-
CENTRES
Progammes & Centres
Location
भारतामध्ये पारंपरिक ज्ञानाचे फायदे आणि ते आधुनिक, वैज्ञानिक ज्ञानासोबत एकत्र करून शाश्वत शेतीला चालना कशी देता येईल, याबाबत वाढती जाणीव निर्माण होत आहे. त्याचप्रमाणे, मुंबई खाडीसंदर्भातील कोळी समाजाचे पारंपरिक नैसर्गिक ज्ञान शहर नियोजन प्रक्रियेस महत्त्वपूर्ण योगदान देऊ शकते. हे नियोजन नैसर्गिक आपत्तींपासून मुंबई शहराला वारंवार भेडसावणारे धोके कमी करण्याच्या उद्देशाने असावे.
Image Source: Sarang Naik
मुंबई आणि गुजरातपासून गोव्यापर्यंत पसरलेल्या भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरील तीन मूळ आदिवासी समुदायांपैकी कोळी हा एक प्रमुख समुदाय आहे. हा लेख विशेषतः मुंबईत राहणाऱ्या कोळ्यांवर लक्ष केंद्रित करतो. मुंबईतील किनारपट्टीवरील कोळी हा प्रामुख्याने मासेमारी करणारे समुदाय आहे, पण अनेक कोळी आतील भागात राहतात आणि अंतर्गत जलाशयांमधून मासेमारी करण्यासोबत शेतीही करतात. कोळ्यांचे सुमारे 24 उपगट आहेत: त्यापैकी सात उपगट अनुसूचित जमाती म्हणून अधिकृतपणे मान्यताप्राप्त आहेत आणि त्यांना आरक्षणाच्या लाभासाठी पात्रता आहे, तर उर्वरित उपगटांना विशेष मागास वर्ग म्हणून वर्गीकृत करण्यात आले आहे.
ग्रेटर मुंबईमध्ये सुमारे 27 दशलक्ष लोक राहतात, यापैकी सुमारे निम्मे लोक मुंबई शहरात राहतात. त्यामध्ये फारच थोड्या संख्येने कोळी समुदायाचे लोक सुमारे 39 कोळीवाड्यांमध्ये (कोळी गावे) राहतात. कोळी समूहाची एकूण संख्या किंवा कोळीवाड्यांची नेमकी माहिती उपलब्ध नाही. या लेखाच्या लेखकांनी विविध स्रोत आणि कोळी समूहाच्या माहितीदारांनी दिलेल्या माहितीवर आधारित सुमारे 39 कोळीवाड्यांची गणना केली आहे. अधिकृत अंदाज शोधणे कठीण आहे: सर्वात विश्वासार्ह स्रोत म्हणजे गुप्ते (2012) आणि मुंबई ट्रान्सफॉर्मेशन सपोर्ट युनिट. गुप्ते यांनी 2012 मध्ये 37 कोळीवाड्यांचे नकाशांकन केले (चित्र १), तर ट्रान्सफॉर्मेशन युनिटने नमूद केले की फक्त 24 कोळीवाड्यांसाठी लोकसंख्येचे अंदाज उपलब्ध होते, ज्यांची एकूण लोकसंख्या सुमारे 42,000 होती. 2012 नंतर अधिक माहिती उपलब्ध झालेली नाही, मात्र लेखकांना अनेक कोळी माहितीदारांनी सांगितले आहे की अजूनही अनेक कोळीवाडे ओळखले गेलेले नाहीत, विशेषतः मुलुंड-ठाणे परिसरात.
चित्र 1: मुंबईतील 37 कोळीवाड्यांचा नकाशा
स्रोत: मुंबई ट्रान्सफॉर्मेशन सपोर्ट युनिट 20152, गुप्ते 2012:543 चा संदर्भ देत आणि महाराष्ट्र मच्छीमार कृती समिती (MMKS) च्या डेटाचा वापर करत. \[नोंद: मुंबई ट्रान्सफॉर्मेशन सपोर्ट युनिटच्या अहवालातील परिशिष्ट 2 मध्ये नमूद केले आहे की MMKS चा डेटा बृहन्मुंबई महानगरपालिका (24 कोळीवाडे) आणि केंद्रीय समुद्र मत्स्य संशोधन संस्था (32 कोळीवाडे) यांनी दिलेल्या संख्येपेक्षा वेगळा आहे.]
