Author : Soumya Awasthi

Expert Speak Raisina Debates
Published on Mar 27, 2026 Updated 0 Hours ago

सायबर ऑपरेशन्सपासून इलेक्ट्रॉनिक युद्धापर्यंत, इराणविरुद्ध अमेरिका–इस्रायल मोहिमेतून स्पष्ट होते की आधुनिक संघर्षांच्या निकालावर स्पेक्ट्रमवरील वर्चस्व अधिकाधिक निर्णायक ठरत आहे.

क्षेपणास्त्रांआधी 'सिग्नल्स'ची लढाई: इराण युद्धात इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर

    अमेरिका-इस्रायलचे इराणविरुद्धचे युद्ध जरी क्षेपणास्त्रे आणि ड्रोनद्वारे लढले जात असले, तरी त्यातील काही सर्वात महत्त्वाच्या लढाया अदृश्य राहिल्या आहेत. विद्युतचुंबकीय म्हणजेच इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम हे धोरणात्मक स्पर्धेचे प्रमुख क्षेत्र म्हणून उदयास आले आहे, जे औपचारिक युद्धघोषणेच्या मर्यादेखाली कार्यरत राहूनही मोठ्या प्रमाणावर परिणाम घडवते. इलेक्ट्रॉनिक युद्ध, सायबर ऑपरेशन्स आणि माहितीवरील वर्चस्व यांचा असा संगम, जो जाणीवपूर्वक या मर्यादेखाली अंमलात आणला जातो, तो “ग्रे झोन” संघर्षाच्या अभ्यासकांनी मांडलेल्या संकल्पनांना प्रत्यक्षात मोठ्या प्रमाणावर आणि उच्च दर्जाच्या प्रगल्भतेसह साकार झालेले दाखवतो.

    याचे परिणाम आधुनिक युद्धविषयक विचारसरणीसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. 28 फेब्रुवारी 2026 रोजी अमेरिका आणि इस्रायलने ऑपरेशन एपिक फ्युरी (Operation Epic Fury) सुरू केले, तेव्हा सुरुवातीची पावले B-2 बॉम्बर्स किंवा टॉमहॉक (Tomahawk) क्षेपणास्त्रांची नव्हती तर त्याऐवजी, एक अदृश्य हल्ला होता ज्याने पुढील संघर्षाची दिशा ठरवली. पहिले आक्रमक विमान इराणच्या हवाई क्षेत्रात प्रवेश करण्यापूर्वीच, तेथील इलेक्ट्रोमॅग्नेटिक वातावरण पद्धतशीरपणे निष्क्रिय करण्यात आले होते, रडार निष्क्रिय (ब्लाइंड) केले गेले, कमांड-आणि-कंट्रोल दुवे तोडले गेले आणि संवाद नेटवर्क खंडित करण्यात आले. त्यानंतर झालेली प्रत्यक्ष कारवाई ही, खऱ्या अर्थाने, आधीच स्पेक्ट्रममध्ये निर्णीत झालेल्या युद्धाची फक्त दृश्यमान पातळी होती.

    ही बाब इराण संघर्षातील केवळ एक तळटीप नाही; तर ती त्यातील एक महत्वाची शिकवण आहे. या युद्धात दिसून आलेली प्रत्यक्ष, इलेक्ट्रॉनिक आणि सायबर ऑपरेशन्सची सांगड आधुनिक युद्ध कसे लढले जाते यामध्ये मोठा बदल दर्शवते, ज्यामुळे लष्करी शक्ती, प्रतिबंध आणि नागरी पायाभूत सुविधांची असुरक्षितता याबाबतच्या पारंपरिक समजुतींना आव्हान मिळते. त्यामुळे, स्वतःच्या सुरक्षेला गांभीर्याने घेणाऱ्या कोणत्याही राष्ट्रासाठी या बदलत्या स्वरूपाचे आकलन करणे अत्यावश्यक ठरते.

    इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रममधील अमेरिका–इस्रायल मोहीम

    ऑपरेशन एपिक फ्युरीच्या सुरुवातीच्या तासांमध्ये इराणचे हवाई संरक्षण रडार आणि संवाद प्रणाली निष्क्रिय करण्यात अमेरिकन नौदलाचे EA-18G Growler (ग्रोव्लर) हे इलेक्ट्रॉनिक युद्धासाठी विशेष तयार केलेले विमान महत्त्वाचे ठरले. अहवालानुसार, अमेरिका B-2 स्पिरीट बॉम्बर आणि F-35 लढाऊ विमानांसारखी स्टेल्थ विमाने तैनात करत होती, ज्यांच्यासोबत EA-18G ग्रोव्लर हे शत्रूच्या रडार आणि संवाद प्रणालींमध्ये अडथळा आणण्याचे मुख्य कार्य पार पाडत होते. याशिवाय, अमेरिकी स्पेस फोर्सच्या उपग्रह प्रणालींनी क्षेपणास्त्रांची पूर्वसूचना आणि गुप्तचर माहिती रिअल-टाइममध्ये पुरवली. या संपूर्ण कारवाईचा क्रम स्पष्ट होता: आधी दडपणे, मग निष्क्रिय करणे आणि शेवटी हल्ला करणे.

