Author : Seema Puri

Expert Speak Health Express
Published on Jun 27, 2025 Updated 0 Hours ago

कमी जन्मवजनाची समस्या सोडवण्यासाठी मानसिक आरोग्य, पोषण आणि स्थानिक पातळीवरील देखरेख यांचा समावेश मुख्य मातृत्व आरोग्य कार्यक्रमांमध्ये करणे गरजेचे आहे.

आई निरोगी, बाळ बळकट: जन्माआधीच ठरतो आयुष्याचा पाया!

Image Source: Getty

    भारतामध्ये वेगाने आर्थिक प्रगती व वैद्यकीय क्षेत्रात मोठी प्रगती होऊनही, कमी जन्मवजन (LBW) असलेल्या बाळांचे प्रमाण अजूनही अधिक आहे. संपूर्ण जगात दरवर्षी सुमारे १५.५ टक्के बाळांचे जन्मवजन कमी असते, यापैकी ९५ टक्के बाळांचा जन्म मध्यम व कमी उत्पन्न असलेल्या देशांमध्ये होतो. २०१९-२० च्या राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणानुसार (NFHS-5) भारतात १७.२९ टक्के बाळांचे वजन जन्माच्या वेळी कमी होते, तर त्यापैकी ६ टक्के बाळांचे वजन फारच कमी म्हणजे १५०० ग्रॅमपेक्षा कमी होते. आरोग्य केंद्रांवर आधारित सेवा सुधारल्या आहेत. उदाहरणार्थ, रुग्णालयात होणाऱ्या प्रसूतींमध्ये वाढ झाली असून २०१९-२१ दरम्यान ८८.६ टक्के गर्भवती महिलांनी रुग्णालयीन प्रसूती केल्या व ७० टक्के महिलांनी गरोदरपणाच्या पहिल्या तीन महिन्यांत तपासणी केली. मात्र, या सेवा शहरांमध्ये ग्रामीण भागांच्या तुलनेत अधिक आहेत. या सुधारणांनंतरही, २०१४-१५ च्या NFHS-4 सर्वेक्षणापासून LBW चे प्रमाण विशेष घटलेले नाही.

    हलाखीची सामाजिक-आर्थिक स्थिती, शिक्षणाची कमतरता, अल्पवयीन गर्भधारणा आणि अपुरी प्रसवपूर्व देखरेख ही कारणे LBW चे प्रमाण वाढवतात.

    जन्माच्या वेळी वजन कमी असलेल्या बाळांना सुरुवातीला थंडी (हायपोथर्मिया) आणि कमी साखरेची पातळी (हायपोग्लायसेमिया) यांचा धोका असतो. त्यांना दीर्घकालीन न्यूरोलॉजिकल आणि भाषिक समस्या होण्याची शक्यता असते. यामुळे लवकर मृत्यूचा धोका देखील वाढतो. शिवाय, LBW असलेल्या मुलांना मोठेपणी हृदयविकार, मधुमेह, व रक्तातील चरबी वाढण्याचे विकार लवकर होण्याची शक्यता असते.

    अनेक अभ्यासांतून हे स्पष्ट झाले आहे की सामाजिकदृष्ट्या वंचित पार्श्वभूमी असलेल्या गर्भवती महिलांना LBW बाळ होण्याचा धोका जास्त असतो. कमी आर्थिक स्थिती, अपुरे शिक्षण, अल्पवयीन मातृत्व आणि गर्भावस्थेतील अपुरी तपासणी यामुळे LBW होण्याचा धोका वाढतो. मद्य, सिगारेट किंवा अन्य मादक पदार्थांचे सेवन केल्यास बाळाचा जन्म वेळेपूर्वी (३७ आठवड्यांपूर्वी) होण्याची शक्यता वाढते, तसेच जन्माच्या वेळी वजन कमी असण्याचा धोका निर्माण होतो. यामुळे बाळाला श्वसनाचा त्रास, दूध पिण्यात अडचण, आणि वाढीतील विलंब यासारख्या समस्या उद्भवू शकतात. इतर कारणांमध्ये एकाच वेळी दोन किंवा अधिक बाळांची गर्भधारणा, प्रसूतीशी संबंधित गुंतागुंत, दुखापत, प्री-एक्लॅम्प्सिया किंवा एक्लॅम्प्सिया, संसर्ग, उच्च रक्तदाब व मधुमेहासारखे दीर्घकालीन आजार, तसेच मातेचा पोषणस्थिती यांचा समावेश होतो. गर्भाच्या बाबतीत, गर्भातील वाढीतील मर्यादा (IUGR), संसर्ग व प्लेसेंटा ही कारणे देखील LBW साठी जबाबदार असतात.

