-
CENTRES
Progammes & Centres
Location
टेक कंपन्यांमधील नोकरकपात AI च्या उदयाचे संकेत देत आहे. भारताने ही संधी साधली पाहिजे - आपल्या तरुणांना कौशल्ये देऊन, अशा भविष्याची घडण घडवायला हवी जिथे AI नोकऱ्या काढून न घेता त्यांना सक्षम करतो.
Image Source: Getty
अलीकडच्या काही महिन्यांत जागतिक नोकरी बाजारात मोठ्या प्रमाणावर उलथापालथ झाली आहे. मोठमोठ्या तंत्रज्ञान कंपन्यांनी मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांची कपात केली आहे, आणि यामागचं मुख्य कारण म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) चा झपाट्याने होणारा उदय. उदाहरणार्थ, IBM ने अंदाजे 8,000 कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केलं आहे. हे कर्मचारी मुख्यतः मानव संसाधन विभागातील होते आणि ही कपात केवळ खर्चकपात करण्यासाठी नव्हे, तर AI युगात कंपनीची कार्यपद्धती कशी बदलेल याचं प्रतिबिंब आहे. अशाच प्रकारे, Microsoft ने 6,000 हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केलं आहे. जे त्यांच्या एकूण जागतिक कामगार संख्येच्या सुमारे 3% आहे. यामध्ये AI विभागाचे संचालकही सामील आहेत, आणि ही Microsoft च्या इतिहासातील सर्वात मोठ्या कपातींपैकी एक मानली जाते. विशेष म्हणजे, ही कपात कंपनीचे आर्थिक परिणाम चांगले असूनही करण्यात आली आहे. एका तिमाहीत 70.1 बिलियन अमेरिकन डॉलर्स उत्पन्न आणि 25.8 बिलियन अमेरिकन डॉलर्स निव्वळ नफा नोंदवला गेला आहे.
पारंपरिक भूमिका विशेषतः सॉफ्टवेअर अभियांत्रिकीसारख्या आता अधिकाधिक प्रमाणात स्वयंचलित केल्या जात आहेत किंवा बंद केल्या जात आहेत. यामुळे जागतिक रोजगाराच्या पद्धतीत मोठा बदल होतो आहे. कंपन्या त्यांच्या मानव संसाधन धोरणात बदल करत आहेत, जे AI प्रणालींच्या प्रगतीमुळे घडत आहे.
Microsoft आणि IBM यांसारख्या मोठ्या टेक कंपन्या त्यांच्या कामगार संघटनांबाबत नव्याने विचार करत आहेत. Microsoft ने एकट्याने 80 बिलियन अमेरिकन डॉलर्स इतकी AI पायाभूत सुविधा निर्मितीत गुंतवणूक केली आहे. त्यामुळे AI, क्लाऊड आणि सायबर सुरक्षा यांच्याशी थेट संबंधित भूमिका वगळता इतर अनेक पारंपरिक भूमिका संकटात आल्या आहेत. विशेषतः सॉफ्टवेअर अभियांत्रिकीतील भूमिका मोठ्या प्रमाणात स्वयंचलित होत आहेत किंवा कमी केल्या जात आहेत. त्यामुळे जागतिक रोजगारात आमूलाग्र बदल होत आहे. कंपन्या AI तंत्रज्ञानानुसार त्यांचे मनुष्यबळ नव्याने रचत आहेत. परिणामी, भारत आणि जगभरात नोकऱ्यांच्या सुरक्षिततेबाबत चिंता वाढत आहे आणि रोजगाराचे भविष्य काय असेल, हा प्रश्न निर्माण झाला आहे.
AI चा वेगाने होणारा विविध क्षेत्रांतील व जागतिक अर्थव्यवस्थांमधील समावेश रोजगाराच्या पारंपरिक रचनेला मोठ्या प्रमाणात बदलून टाकत आहे. भारतासह संपूर्ण जगभरात एकीकडे नोकऱ्या नष्ट होत आहेत, तर दुसरीकडे नव्या संधीही निर्माण होत आहेत. अंदाजानुसार 2023 ते 2027 दरम्यान 83 मिलियन नोकऱ्या संपतील, तर केवळ 69 मिलियन नव्या नोकऱ्या निर्माण होतील. याचा अर्थ 14 मिलियन नोकऱ्यांची निव्वळ घट होईल. हा बदल मुख्यतः नियमित कामांचे स्वयंचलीकरण आणि विविध क्षेत्रांमध्ये AI उपकरणांचा वापर वाढल्यामुळे होत आहे—उदा. उत्पादन, ग्राहक सेवा, कायदेशीर सेवा, वित्तीय सेवा इत्यादी.