ज्यांच्या नोंदी उपलब्ध आहेत अशा कोळीवाड्यांच्याही सीमा, भौगोलिक आकार, लोकसंख्या आणि वैशिष्ट्ये अस्पष्ट आहेत. ही माहितीची कमतरता दर्शवते की कोळी समाजाविषयी – त्यांच्या उपजीविकेबद्दल किंवा एकूणच कल्याणाबद्दल – शहरातील सरकारी अधिकारी, धोरणकर्ते, नागरी नियोजक आणि सामान्य जनता यांना फारसा रस नाही. ही उपेक्षा कदाचित “विकास” म्हणजे काय याविषयी असलेल्या एकसंध मानसिकतेचे प्रतीक आहे – जणू भारताच्या आर्थिक राजधानीला शांघायप्रमाणे पोलादी काँक्रीटने झळाळून निघायला हवे.
मात्र, मुंबईची खरी परिस्थिती यापासून खूप वेगळी आहे – हे एक असे शहर आहे जिथे कोट्यवधी लोक शाश्वत उपजीविकेसाठी धडपड करत आहेत, आणि ‘नागरी’ जीवनशैलीची पारंपरिक संकल्पनाही गाठू शकलेले नाहीत. मुंबईतील सुमारे 42 टक्के रहिवासी झोपडपट्ट्यांमध्ये राहतात. या आकड्यात कोळीवाड्यांचा समावेश नाही, कारण त्यांना झोपडपट्ट्या म्हणून वर्गीकृत करण्यात आलेले नाही. तरीही, कोळी समुदायालाही शहर नियोजन आणि प्रशासनाच्या उपेक्षेमुळे तशाच अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यांची उपजीविका धोक्यात आली आहे आणि त्यांना आजही अनेक प्रकारच्या सामाजिक भेदभावाचा सामना करावा लागतो. कोविड-19 महामारीच्या काळात ही उपेक्षा अधिक तीव्र झाली. अन्नधान्य मदत आणि इतर गरजा मुंबईतील कोळीवाड्यांपर्यंत फारशा पोहोचल्या नाहीत, आणि पोलिस बंदोबस्तामुळे मासे पकडणे व विकणे कठीण झाले. वरळी कोळीवाडा शहरातील पहिला ‘कंटेनमेंट झोन’ घोषित झाल्यानंतर, कोळी व इतर अल्पसंख्यांक समुदायांना 'व्हायरस वाहक' म्हणून हेरले गेले. परिणामी, ‘सामाजिक अंतर राखणे’ या सार्वजनिक आरोग्य उपायांनी कोळ्यांविरोधातील भेदभाव अधिकच वाढवला.
आता प्रश्न असा आहे की, इतक्या समस्यांच्या पार्श्वभूमीवर – विशेषतः कोळी लोक आणि झोपडपट्टीवासीयांच्या कल्याणाशी संबंधित – मुंबई सामाजिक सलोखा कसा टिकवून ठेवू शकते? आणि हे शहर कशा प्रकारे वाढेल, जेणेकरून सध्या इथे राहणाऱ्यांचे आणि भविष्यात येणाऱ्यांचे जीवनमान व सुरक्षितता सुधारू शकेल?
या लेखाच्या लेखकांनी गेल्या 15 वर्षांत केलेल्या संशोधनातून काही महत्त्वपूर्ण निरीक्षणे समोर आली आहेत, जी पुढील मुद्द्यांमध्ये मांडण्यात आली आहेत:
• कोळी अजूनही पारंपरिक हस्तकौशल्यावर आधारित मच्छीमारी करत असल्याने, त्यांच्यासाठी सर्वात गंभीर समस्या या दोन आधारस्तंभांवर आधारित विकासाच्या संकल्पनेतून निर्माण झाल्या आहेत – ‘कॉंक्रीट’ आणि ‘औद्योगिकीकरण’, विशेषतः समुद्राचे औद्योगिकीकरण. हवामान बदल ही एक गरजेची बाब आहे, परंतु ती एकटी पुरेशी नाही.
