Author : Nilanjan Ghosh

Expert Speak India Matters
Published on Aug 13, 2025 Updated 0 Hours ago

भारताचे विकसित भारत @2047 चे व्हिजन हे युवाप्रेरित थिंक टँक्सना सक्षम करण्यावर आधारित आहे, जे शैक्षणिक ज्ञानाचे धोरणात्मक कृतीमध्ये रूपांतर करतात.

भारताचे शैक्षणिक भविष्य: NEP, तरुणाई आणि थिंक टँक्सची भूमिका

Image Source: Getty Images

    अल्विन टॉफ्लर यांच्या "पॉवरशिफ्ट: नॉलेज, वेल्थ, अ‍ॅन्ड व्हायोलन्स अ‍ॅट द एज ऑफ द 21st सेंच्युरी" या 1990 मध्ये प्रकाशित झालेल्या महत्त्वपूर्ण पुस्तकात, सत्तेची पारंपरिक स्वरूपांपासून (शक्ती आणि पैशावर आधारित) ज्ञानावर आधारित नव्या स्वरूपाकडे होणारी बदलती दिशा अधोरेखित केली आहे. औद्योगिक युगानंतरच्या समाजात, ज्ञान हे सत्तेचे प्रमुख रूप बनले आहे, ज्याने शारीरिक शक्ती आणि आर्थिक नियंत्रणाला मागे टाकले आहे. ही ‘सत्तांतराची’ प्रक्रिया माणसांचा जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलते – राजकारण, व्यवसाय, अर्थव्यवस्था, संस्कृती, नातेसंबंध आणि जागतिक घडामोडी यावर याचा परिणाम होतो. ज्ञानाची ताकद ही मानवाच्या प्रगतीशी निगडित असून अधिक महत्त्वाची बनली आहे. ज्ञान नेहमी मूलभूत नसले तरी, त्याचा कल्पना, नवकल्पना आणि सर्वात मूलभूत म्हणजे कल्पकता यांच्याशी द्विदिशात्मक संबंध असतो. राजकीय शास्त्रज्ञ थॉमस होमर-डिक्सन यांच्या मते, कल्पकता म्हणजे सामाजिक व तांत्रिक समस्यांवर उपाय शोधण्यासाठी तयार होणाऱ्या कल्पना आणि त्या अंमलात आणण्याची प्रक्रिया. होमर-डिक्सन पुढे सांगतात की तांत्रिक कल्पकता ही सामाजिक कल्पकतेवर अवलंबून असते, जी मानवी समाजातील विविध स्तरांवर दिसून येते. सामाजिक कल्पकता म्हणजे समाजातील समस्यांवर नविन व लवचिक उपाय शोधण्याची क्षमता, जी मानवसंबंध पुन्हा रचून, नव्या सामाजिक चौकटी तयार करून साध्य होते. ही कल्पकता म्हणजेच सार्वजनिक आणि निमसार्वजनिक वस्तू (जसे की बाजारपेठा, निधी संस्था, शैक्षणिक व संशोधन संस्था, आणि प्रभावी शासन) तयार करणे, सुधारणा करणे आणि टिकवून ठेवण्यासाठी अत्यावश्यक आहे. कल्पकतेला आता उत्पादनाच्या पाचव्या घटकाप्रमाणे ओळखले जाते. जमीन (नैसर्गिक भांडवल), कामगार, भांडवल, उद्योजकता यांच्यासोबत. हेच तत्व नव-शास्त्रीय अर्थशास्त्रातील टोटल फॅक्टर प्रोडक्टिविटी संकल्पनेशी साधर्म्य राखते. विकसित भारत 2047 - म्हणजे भारताच्या स्वातंत्र्याच्या शंभराव्या वर्षापर्यंत विकसित देश होण्याचे स्वप्न. हे कल्पकतेच्या म्हणजेच सर्जनशीलतेच्या आधारेच साकार होऊ शकते. लोकसंख्येच्या दृष्टीने तरुण देश असलेल्या भारताला पुढची मोठी झेप घेण्यासाठी सामाजिक संस्थाना नव्या विचारांनी सार्वजनिक धोरण व विकासाच्या शासनामध्ये रूजवाव्या लागतील.