अमेरिकेत (US) BigTech कंपन्यांनी मोठ्या प्रमाणावर कर्मचार्यांची कपात केली आहे, आणि हे परिवर्तन स्पष्टपणे दिसत आहे. 2025 च्या पहिल्या पाच महिन्यांत एकूण 284 कंपन्यांमध्ये 62,000 हून अधिक कर्मचारी कामावरून कमी करण्यात आले आहेत. फक्त मे महिन्यात, Google ने 200 कर्मचाऱ्यांना कमी केलं, तर Meta ने 2025 मध्ये एकूण 3,600 कर्मचाऱ्यांची कपात करण्याची योजना आखली आहे. या सर्व घटनांमधून एक गोष्ट स्पष्ट होते: आता कोणतीही नोकरी मग ती कितीही वरिष्ठ पदावरची किंवा विशेष कौशल्याधारित असली तरी AI च्या प्रभावापासून सुरक्षित नाही.
AI-संबंधित स्वयंचलनाचा परिणाम भारतात आधीच दिसू लागला आहे, विशेषतः स्टार्टअप आणि IT क्षेत्रामध्ये. फक्त 2025 च्या पहिल्या पाच महिन्यांत, भारतातील स्टार्टअप्सनी 3,600 पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केलं आहे. यामागे खर्चकपात आणि ऑटोमेशन तंत्रज्ञानाचा वापर हे कारण आहे. उदाहरणार्थ, Ola Electric ने आपल्या फ्रंटएंड ऑपरेशन्समध्ये स्वयंचलन केल्यानंतर 1,000 कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केलं. त्याचप्रमाणे, भारताच्या अर्थव्यवस्थेचा एक मजबूत आधारस्तंभ असलेल्या IT क्षेत्रात, 2024 मध्ये 50,000 पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या गेल्या आहेत, विशेषतः एंट्री-लेव्हल प्रोग्रामर आणि सॉफ्टवेअर टेस्टर्स, कारण त्यांच्या भूमिका आता AI द्वारे अधिक सहजपणे पार पाडल्या जात आहेत.
AI चा प्रभाव फक्त तंत्रज्ञान कंपन्यांपुरता मर्यादित नाही, तर उत्पादन, लॉजिस्टिक्स आणि ग्राहक सेवा यांसारख्या क्षेत्रांमध्येही कमी-कौशल्य आणि पुनरावृत्तीपूर्ण कामांवर आधारित भूमिका धोक्यात आल्या आहेत. भारतासाठीचा अंदाज फारच गंभीर आहे. 40 ते 50 टक्के वर्तमान पांढरपेशा नोकऱ्या पुढील काळात नष्ट होऊ शकतात. यामुळे मोठ्या प्रमाणात उपजीविका धोक्यात येऊ शकतात आणि भारताच्या ग्राहकाधारित आर्थिक विकासाच्या नरेटिव्हला धोका निर्माण होऊ शकतो.
AI चा प्रभाव हा फक्त तंत्रज्ञान कंपन्यांपुरताच मर्यादित नसून उत्पादन, लॉजिस्टिक्स आणि ग्राहक सेवा यांसारख्या क्षेत्रांमध्येही मोठ्या प्रमाणावर जाणवतो आहे.
तरीही, या बदलांच्या काळातही भारतासाठी संधी आहेत. भारताकडे जगातील सर्वात मोठी युवा लोकसंख्या आहे. 371.4 मिलियन लोक आणि सरासरी वय 28.4 वर्षे. जर ही लोकसंख्या योग्य कौशल्यांनी सज्ज केली, विशेषतः AI-संबंधित क्षेत्रात, तर भारत या संक्रमण काळातून यशस्वीपणे पुढे जाऊ शकतो आणि 2032 पर्यंत 10 ट्रीलीयन डॉलर्स अर्थव्यवस्था बनण्याचे स्वप्न साकार करू शकतो. डेटा सायन्स, मशीन लर्निंग आणि AI उत्पादन विकास यांसारखी नवोदित क्षेत्रे झपाट्याने वाढत आहेत आणि अशी अनेक नवीन नोकऱ्या निर्माण होत आहेत ज्या दहा वर्षांपूर्वी अस्तित्वातही नव्हत्या. व्यापकदृष्ट्या, ज्ञानाधारित कामे, कंटेंट निर्मिती आणि उत्पादन क्षेत्रात AI वापराचे मोठे प्रमाण दिसून येईल.
म्हणून, रोजगाराचे भविष्य हे जुळवून घेण्यात आणि नव्या कौशल्यात आहे. Nvidia चे CEO Jensen Huang यांनी याबाबत अचूक म्हटलं आहे, “तुमची नोकरी AI कडून जाणार नाही, पण AI वापरणाऱ्या व्यक्तीकडून ती नक्कीच जाईल.” त्यामुळे व्यक्ती आणि अर्थव्यवस्थांसाठी पुढचा मार्ग म्हणजे या बदलत्या वास्तवाला स्वीकारून AI ला एक शत्रू नव्हे तर साधन मानणं, जेणेकरून नोकरीच्या बाजारात स्पर्धेत टिकता येईल.
