Author : Shoba Suri

Expert Speak Health Express
Published on Nov 10, 2025 Updated 0 Hours ago

भारताचा अनुभव दर्शवतो की पोषण अभियान, टेलि-मानस आणि पीएम-पोषण यांसारख्या उपक्रमांद्वारे पोषण आणि मानसिक आरोग्य कार्यक्रमांचे एकत्रीकरण हे सार्वजनिक आरोग्य व्यवस्था मजबूत करण्यासाठी आणि संकटाच्या काळात लवचिकता निर्माण करण्यासाठी अत्यावश्यक आहे.

पोषण आणि मानसिक आरोग्य : संकटात उभा भारताचा नवा पाया

Image Source: Getty Images

    भारत “सेवांपर्यंत प्रवेश - आपत्ती आणि आणीबाणीतील मानसिक आरोग्य” या विषयाअंतर्गत 2025 चा जागतिक मानसिक आरोग्य दिन साजरा करत आहे. याच पार्श्वभूमीवर एका महत्त्वपूर्ण पण अनेकदा दुर्लक्षित राहिलेल्या संबंधाचा विचार करणे अत्यंत आवश्यक ठरते तो म्हणजे पोषण आणि मानसिक आरोग्य यांतील घनिष्ट परस्पर अवलंबित्व. नैसर्गिक आपत्ती असो, महामारी असो किंवा सामाजिक-राजकीय अस्थिरता अशा संकटांचा परिणाम केवळ भौतिक हानीपुरता मर्यादित नसतो, तर ते अन्न प्रणाली आणि भावनिक स्थैर्यावरही खोलवर परिणाम करतात. या परिस्थितीत कुपोषण आणि मानसिक आरोग्याशी संबंधित समस्या एकमेकांना अधिक तीव्र करतात, त्यामुळे दोन्ही पैलूंवर एकाच वेळी लक्ष केंद्रित करणे हे लवचिकता आणि पुनर्प्राप्ती साध्य करण्यासाठी अत्यावश्यक ठरते.

    आपत्तीच्या काळात अन्न प्रणाली विस्कळीत होते, ज्यामुळे अन्नसुरक्षेचा अभाव निर्माण होतो, आणि परिणामी मानसिक आरोग्याच्या समस्या आणखी तीव्र होतात. कुपोषण जे विशेषतः लोह, फोलेट आणि ओमेगा-3 फॅटी ॲसिड यांसारख्या आवश्यक पोषक घटकांच्या कमतरतेमुळे उद्भवते. ज्यामुळे नैराश्य, चिंता आणि आकलनविषयक (काँग्निटिव्ह) क्षमतेतील बिघाड यांचा धोका वाढतो, असे आढळले आहे. भारतात, जिथे लोकसंख्येचा मोठा भाग पोषण म्हणजेच न्यूट्रीशन कमतरतेचा सामना करतो, तिथे संकटांच्या काळात मानसिक आरोग्यावर होणारा परिणाम अत्यंत गंभीर असतो. संशोधनातून दिसून आले आहे की अन्नसुरक्षा वाढवल्याने अपुर्‍या पोषणामुळे उद्भवणारा मानसिक ताण कमी होऊ शकतो. उदाहरणार्थ, कोविड-19 महामारीदरम्यान ॲक्शन अगेंस्ट हंगर सारख्या संस्थांनी आपत्कालीन अन्नसहाय्याबरोबरच मानसिक आरोग्य सहाय्य पुरवले ज्यामुळे शारीरिक आणि मानसिक गरजा एकाचवेळी पूर्ण करता आल्या. संकटांच्या काळात अन्नसुरक्षा यंत्रणा मजबूत केल्यास मानसिक ताण कमी होतो, तणाव हाताळण्याची क्षमता वाढते आणि सामुदायिक लवचिकता बळकट होते.

