Author : Samarveer Singh

Expert Speak Young Voices
Published on Dec 31, 2025 Updated 0 Hours ago

पाकिस्तानच्या प्रमुख हवाई तळांवर आणि महत्त्वाच्या साधनसंपत्तीवर घाव घालून, ऑपरेशन सिंदूरने सीमापार दहशतवाद इस्लामाबादसाठी आर्थिकदृष्ट्या महागडा आणि धोकादायक जुगार ठरवला आहे.

ऑपरेशन सिंदूर: पाकिस्तानला दहशतवादाचा महागडा धडा!

Image Source: Getty Images

    लष्करी कारवाया जरी त्या तीव्र आणि जलद असल्या तरी त्यांचे आर्थिक परिणाम होतातच. ऑपरेशन सिंदूरमध्ये दोन्ही देशांसाठी मोठे आर्थिक खर्च अंतर्भूत होते. क्षेपणास्त्रे, ड्रोन आणि उच्च-मूल्याच्या शस्त्रप्रणालींचा वापर करून करण्यात आलेल्या अचूक हल्ल्यांमुळे प्रणालींची पुनर्बांधणी, तसेच नुकसानग्रस्त हवाई तळे आणि विमानांची दुरुस्ती यांसारखे खर्च उद्भवले. ही कारवाई भारतासाठीही खर्चरहित नव्हती; मात्र पाकिस्तानला प्रचंड पायाभूत नुकसान सहन करावे लागले. रडार प्रणाली आणि विमानांचे नुकसान झाले. या मोहिमेने आपली दोन्ही उद्दिष्टे साध्य केली: पाकिस्तान-अधिकृत काश्मीरमधील दहशतवादी पायाभूत संरचना उद्ध्वस्त करणे आणि सीमापार दहशतवादाविरोधात भारताचा ठाम निर्धार पाकिस्तानपर्यंत पोहोचवणे. हा लेख या खर्चांचे आकलन करण्यावर लक्ष केंद्रित करतो. अचूक क्षेपणास्त्र हल्ले, विमानांचे नुकसान, लष्करी पायाभूत सुविधांची हानी व तोफखाना चकमक आणि या कारवाईमागील आर्थिक परिमाणांवर एक नवा दृष्टिकोन मांडतो.