    हल्ल्यानंतर काही तासांतच इराणची संवाद व्यवस्था गंभीररीत्या खंडित झाली. इंटरनेट कनेक्टिव्हिटी साधारणतः केवळ 4 टक्क्यांपर्यंत घसरली. सरकारी सेवा विस्कळीत झाल्या आणि राज्य नियंत्रित दूरचित्रवाणीच्या उपग्रह प्रसारणांमध्ये हस्तक्षेप करून शासनबदल समर्थक संदेश प्रसारित करण्यात आले.

    विशेष म्हणजे, लाखो इराणी नागरिक वापरत असलेले बडे साब कॅलेंडर (Bade Saba Calendar) हे एक साधे धार्मिक ॲप सायबर-मानसिक मोहिमेसाठी प्रभावी माध्यम बनले. इस्रायलने या ॲपमध्ये छेडछाड करून वापरकर्त्यांना “मदत पोहोचली आहे, घाबरू नका” असे संदेश पाठवले. ही पूर्वनियोजित मानसशास्त्रीय मोहीम प्रत्यक्ष हल्ल्यांसोबत समन्वय साधून राबवण्यात आली होती, ज्यावरून यासाठी अनेक महिने आधीपासून तयारी आणि पोहोच मिळवलेली असल्याचे सूचित होते.

    याआधी जुन 2025 मध्ये ऑपरेशन रायझिंग लायन दरम्यान, इस्रायलच्या 5114 व्या स्पेक्ट्रम वॉरफेअर बटालियनने प्रत्यक्ष वेळेत (रिअल-टाइम) इलेक्ट्रोमॅग्नेटिक (विद्युतचुंबकीय) स्पेक्ट्रममध्ये हस्तक्षेप करून इस्रायलवर येणाऱ्या ड्रोन हल्ल्यांचा मोठा भाग निष्प्रभ केला होता. या मोहिमेनंतर इस्रायली संरक्षण दलाने (इस्रायल डिफेन्स फोर्स-IDF) आपल्या C4I संचलनालयाची पुनर्रचना करत कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि स्पेक्ट्रम विभाग स्वतंत्रपणे स्थापन केले. यातून इलेक्ट्रॉनिक युद्ध आणि AI हे आता पूरक साधन न राहता हवाई संरक्षणाचे प्रमुख घटक बनल्याचे स्पष्ट होते.

    असममितीय फायद्याच्या शोधात इराण (Iran’s Search for Asymmetric Advantage)

    इराणची इलेक्ट्रॉनिक युद्ध प्रतिक्रिया मर्यादित असली तरी ती पूर्णपणे दुर्लक्षित करता येणार नाही. त्यांचे सर्वाधिक यश हवाई क्षेत्रात नसून समुद्रात दिसून आले. जगातील सुमारे 20 टक्के तेल वाहतूक होणाऱ्या 39 किलोमीटर रुंद हॉर्मुझ सामुद्रधुनीत फेब्रुवारी 2026 पासून लष्करी आणि व्यापारी जहाजांवर परिणाम करणारे प्रगत इलेक्ट्रॉनिक हस्तक्षेप दिसून आले आहेत. ओपन-सोर्स गुप्तचर माहितीप्रमाणे, अमेरिका–इस्रायल हल्ल्यानंतर अवघ्या 24 तासांत UAE, कतार, ओमान आणि इराणच्या पाण्यातील 1,100 हून अधिक व्यापारी जहाजांनी नेव्हिगेशन बिघाडाची नोंद केली. जहाजांवरील GPS प्रणालींनी त्यांचे स्थान विमानतळ, अणुऊर्जा केंद्रे किंवा भूभागातील इतर ठिकाणी दाखवले, जे सक्रिय “स्पूफिंग” म्हणजेच छेडछाडीचे ठळक उदाहरण आहे. पहिल्या आठवड्याच्या अखेरीस लॉईड्स लिस्ट इंटेलिजन्सने 655 जहाजांवर परिणाम करणाऱ्या 1,735 हस्तक्षेप घटनांची नोंद केली, आणि दररोजच्या घटनांची संख्या जवळजवळ दुप्पट होत गेली.

