशीलतेचं आणि सहानुभुती या दोन्ही गोष्टींचं सूक्ष्म विश्लेषण करणं गरजेचं आहे.

    सरकार, नागरिक आणि टेक्नॉलॉजीकल प्लॅटफॉर्म्स यांच्यासमोरील आव्हान हे फक्त आक्षेपार्ह कंटेंट हटवणे हा नसून संवेनशील व्यक्ती त्या विचाराकडे आकर्षित होणार नाहीत यासाठीची खबरदारी घेणे हा आहे. त्यासाठी केवळ सुरक्षा यंत्रणा बळकट करणं पुरेसं नाही तर शाश्वत संशोधन, सामाजिक सहभाग यांना प्राधान्य देणंही आवश्यक आहे. पारंपरिक युद्धभूमी पलिकडे गेलेल्या धोक्यांना तोंड देण्यासाठी दृष्टीकोनही अधिक व्यापक करणंही तितकंच महत्त्वाचं आहे. 


    सौम्या अवस्थी या ऑब्झर्व्हर रिसर्च फाऊंडेशनमध्ये सेंटर फॉर सिक्युरिटी, स्ट्रॅटेजी अँड टेक्नॉलॉजी (CSST) फेलो आहेत.

    The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.