• वर उल्लेख केलेल्या ‘कॉंक्रीट’चा संदर्भ ब्रिटिश काळातील आणि नंतरच्या विकास प्रक्रियेचा आहे, ज्यामध्ये मूळ सात बेटांपासून तयार झालेल्या मुंबईचे रूपांतर एका कठीण, न झिरपणाऱ्या भूमीमध्ये करण्यात आले. माथूर आणि डा कुन्हा (2009) यांनी स्पष्ट केले आहे की मुंबई ही एक खाडी आहे, ज्याचे स्वरूप नागरीकरणामुळे बदलले गेले आहे, आणि त्यामुळे पावसाळ्यात आवश्यक असलेल्या पाण्याच्या वाहनात अडथळा निर्माण होतो. परिणामी, वारंवार विनाशकारी पूर येऊ लागले आहेत. आधुनिक, वैज्ञानिक पाणी व्यवस्थापन प्रणाली या समस्येचे प्रमाण हाताळू शकत नाही. तरीदेखील केंद्र, राज्य आणि स्थानिक सरकारे किनारपट्टीवरील रस्ते, ट्रान्स-हार्बर महामार्ग, पूल आणि विशेष निर्यात प्रक्रिया क्षेत्रे (स्पेशल एक्सपोर्ट प्रोसेसिंग झोन SEZ) बांधताना सतत कॉंक्रीटचा वापर करत आहेत. मुंबईच्या नाजूक किनाऱ्यावर असलेल्या या पायाभूत प्रकल्पांमुळे समुद्राची नैसर्गिक भरती-ओहोटी आणि जलप्रवाहांना अधिक अडथळे आले आहेत. विशेषतः मुलुंड-कोपरी भागातील दलदलीच्या नाजूक परिसंस्थेवर उभारण्यात येणाऱ्या एका SEZ प्रकल्पामध्ये भरती रोखण्यासाठी बंधारे बांधले गेले. या प्रकल्पाला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले कारण या दलदलीचा ऐतिहासिक वापर स्थानिक पुरांपासून नैसर्गिक संरक्षण म्हणून केला जात होता. परिणामी, मुंबई उच्च न्यायालयाने या प्रकल्पावर ‘स्टे ऑर्डर’ दिला आणि प्रकल्प थांबवण्यात आला.
‘समुद्राचे औद्योगिकीकरण’ म्हणजे असे भव्य प्रकल्प जे मुंबईच्या सागरी परिसंस्थेवर प्रतिकूल परिणाम करतात. उदाहरणादाखल, उरण येथील जवाहरलाल नेहरू पोर्टचा विस्तारलेला चौथा कंटेनर टर्मिनल आणि तेल व नैसर्गिक वायू महामंडळ (ONGC) कडून समुद्रातील हायड्रोकार्बन्सच्या नवीन शोध मोहिमा यांचा उल्लेख करता येईल. ONGC कडून करण्यात आलेल्या सिस्मिक सर्व्हेनी शहराच्या सागरी जीवनाला हानी पोहोचवली आहे — आणि कदाचित हे व्यावसायिक ट्रॉलरपेक्षा अधिक हानीकारक ठरले आहेत. ट्रॉलर मुळे कोळ्यांच्या उपजीविकेवर आणि सागरी स्रोतांवर विपरीत परिणाम झाला आहे. शहर नियोजन करणाऱ्यांनी कोळी समाजाकडून काही धडे घ्यावेत, जे दर्यादेवाची पूजा करतात – असा समुद्र देव जो पूर्वी उदारतेने भरघोस मासेमारीसाठी आशीर्वाद देत असे. आजही कोळी पारंपरिक गिलनेट पद्धतीचा वापर करून मासेमारी करतात, जी ट्रॉलर आणि पर्स साईन पेक्षा खूपच कमी विनाशकारी आहे. उदाहरणार्थ, कफ परेड कोळीवाड्यातील 275 बोटींमध्ये केवळ 6 टक्के ट्रॉलर किंवा पर्स साईन आहेत, तर उर्वरित 94 टक्के बोटी गिलनेट वापरतात. हे दर्शवते की कोळींच्या धार्मिक मूल्यांचा थेट संबंध शाश्वत मासेमारी उद्योग निर्माण करण्याच्या गरजेशी आणि सागरी पर्यावरणाचा सन्मान करण्याशी आहे.
• कोळींच्या पारंपरिक ज्ञानाच्या अनेक बाबी — ज्या आजच्या गरजांनुसार स्वतःला अनुकूल करत गेल्या आहेत — त्या मुंबईच्या नैसर्गिक पर्यावरणाच्या अधिक प्रभावी व्यवस्थापनासाठी उपयुक्त ठरू शकतात. मासेमारी करताना कोळी लोक शाश्वतता (sustainability) आणि उत्पादनवाढ यांचा समतोल साधण्याचा प्रयत्न करतात, कारण त्यांना त्यांच्या उपजीविकेच्या गरजांप्रमाणेच त्यांना आधार देणाऱ्या पर्यावरणाचीही काळजी आहे.
1. मुंबई महानगर परिसराला परिभाषित करणाऱ्या किनाऱ्यालगत, खाड्यांमध्ये, नद्यांमध्ये आणि खाडीमुखांमध्ये कोळी अनेक शतकांपासून मासेमारी करत आहेत. हि मासेमारी मुख्यत्वे समुद्री जीवांच्या हंगामी हालचाली आणि भरती-ओहोटीच्या भागांतील पाण्याच्या प्रवाहाचे निरीक्षण करून केली जाते. त्यामुळे कोळी हे सागरी जैवविविधता, दलदलीचे भाग आणि मॅन्ग्रोव्हचे (खारफुटी) महत्व पटवून देणारे नैसर्गिक समर्थक आहेत. हे क्षेत्र केवळ समुद्री प्रजातींच्या प्रजननासाठीच नाही तर जास्त भरतीच्या लाटा आणि पावसाळ्यातील पुरापासून संरक्षण करणारे बळकट नैसर्गिक कवचसुद्धा आहेत.
