-
CENTRES
Progammes & Centres
Location
ऑपरेशन सिंदूरनंतर भारताला फिफ्थ जनरेशन फायटर विमानांचे महत्त्व अधिक प्रकर्षाने कळले आहे. यातच भारताला अमेरिकेचा F-35 ऑफर स्वीकारण्याचा मोह होऊ शकतो. परंतू, विमानाच्या संभाव्य अधिग्रहणाशी संबंधित अनेक आव्हाने पाहता, हा पर्याय देशासाठी आदर्श पर्याय ठरेल याची शक्यता नाही.
Image Source: Getty
फेब्रुवारी 2025 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वॉशिंग्टन भेटीदरम्यान अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी F-35 विमानांची भारताला विक्री करण्याची कल्पना मांडली होती, आणि लवकरच याबाबत औपचारिक विक्री प्रस्ताव येण्याची शक्यता आहे. भारताच्या पाकिस्तानशी अलिकडेच झालेल्या चकमकी आणि ऑपरेशन सिंदूर यातून भारतीय हवाई दलासाठी राफेल सारखी प्रगत लढाऊ विमाने असण्याचे महत्त्व अधोरेखित झाले आहे. याच पार्श्वभुमीवर भविष्यातील संघर्ष लक्षात घेता, अत्याधुनिक विमानांचा हवाई दलात समावेश करणे अपरिहार्य झाले आहे. चीनने पाकिस्तानला J-10 आणि अलिकडेच J-35 पाचव्या पिढीतील लढाऊ विमानांसारखी प्रगत विमाने पुरवली आहेत, त्यामुळे ही बाब विशेष महत्त्वाची आहे. भारताने IAF च्या शस्त्रागाराचे भविष्य आणि F-35 हा त्यासाठीचा सर्वोत्तम पर्याय आहे का हे निश्चित केले पाहिजे. भारताचा पुढील मार्ग ठरवण्यासाठी, F-35 च्या इतिहासाचे आणि तांत्रिक वैशिष्ट्यांचे काळजीपूर्वक परीक्षण करणे आवश्यक आहे.
F-35 लाइटनिंग II हे 1990 च्या दशकात सुरू झालेल्या अमेरिकेच्या संरक्षण विभागाच्या (DOD) जॉइंट स्ट्राइक फायटर (जेएसएफ) कार्यक्रमांतर्गत विकसित करण्यात आले आहे. ऑक्टोबर 2001 मध्ये डीओडीने लॉकहीड मार्टिनच्या विमानाच्या डिझाइनची निवड केली आणि परिणामी जेएसएफ कार्यक्रमाने सिस्टम डेव्हलपमेंट आणि प्रात्यक्षिक टप्प्यात प्रवेश केला. F-35 , F-22 रॅप्टरसह, हे पहिले पाचव्या पिढीतील स्ट्राइक-फायटर विमान मानले जाते, ज्यामध्ये स्टेल्थ कोटिंग्ज, अंतर्गत शस्त्रास्त्रांचा वापर आणि सुपरक्रूझ क्षमता (आफ्टरबर्नरशिवाय सुपरसॉनिक वेगाने उड्डाण करणे) यासारख्या प्रगत स्टेल्थ वैशिष्ट्यांचा समावेश आहे. यास प्रॅट अँड व्हिटनीचे F135 इंजिन लावण्यात आले आहे. हे इंजिन ४०,००० पौंडपेक्षा जास्त थ्रस्ट देऊ शकते आणि चौथ्या पिढीच्या इंजिनांपेक्षा जास्त स्टील्थ तंत्रज्ञानाचा वापर करते. F-35 हे विमान मॅक 1.6 पर्यंत वेगाने उड्डाण करू शकते आणि त्याचा कॉम्बॅट रेडिअस 450 ते 600 नॉटिकल मैल आहे. यात F-35 A, F-35 B आणि F-35 C असे तीन प्रकार आहेत. या सर्वांमध्ये समान इंजिन आणि वैशिष्ट्ये समाविष्ट आहेत, तर मुख्य फरक म्हणजे टेक-ऑफ आणि लँडिंगची पद्धत, इंधन क्षमता आणि वाहक योग्यता हा आहे.