    गर्भातील बाळ संपूर्णपणे आईकडून मिळणाऱ्या महत्त्वाच्या पोषक घटकांवर अवलंबून असते. त्यामुळे गरोदरपणात योग्य आहार घेणे हे प्रसवपूर्व देखरेखीचा एक अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. गर्भातील बाळाच्या अवयवांच्या वाढीसाठी, हाडांच्या मजबुतीसाठी आणि सामान्य शरीरक्रियांसाठी प्रथिने, कर्बोदके, चरबी, जीवनसत्त्वे आणि खनिजे यांसारख्या अनेक पोषक घटकांची गरज असते. या पोषक घटकांचा अपुरा पुरवठा झाल्यास बाळाच्या वाढीमध्ये विलंब होतो, प्रसवाच्या वेळी अडचणी येतात, आणि बाळाचे वजन कमी राहते. गर्भवती मातेच्या आहारातील कमतरता बाळ जन्मल्यानंतरही त्याच्या वाढीवर आणि विकासावर परिणाम करत राहते. काही संशोधनांनुसार गरोदरपणात योग्य पोषण न मिळाल्यास बाळाला स्थूलपणा, मधुमेह आणि मानसिक वाढीतील अडथळे निर्माण होण्याची शक्यता असते. या निष्कर्षांमधून हे स्पष्ट होते की गर्भधारणेदरम्यान योग्य प्रमाणात मोठ्या (मॅक्रो) आणि सूक्ष्म (मायक्रो) पोषक घटकांचा समावेश असलेला संतुलित आहार घेणे खूप आवश्यक आहे, कारण याचा परिणाम बाळाच्या दीर्घकालीन आरोग्यावर होतो.

    मॅक्रो पोषक घटक म्हणजे कर्बोदके, प्रथिने आणि चरबी हे शरीराला ऊर्जा देतात आणि बाळाच्या वाढीसाठी आवश्यक असतात. मायक्रो पोषक घटक म्हणजे लोह, कॅल्शियम, व्हिटॅमिन बी-१२ आणि फोलिक ॲसिड – हे रक्त तयार होण्यासाठी, हाडांच्या वाढीसाठी आणि जन्मजात दोष टाळण्यासाठी उपयुक्त असतात. व्हिटॅमिन डी कॅल्शियम शोषणास मदत करते; व्हिटॅमिन सी ऊतींच्या दुरुस्तीस आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करते; व्हिटॅमिन ए डोळ्यांच्या आणि पेशींच्या वाढीसाठी आवश्यक असते; व्हिटॅमिन ई पेशींचे संरक्षण करते आणि बी-कॉम्प्लेक्स जीवनसत्त्वे चयापचय आणि मेंदूच्या विकासासाठी आवश्यक असतात. या कोणत्याही पोषक घटकांची कमतरता बाळासाठी गंभीर परिणाम घडवू शकते.

    गर्भवती मातेच्या पोषणातील कमतरता बाळ जन्मल्यानंतरही त्याच्या वाढीवर आणि मानसिक विकासावर परिणाम करते. काही संशोधनातून असे दिसून आले आहे की ज्या मातांना गरोदरपणात योग्य पोषण मिळाले नाही, त्यांच्या बाळांमध्ये स्थूलपणा, मधुमेह आणि बौद्धिक क्षमतेतील अडथळे यांचे प्रमाण अधिक असते.

    गरोदरपणात मातांची मानसिक आरोग्य स्थितीही बाळाच्या विकासावर मोठा परिणाम करते. मानसिक दृष्ट्या स्थिर मातांमुळे बाळाशी चांगला भावनिक संपर्क तयार होतो, सुरक्षित बंध निर्माण होतो आणि बाळाचा सामाजिक-भावनिक विकास चांगला होतो. परंतु गरोदरपणात जर मातेला चिंता, ताणतणाव किंवा नैराश्य असेल, तर ते बाळाच्या भावनिक, बौद्धिक आणि वर्तनात्मक विकासावर वाईट परिणाम करते. या मानसिक समस्यांमुळे आईच्या शरीरात कॉर्टिसोल नावाचे ताणदायक हार्मोन जास्त प्रमाणात निर्माण होते. हे हार्मोन अपऱामार्गे थेट गर्भापर्यंत पोहोचते आणि त्याचा परिणाम बाळाच्या मेंदूच्या विकासावर होतो. या हार्मोनचा दीर्घकाळ परिणाम झाल्यास बाळाच्या मेंदूतील भावना, लक्ष केंद्रित करणे आणि स्मरणशक्ती नियंत्रित करणाऱ्या भागांवर वाईट परिणाम होतो. म्हणून, गरोदरपणात मानसिक तणाव अनुभवणाऱ्या मातांची मुले पुढे जाऊन वर्तनात्मक समस्या, शिकण्यातील अडचणी आणि मानसिक आजारांनी त्रस्त होण्याची शक्यता अधिक असते. संशोधन असेही सूचित करते की, ज्या बाळांना गर्भावस्थेत किंवा जन्मानंतरच्या सुरुवातीच्या काळात मातांच्या नैराश्याचा सामना करावा लागतो, त्यांना असुरक्षित बंध, भावनिक अडचणी आणि सामाजिक कौशल्य कमी असण्याची अधिक शक्यता असते. शिवाय, नैराश्यामुळे आईला बाळाची योग्य प्रकारे काळजी घेणे आणि त्याच्याशी उत्तरदायीपणे वागणे कठीण होते.

