-
CENTRES
Progammes & Centres
Location
हिमनद्यांच्या वितळण्यामुळे पृथ्वीवर साखळीप्रमाणे संकटे उभी राहतात, आणि ओक्जोकुलपासून ते याला पर्यंतच्या हिमनद्या तातडीच्या हवामान कृतीची मागणी करतात.
Image Source: Pexels
जगभरात सरासरी तापमान वाढत असून त्याचबरोबर हरितगृह वायू (ग्रीन हाऊस गॅस GHG) उत्सर्जनही वाढत आहे, त्यामुळे जगातील हिमनगांचे म्हणजेच ग्लेशियरचे भविष्य अंधकारमय वाटते. स्वित्झर्लंडमधील ब्लॅटन येथे बिर्च हिमनग आताच कोसळलेला असताना आणि नेपाळमधील याला हिमनगाचा पार पडलेला औपचारिक अंत्यविधी म्हणजेच वितळणे, हे बदलत्या हवामानाचे आणि अनिश्चित भविष्याचे शोकगीत आहेत. गेल्या दोन दशकांत ज्याप्रमाणे हिमनगांच्या संख्या घटत आहेत त्या विश्लेषणावरून हे स्पष्ट होते की, उत्सर्जनात कपात झाली तरीही ही हा प्रकार सुरूच राहण्याची शक्यता आहे. ही केवळ प्रतीकात्मक हानी नसून, हिमनग जे हवामान बदलाचे पहारेकरी मानले जातात, त्यांचे वितळणे किंवा होणारी घट हे एक भयंकर पर्यावरणीय संकट, पाण्याचा तुटवडा आणि सांस्कृतिक अधःपतन यांचा इशारा आहे.
जगातील सुमारे 69 टक्के गोड्या पाण्याचा साठा हिमनगांमध्ये आहे, तसेच हे हिमनग पर्वतीय परिसंस्था, जलाशय, आणि जैवविविधतेच्या केंद्रांना टिकवून ठेवतात. केवळ हिमालयातच सुमारे 15,000 हिमनग असून त्यांच्या वितळलेल्या पाण्याचा सिंधू, गंगा, ब्रह्मपुत्र, यमुना, मेकोंग, सालवीन, इरावदी, यांगत्से आणि यलो नदीसारख्या प्रमुख नद्यांना पुरवठा होतो. यामुळे अंदाजे 1.3 ते 1.5 अब्ज लोकांच्या गोड्या पाण्याच्या गरजा भागतात. अंटार्क्टिका आणि ग्रीनलँडमधील मोठ्या आइस शिट्स (बर्फाच्या चादरी) जागतिक हवामान व्यवस्थेत महत्त्वाची भूमिका बजावतात, कारण ते महासागर प्रवाह नियंत्रित करतात आणि अल्बेडो प्रभावाद्वारे वातावरण थंड ठेवतात (सूर्यप्रकाश परावर्तित करतात). परंतु जागतिक तापमान वाढल्यामुळे हे बर्फ साठे वितळत असून त्यामुळे समुद्रपातळी वाढत आहे.
आंतरशासकीय हवामान बदल पॅनेल (इंटरगोवर्नमेंटल पॅनल ऑन क्लायमेट चेंज IPCC) नुसार, 1900 पासून जागतिक सरासरी समुद्रपातळी सुमारे 20 सेंटीमीटरने वाढली आहे, 1971 पासून 10 सेंटीमीटरने, आणि 2006 पासून ही वाढ दरवर्षी 4 मिमी इतकी झाली आहे. वितळणारे हिमनग महासागरातील प्रवाह पद्धतींनाही अस्थिर करू शकतात (उदाहरणार्थ, अटलांटिक मेरिडिऑनल ओव्हरटर्निंग सर्क्युलेशनचा वेग कमी होणे), ज्यामुळे हिमनगांच्या पलीकडील भागांतील हवामान पद्धती बिघडू शकतात. यात किनारपट्टीवरील शहरे जलमय होणे आणि डोंगराळ भागात हिमसरोवर फुटून महापूर (ग्लासिअल लेक आउटबर्स्ट फ्लड GLOF) येणे यांचा समावेश होतो, ज्यामुळे अनेक समुदाय संकटात सापडतात आणि कोट्यवधी लोक बेघर होण्याचा धोका निर्माण होतो. या संकटात भर टाकणारी बाब म्हणजे नैसर्गिक हवामान अभिलेखांचे (climate archives) नष्ट होणे कारण हिमनगांच्या गोठलेल्या थरांमध्ये पृथ्वीच्या तापमान आणि वातावरणीय रचनेत झालेल्या बदलांचे पुरावे साठलेले असतात.
