Author : Nilanjan Ghosh

Expert Speak Raisina Debates
Published on Jul 22, 2025 Updated 0 Hours ago

उदयोन्मुख आणि संक्रमणावस्थेतील अर्थव्यवस्थांमध्ये, थिंक टॅंक्स अधिकाधिक प्रमाणात 'सर्जनशीलतेची' बहुविषयक प्रयोगशाळा म्हणून कार्य करू लागले आहेत. ते जटिल आणि परस्पर जोडलेल्या विकासाच्या आव्हानांवर मात करण्यासाठी आवश्यक असलेल्या कल्पना, पुरावे आणि प्रणालीआधारित विचार पद्धती निर्माण करतात.

नवसंकल्पनांची प्रयोगशाळा: विकसनशील देशांतील थिंक टँक्सची भूमिका

Image Source: Getty

"थिंक टँक" ही संकल्पना आजही सहज समजणारी नाही, जरी ती सामाजिक-राजकीय-आर्थिक क्षेत्रात अस्तित्वात असली आणि धोरणात्मक क्षेत्रात वारंवार उल्लेख केला जात असला तरीही. भारतासारख्या उदयोन्मुख अर्थव्यवस्थेमध्ये, एखाद्या विशिष्ट प्रकारच्या संस्थेला परिभाषित करण्यासाठी 'थिंक टँक' या संज्ञेचा वापर गेल्या दोन दशकांमध्येच व्यापकपणे स्वीकारला गेला आहे. काही शासकीय निधी मिळवणाऱ्या संस्था (उदाहरणार्थ, भारतीय सामाजिक विज्ञान संशोधन परिषदेद्वारे वित्तपुरवठा केलेल्या संस्था) सामाजिक विज्ञानातील संशोधन संस्थांच्या रूपात ओळखल्या गेल्या, आणि त्यांपैकी काही संस्था विद्यापीठ प्रणालीशी जवळून संबंधित होत्या. तथापि, आधुनिक थिंक टँक हे विद्यापीठ नसून, पारंपरिक संशोधन संस्थांप्रमाणे केवळ शैक्षणिक प्रश्नांवर काम करणारी संस्था नाही. पारंपरिक संशोधन संस्था आणि विद्यापीठे प्रबंध (डॉक्टरेट) कार्यक्रम चालवतात, अशा प्रश्नांवर लक्ष केंद्रित करतात जे शैक्षणिकदृष्ट्या महत्त्वाचे असले तरी वास्तववादी आणि अंमलात आणता येण्याजोग्या धोरणनिर्मितीच्या दृष्टीने दुय्यम असू शकतात. त्या अनेकदा आपापसातच चर्चा करतात, चार भिंतींच्या 'आयव्हरी टॉवर' मध्ये राहतात, केवळ शैक्षणिक वर्तुळात वाचल्या जाणाऱ्या क्लिष्ट जर्नल्समध्ये लेख प्रकाशित करतात, आणि स्वतःला 'अर्धदेवता' समजतात – जे सर्वसामान्यांपेक्षा श्रेष्ठ आहेत कारण ते त्यांच्या स्वतः ठरवलेल्या 'सत्यांच्या' बौद्धिक शोधात गुंतलेले असतात.