    सामाजिक कल्पकता म्हणजे समाजातील समस्यांवर नविन व लवचिक उपाय शोधण्याची क्षमता, जी मानवसंबंध पुन्हा रचून, नव्या सामाजिक चौकटी तयार करून साध्य होते.

    हे विचार कल्पक, कार्यान्वित करण्याजोगे, पुराव्यावर आधारित, व्यवस्थात्मक दृष्टिकोनातून निर्माण झालेले आणि बहुविषयात्मक चौकटीत बसणारे असावेत. हे विचार त्या संस्थांमध्ये विकसित व वाढवले गेले पाहिजेत, ज्यांना गुंतागुंतीचे प्रश्न आणि स्थानिक संदर्भ यांचे भान आहे. याच ठिकाणी थिंक टँक्सची भूमिका महत्त्वाची ठरते, कारण त्या विचारप्रवर्तक प्रयोगशाळा आणि अंमलात येऊ शकणाऱ्या ज्ञानाचे सेतू म्हणून काम करतात. त्यामुळे, भारतातील तरुणांना भविष्याच्या धोरणात्मक घडामोडींचे शिल्पकार बनवण्यासाठी थिंक टँक्स अधिकाधिक महत्त्वाचे ठरत आहेत. 

    भारताचे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (नॅशनल एज्युकेशन पॉलिसी NEP) 2020 संशोधन आणि नवकल्पनांच्या (इनोव्हेशन) संस्कृतीच्या विकासाचे भाकीत करते. हे धोरण ज्ञाननिर्मिती आणि धोरणात्मक अंमलबजावणी यामधील दरी कमी करण्याचा प्रयत्न करते, विशेषतः नॅशनल रिसर्च फाऊंडेशन (NRF) सारख्या संस्थात्मक पातळीवर. या पार्श्वभूमीवर, थिंक टँक्स केवळ सरकारी धोरणांवर प्रभाव टाकणाऱ्या संस्था म्हणून नव्हे, तर संशोधन-धोरण यामधील मानवी भांडवल घडवणाऱ्या ‘इनक्यूबेटर’ म्हणूनही पुन्हा विचारात घेतल्या जाव्या लागतील.

    थिंक टँक्स का महत्त्वाचे आहेत?

    थिंक टँक्स या संस्था पारंपरिक विद्यापीठे किंवा सामाजिक विज्ञान संशोधन संस्था (उदा. भारतीय सामाजिक विज्ञान संशोधन परिषद–ICSSR यांच्यासारख्या) नसतात. थिंक टँक्स संशोधन, धोरण, आणि सार्वजनिक संवाद यांच्या मधल्या क्रियांमध्ये कार्यरत असतात. त्या धोरणकर्ते, जनमत घडवणारे, नागरिक समाज, स्वयंसेवी संस्था आणि विद्यापीठे अशा व्यापक परिसंस्थेशी संवाद साधतात. विद्यापीठांप्रमाणे फक्त शास्त्रीय संशोधनपत्रिकांमध्ये लेख प्रकाशित करणे हे त्यांचे एकमेव कार्य नसते. संशोधन प्रकाशित करणे हे गरजेचे असले, तरी ते पुरेसे नाही. थिंक टँक्सना त्यांच्या संशोधनाचा मुख्य संदेश त्या व्यापक समूहांपर्यंत पोहोचवावा लागतो, ज्या समूहांसोबत ते सतत संवाद साधतात. सामाजिक, आर्थिक, राजकीय आणि पर्यावरणीय क्षेत्रांतील प्रत्यक्ष समस्यांवर उपाय शोधताना, थिंक टँक्सना सैद्धांतिक विचारांचे क्रियाशील शिफारसींमध्ये रूपांतर करावे लागते. थिंक टँक्स हे वेळप्रसंगी प्रतिक्रिया देणारे, संदर्भात उपयुक्त, आणि एकत्रित विचार करणारे असतात. ते प्रयोग करतात, टीका करतात, नवीन कल्पना मांडतात आणि वर्तमानाच्या पुढे जाऊन भविष्यातील शक्यता शोधतात. हे ज्ञाननिर्माते बहुविषयक चौकटीमध्ये काम करतात आणि ज्ञानसृष्टी व निर्णय प्रक्रियेतील दरी भरून काढण्याचे काम करतात. हे कार्य विद्यापीठे किंवा पारंपरिक संशोधन संस्था जे विषयप्रधान चौकटीत कार्य करतात, त्यांच्या कक्षेच्या बाहेर जाऊन घडते. अशा विभागीयतेमुळे जटिल समस्या सोडवण्याच्या प्रयत्नांत अडथळा निर्माण होतो.