या पार्श्वभूमीवर, केवळ प्रतिक्रियाशील संकट व्यवस्थापनाच्या पलीकडे जाऊन दीर्घकालीन आणि समाकलित नियोजनाकडे वळणे अत्यावश्यक आहे. ज्यामध्ये पाणी प्रशासन, आपत्ती सज्जता, अन्न सुरक्षा, सांस्कृतिक वारशाचे संरक्षण आणि हिमनगांनी पुरवठा होणाऱ्या परिसंस्थांमध्ये आंतरराष्ट्रीय सहकार्य यांचा समावेश असावा.
स्लोव्हेनिया आणि व्हेनेझुएला हे दोन देश असे आहेत ज्यांनी त्यांच्या सर्व हिमनगांचा पूर्णतः ऱ्हास अनुभवलेला आहे. ही एक गंभीर चेतावणी आहे. अनेक इतर देशही अशाच संकटास सामोरे जात आहेत. ऑस्ट्रियामधील सर्वात मोठा पास्टरझे हिमनग 1851 पासून त्याच्या अर्ध्याहून अधिक वस्तुमान गमावून बसला आहे, आणि 1984 ते 2000 या कालावधीत त्याची जीभ (glacier tongue) 290 मीटरने मागे सरकली आहे. भारतीय हिमालयातील गंगोत्री हिमनग जो पवित्र गंगा नदीचा स्रोत आहे, तो 1817 पासून 3 किलोमीटरहून अधिक मागे हटला आहे, ज्यामुळे कोट्यवधी लोकांच्या जलस्रोतांवर धोका निर्माण झाला आहे. आफ्रिकेतील माउंट किलिमंजारोच्या शिखराजवळ असलेला फुर्टवांगलर हिमनग विषुववृत्ताजवळील शेवटच्या काही हिमनगांपैकी एक तो ही 2030 पर्यंत पूर्णतः नाहीसा होण्याची शक्यता आहे. बोलिवियामधील चकाल्ताया हिमनग, जो सुमारे 18,000 वर्ष जुना बर्फाचा थर होता, तो पूर्णतः वितळलेला आहे आणि अँडीज पर्वतरांगेतील उरलेले हिमनग येत्या काही दशकांत नाहीसे होतील, याचा तीव्र इशारा देतो.
2022 मध्ये, इटालियन डोलोमाइट्समधील मार्मोलाडा हिमनगाचा मधोमध असलेल्या तडा गेलेल्या भागात साचलेल्या वितळलेल्या पाण्याचे तापमान 10.7 °C पर्यंत पोहोचले होते परिणामी हा भाग अचानक खचला यामुळे हिमसख्खलनाचा भयंकर प्रकार घडला आणि 11 गिर्यारोहक मृत्युमुखी पडले. यानंतरची अलीकडील दुर्घटना 2025 मध्ये स्विस आल्प्समधील बिर्च हिमनगाची होती, जेव्हा सुमारे 9 दशलक्ष घनमीटर खडक आणि बर्फ दरीत कोसळले आणि ब्लॅटन गाव नकाशावरूनच नाहीसे झाले. हिंदूकुश-हिमालय मूल्यांकन अहवालातही इशारा देण्यात आला आहे की, जागतिक पातळीवर अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रयत्न झाले तरी शतकाच्या अखेरीस हिमालयातील एक तृतीयांश हिमनग नाहीसे होऊ शकतात. हे हिमनगांचे लोप होणे हे फक्त स्थानिक नुकसान नसून, ग्रहव्यापी आणि राजकीय आहे. जे हरितगृह वायू उत्सर्जन आणि तापमानवाढीने होणाऱ्या अपरिवर्तनीय बदलांच्या जागतिक प्रवाहाचे ते प्रतिनिधित्व करतात.