नवीन युगातील थिंक टँक वेगाने कार्य करणारे असतात, जे सामाजिक, आर्थिक, राजकीय आणि पर्यावरणीय प्रणालींच्या सतत बदलणाऱ्या गरजांशी सुसंगत राहते आणि भविष्यासाठी कल्पना निर्माण करण्यासाठी वर्तमान क्षणाच्या पलीकडे विचार करते. या अर्थाने, थिंक टँक हे ज्ञाननिर्मिती, धोरण मध्यस्थी आणि कल्पनात्मक नवोपक्रम यांच्या संगमावर एक अनोखी बौद्धिक जागा व्यापते. अंमलबजावणीयोग्य धोरणात्मक ज्ञानाचे मध्यस्थी म्हणून कार्य करताना, आधुनिक थिंक टँकना विद्यापीठातील ज्ञान, राज्य यंत्रणा, जनमतनिर्माते आणि नागरी समाज यांच्यातील गुंतागुंतीचा मार्ग शोधावा लागतो. त्यामुळे आजच्या घडीला थिंक टँक हे अमूर्त सैद्धांतिक चौकटी आणि वास्तवातील निर्णय घेण्याच्या सूक्ष्म गरजांमधील दरी भरून काढतात, आणि बहुविषयक संशोधनाचे अंमलात आणता येणाऱ्या ज्ञानामध्ये रूपांतर करतात. हे करताना, ते केवळ माहिती पुरवणारे नसून, सुसंगततेचे निवडक रूप साकारतात, जे चर्चेला आकार देतात, रणनीतीसंबंधी निर्णयांसाठी माहिती पुरवतात, आणि अशा पर्यायांना स्पष्टपणे मांडतात जे अन्यथा अज्ञात राहिले असते.

म्हणूनच, थिंक टँक अशा संशोधन प्रश्नांवर लक्ष केंद्रित करते जे समाज, अर्थव्यवस्था आणि नैसर्गिक पर्यावरण यांच्या एकत्रीत वास्तवाशी जोडलेले असतात आणि हे प्रश्न गुंतागुंतीचे असतात. गुंतागुंतीच्या समस्यांना सहज उपाय नसतात जर असे उपाय असते, तर त्या समस्या गुंतागुंतीच्या राहिल्या नसत्या आणि त्या निर्देशांक व अपवर्तकाच्या चौकटीत निश्चित (आणि मर्यादित) उपायांसह रेखीय समीकरणांमध्ये मांडता आल्या असत्या. मात्र, वास्तवातील समस्या इतक्या सोप्या नसतात की त्यांना सुटसुटीत कार्यात्मक रूपात मांडता येईल. म्हणून, अवकाश व काळ यांमध्ये सतत खरे ठरणारे अंतिम उपाय शोधण्यापेक्षा समस्या समाधानाच्या नवकल्पनायुक्त पद्धती शोधणे अधिक महत्त्वाचे आहे. आणि हीच आधुनिक थिंक टँकसमोरील खरी आव्हाने आहेत!

विकास धोरणात्मक विचारधारा (Development Policy Thinking)

पुढे, एक स्वतंत्र धोरणात्मक-शैक्षणिक शिस्त म्हणून डेव्हलपमेंट स्टडीज (विकास अभ्यास) हे क्षेत्र मागील 50 वर्षांत लक्षणीयरीत्या विकसित झाले आहे. प्रारंभीच्या एकसूत्री विकास वाढ या विचारसरणीपासून सुरुवात होऊन, विकासविषयक विचारात (डेव्हलपमेंट थिंकिंग) हळूहळू वितरणात्मक न्याय (डिस्ट्रिब्यूटिव जस्टिस) आणि समानता यांसारख्या मुद्द्यांचा समावेश झाला आहे. आरोग्यसेवा, शिक्षण, संपत्तीतील असमतोल यांसारख्या विविध क्षेत्रांतील विषमता लक्षात घेऊन. यानंतर, ब्रुंटलँड आयोगाने मांडलेली शाश्वत विकास ही संकल्पना स्वीकारल्यावर या विचारसरणीला कालबद्ध संदर्भ मिळाला. तथापि, विकास प्रशासकीय व्यवस्थापनातील (डेव्हलपमेंट गव्हर्नन्स) आव्हानांचे अधिक समग्र स्वरूप 2015 मध्ये मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स (MDGs) च्या जागी आलेल्या सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स (SDGs) च्या 2030 अजेंडामधून समोर आले. SDGs ही स्वतःच्या रचनेतूनच विकास शासनाच्या (डेव्हलपमेंट गव्हर्नन्स) जटिलतेची कबुली देतात, जिथे समानता, कार्यक्षमता आणि शाश्वतता या परस्परविरोधी वाटणाऱ्या संकल्पनांमध्ये संतुलन साधण्याचा प्रयत्न आहे. या सर्व गोष्टी मोहन मुनसिंघे यांच्या सस्टेनोमिक्स (Sustainomics) या चौकटीत मांडलेल्या दृष्टिकोनानुसार स्पष्ट केल्या गेल्या आहेत.

