Author : Soumya Awasthi

Expert Speak Raisina Debates
Published on May 12, 2025 Updated 0 Hours ago

ऑपरेशन सिंदूरनंतर AQIS ने दिलेला जिहादचा कॉल ही एक धोरणात्मक वाढ आहे, ज्यामध्ये भारताला त्यांच्या विचारसरणीवर आधारित आणि प्रादेशिक मोहिमेतील प्रमुख लक्ष्य म्हणून अधोरेखित करण्यात आले आहे.

ऑपरेशन सिंदूर आणि AQIS: भारताच्या हवाई हल्ल्यांचा जिहादी जगतात परिणाम

Image Source: Getty

    ६ मे २०२५ रोजी भारताने पाकिस्तानच्या सीमेमधील नऊ लक्ष्यित ठिकाणांवरील दहशतवादी तळांवर केलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर, भारतीय उपखंडातील अल-कायदा म्हणजेच अल-कायदा इन इंडियन सबकॉन्टिनेन्ट (AQIS) ने भारताविरुद्ध जिहाद जाहीर केला. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सुरू असलेल्या परिस्थितीत जिहाद हे एक धार्मिक कर्तव्य असल्याचे या गटाने घोषित केले. या घोषणेमुळे या अतिरेकी गटाच्या वकृत्वात आणि रणनीतिक भूमिकेत एक गंभीर वाढ झाली आहे.

    AQIS चे मुख्य नेतृत्व पाकिस्तानमधून कार्यरत असल्याचे मानले जाते, जे नेतृत्व ओसामा महमूद हा अमीर म्हणून करतो. त्यास आदिवासी भागात आणि शहरातील सुरक्षित ठिकाणांमध्ये तुलनेत सुरक्षित आश्रय मिळतो, जो अनेकदा पाकिस्तानच्या सुरक्षायंत्रणांतील काही घटकांच्या अप्रत्यक्ष संरक्षणामुळे किंवा निष्क्रिय दुर्लक्षामुळे संभवतो. या गटाने दीर्घकाळापासून पाकिस्तानातील देवबंदी संस्थांच्या गटांमधून, जसे की दारुल उलूम हक्कानिया आणि बहावलपूर मदरसा तसेच सलाफी धार्मिक नेटवर्क आणि मदरसा सर्किटमधून विशेषतः पाकिस्तानमधून भरती करण्याचा प्रयत्न केला आहे.

    या गटाने त्यांच्या अलीकडील अधिकृत निवेदनात हवाई हल्ल्यांचा निषेध केला असून, भारतावर निरपराध मुस्लिमांची हत्या केल्याचा आणि पाकिस्तानच्या सार्वभौमत्वाचा भंग केल्याचा आरोप केला आहे. अधिक महत्त्वाचे म्हणजे, या हल्ल्यांना इस्लामविरोधात कथित हिंदू राष्ट्रवादी मोहिमेचा एक भाग म्हणून दर्शवले गेले असून, हिंसक संघर्ष हाच एकमेव योग्य प्रतिसाद असल्याचे घोषित केले आहे. या गटाने भारत, पाकिस्तान आणि बांगलादेशमधील मुस्लिमांना या हाकेला प्रतिसाद देण्याचे आणि AQISच्या ब्रिगेडमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले आहे, तसेच स्वतःला जागतिक मुस्लिम उम्माहचे रक्षणकर्ते आणि पाकिस्तानच्या भौगोलिक पवित्रतेचे संरक्षक म्हणून मांडले आहे.

    या गटाने भारत, पाकिस्तान आणि बांगलादेशमधील मुस्लिमांना या हाकेला प्रतिसाद देण्याचे आणि AQISच्या ब्रिगेडमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले आहे, तसेच स्वतःला जागतिक मुस्लिम उम्माहचे रक्षणकर्ते आणि पाकिस्तानच्या भौगोलिक पवित्रतेचे संरक्षक म्हणून मांडले आहे.