2. कोळ्यांचे पारंपरिक ज्ञानामध्ये हंगामी हवामान व वाऱ्याच्या दिशा यांचे सखोल आकलन समाविष्ट आहे. हे ज्ञान GPS तंत्रज्ञानासोबत वापरल्यास नैसर्गिक आपत्ती (चित्र 2) व इतर पर्यावरणीय समस्यांबाबत लवकर इशारा मिळू शकतो.
चित्र 2. कोळ्यांचे वाऱ्याच्या दिशेबाबतचे आकलन
स्रोत: लेखकांचा स्वतःचा
3. कोळ्यांचा दरियादेव या समुद्र देवतेबद्दलचा आदर सणांदरम्यान नारळ व समुद्री अन्नाची आहुती देऊन व्यक्त केला जातो. ही जैवविघटनशील सामग्री इतर सण आयोजकांना त्यांच्या देवतांच्या मूर्ती व धार्मिक विधींमध्ये कंपोस्ट म्हणजेच विघटन होणारी सामग्री वापरण्यास प्रेरणा देऊ शकते.
2017 मधील नारळी पौर्णिमा उत्सवातील दृश्य. भक्तांचे छायाचित्र बांद्रा वरळी सीलिंकच्या समोर दिसते, ज्याचा कोळी समाजाच्या मच्छीमारी व्यवसायावर नकारात्मक परिणाम झाला आहे.
4. पारंपरिकपणे मासेमारीसाठी वापरली जाणारी कोळी गिलनेट जाळी वर्सोवा कोळीवाड्यात प्लास्टिक व इतर कचऱ्याने दूषित पाणी समुद्रात वाहून जाण्यापूर्वी गाळण्यासाठी वापरण्यात आली आहे. अशीच जलशुद्धीकरण पद्धत ठाणे खाडी परिसरात वापरल्यास, खाडीचा श्वास रोखणारा कचरा दूर करून ठाण्याचे पाणी स्वच्छ करता येईल.
ठाणे खाडीच्या वरच्या भागातील प्रदूषण. फ्लेमिंगो अभयारण्याच्या जवळील भागात ओहोटीच्या वेळी ह्या प्लास्टिकच्या पिशव्या आणि बाटल्या दिसून आल्या.
मुंबईचे विस्तारलेले पण अधिक व्यवस्थित नियोजन तयार करताना कोळी समाजाला त्यामध्ये सहभागी होण्यासाठी आमंत्रित करावे. अशा समावेशामुळे कोळी समाजाची कौशल्ये आणि त्यांचे अनुभव उपयोगी व स्पर्धात्मक ठरणाऱ्या नवीन नोकऱ्या निर्माण होऊ शकतात. यासाठी एक संभाव्य आदर्श म्हणजे ऑस्ट्रेलियातील काकाडू नॅशनल पार्कमध्ये आदिवासी लोकांच्या रोजगाराचे उदाहरण. त्या उद्यानातील सुमारे एक तृतीयांश रेंजर्स हे आदिवासी ऑस्ट्रेलियन आहेत, आणि ते पार्क्स ऑस्ट्रेलिया आणि आदिवासी समुदाय यांच्या संयुक्त व्यवस्थापनाखाली चालवले जाते.
भारतामध्ये पारंपरिक ज्ञानाचे फायदे आणि ते आधुनिक, वैज्ञानिक ज्ञानासोबत एकत्र करून शाश्वत शेतीला चालना कशी देता येईल, याबाबत वाढती जाणीव निर्माण होत आहे. त्याचप्रमाणे, मुंबई खाडीसंदर्भातील कोळी समाजाचे पारंपरिक नैसर्गिक ज्ञान शहर नियोजन प्रक्रियेस महत्त्वपूर्ण योगदान देऊ शकते. हे नियोजन नैसर्गिक आपत्तींपासून मुंबई शहराला वारंवार भेडसावणारे धोके कमी करण्याच्या उद्देशाने असावे.
मारिका विचियानी (Ph.D., SOAS, यूनिव्हर्सिटी ऑफ लंडन) ह्या एमेरिटा, मोनॅश एशिया इन्स्टिट्यूट, मोनॅश युनिव्हर्सिटी, मेलबर्न, ऑस्ट्रेलिया येथे प्रोफेसर आहेत.
अनुषा केसरकर-गव्हाणकर (Ph.D., IITB-Monash Research Academy, मुंबई) या ऑब्झर्व्हर रिसर्च फाउंडेशन, मुंबई येथील सीनियर फेलो आहेत.
The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.