जरी SDGs ही उद्दिष्टे जागतिक असली, तरी विकसनशील देशांसाठी ती साध्य करणे प्रगत देशांच्या तुलनेत अधिक कठीण आहे. या आव्हानाचे मुख्य कारण म्हणजे वित्तपुरवठा, धोरणनिर्मिती, व्यवस्थापन आणि अंमलबजावणी यामधील “विचार” किंवा “सर्जनशीलतेची” कमतरता. त्यामुळेच तरुण लोकशाही राष्ट्रे आणि संक्रमणावस्थेतील अर्थव्यवस्थांसाठी थिंक टँक्सचे महत्त्व अधिक ठळक होते.

सर्जनशीलतेची दरी

‘सर्जनशीलतेची दरी (Ingenuity Gap) ही संज्ञा राजकीय शास्त्रज्ञ थॉमस होमर-डिक्सन यांनी मांडली असून, ती जटिल समस्यांवर उपाय शोधण्यासाठी आवश्यक असलेल्या नाविन्यपूर्ण कल्पनांच्या वाढत्या मागणी आणि प्रत्यक्ष उपलब्धतेतील तफावत दर्शवते. पुढे, होमर-डिक्सन यांनी “सर्जनशीलता” हे व्यापक स्तरावर उत्पादनाचा एक घटक म्हणून मांडले असून, विकसित आणि कमी विकसित अर्थव्यवस्थांमधील विकासातील दरी ही सर्जनशीलतेच्या उत्पादनातील फरकामुळे निर्माण झाल्याचे स्पष्ट केले आहे. आधुनिक समाज विविध परस्पर जोडलेल्या आव्हानांना सामोरे जात आहेत जसे की पर्यावरणीय प्रश्न, आर्थिक अस्थिरता, आणि सामाजिक विषमता. या समस्यांचे स्वरूप जागतिक तापमानवाढ आणि हवामान बदल यामुळे अधिक गुंतागुंतीचे बनले आहे. या नव्या समस्यांतील घट्ट गुंतागुंत ही तांत्रिक आणि सामाजिक अशा दोन्ही प्रकारच्या सर्जनशीलतेची मागणी करते. या समस्यांचे आणि त्यावरच्या कल्पनांचे तीन सामान्य विशेष लक्षणे आहेत: a) वास्तविक समस्यांचे निराकरण विद्यमान विचारसरणीने किंवा एका शाखेच्या दृष्टिकोनातून होऊ शकत नाही, b) कल्पना किंवा “सर्जनशीलता” ही सध्याच्या किंवा भविष्यातील वास्तवात अंमलात आणता येण्यासारखी असावी, c) जर ती कल्पना भविष्यासाठी असेल, तर तिच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक परिस्थिती स्पष्ट करावी लागते आणि तिची उपयुक्तता टिकवण्यासाठी सार्वजनिक क्षेत्रात सतत चर्चा होणे गरजेचे असते.