    "कल्पकता" आणि विकसित भारत @2047

    भारताला लागणारी कल्पकता (ingenuity) ही केवळ तांत्रिक नसून बौद्धिक आणि संस्थात्मक आहे. अशा कल्पकतेची गरज भागवण्यासाठी अशा पिढीचे निर्माण आवश्यक आहे जी विचारवंत, संशोधक आणि धोरण-उद्योजक असतील - जे पारंपरिक विषयांच्या चौकटीपलीकडे जाऊन विचार करू शकतील. भारतातील थिंक टँक्स अनेकदा तरुण संशोधकांसाठी ‘फिनिशिंग स्कूल’ म्हणून काम करतात, अगदी डॉक्टरेट पदवीधरांसाठीही. कारण बहुतेक डॉक्टरेट अभ्यासक्रम भारतात असोत किंवा परदेशात त्यांच्या विद्यार्थ्यांना व्यवस्थात्मक दृष्टिकोनातून जटिल समस्यांवर उपाय  शोधण्याचे प्रशिक्षण देत नाहीत. तसेच, हे अभ्यासक्रम व्यावहारिक व कृतीशील उपाययोजना विकसित करणे, तसेच लोकप्रिय माध्यमांवर धोरणात्मक संकल्पना थोडक्यात मांडणे याचेही प्रशिक्षण देण्यात कमी पडतात. थिंक टँक्स सध्या 'कल्पकता' निर्माण करण्याच्या प्रक्रियेत क्षमतेचे विकासक म्हणून कार्यरत आहेत. त्यामुळे, NEP 2020 मधील मानवी भांडवल विकासाच्या दृष्टीने दिलेल्या दृष्टीकोनाच्या अंमलबजावणीत त्यांची भूमिका ओळखली जाणे अत्यावश्यक आहे. यासाठी पुढील तीन पावले उचलण्याची गरज आहे:

    भारतातील थिंक टँक्स अनेकदा तरुण संशोधकांसाठी ‘फिनिशिंग स्कूल’ म्हणून काम करतात, अगदी डॉक्टरेट पदवीधरांसाठीही. कारण बहुतेक डॉक्टरेट अभ्यासक्रम भारतात असोत किंवा परदेशात त्यांच्या विद्यार्थ्यांना व्यवस्थात्मक दृष्टिकोनातून जटिल समस्यांवर उपाय शोधण्याचे प्रशिक्षण देत नाहीत.

    प्रथम म्हणजे संस्थात्मक पायाभूत सुविधांमध्ये प्रणालीगत गुंतवणूक गरजेची आहे. विद्यापीठ व्यवस्थेच्या पलीकडे जाऊन एक अनुकूल संस्थात्मक अधिष्ठान निर्माण करण्यासाठी प्रणालीगत गुंतवणूक करणे आवश्यक आहे. नॅशनल रिसर्च फाउंडेशन (NRF) च्या उच्च दर्जाच्या संशोधनाला निधी देणे, विद्यापीठांमध्ये क्षमताविकास घडवणे आणि पुराव्यावर आधारित धोरणनिर्मितीला प्रोत्साहन देणे हे उद्दिष्ट यशस्वी करण्यासाठी थिंक टँक्सना सहकारी संस्थांप्रमाणे विचारात घेणे गरजेचे आहे.
    काही थिंक टँक्सनी आधीच तरुणांशी संलग्नतेची रचना करून ती संस्थात्मक स्वरूपात रूजवली आहे. उदाहरणार्थ:

    १. धोरण संशोधनाच्या (पॉलिसी रिसर्च) जगतात विद्यार्थ्यांना सहभागी करून घेणाऱ्या फेलोशिप आणि इंटर्नशिप 
    २. हवामान वित्त (क्लायमेट फायनान्स), नागरी नियोजन, आणि सामाजिक संरक्षण यांसारख्या विषयांवर आधारित प्रयोगशाळा (थीमॅटिक लॅब्स) व इनक्यूबेटर्स
    ३. डेटा प्लॅटफॉर्म्स आणि ज्ञानसंग्रहालये
    ४. शाळा आणि महाविद्यालयांशी सहकार्य, ज्याद्वारे तरुणांना सार्वजनिक धोरणाचा विचार करायला प्रवृत्त केले जाते
    यामुळे थिंक टँक्स शैक्षणिक संस्थांना प्रात्यक्षिक, बहुविषयक आणि धोरण-संदर्भित शिक्षण अनुभवाने पूरक ठरू शकतात.

    दुसरे, भविष्यात निर्माण होणाऱ्या विकासात्मक आव्हानांवर मात करण्यासाठी विचारशील नेतृत्वाकडे काही महत्त्वाची कौशल्ये आवश्यक आहेत:

    १. सिस्टम्स थिंकिंग (संस्थात्मक विचार) - परस्परसंबंध, फीडबॅक लूप्स आणि गुंतागुंतीचे कारण-परिणाम समजून घेण्यासाठी
    २. धोरण लेखन व संवाद कौशल्ये - जटिल तांत्रिक माहिती सामान्य वाचकांसाठी समजण्यास सुलभ भाषेत अनुवादित करण्यासाठी
    ३. प्रगत गुणात्मक आणि संख्यात्मक संशोधन कौशल्ये - समस्या स्पष्टपणे ओळखण्यासाठी आणि कृतीयोग्य उपाय तयार करण्यासाठी
    ४. नैतिक विचारशक्ती - स्वार्थ व सत्ता असमतोलांच्या दरम्यान संतुलन राखण्यासाठी
    ५. सहकार्यात्मक समस्या सोडवणे - शासन, विद्यापीठे, नागरी संस्था आणि खासगी क्षेत्र यांच्यासोबत काम करण्याची क्षमता

    या संदर्भात, थिंक टँक्स प्रशिक्षण मंच म्हणून उदयास येऊ शकतात आणि प्रत्यक्षात विद्यापीठांपेक्षा अधिक परिणामकारक ठरू शकतात, कारण ते धोरणनिर्मितीच्या जवळ असतात आणि बहुविषयक दृष्टिकोन वापरतात.

    तिसरे म्हणजे विचारशील तरुणांसाठी योग्य मानसिकतेचा विकास- थिंक टँक्सनी प्रेरित तरुणांमध्ये जिज्ञासा, धैर्य आणि बांधिलकी या गुणांचे संवर्धन करून भविष्यातील विचारसरणीची मानसिकता विकसित करावी. सार्वजनिक धोरण म्हणजे केवळ विश्लेषण नव्हे, तर मूल्ये आणि दृष्टीकोन देखील असतो. युवकांना यथास्थितीला प्रश्न विचारण्यास, नैतिक गोंधळ आणि सार्वजनिक विचार प्रक्रियेला सामोरे जाण्यास, टीका करण्यास आणि मनन करण्यास, तसेच अल्पकालीन दबावाच्या परिस्थितीत दीर्घकालीन विचार करण्यास प्रेरित करणे गरजेचे आहे. यामुळे असे विचारवंत निर्माण होतील, जे बौद्धिकदृष्ट्या सखोल आणि नैतिकदृष्ट्या ठाम असतील.