    इराणने आखतामधील डेटा सेंटर्सनाही लक्ष्य केले, ज्यामध्ये बहरीनमधील ॲमेझॉन वेब सर्व्हिसेस (AWS) सुविधांचाही समावेश होता. ही लष्करी स्थळे नसल्यामुळे डिजिटल पायाभूत सुविधांची टिकाऊपणा, सार्वभौमत्व आणि सुरक्षितता याबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले. 2011 पासून इराणने अमेरिकेच्या हवाई आणि अवकाश-आधारित इलेक्ट्रॉनिक युद्ध क्षमतेला तोलण्यासाठी GPS स्पूफिंग आणि जॅमिंग तंत्रज्ञानात सातत्याने गुंतवणूक केली आहे. याचे परिणाम व्यापक पातळीवर दिसून आले. ऊर्जेच्या किमती वाढल्या, आखातामधील जहाजवाहतुकीसाठी विमा दर वाढले आणि अनेक मोठ्या वाहतूक कंपन्यांनी आपले मार्ग बदलले, ज्यामुळे जागतिक पुरवठा साखळ्यांमध्ये वेळ आणि खर्च दोन्ही वाढले.

    इराणने स्टारलिंक टर्मिनल्समध्ये व्यत्यय आणण्याचाही प्रयत्न केला, ज्यासाठी 7787 लष्करी दर्जाचे “किल स्विच” GPS जॅमर्स वापरण्यात आले. यामुळे देशभरातील इंटरनेट गती मंदावली आणि मर्यादित संसाधनांमध्येही इराणी इलेक्ट्रॉनिक युद्ध नियोजक नवोन्मेषी पद्धतीने विचार करत असल्याचे दिसून आले. सायबर क्षेत्रात, इराण-समर्थित गटांनी अमेरिकन लक्ष्यांवर आणि आखाती देशांतील संस्थांवर डिस्ट्रिब्यूटेड डिनायल ऑफ सर्व्हिसेस (DDoS) हल्ले, वेबसाइट विकृतीकरण आणि डेटा नष्ट करण्याच्या कारवाया केल्या. मार्च 2026 मध्ये इराणी हॅकर गट Handala ने अमेरिकेतील प्रमुख वैद्यकीय तंत्रज्ञान कंपनी स्ट्रायकर कोओपेरेशन (Stryker Corporation) वर केलेला हल्ला हा सर्वात गंभीर मानला जातो, ज्यामुळे जागतिक कामकाज विस्कळीत झाले आणि मोठ्या प्रमाणात संवेदनशील डेटा चोरीला गेला.

    युद्धपद्धतीवरील परिणाम

    सध्याच्या संघर्षातून स्पष्ट होते की इलेक्ट्रॉनिक युद्ध (EW) आता केवळ सहाय्यक भूमिका बजावत नाही; ते आधुनिक युद्धातील एक प्रमुख सक्षम करणारा आणि शक्तिवर्धक घटक बनला आहे. अमेरिका–इस्रायल आघाडीने कोणतेही प्रत्यक्ष शस्त्र वापरण्यापूर्वीच इराणच्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वातावरणाचा नाश करण्याचा निर्णय घेतला. हा केवळ तांत्रिक निर्णय नव्हता, तर एक स्पष्ट सिद्धांतात्मक विधान होते. स्पेक्ट्रमवरील नियंत्रण हे आकाश, समुद्र आणि जमिनीवरील नियंत्रणापूर्वी येते. जे कोणत्याही लष्कर संघर्षाच्या सुरुवातीला स्पेक्ट्रमवर नियंत्रण मिळवू शकत नाही, ते निष्क्रिय करून लढण्यास भाग पडते, जसे इराणच्या बाबतीत मोठ्या प्रमाणात दिसून आले.

    दुसरे म्हणजे, असममितीय इलेक्ट्रॉनिक युद्ध हे एक प्रभावी संतुलन साधणारे साधन ठरू शकते, जरी त्याला मर्यादा असतात. तरी इराणच्या GPS स्पूफिंग मोहिमेने दाखवून दिले की हवाई वर्चस्व किंवा अवकाश-आधारित साधने नसतानाही, नागरी प्रणालींमध्ये लक्ष्यित इलेक्ट्रॉनिक व्यत्यय आणून मोठा धोरणात्मक आणि तांत्रिक खर्च लादता येतो. जहाजवाहतुकीत व्यत्यय आणि जगातील सर्वात महत्त्वाच्या तेल मार्गांपैकी एकाचा प्रभावी अडथळा निर्माण करणे हे लक्षणीय यश आहे. मात्र, IRGC च्या सायबर मुख्यालयावर प्रत्यक्ष हल्ला झाल्यानंतर इराणची इलेक्ट्रॉनिक युद्धाची केंद्रीकृत समन्वय क्षमता मोठ्या प्रमाणात कमी झाली. त्यामुळे, असममितीय EW कितीही प्रभावी असले तरी ते प्रत्यक्ष लष्करी वर्चस्वासमोर असुरक्षित राहतात.