बहुविषयक थिंक टँक्सची भूमिका (The Role of Multidisciplinary Think Tanks)

बहुविषयक म्हणजेच मल्टीडिसिप्लिनरी थिंक टँक्स विकासाच्या समस्या एकत्रित आणि सखोल दृष्टिकोनातून सोडवण्यासाठी ‘सर्जनशीलता’ निर्माण करण्यासाठी योग्य स्थानावर असतात. ते डेटा उपलब्ध करून देऊन, पर्यायी विश्लेषणे सादर करून आणि सार्वजनिक विचारसरणीत विविधता वाढवून धोरण क्षेत्राचा व्यास वाढवतात. पूर्वी असं समजलं जायचं की आर्थिक संशोधन संस्था काही महत्वाच्या विकासात्मक समस्यांवर सर्वोत्तम उपाय देऊ शकतात. मात्र, आज विकास शासन अधिकाधिक जटिल, बहुविविध आणि सह-निर्मितीच्या आवश्यकतेने व्यापलेले आहे. हवामान बदल, ऊर्जा संक्रमण, अन्नसुरक्षा आणि सामाजिक संरक्षण यांसारख्या विकासात्मक आव्हानांची विविधता बहु-हितधारक दृष्टिकोन आणि बहुविषयक पध्दतींची गरज निर्माण करते. महत्त्वाचे म्हणजे, या समस्या एकमेकांशी जोडलेल्या असतात - उदाहरणार्थ, भौगोलिक-राजकीय आणि आर्थिक धक्क्यांचा पुरवठा साखळ्या, विकास सहाय्याचा प्रवाह, महागाई, गरिबी आणि भूक यावर परिणाम होतो, ज्यामुळे खरेदी शक्ती कमी होते आणि मानवकल्याणावर परिणाम होतो. या गुंतागुंतीच्या समस्यांसाठी क्षेत्रीय मर्यादांपलीकडील एकत्रित प्रणाली-आधारित विचारसरणी आवश्यक आहे, जी विद्यापीठातील स्वतंत्र शैक्षणिक विभाग किंवा विशेष आर्थिक संशोधन संस्थांमध्ये शक्य नाही. बहुविषयक थिंक टँक्स या गरजेची पूर्तता ‘विचारांची प्रयोगशाळा’ म्हणून करतात. ते विविध क्षेत्रांत संवाद साधतात, प्रणालीगत संबंध समजून घेतात आणि पुरावे, प्रणाली विचारसरणी व संस्थात्मक वास्तववादावर आधारित धोरणाचे पर्याय मांडतात.

महत्त्वाचे म्हणजे, अशा बहुविषयक थिंक टँक्सचा विश्लेषणात्मक शस्त्रागार केवळ लक्षणीय धोरणात्मक उपायांपुरताच मर्यादित नसतो. एकत्रित प्रणालीवादी दृष्टिकोनामुळे थिंक टँक्स "खेळाच्या नियमांची" चौकशी करू शकतात म्हणजेच, विकासात्मक परिणामांवर प्रभाव टाकणाऱ्या गोष्टी म्हणजेच प्रोत्साहन रचनेची आणि सत्तेची विषमता यांची तपासणी करू शकतात. हा प्रणालीकेंद्रित दृष्टिकोन मजबूत धोरण संवादाला तात्पुरत्या सल्लागार कामापेक्षा वेगळा ठरवतो.

असे करताना, थिंक टँक्स विकास शासनाच्या चर्चेला आकार देण्यात नैतिक भूमिका बजावतात. लिंग समता, हवामान अनुकूलन वित्त (क्लायमेट अडॅप्शन फायनान्स), मानवकल्याणामध्ये इकोसिस्टम सर्विसेस यांची भूमिका किंवा पिढ्यांमधील न्याय (इंटरजनरेशनल जस्टिस) यांसारख्या कमी प्रतिनिधित्व असलेल्या मुद्यांना अधोरेखित करून, ते “विकास” या संकल्पनेची व्याप्ती वाढवतात आणि धोरणात्मक प्राधान्ये पुन्हा मांडतात. संशोधनातील निष्कर्ष म्हणजेच रिसर्च आउटपुट, सार्वजनिक मंच आणि सल्लागार कार्यशाळांद्वारे, ते अशा चर्चात्मक बदलांसाठी मार्गदर्शन करतात जे अनेकदा संस्थात्मक बदलांपूर्वी घडतात.