    तरुणाईच्या सहभागाचे संस्थात्मक रूप

    म्हणूनच, भारतीय थिंक टँक्सचे महत्त्व हे केवळ धोरणावर प्रभाव टाकण्यात नसून, भविष्यातील विचारसंपन्न मानवी भांडवल तयार करण्यातही आहे. यासाठी पुढील उपक्रम राबवणे उपयुक्त ठरेल:

    • राष्ट्रीय फेलोशिप्स - थिंक टँक्समध्ये धोरण संशोधनासाठी NRF किंवा देणगी संस्थांच्या माध्यमातून तरुणांसाठी फेलोशिप्स सुरू करणे

    • थिंक टँक - अकॅडेमिया कन्सोर्टियम– विद्यापीठे व थिंक टँक्समधील विद्यार्थ्यांचे व प्राध्यापकांचे परस्पर आदानप्रदान सुलभ करणे.

    • नॅशनल पॉलिसी इनोव्हेशन चॅलेंज - महाविद्यालय व विद्यापीठ विद्यार्थ्यांसाठी थिंक टँक्सच्या सहकार्याने धोरण म्हणजेच पॉलिसी प्रोटोटाइप्स तयार करण्याची स्पर्धा

    • पदव्युत्तर अभ्यासक्रमांत धोरण संशोधनाचा (पॉलिसी रिसर्च) समावेश करावा यामध्ये थिंक टँक प्रोफेशनल्सचे मार्गदर्शन मिळवावे

    • डिजिटल नॉलेज प्लॅटफॉर्म्स - जिथे धोरण शिक्षणासाठी केस स्टडीज, सिम्युलेशन्स आणि संवादात्मक साधने उपलब्ध असतील

    हे सर्व उपक्रम केवळ NEP 2020 शी सुसंगत नाहीत, तर संशोधनाधिष्ठित शिक्षणाला चालना देतात आणि NRF च्या अनुप्रयुक्त संशोधनासाठी संस्थात्मक क्षमता निर्माण करण्याच्या उद्दिष्टांना बळकट करतात.

    या परिवर्तनासाठी थिंक टँक्स हे केवळ देशाचे सल्लागार किंवा नवकल्पनांचे इनक्यूबेटर्स म्हणून नव्हे, तर पुढच्या पिढीच्या ज्ञाननिर्मात्यांचे मार्गदर्शक म्हणून, तसेच पुरावा, नैतिकता आणि नवोन्मेष यांचे समन्वय साधणारी संस्कृती घडवणारे म्हणून काम करू शकतात.

    पुढील 22 वर्षे

    या अपार शक्यतांनी भरलेल्या क्षणी, विकसित भारत@2047 ही भारताची महत्त्वाकांक्षा केवळ भौतिक पायाभूत सुविधांपुरती मर्यादित नसावी, तर ती बौद्धिक पायाभूत रचनेची उभारणी म्हणून समजली पाहिजे, जी भविष्यातील धोरणात्मक विचारांची जननी ठरेल. या परिवर्तनासाठी थिंक टँक्स हे केवळ देशाचे सल्लागार किंवा नवकल्पनांचे इनक्यूबेटर्स म्हणून नव्हे, तर पुढच्या पिढीच्या ज्ञाननिर्मात्यांचे मार्गदर्शक म्हणून, तसेच पुरावा, नैतिकता आणि नवोन्मेष यांचे समन्वय साधणारी संस्कृती घडवणारे म्हणून काम करू शकतात. कदाचित पुढील 22 वर्षांमध्ये थिंक टँक्सचे महत्त्व केवळ त्यांनी प्रकाशित केलेल्या धोरणपत्रांमुळे, माध्यमांमधील उपस्थितीमुळे किंवा त्यांनी सार्वजनिक क्षेत्रात आणलेल्या ‘कल्पकते’मुळे मोजले जाणार नाही, तर त्याऐवजी ते किती तरुण विचारवंतांना प्रेरणा देतात, घडवतात आणि सार्वजनिक धोरण संशोधनाच्या क्षेत्रात पुढे नेतात, यावरून मोजले जाईल.


    निलांजन घोष हे ऑब्झर्व्हर रिसर्च फाउंडेशन (ORF) मध्ये डेव्हलपमेंट स्टडीजचे व्हाइस प्रेसिडेंट आहेत.

    The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.