    जगभरात गर्भधारणेतील अपायकारक परिणाम कमी करण्यासाठी विविध उपाययोजना राबवण्यात आल्या आहेत. संयुक्त राष्ट्रसंघाच्या (UN) तिसऱ्या शाश्वत विकास उद्दिष्टामध्ये (SDG-3) मातांच्या आणि नवजात बाळांच्या आरोग्यात सुधारणा करणे व मृत्यूदर कमी करणे हे उद्दिष्ट आहे, जे कुशल आरोग्य कर्मचार्‍यांद्वारे प्रसूतीचे प्रमाण वाढवून साध्य करणे अपेक्षित आहे. भारतात कमी वजनाच्या बाळांच्या जन्माच्या समस्येवर उपाय म्हणून केंद्र व राज्य सरकारांनी आपापल्या आरोग्य कार्यक्रमांना अधिक बळकट करण्यावर भर दिला आहे.
    काही योजनांमध्ये मातांसाठी प्रसवपूर्व तपासण्यांची सेवा अधिक गुणवत्तापूर्ण करणे आणि त्यांच्या वैद्यकीय खर्चात कपात करणे, हे मुख्य उद्दिष्ट आहे. उदा., जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम आणि प्रजनन, मातृत्व, नवजात, बालक, किशोरवयीन आरोग्य आणि पोषण कार्यक्रम (RMNCAH+N). इतर योजना, जसे की एकात्मिक बाल विकास सेवा (ICDS) योजना आणि पोषण अभियान, या गरोदर महिलांसाठी अतिरिक्त पोषण सेवा पुरवण्यावर लक्ष केंद्रित करतात, आणि त्याचबरोबर मातांच्या वजनाचे नियमित परीक्षणही करतात.

    संशोधनातून असे दिसते की, ज्या बाळांना गर्भावस्था व प्रसवोत्तर काळात मातांच्या नैराश्याचा सामना करावा लागतो, त्यांच्यात असुरक्षित भावनिक बंध निर्माण होण्याची शक्यता अधिक असते, तसेच त्यांना भावनिक अडचणी आणि सामाजिक कौशल्ये कमी असण्याचीही अधिक शक्यता असते.

    गरोदरपणात महिलांच्या मानसिक आरोग्याकडे अपायकारक प्रसूती परिणामांचे एक महत्त्वाचे कारण म्हणून पुरेसे लक्ष दिले गेलेले नाही. जरी प्रसवोत्तर नैराश्य आता वैद्यकीय क्षेत्रात अधिक प्रमाणात ओळखले जाऊ लागले असले, तरी गरोदरपणातील नैराश्य, चिंता, ताणतणाव आणि त्याचा बाळाच्या जन्मावर होणारा परिणाम अजूनही दुर्लक्षितच राहिला आहे.
    बाळाच्या संपूर्ण विकासासाठी आईच्या मानसिक आरोग्याला प्राधान्य देणे खूप आवश्यक आहे, जे योग्य उपचार, सहकार्य आणि प्रेमळ वातावरणाच्या माध्यमातून शक्य होते. हे स्पष्ट करते की, केवळ रुग्णालय-आधारित उपायांपेक्षा अधिक व्यापक पद्धतीने प्रजनन आरोग्य सुधारण्याकडे लक्ष दिले पाहिजे. गर्भवती महिलांच्या गरजा वेळेवर ओळखणे आणि त्यांना वैयक्तिक, कौटुंबिक व सामुदायिक पातळीवर आधार देणे खूप महत्त्वाचे ठरते. आईच्या मानसिक ताणाचा बाळाच्या लवकर वाढीवर होणारा परिणाम कमी करण्यासाठी प्रेमळ आणि पोषणदायक वातावरण तयार करणे, तणाव कमी करणाऱ्या उपायांची माहिती देणे, आणि सामाजिक पाठबळ देणाऱ्या उपाययोजना यांचा समावेश असलेले प्रयत्न उपयुक्त ठरतात.

    आईच्या तणावावर आणि पोषणावर लक्ष देणे, हे जन्माच्या वेळी येणाऱ्या अडचणी टाळण्यासाठी, बाळाच्या जिवंत राहण्याच्या शक्यता वाढवण्यासाठी आणि गर्भातील बाळाचा चांगला विकास घडवून आणण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरते. यामध्ये संतुलित आहार मिळवून देणे, पोषक घटकांची कमतरता भरून काढणे आणि तणाव नियोजनाचे उपाय राबवणे आवश्यक ठरते. आईच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याची काळजी घेणारी एक सर्वसमावेशक पद्धत ही एक सकारात्मक आणि आरोग्यदायी गर्भधारणेसाठी आवश्यक आहे.


    सीमा पुरी या दिल्ली विद्यापीठाच्या इंस्टीट्यूट ऑफ होम इकॉनॉमिक्समधील अन्न व पोषण विभागात माजी प्राध्यापक आहेत.

    The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.