आकृती १: F-35 चे प्रकार
स्त्रोत – कॉंग्रेशनल रिसर्च सर्व्हिस
F-35 A |
F-35 B |
F-35 C |
कन्व्हेशनल टेक-ऑफ आणि लँडिंग (सीटीओएल) क्षमतांसह अमेरिकन हवाई दला (युएसएएफ) साठी डिझाइन करण्यात आलेले विमान. हे एक ड्युअल कॅपेबल एअरक्राफ्ट (डीसीए) देखील आहे, म्हणजेच हे लढाऊ विमान शस्त्रास्त्रे व अण्वस्त्रेही वाहून नेऊ शकते. |
शॉर्ट टेक-ऑफ आणि व्हर्टिकल लँडिंगची (एसटीओव्हीएल) क्षमता असलेले हे विमान प्रामुख्याने यूएस मरीन कॉर्प्स (युएसएमसी) आणि यूएस नेव्हीसाठी विकसित करण्यात आले आहे. |
एअरक्राफ्ट कॅरिअर व्हेरिअंट |
F-35 हा अमेरिकेच्या संरक्षण विभागाचा आतापर्यंतचा सर्वात महत्त्वाकांक्षी आणि महागडा खरेदी प्रयत्न आहे. यामध्ये सुरूवातीस 2470 विमाने आणि इंजिनांच्या विकास आणि उत्पादनासाठी 485 अब्ज अमेरिकन डॉलर्सपेक्षा जास्त खर्च अपेक्षित असला तरी या कार्यक्रमाचा एकूण विकास खर्च 2 ट्रिलियन अमेरिकन डॉलर्सपेक्षा जास्त आहे. F-22 व F-35 ही दोन्ही विमाने अमेरिकेच्या लढाऊ ताफ्याचा आधारस्तंभ आहे. ही दोन्ही विमाने एकत्रितपणे एअर सुपिरिऑरिटी फायटर्स (F-22) आणि मॉडेस्ट डीसीए (F-35 ) यांचे संयोजन असल्याने त्यास हाय लो मिक्सचे वैशिष्ट लाभले आहे. यासोबतच, 2040 च्या मध्यापर्यंत F-35 विमानांची खरेदी सुरू ठेवण्याची डीओडीची योजना आहे.
F-35 ला त्याच्या विकास आणि आधुनिकीकरणाच्या टप्प्यात अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे उत्पादन खर्चात वारंवार वाढ झाली आहे. डिसेंबर 2018 मध्ये, त्यांनी 873 निराकरण न झालेल्या कमतरतांसह प्रारंभिक ऑपरेशनल चाचणी आणि मूल्यांकन टप्प्यात प्रवेश केला आहे. जरी मार्च 2024 मध्ये संरक्षण विभागाने विमानाच्या फुल रेट प्रोडक्शनसाठी मंजुरी दिली असली तरी, F-35 कार्यक्रमात अजूनही अनेक प्रलंबित समस्या आहेत.