    ही घडामोड पूर्णपणे अनोखी नसली तरी, AQIS कडून अनेक अपयशी प्रयत्नांनंतर आणि माजी अमीर अयमान अल-झवाहिरीच्या मृत्यूनंतर दक्षिण आशियात पुन्हा सक्रिय होण्याच्या पुनरावृत्त प्रयत्नांना अधोरेखित करते. ही एक विचारसरणीवर आधारित मोहीम असून, प्रादेशिक स्थित्यंतराच्या पार्श्वभूमीवर धोरणात्मक प्रचार आणि भरतीसाठीची एक संधी म्हणून काम करते. AQIS ने भारतीय हवाई हल्ल्याचा वापर प्रचार आणि भरतीच्या संधीसाठी केला आहे. या गटाचा उद्देश भारताला प्रमुख प्रादेशिक आक्रमक म्हणून सादर करणे आणि धार्मिक भावना भडकवणे आहे. ही यांची एक सतत वापरली जाणारी युक्ती असून, ती त्यांनी त्यांच्या प्रकाशनांद्वारे, पत्रकांद्वारे आणि प्रचार व्हिडिओद्वारे पुन्हा पुन्हा वापरली आहे. पाकिस्तान आणि बांगलादेशमध्ये sporadic (अनियमित) प्रचार मोहिमा आणि अपयशी ऑपरेशनल प्रयत्नांनंतरही AQIS ला या भागातील जिहादी रणांगणात एक मध्यवर्ती भूमिका निभावता आलेली नाही. 

    भारताच्या अलीकडील हवाई हल्ल्यांमुळे AQIS ला स्वतःला पुन्हा सक्रिय करण्याची संधी मिळाल्याचे दिसून येते. या हल्ल्यांमुळे जैश-ए-मोहम्मद (JeM) आणि लष्कर-ए-तैबा (LeT) सारख्या गटांकडून वापरण्यात येणाऱ्या लॉंच पॅड्स आणि दहशतवादी पुरवठा साखळ्या उद्ध्वस्त झाल्याचे सांगितले जाते, जे भारताविरुद्ध पाकिस्तानचे धोरणात्मक हस्तक मानले जातात. पाकिस्तानने या हल्ल्यांची व्याप्ती आणि उद्देशाचे खंडन केले असले, तरी जिहादी गटांकडून प्रतिक्रिया तीव्र आणि आक्रमक स्वरूपात आली आहे.

    AQIS साठी परिणाम

    AQIS च्या अलीकडील प्रचारात भारताला प्रमुख शत्रू म्हणून सादर करण्यात आले असून, हा गट आंतरराष्ट्रीय धार्मिक भावना भडकवण्याचा प्रयत्न करत आहे. हे जिहादी राजकारणाचे एक ठराविक उदाहरण आहे, जिथे भौगोलिक घडामोडींचा वापर करून मुस्लिमांवर अन्याय होत असल्याचे पक्षपाती कथानक तयार केले जाते आणि दहशतवादी प्रतिसादाचे समर्थन केले जाते. AQIS च्या अलीकडील घोषणा आणि प्रचार भारताला त्यांच्या विचारसरणीतील आणि रणनीतीतील मुख्य लक्ष्य म्हणून अधोरेखित करतात, आणि काश्मीरपासून पॅलेस्टाईन व म्यानमारपर्यंतच्या मुद्द्यांना जोडतात. या घोषणेला पूर्वीच्या AQIS निवेदनांपेक्षा वेगळे ठरवणारे घटक म्हणजे त्याचे वेळोवेळी केलेले निवेदन आणि त्यामागचा धोरणात्मक उद्देश. तसेच, AQIS चा नव्याने सुरू झालेला प्रचार संपूर्ण जिहादी परिप्रेक्ष्यात एक आव्हान म्हणून समोर येतो. या गटाला इस्लामिक स्टेट खोरेसान प्रांत (ISKP) कडून मोठी स्पर्धा आहे, ज्यांनी मोठ्या प्रमाणावर हाई प्रोफाइल हल्ले केले आहेत आणि या भागातील अनेक युवकांना कट्टर बनवून भरती करण्यात यश मिळवले आहे. ही आंतर-जिहादी स्पर्धा हे दर्शवते की अतिरेकी राजकारण हे सतत बदलणारे आणि संघर्षमय क्षेत्र आहे.

    AQIS ने विशेषतः उपखंडातील मुस्लिमांना ‘हिंदुत्व दहशतवादा’विरुद्ध उठण्याचे आवाहन केले.

    जिहादसाठी दिलेली हाक ही केवळ भारतीय मुस्लिमांपुरती मर्यादित नव्हती. AQIS ने विशेषतः उपखंडातील मुस्लिमांना ‘हिंदुत्व दहशतवादा’विरुद्ध उठण्याचे आवाहन केले. या निवेदनात त्यांनी पाकिस्तानच्या भूमीशी प्रामाणिकतेचे आणि इस्लामच्या सन्मानाचे रक्षण करणाऱ्या शस्त्रधारी व्यक्तींचे खुलेआम कौतुक केले, आणि अनेक पातळ्यांवर पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न केला. त्यांनी मुस्लिम युवकांना राष्ट्रवादी ओळखी नाकारून, जिहादी नेतृत्वाखालील जागतिक उम्माहच्या झेंड्याखाली एकत्र येण्याचे आवाहन केले. विचारसरणीतील हे एक महत्त्वाचे वळण आहे, कारण हे सार्वभौम राष्ट्राने घेतलेल्या राष्ट्रीय सुरक्षेच्या कृतींना धर्मावरील कथित युद्धाशी एकत्र करण्याचा प्रयत्न करते. जी जिहादी विचारसरणीतील एक जुनी पद्धत आहे, जी तुटक समाजरचनेत अनेकदा प्रभावी ठरलेली आहे.