    क्षेपणास्त्रांचा खर्च

    ऑपरेशन सिंदूरमधील सर्वाधिक ठळक बाबींमध्ये दोन्ही देशांनी अचूक-मार्गदर्शित क्षेपणास्त्रांचा (प्रिसीजन गाईडेड मिसाइल्स) मोठ्या प्रमाणावर वापर केला, हे महत्त्वाचे ठरते. भारतीय हवाई दलाने नियंत्रण रेषेवर (लाइन ऑफ कंट्रोल–LoC) तसेच पाकिस्तानच्या अंतर्गत भागांतील लक्ष्यांवर हल्ले करण्यासाठी विविध प्रकारची क्षेपणास्त्रे वापरली. यामध्ये SCALP (स्काल्प), ब्रह्मोस क्रूझ क्षेपणास्त्रे, क्रिस्टल मेझ (Crystal Maze) क्षेपणास्त्रे, आकाश आणि S-400 इंटरसेप्टर क्षेपणास्त्रांचा समावेश होता. ऑपरेशनच्या पहिल्याच दिवशी SCALP (स्काल्प) आणि क्रिस्टल मेझ क्षेपणास्त्रांचा वापर करून जैश-ए-मोहम्मद (JeM) आणि लष्कर-ए-तैबा (LeT) यांच्या मुख्यालयांना लक्ष्य करण्यात आले. उपलब्ध अहवालांनुसार, मुरिदके येथील मरकझ-ए-तैबा येथे सुमारे 4–5 क्रिस्टल मेझ क्षेपणास्त्रे डागण्यात आली, तर बहावलपूरमधील मरकझ-ए-सुभान अल्लाहवर 6 SCALP क्षेपणास्त्रे वापरण्यात आली. प्रत्येकी सुमारे 1 दशलक्ष अमेरिकी डॉलर किंमतीच्या SCALP क्षेपणास्त्रांमुळे एकूण अंदाजे 6 दशलक्ष अमेरिकी डॉलरचा खर्च झाला. क्रिस्टल मेझ क्षेपणास्त्रांची अचूक किंमत जाहीर नसली, तरी भारत-इस्रायलमधील 30 क्षेपणास्त्रांसाठी झालेल्या सुमारे 60 दशलक्ष अमेरिकी डॉलरच्या करारानुसार प्रत्येकी सुमारे 2 दशलक्ष अमेरिकी डॉलर इतका खर्च येतो. या हिशोबाने पाच क्षेपणास्त्रांसाठी सुमारे 10 दशलक्ष अमेरिकी डॉलरचा खर्च झाल्याचे सूचित होते. 8 ते 10 मे दरम्यान भारताने पाकिस्तानमधील 11 हवाई तळांना लक्ष्य केले, ज्यामध्ये नूर खान, जेकबाबाद आणि सरगोधा येथील महत्त्वाच्या हवाई तळांचा समावेश होता. या हल्ल्यांमध्ये SCALP आणि ब्रह्मोस क्षेपणास्त्रांचा संयुक्त वापर करण्यात आला. अंदाजानुसार, सुमारे 19 ब्रह्मोस क्षेपणास्त्रे या हवाई तळांवर डागण्यात आली, आणि तेवढ्याच संख्येने SCALP क्षेपणास्त्रेही वापरली गेली असावीत, असा अंदाज आहे. एका ब्रह्मोस क्षेपणास्त्राची सरासरी किंमत सुमारे 4.75 दशलक्ष अमेरिकी डॉलर असल्याने, या वापरामुळे भारताला अंदाजे 90.25 दशलक्ष अमेरिकी डॉलरचा खर्च आला. पाकिस्तानकडून होणाऱ्या हवाई धोक्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी भारताने आकाश आणि S-400 हवाई संरक्षण प्रणालींचाही वापर केला. S-400 प्रणालीचा 11 वेळा वापर करून क्षेपणास्त्रे अडवण्यात आली आणि विमाने पाडण्यात आली, तर आकाश प्रणालीने फतह-2 क्षेपणास्त्र यशस्वीरीत्या अडवले. प्रत्येक आकाश शॉर्ट-रेंज सरफेस-टू-एअर मिसाईल (SRSAM) ची किंमत सुमारे 5 लाख अमेरिकी डॉलर इतकी आहे.

    याशिवाय, नियंत्रण रेषेवर पाकिस्तानच्या स्थानांवर हल्ले करण्यासाठी भारताने इस्रायली बनावटीच्या स्पाइक (Spike) अँटी-टँक गाईडेड मिसाईल्स (ATGM) चा वापर केला. अंदाजानुसार, 2019 मध्ये अग्रिम चौक्यांवर वापराच्या वेळी पाच ATGM डागण्यात आले होते. प्रत्येकी सुमारे 2 लाख अमेरिकी डॉलर किंमतीच्या या क्षेपणास्त्रांमुळे एकूण खर्च सुमारे 1 दशलक्ष अमेरिकी डॉलर इतका झाला.