अस्थिर किंवा संक्रमणात्मक लोकशाहीमध्ये, जिथे राष्ट्राची क्षमता कमी विकसित असू शकते आणि धोरणनिर्मिती अस्पष्ट किंवा वगळणारी असते, तिथे थिंक टँक्स अनेकदा औपचारिक धोरण नियोजन संस्थांची जागा घेतात. ते कठोरपणा, सातत्य आणि संस्थात्मक स्मृती घेऊन येतात, ज्यामुळे धोरण चर्चा अल्पकालीन राजकीय फायद्याऐवजी दीर्घकालीन विकास उद्दिष्टांवर आधारित राहते. उदाहरणार्थ, फक्त प्रणालीकेंद्रित दृष्टिकोनाद्वारेच समजून घेता येते की (उदाहरणार्थ, भारतातील पश्चिम बंगालमधील फरक्का बॅरज) कश्याप्रकारे वाहून येणारा गाळ थांबवू शकतो आणि डेल्टा परिसंस्था (इथे भारतीय सुंदरबन डेल्टा) कशी कमी करू शकतो. थिंक टँक्स विश्वासार्ह डेटा तयार करून, परिस्थितींचे मॉडेलिंग करून आणि खर्च-फायदे यांचे आराखडे सुचवून अशा पुराव्यांवर आधारित धोरणनिर्मितीला प्रोत्साहन देतात - अशा साधनांमुळे निर्णय प्रक्रियेला लोकप्रियतेचा दबाव आणि मनमानीपासून संरक्षण मिळते.

तसेच, जागतिक विकास सहकार्याच्या क्षेत्रात थिंक टँक्स सॉफ्ट पॉवर आणि धोरणात्मक नेतृत्वासाठी मोठा वाटा उचलतात. हे G20 आणि BRICS सारख्या जागतिक मंचांवर दिसून येते, जिथे थिंक टँक सहभाग गट विकास अजेंड्याला आकार देण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात, विशेषतः ग्लोबल साउथकडून संदर्भानुसार उपयुक्त माहिती देतात. ग्लोबल साउथमधील संस्था विशेषतः भारत, इंडोनेशिया, ब्राझील आणि दक्षिण आफ्रिका सारख्या देशांतील आत्तापर्यंत जागतिक मंचांवर आर्थिक राजनय, शाश्वत संक्रमण आणि विकास वित्तासाठी पर्यायी चौकटी पुरवून नैतिक सत्ताधारी म्हणून आपली भूमिका मांडत आहेत.

हे लक्षात ठेवले पाहिजे की थिंक टँकला आपले अस्तित्व सामाजिक-राजकीय-आर्थिक-पर्यावरणीय संदर्भात फक्त सत्तेशी जवळीक यांच्या आधारे नव्हे तर त्यांच्या कामाच्या कठोरपणाने आणि सार्वजनिक चर्चेत आणलेल्या नैतिक मार्गदर्शक तत्त्वांवर आधारित न्यायसंगत करावे लागते. त्याची विश्वासार्हता त्याच्या विश्लेषणात्मक वस्तुनिष्ठतेवर अवलंबून असते, जरी तो राजकीय संस्थांशी संवाद साधत असला तरी. म्हणून, विकास चर्चा अधिकाधिक वादग्रस्त आणि बहुआयामी होत असताना, विशेषतः भारतासारख्या उदयोन्मुख अर्थव्यवस्थेत, थिंक टँक्सची जटिलतेचे अर्थ लावणारे आणि “सर्जनशीलतेचे” उगमस्थान म्हणून भूमिका धोरणनिर्मिती प्रक्रियेत अधिक ठळक होणार आहे.


निलांजन घोष हे ऑब्सर्व्हर रिसर्च फाउंडेशनमध्ये डेव्हलपमेंट स्टडीजचे व्हाइस प्रेसिडेंट आहेत. 

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.