    भारतासाठी परिणाम

    भारताने ही घडामोड गांभीर्याने घेणे आवश्यक आहे. जरी AQIS ला भारतीय भूमीवर थेट हल्ले घडवून आणण्यात फारसे यश मिळालेले नसले, तरी त्यांनी सतत विचारसरणीच्या पातळीवर पाय रोवण्याचे प्रयत्न केले आहेत. विशेषतः डिजिटल प्रचार, सोशल मीडिया नेटवर्क्स आणि कट्टर विचारसरणीच्या व्यक्तींशी गुप्त संपर्क यांद्वारे. सध्याचे निवेदन प्रचार सामग्री म्हणून वापरले जाऊ शकते, ज्याद्वारे 'लोन-वुल्फ' प्रकारचे स्वतंत्र हल्ले किंवा लहान दहशतवादी गट सक्रिय करण्याचा प्रयत्न होऊ शकतो, विशेषतः काश्मीर, उत्तर प्रदेशातील काही भाग, पश्चिम बंगाल, केरळ आणि भारत-बांगलादेश सीमेच्या आसपासच्या प्रदेशांमध्ये.

    दीर्घकालीन प्रयत्नांमध्ये विचारसरणीच्या पातळीवर होणाऱ्या कट्टरतेविरोधात उपाययोजना, डि-रॅडिकलायझेशन (कट्टरता कमी करणारे) कार्यक्रम घेणे, आणि धोके निर्माण होण्यापूर्वीच त्यांची ओळख पटवून त्यांना निष्क्रिय करणाऱ्या संस्थांमधील सहकार्य व क्षमता वाढवणे यावर भर दिला पाहिजे.

    म्हणूनच भारताच्या सुरक्षायंत्रणांनी अल्पकालीन आणि दीर्घकालीन परिणामांचा सखोल विचार करणे आवश्यक आहे. अल्पकालीन दृष्टिकोनातून, कट्टरतेकडे झुकण्याचा धोका, हिंसेसाठी चिथावणी देणे आणि ऑनलाइन जिहादी प्रचार या गोष्टींवर प्रभावी डिजिटल पाळत ठेवणे, समन्वयित गुप्तचर माहिती संकलन आणि धोरणात्मक समुदाय संवाद यांद्वारे यागोष्टी रोखणे आवश्यक आहे. दीर्घकालीन प्रयत्नांमध्ये विचारसरणीच्या पातळीवर होणाऱ्या कट्टरतेविरोधात उपाययोजना, डि-रॅडिकलायझेशन (कट्टरता कमी करणारे) कार्यक्रम घेणे, आणि धोके निर्माण होण्यापूर्वीच त्यांची ओळख पटवून त्यांना निष्क्रिय करणाऱ्या संस्थांमधील सहकार्य व क्षमता वाढवणे यावर भर दिला पाहिजे.

    भौगोलिक राजकारणाच्या दृष्टीने पाहता, हे निवेदन पाकिस्तानच्या दहशतवादविरोधी भूमिकेतील विसंगती उघड करते. पाकिस्तानने वारंवार असा दावा केला आहे की तो आंतरराष्ट्रीय जिहादी संघटनांना पाठिंबा देत नाही, तरीही AQIS चे अस्तित्व आणि नेतृत्व पाकिस्तानमध्ये असल्याचे सर्वश्रुत आहे. AQIS सारख्या गटाला पाकिस्तानच्या भूमीवरून इतक्या उघडपणे निवेदन देण्याचा आत्मविश्वास वाटतो, ही बाब पाकिस्तानच्या अंतर्गत सुरक्षा यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर आणि प्रामाणिकपणावर प्रश्नचिन्ह निर्माण करते. तसेच, यामुळे भारताचा दीर्घकालीन दावा अधिक मजबूत होतो की पाकिस्तान अजूनही अशा गटांना प्रोत्साहन आणि संरक्षण देत आहे, जे प्रादेशिक शांतता आणि स्थैर्याला धोका निर्माण करतात.