    पाकिस्ताननेही या संघर्षादरम्यान स्वतःच्या क्षेपणास्त्रांचा वापर केला. त्यातील प्रमुख म्हणजे फतह-2 दीर्घ-पल्ल्याचे बॅलिस्टिक क्षेपणास्त्र, जे दिल्लीच्या दिशेने डागण्यात आले होते; मात्र हरियाणातील सिरसा परिसरात ते पाडण्यात आले. या क्षेपणास्त्रासाठी पाकिस्तानला सरासरी सुमारे 1 लाख अमेरिकी डॉलर इतका खर्च आला. याव्यतिरिक्त, पाकिस्तानने चीननिर्मित PL-15E दीर्घ-पल्ल्याची BVR क्षेपणास्त्रे (बियाँड व्हिज्युअल रेंज) दोन वेळा डागली, जी भारताच्या हवाई संरक्षण प्रणालींनी पंजाबमध्ये अडवली. या क्षेपणास्त्रांची सरासरी किंमत प्रत्येकी सुमारे 10 लाख अमेरिकी डॉलर असून, पाकिस्तानसाठी एकूण खर्च सुमारे 20 लाख अमेरिकी डॉलर इतका झाला. तसेच, पाकिस्तानने भारतीय हवाई तळांवर CM-400AKG सुपरसॉनिक क्षेपणास्त्रे दोन वेळा डागल्याचेही अहवाल सांगतात. एका क्षेपणास्त्राची किंमत सुमारे 1.67 दशलक्ष अमेरिकी डॉलर असल्याने, या दोन क्षेपणास्त्रांसाठी पाकिस्तानला सुमारे 3.35 दशलक्ष अमेरिकी डॉलर खर्च सहन करावा लागला.

    एकूणच पाहता, भारताने क्षेपणास्त्रांवर पाकिस्तानपेक्षा जास्त खर्च केला असला, तरी फरक असा की भारतीय क्षेपणास्त्रांनी प्रत्यक्ष परिणाम साधला म्हणजेच पैशाच्या मोबदल्यात ठोस परिणाम मिळवला तर पाकिस्तानने खर्च केलेल्या क्षेपणास्त्रांमधून कोणताही प्रभावी परिणाम साध्य झाला नाही.

    विमानांचे नुकसान

    हवाई संघर्ष हा या संघर्षातील एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा ठरला. भारतीय हवाई दलाकडे जमिनीवर आणि आकाशात दोन JF-17 आणि एक F-16 लढाऊ विमाने नष्ट केल्याचे ठोस पुरावे आहेत. पाकिस्तानच्या हवाई दलात प्रामुख्याने वापरल्या जाणाऱ्या JF-17 ब्लॉक-2 प्रकाराच्या एका विमानाची अंदाजे किंमत सुमारे 25 दशलक्ष अमेरिकी डॉलर आहे. त्यामुळे दोन JF-17 विमानांमुळे पाकिस्तानचे सुमारे 50 दशलक्ष अमेरिकी डॉलर इतके नुकसान झाले. याशिवाय, एका F-16 लढाऊ विमानाची सरासरी किंमत 40 दशलक्ष ते 70 दशलक्ष अमेरिकी डॉलर दरम्यान आहे.

    विमानांच्या दुरुस्ती आणि पुनर्बांधणीचा खर्च पाकिस्तानसाठी अत्यंत मोठा आहे. लढाऊ विमानांच्या नुकसानीव्यतिरिक्त, पाकिस्तानने आपले एक C-130J मध्यम वाहतूक विमान ही गमावले, ज्याची किंमत सुमारे 180 दशलक्ष अमेरिकी डॉलर आहे.

    तसेच, भारताच्या S-400 प्रणालीने पाकिस्तानच्या अंतर्गत भागात लक्ष्य साधत एक SAB-2000 एअरबोर्न अर्ली वॉर्निंग सिस्टम ही नष्ट केली. या विमानाची किंमत सुमारे 70–80 दशलक्ष अमेरिकी डॉलर इतकी आहे. जर पाकिस्तान हे विमान बदलून नवीन घेत असेल, तर त्याचा अंदाजे पुनर्स्थापन खर्च सुमारे 160.5 दशलक्ष अमेरिकी डॉलर इतका होईल. हा आकडा 2020 मधील एका SAB-2000 व्यवहाराच्या आधारे काढण्यात आला आहे, ज्यामध्ये खरेदीदाराची माहिती जाहीर करण्यात आलेली नव्हती. भारताचे लष्करी ऑपरेशन्सचे महासंचालक (डायरेक्टर जनरल ऑफ मिलिटरी ऑपरेशन्स DGMO) आणि चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) यांनीही मान्य केल्याप्रमाणे, उच्च-तीव्रतेच्या संघर्षात भारताचे नुकसान मर्यादित होते, मात्र ते टाळता न येणारे होते.