AI स्वीकारामुळे निर्माण होणाऱ्या नोकरी गमावण्याच्या धोका आणि बेरोजगारीला रोखण्यासाठी भारताने एक बहुआयामी धोरण राबवायला हवं. यात कामगार बदल, तंत्रज्ञान सुलभता आणि तथ्याधारित धोरणनिर्मिती यांचा समावेश असावा. सर्वप्रथम, मानवी श्रमास पूरक ठरणाऱ्या नवकल्पनांना प्रोत्साहन देणं महत्त्वाचं आहे. Stanford Institute for Human-Centred Artificial Intelligence (HAI) च्या 'Impacts of AI on Worker Productivity' या Bond यांनी केलेल्या अभ्यासानुसार, AI चा वापर झाल्यानंतर 14 टक्के कामगार उत्पादकता वाढली आहे. दुसरं म्हणजे, कंपन्यांनी अशा कर्मचाऱ्यांचे पुनर्नियोजन करण्यासाठी धोरण तयार करणं गरजेचं आहे, ज्या कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या AI मुळे धोक्यात येत आहेत. International Labour Organization (ILO) चा सल्ला असा आहे की अशा पुनर्वसनावर भर दिला पाहिजे. याशिवाय, डिजिटल, हरित अर्थव्यवस्था, अचूक उत्पादन आणि ग्राहक सेवा क्षेत्रांमध्ये पुनःकौशल्य प्रशिक्षण आणि कौशल्यवृद्धी कार्यक्रमांमध्ये धोरणात्मक गुंतवणूक करणे आवश्यक आहे.
IBM ने नुकत्याच झालेल्या नोकरी कपातीनंतरही, सॉफ्टवेअर विकास आणि विक्रीसारख्या मानवी केंद्रीत भूमिकांमध्ये पुन्हा गुंतवणूक करून कामगारसंख्या वाढवली आहे आणि उत्पादकतेत वाढ केली आहे. याउलट, स्वीडनची 'buy-now-pay-later' कंपनी Klarna यांचा अनुभव दाखवतो की जिथे मानवी संवाद अत्यावश्यक आहे, तिथे AI वर फारसा अवलंबून राहिल्यास धोका वाढतो.
पुनःकौशल्य आणि कौशल्यवृद्धी कार्यक्रमांमध्ये धोरणात्मक गुंतवणूक करणे अत्यावश्यक आहे, विशेषतः डिजिटल, हरित अर्थव्यवस्था, अचूक उत्पादन आणि ग्राहक सेवा क्षेत्रांमध्ये.
AI अभ्यासक्रम आणि प्रकल्प यांना उच्च शिक्षण संस्थांमधील उद्योगांच्या गरजांशी जुळवण्यासाठी शैक्षणिक सुधारणा आवश्यक आहेत. याचबरोबर, ऑनलाईन शिक्षण प्लॅटफॉर्म्सवर अधिकाधिक AI-कौशल्याभ्यासक्रम उपलब्ध करून दिले पाहिजेत. याशिवाय, STEM (Science, Technology, Engineering, and Mathematics) शिक्षणामुळे शालेय विद्यार्थ्यांमध्ये AI बाबत रस निर्माण केला जावा, जेणेकरून ते भविष्यातील AI-केंद्रित नोकऱ्यांसाठी सज्ज होतील. AI चा प्रभाव जाणवणाऱ्या क्षेत्रांमध्ये वेळोवेळी परिणाम मूल्यांकन केले जावे, जेणेकरून धोरणात्मक प्रवेश (policy interventions) योग्य वेळी करता येतील.
AI मुळे भारतातील रोजगार क्षेत्रात संभाव्य अडथळे निर्माण होण्याची शक्यता असली, तरी सध्याचा काळ संधीने भरलेला आहे. भारताच्या विशाल तरुण मनुष्यबळ आणि वाढत्या डिजिटल प्रणालीचा वापर करून, देशाने AI ला समावेशक आर्थिक विकासासाठी प्रेरक शक्ती बनवायला हवं. कौशल्यवृद्धीला प्राधान्य देऊन, शैक्षणिक सुधारणांमध्ये गुंतवणूक करून आणि मानवी प्रयत्नांना पूरक तंत्रज्ञानाच्या नव्या दिशा शोधून, भारत केवळ नोकऱ्या टिकवू शकतो असे नाही, तर भविष्याच्या रोजगारासाठी एक आदर्श नमुना ठरू शकतो.
देबज्योती चक्रवर्ती ह्या ऑब्झर्वर रिसर्च फाउंडेशनमध्ये रिसर्च असिस्टंट आहेत.
The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.
Debajyoti Chakravarty is a Research Assistant at ORF’s Center for New Economic Diplomacy (CNED) and is based at ORF Kolkata. His work focuses on the use ...
Read More +