हिमनगांचे संरक्षण आज अधिक तातडीची गरज झाले आहे. काही देश हिमनगांच्या संवर्धनासाठी प्रयोगशील उपाय करत आहेत. जसे की स्वित्झर्लंडमध्ये हिमनगांवर संरक्षणात्मक चादरी टाकल्या जात आहेत, तर चीनच्या तिबेट पठारावर वनीकरण प्रकल्प राबवले जात आहेत. मात्र, हे प्रयत्न तुटक आणि मर्यादित स्वरूपाचे आहेत. कायदेशीर पातळीवर अर्जेंटिनाने 2010 मध्ये जगातील पहिला राष्ट्रीय हिमनग संरक्षण कायदा स्वीकारला आणि फ्रान्स सरकारने 2020 मध्ये मॉंट ब्लांकसाठी नैसर्गिक परिसंस्था संरक्षण क्षेत्र घोषित केले ही योग्य दिशेने टाकलेली स्वागतार्ह पाऊले आहेत. याशिवाय, संयुक्त राष्ट्र महासभेने (UNGA) या तातडीच्या गरजेला मान्यता देत 2025 हे "आंतरराष्ट्रीय हिमनग संरक्षण वर्ष" म्हणून घोषित केले आहे. हे सर्व प्रयत्न एकत्रितपणे एक निर्णायक वळण दर्शवतात, मात्र अपरिवर्तनीय हिमनग ऱ्हास आणि त्याचे साखळीप्रमाणे भासणारे परिणाम यावर प्रभावीपणे मात करण्यासाठी आपल्याला सध्याच्या विकास मॉडेल्स, संसाधन वापरणारी अर्थव्यवस्था आणि हवामान शासकीय संरचना यांच्यावर अधिक खोल विचार करण्याची गरज आहे.
हिमनगांचा ऱ्हास हा अनेक आदिवासी आणि पर्वतीय समुदायांसाठी जगाच्या अस्तित्वाचे विघटन दर्शवतो. कारण त्यांच्यासाठी हिमनग हे केवळ भौगोलिक रचनेचे घटक नसून त्यांच्या विश्वदृष्टीत खोलवर रुजलेली पवित्र अस्तित्वे आहेत. हवामान बदलाकडे पाहण्याची मुख्य प्रवाहातील भौतिकतावादी दृष्टी ही त्यांच्या ज्ञानपरंपरेतील दृष्टिकोनाशी पूर्णतः विरोधात आहे, जिथे हिमनग हे पूजनीय जीव, रक्षक, पूर्वज आणि देवतांसमान मानले जातात. उदाहरणार्थ, आफ्रिकेतील चग्गा (Chagga) जमात, जी माउंट किलिमंजारोच्या पायथ्याशी राहते, त्यांच्यासाठी या पर्वतावरील बर्फाच्छादित शिखर हे त्यांच्या भौतिक जगाच्या आणि दैवी जगाच्या मधला सेतू आहे. पेरूच्या अँडीज पर्वतरांगांतील स्थानिक केचुआ वाणीमध्ये, माउंट ऑसांगाटेवरील हिमवृष्टीचे नाहीसे होणे हे जगाच्या अंताशी जोडले गेले आहे. नेपाळमधील हिमालयात, शेरपा समुदाय वितळणाऱ्या हिमनगांना नैतिक चुकीबद्दलचा एक प्रकारचा ईश्वरी इशारा मानतो. अशा पवित्र जगांचा ऱ्हास सांस्कृतिक व आध्यात्मिक आघात निर्माण करतो आणि या वेदनेचे प्रकट होणे ही आता एक सांस्कृतिक, राजकीय व नैतिक प्रतिकाराची प्रक्रिया बनू लागली आहे.