ब्लॉक 4 आणि टीआर-3
मार्च 2017 मध्ये मंजूर झालेला “ब्लॉक 4” मॉर्डनायझेशन प्लान ही F-35 कार्यक्रमासमोरील प्रमुख समस्या आहे. यामध्ये प्रगत सेन्सर सूट आणि सुधारित इलेक्ट्रॉनिक युद्ध प्रणाली यासारख्या हार्डवेअर अपडेट्सचा समावेश आहे. या योजनेत टेक्निकल रिफ्रेश 3 (टीआर-3) सॉफ्टवेअर अपडेट सबप्रोग्राम देखील समाविष्ट आहे. यात 50 हून अधिक सॉफ्टवेअर अपग्रेड्स असून ब्लॉक 4 क्षमता सक्षम करण्यासाठी प्रक्रिया शक्ती प्रदान करणे हा याचा उद्देश आहे. ब्लॉक 4 च्या अपग्रेडमध्ये किमान तीन वेगवेगळ्या प्रसंगी अनेक विलंब झाले आहेत. परिणामी, बजेटमध्ये वाढ झाली आहे. या कार्यक्रमाचे 2018 मध्ये सुरुवातीचे बजेट 10.6 अब्ज अमेरिकन डॉलर्स होते ते 2023 पर्यंत 16.5 अब्ज अमेरिकन डॉलर्सपर्यंत वाढले आहे. 2030 पर्यंत ब्लॉक 4 मधील अनेक क्षमता उपलब्ध होणार नाहीत, असे जेएसएफ कार्यक्रमाचे व्यवस्थापन करणाऱ्या जॉईंट प्रोग्राम ऑफिसरने (जेपीओ) म्हटले आहे. त्याचप्रमाणे, टीआर-3 लाही विलंब झाला आहे. यामुळे युएसएएफला जुलै 2023 मध्ये F-35 ए विमानाची डिलिव्हरी पूर्णपणे बंद करावी लागली होती. त्यानंतर, जुलै 2024 मध्ये, यूएसएएफने टीआर-3 च्या मर्यादित आवृत्तीसह F-35 ची डिलिव्हरी पुन्हा स्वीकारण्यास सुरुवात केली. सुरुवातीला त्यांनी अपग्रेड पूर्ण होईपर्यंत प्रति विमान 5 दशलक्ष अमेरिकन डॉलर्सचे पेमेंट रोखले आणि नंतर ही रक्कम प्रति विमान 1.2 दशलक्ष अमेरिकन डॉलर्सपर्यंत कमी करण्यात आली.
देखभालीवर अधिक लक्ष देण्यासाठी F-35 मध्ये ऑटोनॉमिक लॉजिस्टिक्स इन्फॉर्मेशन सिस्टम (ALIS) नावाची डेटा-ट्रॅकिंग सिस्टम वापरली जाते. परंतू, त्याच्या जुन्या सॉफ्टवेअर आर्किटेक्चरमुळे, ही प्रणाली फारशी कार्यक्षम नाही. यात अनेकदा मॅन्युअल इनपुटची आवश्यकता असते आणि सायबर हल्ल्यांबाबत देखील ही सिस्टिम असुरक्षित आहे.
इंजिन अपग्रेड
ब्लॉक 4 आणि टीआर-3 अपग्रेडसाठी F135 इंजिनमध्ये पॉवर आणि कूलिंग अपग्रेड आवश्यक आहेत. 2016 मध्ये अॅडॉप्टिव्ह इंजिन ट्रान्झिशन प्रोग्राम अंतर्गत जनरल इलेक्ट्रिक आणि प्रॅट अँड व्हिटनी यांना F-35 साठी अडव्हांस इंजिन विकसित करण्यासाठी 1 अब्ज डॉलरचे करार मिळाले असले तरी, वाढलेल्या खर्चामुळे XA 100 आणि XA 101 ही दोन्ही इंजिने नाकारण्यात आली आहेत. त्याऐवजी, डीओडीने विद्यमान F 135 इंजिनसाठी इंजिन कोअर अपग्रेड प्रोग्राम निवडला आहे, जो 2032 पर्यंतच पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.
ऑटोनॉमिक लॉजिस्टिक्स इन्फॉर्मेशन सिस्टिम (ALIS)
देखभालीवर अधिक लक्ष देण्यासाठी F-35 मध्ये ऑटोनॉमिक लॉजिस्टिक्स इन्फॉर्मेशन सिस्टम (ALIS) नावाची डेटा-ट्रॅकिंग सिस्टम वापरली जाते. परंतू, त्याच्या जुन्या सॉफ्टवेअर आर्किटेक्चरमुळे, ही प्रणाली फारशी कार्यक्षम नाही. यात अनेकदा मॅन्युअल इनपुटची आवश्यकता असते आणि सायबर हल्ल्यांबाबत देखील ही सिस्टिम असुरक्षित आहे. 2020 मध्ये, डीओडीने ऑपरेशनल डेटा इंटिग्रेटेड नेटवर्क (ODIN) नावाच्या क्लाउड-आधारित सिस्टममध्ये ट्रांझिशन प्रस्तावित केले, जे टीआर-3 अपग्रेडशी देखील सुसंगत असेल. ALIS ते ODIN हा ट्रांझिशन प्रोग्राम सध्या प्रगतीपथावर आहे.