    पायाभूत सुविधांचे नुकसान

    पाकिस्तानच्या हवाई तळांवर भारताने केलेल्या हवाई हल्ल्यांमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. रावळपिंडीतील नूर खान हवाई तळावर, उपग्रह चित्रांमधून एका मोठ्या संकुलाचा विध्वंस आणि हँगरचे गंभीर नुकसान झाल्याचे दिसून आले. तुर्कीयेच्या सहकार्याने संयुक्तपणे उभारलेली आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (AI)-आधारित निर्णय-सहाय्य साधनांनी सुसज्ज अशी दोन NG-MMCC ही महत्त्वाची साधनसंपत्ती नष्ट झाली. ही उच्च-तंत्रज्ञान प्रणाली अत्यंत महागडी मानली जाते.

    Operation Sindoor Raising The Cost Of Terrorism For Pakistan

    नूर खान हवाई तळावरील नुकसान - स्रोत: NDTV

    तुर्की बनावटीच्या Bayraktar TB-2 ड्रोन ठेवलेल्या हँगरवरही हल्ले झाले. यात पाकिस्तानचे सुमारे 50 TB-2 ड्रोन नष्ट झाले असून, यामुळे अंदाजे 300 दशलक्ष अमेरिकी डॉलर इतके नुकसान झाले. ओपन-सोर्स इंटेलिजन्स अहवालानुसार, किमान एक IL-78 टँकर विमान कार्यक्षमतेबाहेर पडले, ज्याची किंमत सुमारे 25–50 दशलक्ष अमेरिकी डॉलर आहे. यावरून पाकिस्तानच्या सर्वाधिक सुरक्षित तळांपैकी एका ठिकाणी झालेल्या प्रचंड विध्वंसाची तीव्रता अधोरेखित होते.

    चकवालमधील मुरिद हवाई तळ जे पाकिस्तानचे प्रमुख लढाऊ ड्रोन केंद्र व एक महत्त्वाचे अग्रिम कार्यरत तळ आहे. उपग्रह चित्रांमध्ये संरक्षित भूमिगत सुविधेच्या प्रवेशद्वाराजवळ सुमारे 3 मीटर रुंद खड्डा दिसून येतो, जो विशेष उपकरणे साठवण्यासाठी वापरला जात असावा. या हल्ल्यात चीनी Wing Loong ड्रोन ठेवलेला हँगरही नुकसानग्रस्त झाला आणि अंदाजे 10 मानवरहित लढाऊ हवाई वाहने (अनमॅन्ड कॉम्बॅट एरियल वेहिकल्स - UCAVs) नष्ट झाली, ज्यांची एकूण किंमत सुमारे 10 दशलक्ष अमेरिकी डॉलर इतकी आहे.

    Operation Sindoor Raising The Cost Of Terrorism For Pakistan

    Operation Sindoor Raising The Cost Of Terrorism For Pakistan

    मुरिद हवाई तळावरील नुकसान - स्रोत: हिंदुस्तान टाइम्स

    कराचीतील भोलारी हवाई तळावर जिथे JF-17, F-16 आणि SAB-2000 AEW&C प्रणाली तैनात होती, तिथे क्रूझ क्षेपणास्त्र हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात स्वीडननिर्मित AEW&C विमान नष्ट झाले. पाकिस्तानच्या निवृत्त एअर मार्शलने दिलेल्या माहितीनुसार, हे विमान ठेवलेल्या हँगरवर चार ब्रह्मोस क्षेपणास्त्रे आदळली, आणि या नुकसानीची किंमत सुमारे 300 दशलक्ष अमेरिकी डॉलर इतकी असल्याचे नमूद करण्यात आले.