उदाहरणार्थ, मे 2025 मध्ये नेपाळमध्ये याला हिमनगासाठी एक 'हिम अंत्यविधी' (ice funeral) आयोजित करण्यात आला, हा हिमनगाचे 1970 च्या दशकापासून 66 टक्क्यांनी संकूचन झाले आहे. या सोहळ्यात बौद्ध भिक्षू, सरकारी अधिकारी, हवामान वैज्ञानिक आणि स्थानिक समुदाय सहभागी झाले होते. याला हिमनग हा जगातील पाचवा हिमनग आहे ज्यासाठी असा शोकविधी झाला. त्याआधी ओकजोयकुल (आइसलँड), अयोलोकों (मेक्सिको), क्लार्क (अमेरिका) आणि बासोडिनो (स्वित्झर्लंड) हिमनगांचे अंत्यविधी पार पडले होते. मात्र प्रश्न असा आहे की या दु:खभावनेच्या कृती स्वतः हवामान कृतीसाठी प्रेरणास्थान बनू शकतील का? आणि त्या रचनांना आव्हान देऊ शकतील का, ज्यांनी हे नुकसान अटळ बनवले आहे?
डेरिडाच्या विचारांनुसार, असे म्हणता येईल की ही केवळ प्रतिकात्मक स्वरूपाची हवामान प्रतिकाराची कृत्य आहेत, जे स्मृती जागवतात, राजकीय निष्क्रियतेशी सामना करतात आणि न भरून येणाऱ्या नुकसानीसाठी जबाबदारीची मागणी करतात. भावनिक प्रतिक्रियेच्या स्वरूपात शोक हा मूलतः अभिनयात्मक असतो आणि जेव्हा तो हवामान बदलामुळे होणाऱ्या दु:खाशी जोडला जातो, तेव्हा हिमनगांचे अंत्यविधी फक्त प्रतीकात्मक उपक्रम नसून त्याहून अधिक महत्त्वाचे वाटतात. अभ्यासातून दिसून आले आहे की ओकजोयकुल हिमनग अंत्यविधीची माध्यमांमधील चर्चा जागतिक प्रतीक बनली, ज्यामुळे हवामान बदलाच्या वास्तविक, भावनिक आणि अंतर्निहित पैलूंचा प्रसार झाला. या विधीने आंतरराष्ट्रीय पातळीवर जनतेच्या मनात जागरूकता निर्माण केली आणि जागतिक हवामान कृती व नागरी समाज चळवळींना चालना दिली.
अॅन्थ्रोपोसिन म्हणजेच मानवकृत युगात हिमनगांचे अंत्यविधी सामूहिक जबाबदारीची प्रक्रिया म्हणून उभे राहू लागले आहेत, जे शोकाला प्रतिकाराचे रूप देतात आणि प्रभुत्वशाही सत्ताकेंद्रे व कार्बन भांडवलशाही जे काही दडपायचा प्रयत्न करतात ते उघड करतात. हे आपल्याला जबरदस्तीने विकासाच्या संसाधनाचे शोषण करणाऱ्या मॉडेल्सकडे आणि इतर कारणांकडे लक्ष वेधून घेतात, ज्यामुळे अशी हानी अपरिहार्य झाली आहे. मात्र, या नुकसानीवर तोडगा काढण्यासाठी तुकड्या-तुकड्यांत दिलेल्या प्रतिसादांवरून पुढे जाणे आवश्यक आहे. हिमनगांच्या मागे हटण्याचा आणि त्याच्या साखळीप्रमाणे परिणामांचा विचार राष्ट्रीय धोरणांमध्ये आणि आंतरराष्ट्रीय हवामान बदल व आपत्ती जोखमी कमी करण्याच्या चर्चांमध्ये पर्वतीय समुदायांच्या सहभागासह केला जाणे गरजेचे आहे. तसेच, संशोधनाचे निष्कर्ष थेट कृती आणि धोरणांमध्ये रूपांतरित करण्यासाठी क्रॉस-डिसिप्लिनरी (अंतरशाखीय) क्रायोस्फिअर संशोधन आवश्यक आहे. हिमनगांना ग्रहव्यापी सार्वजनिक संपत्ती मानून त्यांचे नैतिक संरक्षण करणे अत्यावश्यक आहे.
सोमा सरकार ह्या ऑब्झर्व्हर रिसर्च फाउंडेशनच्या अर्बन स्टडीज प्रोग्राममध्ये असोसिएट फेलो आहेत.
The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.
Soma Sarkar is an Associate Fellow with ORF’s Urban Studies Programme. Her research interests span the intersections of environment and development, urban studies, water governance, Water, ...
Read More +