    भारत सरकारने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेत पोषण आणि मानसिक आरोग्याच्या एकत्रीकरणाचे महत्त्व वाढत्या प्रमाणात ओळखले आहे. राष्ट्रीय मानसिक आरोग्य कार्यक्रम (National Mental Health Programme - NMHP) अंतर्गत मानसिक आरोग्य सेवा प्राथमिक आरोग्य व्यवस्थेत समाविष्ट करण्याचे उद्दिष्ट आहे. यातील एक महत्त्वाचा पुढाकार म्हणजे टेलि-मानस, ही 24x7 दूरध्वनीद्वारे मानसिक आरोग्य सेवा, जी देशभरात तात्काळ मानसशास्त्रीय सहाय्य पुरवते. या प्लॅटफॉर्मचा प्रभाव अधिक वाढवण्यासाठी पोषणविषयक सल्लामसलत समाविष्ट केली जाऊ शकते. पोषण अभियान सारखे कार्यक्रम कुपोषणावर मात करण्यासाठी कार्यरत आहेत, तर राष्ट्रीय आरोग्य धोरण 2017 मानसिक आरोग्याला राष्ट्रीय प्राधान्य मानते आणि ते प्राथमिक आरोग्यसेवांमध्ये समाविष्ट करण्यावर तसेच मानसिक आरोग्याच्या पायाभूत सुविधांच्या बळकटीकरणावर भर देते. दरम्यान, फिट इंडिया मूव्हमेंट शारीरिक क्रियाशीलता आणि आहाराबद्दल जागरूकता वाढवून जीवनशैलीद्वारे मानसिक आरोग्य सुधारण्यास हातभार लावते. त्याचप्रमाणे, पीएम-पोषण (मिड-डे मील योजना) शालेय विद्यार्थ्यांना पौष्टिक आहार पुरवून त्यांच्या बौद्धिक विकास आणि भावनिक कल्याणास पाठिंबा देते. ही योजना शाळांना आपत्तीच्या काळात अन्नवाटप आणि मानस-समाजिक सहाय्य केंद्र म्हणून कार्य करण्यास सक्षम बनवते.

    महिला, किशोरवयीन आणि संवेदनशील गटांवर केंद्रित कार्यक्रम पोषण आणि मानसिक आरोग्य यांतील संबंध आणखी स्पष्ट करतात. अलीकडेच सुरू करण्यात आलेले स्वस्थ नारी, सशक्त परिवार अभियान महिलांच्या आरोग्य, पोषण आणि प्रतिबंधात्मक काळजीवर लक्ष केंद्रित करते. आरोग्य तपासण्या, पोषण शिक्षण आणि मानसिक आरोग्य सहाय्याद्वारे हे अभियान संपूर्ण कुटुंबाच्या कल्याणाला समग्र पद्धतीने हाताळते, विशेषतः आपत्ती आणि आणीबाणीच्या काळात. राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत किशोर आरोग्य कार्यक्रम - राष्ट्रीय किशोर स्वास्थ्य कार्यक्रम (RKSK) हा उपक्रम पोषण, मानसिक आरोग्य, पदार्थांचा गैरवापर आणि असंसर्गजन्य आजारांवर लक्ष केंद्रित करणाऱ्या एकात्मिक सेवा पुरवतो, ज्यामुळे किशोरवयीनांना संपूर्ण आरोग्य सेवा मिळते. डिजिटल क्षेत्रात, आयुष्मान भारत डिजिटल मिशन एकात्मिक आरोग्य नोंदी सुलभ करून सेवांपर्यंतची प्पोहोच वाढवते, ज्याचा मानसिक आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतो. सामुदायिक स्तरावरील उपक्रम या सरकारी कार्यक्रमांना पूरक ठरतात ते स्थानिक जनजागृती, सहकारी समर्थन आणि सांस्कृतिकदृष्ट्या संवेदनशील काळजीद्वारे मूलभूत स्तरावर सेवा-अभाव कमी करतात. मुंबईतील SNEHA संस्था किशोरवयीन मुलांना पोषण, प्रजनन आरोग्य आणि भावनिक लवचिकतेविषयी शिक्षण देते, ज्यामुळे स्थानिक स्तरावर मानसिक आरोग्य समर्थनाचे जाळे निर्माण होते. जे संकटकाळात विशेषतः महत्त्वाचे ठरते. तामिळनाडूमधील द बॅन्यन संस्था बेघर आणि असुरक्षित व्यक्तींसाठी समुदाय-आधारित मानसिक पुनर्वसन सेवा पुरवते, तर निलगिरीतील अश्विनी आदिवासी आरोग्य सेवा आणि मानसिक सामाजिक सहाय्य यांचे एकत्रीकरण करते. त्याचप्रमाणे, निमहन्सचा समुदाय मानसिक आरोग्य कार्यक्रम आणि टाटा ट्रस्ट्सचे स्थानिक हस्तक्षेप जसे की तांदळाचे पोषण-वर्धन (rice fortification) आणि समुपदेशन मोहिमा हे सेवा-अभाव भरून काढतात आणि स्थानिक पातळीवर मानसिक कल्याण वाढवतात. मन टॉक्स सारख्या हेल्पलाईन आणि जनजागृती मंच मोफत मानसिक आरोग्य समुपदेशन व समुदाय संवाद उपलब्ध करून देतात, ज्यामुळे मानसिक आघात कमी होतो. हे स्थानिक आणि एकात्मिक दृष्टिकोन दाखवतात की पोषण उपक्रमांमध्ये मानसिक आरोग्याविषयी जागरूकता समाविष्ट केल्याने संपूर्ण समुदायाची लवचिकता वाढते आणि संकटांच्या धक्क्याचा परिणाम मवाळ होतो.