वरील समस्या F-35 ला त्याच्या कामगिरीमधील उद्दिष्टे साध्य करण्यात अडथळा ठरल्या आहेत, ज्यामुळे उपलब्धता, विश्वासार्हता आणि देखभाल क्षमता कमी झाली आहे. उदाहरणार्थ, 2023 मध्ये, यूएसएएफच्या F-35 ए फ्लीटसाठी मिशन कॅपेबल रेट 51.9 टक्के होता. हा दर 80 टक्क्यांच्या किमान लक्ष्याच्या तुलनेत खूपच कमी आहे. सध्याच्या घडीला F-35 ही लढाऊ विमाने सक्षम नाहीत असाही अनुमान काढला जात आहे. याव्यतिरिक्त 2020 पासून F-35 चे अनेक अपघात झाले आहेत. काही अपघात किरकोळ असले तरी काही गंभीर स्वरूपाचे आहेत. अपघात हे कोणत्याही विमानाच्या विकास चक्राचा एक भाग असले तरी, या घटना F-35 च्या कार्यक्रमाला भेडसावणाऱ्या काही प्रणालीगत समस्यांवर प्रकाश टाकणाऱ्या आहेत.
उच्च युनिट आणि देखभाल खर्चाव्यतिरिक्त, F-35 ची घडण नाटोला नजरेसमोर ठेवून करण्यात आली असल्याने भारतासाठी त्याचा वापर करणे आणि देखभाल करणे विशेषतः कठीण झाले आहे. लॉकहीड मार्टिनने पुरवठा साखळीतील व्यत्ययांसाठी कोविड-19 साथीला जबाबदार धरले आहे. परंतु संरक्षण क्षेत्रातील ही दिग्गज कंपनी 2023 पर्यंतही त्यांचे वितरण लक्ष्य पूर्ण करू शकलेली नाही. ही कंपनी आता सहाव्या पिढीतील लढाऊ विमाने विकसित करण्यासाठी अमेरिकेच्या नेक्स्ट जनरेशन एअर डोमिनन्स प्रोग्राममध्ये सहभागी नाही, त्याऐवजी डीओडीने बोईंगच्या F-47 विमानांचा पर्याय निवडला असल्याचे आता म्हटले जात आहे. परिणामी, स्वित्झर्लंडसारखे देश तांत्रिक कारणांमुळे, किमान काही प्रमाणात, F-35 खरेदी करण्यापासून मागे हटण्याचा विचार करत आहेत.
JSF कार्यक्रम सुरू झाल्यापासून, अमेरिकेच्या एकूण 19 मित्र राष्ट्रांना 1100 हून अधिक F-35 विमाने निर्यात करण्यात आली आहेत. याआधी डिलिव्हरीच्या वेळापत्रकाचे पालन केले गेले असले तरी, अलिकडच्या वर्षांत त्यात विलंब होत आहे. उदाहरणार्थ, ब्लॉक 4 अपग्रेड विलंबामुळे 2024 मध्ये जपानला सहा F-35 बी विमानांची नियोजित डिलिव्हरी पुढे ढकलण्यात आली आहे. 2025 मध्ये बेल्जियमला होणाऱ्या F-35 च्या डिलेव्हरीत विलंब झाल्याने युक्रेनला हस्तांतरित करावयाच्या 30 F-35 ची डिलेव्हरी पुढे ढकलली गेली आहे.
F-35 आयात करणाऱ्या देशांसाठी वाढत्या किमती ही आणखी एक चिंता आहे. जपान आणि अलिकडे कॅनडा सारख्या देशांना किमती वाढल्यामुळे अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. तंत्रज्ञान हस्तांतरणाच्या बाबतीत अमेरिका अत्यंत संवेदनशील आहे. इंटरनॅशनल ट्राफिक इन आर्म्ड रेग्युलेशनसारख्या नियमांमुळे युके आणि दक्षिण कोरियासारख्या जवळच्या मित्र राष्ट्रांशीही त्यांचे मतभेद निर्माण झाले आहेत.