    पुढील दिशा

    ही घडामोड प्रादेशिक सहकार्यासाठी एक इशारा म्हणून देखील घेतली पाहिजे. AQIS चा धोका केवळ भारतापुरता मर्यादित नाही. बांगलादेश आधीच वेळोवेळी उद्भवणाऱ्या जिहादी धमक्यांचा सामना करत आहे, तर तालिबानच्या नियंत्रणाखालील अफगाणिस्तानलाही अशाच प्रकारच्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. संपूर्ण क्षेत्रासाठी एक व्यापक गुप्तचर माहिती सामायिकरण आणि दहशतवादविरोधी यंत्रणा तयार करणे आवश्यक आहे, जेणेकरून सगळ्या इस्लामिक दहशतवादी गटांविरोधात एकत्रित भूमिका घेता येईल. शिवाय, AQIS सारख्या संघटनांशी संबंधित गट व व्यक्तींना वेगळं पाडण्यासाठी आणि त्यांच्यावर निर्बंध लादण्यासाठी, भारताने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद (UNSC) आणि आर्थिक कृती दल (FATF) यांसारख्या आंतरराष्ट्रीय मंचांचा प्रभावीपणे उपयोग करत राहिले पाहिजे.

    AQIS चा धोका केवळ भारतापुरता मर्यादित नाही. बांगलादेश आधीच वेळोवेळी उद्भवणाऱ्या जिहादी धमक्यांचा सामना करत आहे, तर तालिबानच्या नियंत्रणाखालील अफगाणिस्तानलाही अशाच प्रकारच्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

    याशिवाय, डिजिटल निगराणी ठेवण्याची क्षमता अधिक व्यापक केली पाहिजे, विशेषतः डार्क नेटवरील जिहादी मंच, टेलिग्रामवरील अरबी व उर्दू चॅनेल्स आणि AQIS च्या इंग्रजी तसेच प्रादेशिक भाषांमधील नव्या संपर्क मोहिमांवर लक्ष केंद्रित केले पाहिजे.

    शेवटी, विचारसरणीच्या स्तरावरील लढाही तितक्याच तातडीने लढला पाहिजे. जिहादी प्रचार अशा ठिकाणी फोफावतो, जिथे राष्ट्राची दुर्बल भूमिका आणि सांप्रदायिक ध्रुवीकरणामुळे एक पोकळी निर्माण होते. भारताने हे सुनिश्चित केले पाहिजे की अंतर्गत चर्चामध्ये अशा खोट्या कथानकांना बळ मिळणार नाही की मुस्लिमांना पद्धतशीरपणे लक्ष्य केले जात आहे. हिंसक अतिरेकी विचारांना वैधतेपासून दूर ठेवण्यासाठी आणि घटनात्मक मूल्ये जसे की बहुविचारधारा आणि शांततामय सहजीवन टिकवण्यासाठी, समुदयाचे नेते, धार्मिक विद्वान आणि नागरी समाजातील प्रतिनिधींना सक्रियपणे सहभागी करून घेतले पाहिजे.

    निष्कर्ष

    निष्कर्षामध्ये, AQIS चा भारताविरुद्ध जिहाद जाहीर करणे हा एक प्रचारात्मक युक्तिवाद आणि क्षेत्रात त्याच्या प्रभावाला पुन्हा सक्रिय करण्याचा धोरणात्मक प्रयत्न आहे. जरी त्यांच्या ऑपरेशनल क्षमता मर्यादित असल्या तरी, त्यांची विचारसरणीकडे आकर्षित करण्याची शक्ती आणि हिंसा उकसवण्याची क्षमता कमी लेखता येणार नाही. भारताने कठोर शक्तीला विचारसरणीच्या लवचिकतेसह, गुप्तचर समन्वयाला डिजिटल साक्षरतेसह आणि प्रादेशिक सहकार्यास मजबूत राष्ट्रीय एकतेसह जोडणारी एक बहुआयामी रणनीती स्वीकारली पाहिजे. येणारे महिने हे ठरवतील की AQIS चे हे जाहीर करणे केवळ प्रचारचे माध्यम राहील की ते ठोस धोके निर्माण करेल, मात्र यावर भारताचा प्रतिसाद हा आक्रमक आणि शाश्वत असावा लागेल.


    सोम्या अवस्थी हे ऑबझर्व्हर रिसर्च फाउंडेशनमधील सेंटर फॉर सिक्युरीटी स्ट्रेटजी अँड टेक्नॉलॉजीमध्ये फेलो आहेत.

    The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.

    Author

    Soumya Awasthi

    Soumya Awasthi

    Dr Soumya Awasthi is Fellow, Centre for Security, Strategy and Technology at the Observer Research Foundation. Her work focuses on the intersection of technology and national ...

    Read More +