    आपत्ती नंतरच्या प्रभावी रिकव्हरीसाठी हे ओळखणे आवश्यक आहे की योग्य पोषण म्हणजे फक्त कुपोषण रोखणे नव्हे, तर ते मानसिक आरोग्य पुनर्बांधणीसाठीही अत्यंत आवश्यक आहे. पोषक आहार मनःस्थिती सुधारतो, संज्ञानात्मक कार्यक्षमता वाढवतो आणि भावनिक लवचिकता मजबूत करतो, ज्यामुळे व्यक्तींना तणाव आणि आघातांचा सामना करणे सुलभ होते. कोविड-19 काळातील अनुभवाने दाखवून दिले की अन्नसुरक्षा उपाययोजना, समुपदेशन आणि मानसिक सामाजिक सहाय्य यांचे संयोजन असलेले हस्तक्षेप व्यक्ती आणि कुटुंबांना संकटातून अधिक परिणामकारकपणे बाहेर पडण्यास मदत करतात आणि या सर्वसमावेशक दृष्टिकोनाचे महत्त्व अधोरेखित करतात. 

    आर्थिक सर्वेक्षण 2024-25 मध्ये अधिक मजबूत मानसिक आरोग्य व्यवस्थांची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. शालेय शिक्षणामध्ये मानसिक आरोग्य शिक्षण समाविष्ट करणे, कार्यस्थळावरील कल्याण धोरणे सुधारणे आणि टेली-मानस व कृत्रिम बुद्धिमत्ता (AI)-आधारित उपायांद्वारे डिजिटल सेवांचा विस्तार करणे. भारताचा अनुभव दाखवतो की संकटांच्या काळात पोषण आणि मानसिक आरोग्य या दोन्हींचा एकात्मिक आणि सर्वांगीण दृष्टिकोनातून विचार करणे अत्यावश्यक आहे. शासकीय योजना आणि कार्यक्रम, डिजिटल इनोव्हेशन आणि समुदाय-आधारित उपक्रम यांचा संगम लवचिकतेसाठी प्रभावी चौकट प्रदान करतो. संदेश स्पष्ट आहे की धोरणकर्ते, आरोग्य व्यावसायिक आणि समुदाय नेतृत्व यांनी ओळखले पाहिजे की शरीराचे पोषण आणि मनाचे पोषण हे एकमेकांपासून वेगळे नाहीत. पोषण कार्यक्रमांमध्ये मानसिक आरोग्याचे घटक समाविष्ट करून आणि मानसिक आरोग्य उपक्रमांमध्ये पोषणाचा दृष्टिकोन आणून भारत आपल्या समुदायांना केवळ संकटांमधून सावरण्यासच नव्हे, तर अधिक सक्षम, समृद्ध आणि लवचिक भविष्य घडविण्यास सुसज्ज करू शकतो. 


    शोभा सूरी ह्या ऑब्झर्व्हर रिसर्च फाऊंडेशनमध्ये हेल्थ इनिशिएटिव्हच्या सिनियर फेलो आहेत.

    The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.