    Operation Sindoor Raising The Cost Of Terrorism For Pakistan

    भोलारी हवाई तळावरील नुकसान, कराची - स्रोत: द इकॉनॉमिक टाइम्स

    जेकोबाबाद हवाई तळावर हँगरवर मजबुत हल्ला झाला. अहवालांनुसार, यात जॉर्डननिर्मित तीन F-16 विमाने नुकसानग्रस्त झाली. त्यांच्या अचूक किमती जाहीर नसल्या तरी, रोमानिया-पोर्तुगाल करारानुसार 12 नूतनीकरण केलेल्या F-16 विमानांची किंमत 253 दशलक्ष अमेरिकी डॉलर (म्हणजे प्रत्येकी सुमारे 18 दशलक्ष अमेरिकी डॉलर) इतकी होती. हा दर गृहित धरल्यास, तीन विमानांमुळे पाकिस्तानचे अंदाजे 54 दशलक्ष अमेरिकी डॉलर इतके नुकसान झाले.

    Operation Sindoor Raising The Cost Of Terrorism For Pakistan

    जेकोबाबाद हवाई तळावरील नुकसान - स्रोत: इंडियन एक्सप्रेस

    रहीम यार खान UAV आणि जेट विमानांच्या तैनातीसाठी महत्त्वाचे अग्रिम तळ येथे धावपट्टीला (रन वे) सर्वाधिक नुकसान झाले. या नुकसानीमुळे तळावरील पाकिस्तान एअर फोर्स (PAF) ची सर्व विमाने जमिनीवरच राहिली, आणि तळाची कार्यक्षमता लक्षणीयरीत्या घटली.

    Operation Sindoor Raising The Cost Of Terrorism For Pakistan

    रहीम यार खान हवाई तळावरील नुकसान - स्रोत: इंडियन एक्सप्रेस

    पायाभूत सुविधांच्या नुकसानीव्यतिरिक्त, भारताने पाकिस्तानभरातील अनेक हवाई संरक्षण रडार केंद्रे ही उद्ध्वस्त केली. यामध्ये पंजाबमधील पासरूर हवाई पट्टीवरील एक रडार केंद्र उपग्रह चित्रांद्वारे नष्ट झाल्याची पुष्टी झाली आहे. याशिवाय आरिफवाला हवाई तळ, चुनियन रडार, आणि सुक्कूर हवाई पट्टी येथील आणखी तीन केंद्रांवर हल्ले करण्यात आले.

    Operation Sindoor Raising The Cost Of Terrorism For Pakistan

    आरिफवाला हवाई तळावरील नुकसान - स्रोत: NDTV

    Operation Sindoor Raising The Cost Of Terrorism For Pakistan

    चुनियन हवाई तळावरील नुकसान - स्रोत: NDTV

    Operation Sindoor Raising The Cost Of Terrorism For Pakistan

    पासरूर हवाई तळावरील नुकसान - स्रोत: NDTV

    Operation Sindoor Raising The Cost Of Terrorism For Pakistan

    सुक्कूर हवाई तळावरील नुकसान - स्रोत: इंडियन एक्सप्रेस

    Operation Sindoor Raising The Cost Of Terrorism For Pakistan

    सरगोधा हवाई तळावरील नुकसान - स्रोत: NDTV

    मध्य पंजाबमधील चुनियन हवाई तळावर भारताने चीननिर्मित YLC-8E अँटी-स्टेल्थ रडार नष्ट केले, ज्याची अंदाजे किंमत 15-20 दशलक्ष अमेरिकी डॉलर आहे. याशिवाय निष्प्रभ करण्यात आलेल्या प्रणालींमध्ये लाहोरमध्ये HARPY ड्रोनद्वारे लक्ष्य केलेले चीननिर्मित LY-80 फायर रडार (सुमारे 70 दशलक्ष अमेरिकी डॉलर), अमेरिकन बनावटीची AN/TPQ-43 ट्रॅकिंग रडार प्रणालींची दोन युनिट्स (प्रत्येकी 25 दशलक्ष अमेरिकी डॉलर), तसेच चीनच्या HQ-9 प्रणालीतील एक फायर युनिट (अंदाजे 100-200 दशलक्ष अमेरिकी डॉलर) यांचा समावेश आहे. शत्रूच्या हवाई संरक्षण दडपशाही (सप्रेशन ऑफ एनिमी एअर डिफेन्स- SEAD) कारवायांदरम्यान, अहवालांनुसार सुमारे 30 Harop ड्रोन, भारताच्या 154 ड्रोनच्या साठ्यापैकी सुमारे 20 टक्के वापरण्यात आले. याचा एकूण खर्च अंदाजे 300 दशलक्ष अमेरिकी डॉलर इतका झाला. 