    तिसरे म्हणजे, इलेक्ट्रॉनिक युद्धात (EW) नागरी आणि लष्करी क्षेत्रातील भेद मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे. डेटा सेंटर्स, नेव्हिगेशन प्रणाली, वीज जाळे, रुग्णालये आणि संवाद नेटवर्क्स यांसारखी परस्पर जोडलेली डिजिटल पायाभूत साधने प्रथम नागरी मालमत्ता असतात आणि नंतर लष्करी लक्ष्य बनतात. सायबर इस्लामिक रेझीस्टन्स सारख्या सामूहिक हॅक्टिव्हिस्ट गटांमुळे नागरी आणि लष्करी क्षेत्रांमधील सीमारेषा अधिकच धूसर झाल्या आहेत, ज्यामुळे राज्य आणि गैर-राज्य घटकांमधील सहकार्य पुढे आले आहे.

    इलेक्ट्रॉनिक युद्धाचे परिणाम सामान्य लोकांवरही मोठ्या प्रमाणात पडत आहेत. इंधनटंचाई, उड्डाणांमध्ये अडथळे आणि पुरवठा साखळीतील व्यत्यय यामुळे लोक अप्रत्यक्षपणे या संघर्षाचे बळी ठरत आहेत. या नव्या वास्तवाची दखल धोरणनिर्मितीत न घेणारी राष्ट्रे एका धोकादायक भ्रमात राहण्याचा धोका पत्करतात.

    इलेक्ट्रोमॅग्नेटिक युद्धाच्या युगात सुरक्षेचा पुनर्विचार

    इराण संघर्षाने एक गोष्ट स्पष्ट केली आहे: जे देश त्यांच्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वातावरणाचे, नेव्हिगेशन प्रणालींचे, संवाद यंत्रणांचे किंवा महत्त्वाच्या डेटा पायाभूत सुविधांचे संरक्षण करू शकत नाहीत, ते धोरणात्मकदृष्ट्या असुरक्षित ठरतात आणि ही कमतरता पारंपरिक लष्करी गुंतवणुकीने भरून निघू शकत नाही. ही समस्या फक्त मध्यपूर्वेतील देशांपुरती मर्यादित नाही; ती प्रत्येक त्या राष्ट्रासाठी आहे जे GPS-आधारित पायाभूत सुविधांवर अवलंबून आहेत, व्यावसायिक क्लाउड कॉम्प्युटिंगचा वापर करतात किंवा अजून GNSS-स्वतंत्र नेव्हिगेशन प्रणालींमध्ये गुंतवणूक केलेली नाही.

    भारतासाठी हा धडा 2020 मधील गलवान व्हॅली संघर्ष आणि 2025 मधील ऑपरेशन सिंदूर यांमधून आधीच स्पष्ट झाला आहे, जिथे भारताच्या स्वदेशी इलेक्ट्रॉनिक युद्ध (EW) प्रणालींची प्रभावीता दिसून आली. मात्र, इराण संघर्ष दाखवतो की पुढील टप्पा केवळ रणांगणावर नाही, तर स्पेक्ट्रम वर्चस्व मिळवण्यावर आहे म्हणजेच प्रत्यक्ष हल्ल्यांपूर्वी डेटा सेंटर्स, संवाद व्यवस्था आणि कमांड-आणि-कंट्रोल प्रणालींवर नियंत्रण मिळवणे.

    याशिवाय, नागरी पायाभूत सुविधा आता केवळ दुय्यम नुकसान राहिल्या नसून थेट लक्ष्य बनल्या आहेत. भारताची किनारपट्टी, हिंदी महासागरातील जहाजवाहतूक मार्ग, तसेच GNSS-आधारित विमानवाहतूक आणि ऊर्जा प्रणाली या सर्व अशाच प्रकारच्या असुरक्षिततेला सामोरे जाऊ शकतात विशेषतः चीनसारख्या प्रतिस्पर्ध्याकडून, ज्याच्या इलेक्ट्रॉनिक युद्ध क्षमता इराणपेक्षा अधिक प्रगत आहेत.

    या बदलत्या स्वरूपाचे आकलन म्हणजे नॉन-किनेटिक ते किनेटिक ऑपरेशन्स म्हणजेच अप्रत्यक्ष ते प्रत्यक्ष युद्धाकडे होणारे संक्रमण आणि राज्य तसेच हॅक्टिव्हिस्ट किंवा इतर गैर-राज्य घटकांमधील वाढते सहकार्य हे येत्या दशकातील सुरक्षा आव्हानांना तोंड देण्यासाठी आवश्यक असलेली धोरणे, पायाभूत सुविधा आणि संस्था उभारण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे.


    सौम्या अवस्थी या ऑब्झर्व्हर रिसर्च फाउंडेशनच्या सेंटर फॉर सिक्युरिटी, स्ट्रॅटेजी अँड टेक्नॉलॉजी येथे फेलो आहेत.

    The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.