अमेरिका परदेशी लष्करी विक्री कराराद्वारे भारताला औपचारिकपणे F-35 A देण्याचा विचार करत आहे. भारतीय हवाई दलाच्या ताफ्यासाठी हा सर्वोत्तम पर्याय नाही. जगातील सर्वात प्रगत पाचव्या पिढीतील विमानांपैकी एक असूनही, वर नमूद केल्याप्रमाणे F-35 ला अनेक तांत्रिक आणि लॉजिस्टिक आव्हानांचा सामना करावा लागत आहे. याशिवाय, भारताच्या विमान खरेदीमध्ये इतरही काही संदर्भात्मक अडथळे आहेत. उच्च युनिट आणि देखभाल खर्चाव्यतिरिक्त, F-35 ची घडण नाटोला नजरेसमोर ठेवून करण्यात आली असल्याने भारतासाठी त्याचा वापर करणे आणि देखभाल करणे विशेषतः कठीण झाले आहे. शिवाय, सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर (शस्त्र प्रणाली) च्या देखभाल आणि अपग्रेडसाठी अमेरिकेवर पूर्णपणे अवलंबून राहिल्यास संभाव्यतः सर्व IAF ऑपरेशन्सवर अमेरिकेची नजर राहण्याची दाट शक्यता आहे. तसेच, F-35 चे सॉफ्टवेअर वर्गीकृत आहे. US DOD लॉकहीड मार्टिनसह बौद्धिक संपदा हक्कांच्या मुद्द्यांवर खटल्याचा सामना करत आहे.
ऑपरेशन सिंदूर आणि पुढील भविष्याचा विचार करता, भारताने त्याच्या ताफ्यात अद्ययावत यंत्रणांचा समावेश करणे अत्यंत गरजेचे आहे. अलिकडेच मान्यता मिळालेल्या अडव्हांस मिडीअम कॉम्बॅट एअरक्राफ्ट (एएमसीए) च्या वापरावर भर देणे हा आदर्श पर्याय असला तरी, स्वदेशी लढाऊ विमानांचा विकास करण्याचा भारताचा इतिहास फारसा उल्लेखनीय नाही. तेजस या हलक्या लढाऊ विमानाला अनेक विलंबांचा तसेच खर्च वाढीचा सामना करावा लागल्याने ते यशस्वी होण्यासाठी 30 वर्षांहून अधिक काळ लागला आहे. जर AMCA कार्यक्रमाला असाच विलंब झाला, तर भारताला रशियन सुखोई Su-57 किंवा अमेरिकन F-35 सारख्या परदेशी पर्यायांवर अवलंबून राहावे लागणार आहे. चीनकडून पाचव्या पिढीतील लढाऊ विमाने मिळविण्यासाठी पाकिस्तानने अलिकडेच सुरू केलेला प्रयत्न आणि भविष्यातील संघर्षाच्या परिस्थितीत अशा हवाई शक्तीच्या फायद्याचा धोका लक्षात घेता, भारताला पाचव्या पिढीतील स्थानिक लढाऊ विमानांपेक्षा परदेशी पर्यायांच्या अधिक गांभिर्याने विचार करावा लागू शकतो. जरी दोन्ही पर्यायांसोबत त्यांची स्वतःची आव्हाने आणि तडजोडी आहेत, तरी वरील मुद्द्यांचा विचार करता, F-35 निश्चितच भारतासाठी योग्य पर्याय नाही, हे स्पष्ट आहे.
प्रतीक त्रिपाठी हे ऑब्झर्वर रिसर्च फाउंडेशनच्या सुरक्षा, धोरण आणि तंत्रज्ञान केंद्राचे सिनियर फेलो आहेत.
The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.
Prateek Tripathi is a Junior Fellow at the Centre for Security, Strategy and Technology. His work focuses on emerging technologies and deep tech including quantum technology ...
Read More +