    तोफखाना गोळीबार

    भारताच्या कारवाईनंतर नियंत्रण रेषेवर (LoC) जोरदार तोफखाना चकमक झाली. दिवसाला सरासरी 2,000 शेल्स असा सावध अंदाज धरल्यास, भारताने सुमारे 8,000 शेल्स तर पाकिस्तानने सुमारे 6,000 शेल्स डागले असावेत. ही आकडेवारी फायनान्शियल एक्सप्रेसच्या अहवालाशी सुसंगत आहे.

    भारताने पाकिस्तानच्या टियर-2 संरक्षण व्यवस्थांचा नायनाट करण्यासाठी M-777 हॉवित्झर्ससह अचूक-मार्गदर्शित एक्सकॅलिबर (Excalibur) शेल्सचा वापर केला. यासोबतच अचूक हल्ल्यांसाठी बोफोर्स तोफा आणि पोलंडनिर्मित लोइटरिंग म्युनिशन्स तैनात करण्यात आल्या. 155 मिमी बोफोर्स शेलची किंमत सुमारे 1,100 अमेरिकी डॉलर आहे, तर एक्सकॅलिबर शेलची किंमत अंदाजे 1 लाख अमेरिकी डॉलर आहे. त्यामुळे बहुतांश गोळीबार पारंपरिक “डम्ब” शेल्सने करण्यात आला, तर महागडी अचूक शस्त्रास्त्रे केवळ उच्च-मूल्य लक्ष्यांसाठी राखून ठेवण्यात आली.

    निष्कर्ष

    ऑपरेशन सिंदूरने दहशतवादाबाबत भारताची रणनीतिक भूमिका नव्याने अधोरेखित करत पाकिस्तानच्या लष्करी व दहशतवादी पायाभूत सुविधांवर आर्थिकदृष्ट्या अपंग करणारा आघात केला. एकूण खर्चाच्या दृष्टीने, ऑपरेशन सिंदूरनंतरच्या चार दिवसांच्या संघर्षात भारताचा अंदाजे खर्च 407.75 दशलक्ष अमेरिकी डॉलर इतका झाला. याउलट, पाकिस्तानला सुमारे 1.5 अब्ज अमेरिकी डॉलर इतका मोठा आर्थिक फटका बसला. दोन्ही देशांना मोठे खर्च सहन करावे लागले असले, तरी त्यांच्या अर्थव्यवस्थांच्या तुलनात्मक आकारामुळे पाकिस्तानवरील आर्थिक ओझे भारताच्या तुलनेत अत्यंत असमतोल आहे. भारताचा GDP पाकिस्तानपेक्षा सुमारे 10 पट असल्याने, बदल-दुरुस्तीचे खर्च भारतासाठी तुलनेने अधिक सुलभ आहेत. याउलट, F-16 किंवा Saab AEW&C सारखी प्रगत विमाने पुन्हा मिळवणे पाकिस्तानसाठी अत्यंत कठीण ठरेल, ज्यामुळे त्याची संरक्षणात्मक स्थिती आणखी कमकुवत होईल. येथे चर्चिलेले खर्च केवळ गतिजन्य (kinetic) लष्करी कारवायांपुरते मर्यादित आहेत, हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. विमानसेवा विस्कळीत होणे, हवाई क्षेत्र बंद ठेवणे आणि त्यातून होणारे व्यावसायिक नुकसान यांसारखे इतर महत्त्वाचे आर्थिक परिणाम या विश्लेषणात समाविष्ट केलेले नाहीत. 


    समरवीर सिंग हे ऑब्झर्व्हर रिसर्च फाउंडेशनमध्ये इंटर्न आहेत. 

    The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.