Expert Speak Raisina Debates
Published on Jan 02, 2026 Updated 15 Hours ago

भारतासाठी 2025 मधील एक महत्त्वाचा धडा असा आहे की ड्रोनच्या वापरामधील इनोव्हेशन जेव्हा क्षेपणास्त्रांच्या वापराशी एकत्रित केले जातात, तेव्हा युद्धातील अंदाज व्यक्त करण्याची क्षमताच (प्रेडिक्टेबिलिटी) नष्ट होईल.

2025: ड्रोन, क्षेपणास्त्रे आणि बदलती भारतीय रणनिती

    2025 या वर्षात युद्धपद्धतींमध्ये लक्षणीय बदल आणि जुळवून घेण्याची प्रक्रिया दिसून आली. संघर्ष सुरू असताना युद्धरत राष्ट्रांनी आपल्या डावपेचांमध्ये आणि तंत्रज्ञानात सातत्याने सुधारणा केल्या. या काळात काही महत्त्वाचे प्रवाह स्पष्ट झाले. पहिले, ड्रोन एक असममित क्षमता म्हणून उदयास आले, ज्यामुळे जलद आणि निर्णायक पराभव टाळता आला. मात्र, ड्रोन एकटे पुरेसे ठरत नाहीत आणि मोठे नुकसान घडवून आणण्याची त्यांची क्षमता मर्यादित आहे, त्यामुळे त्यांच्या वापराच्या पद्धतीत बदल होत आहेत. दुसरे, भूदल (ग्राऊंड फोर्स) अजूनही अत्यंत महत्त्वाचे आहे, कारण त्यांच्याशिवाय भूभागावरील नियंत्रण आणि मिळवलेले लाभ टिकवून ठेवता येत नाहीत. तिसरे, मानवरहित नव्हे तर मानवी वैमानिक असलेली हवाई शक्ती युद्धाचे पारडे फिरवण्यासाठी निर्णायक ठरते, परंतु मजबूत आणि खोलवर रुजलेल्या भूदलांविरुद्ध केवळ हवाई शक्तीच्या जोरावर भूभाग जिंकणे शक्य होत नाही. शेवटी, नौदल शक्तीही सातत्याने विकसित होत राहणार असून, जगातील बहुतांश प्रमुख नौदलांमध्ये मानवरहित पाणबुडी वाहने (अनमॅन्ड अंडरवॉटर वेहिकल्स – UUVs) महत्त्वाची भूमिका बजावतील.

    मानवरहित हवाई वाहने (अनमॅन्ड एरियल वेहिकल्स – UAVs) रशिया आणि युक्रेनमधील सुरू असलेल्या युद्धात महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. मात्र, 2022–23 च्या टप्प्यात जितका प्रभाव त्यांचा दिसून आला होता, तितका प्रभाव सध्या दिसत नाही. हवाई ड्रोनच्या बाबतीतही, त्यांची भूमिका प्रामुख्याने गुप्तचर माहिती संकलन, टेहळणी आणि निरीक्षण (Intelligence, Reconnaissance and Surveillance – ISR) तसेच मर्यादित हल्ल्यांपुरतीच राहिली आहे. त्यांनी आक्रमक भूदलांची पुढे सरकण्याची गती कमी केली, त्यांना रोखले, किंवा शत्रूच्या हवाई संरक्षण आणि रडार स्थापनेला निष्प्रभ केले. याच वर्षी मे महिन्यात झालेल्या भारत-पाकिस्तान चकमकीतही ड्रोनने महत्त्वाची भूमिका बजावली, ज्यात पाकिस्तानी रडार आणि हवाई संरक्षण प्रणाली निष्क्रिय करण्यात आल्या. जून महिन्यात झालेल्या इस्रायल-इराण संघर्षातही हेच चित्र दिसून आले.

    रशिया–युक्रेन युद्धाच्या काळात ड्रोन तांत्रिकदृष्ट्याही विकसित झाले. रशियाने जेट इंजिन असलेले ‘शाहेद’ ड्रोन विकसित केले, ज्यामुळे हे UAVs प्रोपेलरवर चालणाऱ्या ड्रोनपेक्षा अधिक वेगाने उडू शकतात. ड्रोनमुळे दोन्ही बाजूंना युद्धभूमीवर मोठ्या प्रमाणात अचानक हल्ला करण्याची संधी मिळू शकलेली नाही, विशेषतः युक्रेनच्या सपाट आणि कमी वनस्पती असलेल्या भूभागात जलद घुसखोरी रोखण्यात ते प्रभावी ठरले. यातून भारतासाठी चीनविरोधात डेपसांग मैदानात तसेच पाकिस्तानविरोधात पंजाब आणि राजस्थानमधील सपाट सीमावर्ती भागात महत्त्वाचा धडा मिळतो. याशिवाय, ड्रोन, बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे आणि क्रूझ क्षेपणास्त्रांचा संयुक्त वापर करून आक्रमक कारवाया करणे शत्रूला परिस्थितीशी जुळवून घेण्यापासून रोखण्यासाठी अत्यावश्यक ठरते. या प्रकारचा हल्ला रशियाने प्रभावीपणे करून दाखवला आहे.

    मात्र, ड्रोन एकटेच युद्ध जिंकू शकत नाहीत, लढाया तर दूरच. युद्ध जिंकण्यासाठी भूदल म्हणजेच ग्राऊंड फोर्स अत्यावश्यक आहे. याच वर्षी एप्रिलमध्ये कुर्स्क प्रदेशातून युक्रेनी सैन्याला हुसकावून लावण्यात रशियन भूदलाला यश आले, यामागे उत्तर कोरियाच्या मदतीने उभारलेली रशियन भूदलशक्ती कारणीभूत ठरली आणि युक्रेनी सैन्याला माघार घ्यावी लागली. लांब पल्ल्याच्या अचूक हल्ला करणाऱ्या शस्त्रप्रणाली पायदळ, ओढून म्हणजेच टो (tow) करून चालणारे आणि स्वयंचलित तोफखाने तसेच रणगाडे यांची बरोबरी करू शकत नाहीत. युक्रेनला HIMARS (हाय मोबिलिटी आर्टिलरी रॉकेट सिस्टम) मिळूनही हे स्पष्ट झाले आहे की लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रे नेहमीच भूदलांना थेट पाठबळ देण्यासाठी उपयुक्त ठरत नाहीत. ही प्रणाली प्रामुख्याने शत्रूच्या रेषांच्या मागील बाजूला असलेल्या स्थिर लक्ष्यांवर हल्ल्यासाठी अधिक योग्य आहे. त्यामुळे भु युद्धाच्या परिस्थितीत पारंपरिक तोफखान्याचे महत्त्व आजही तितकेच कायम राहणार आहे.

    मानवी वैमानिक असलेली हवाई शक्ती (एअर पॉवर) येत्या काळातही महत्त्वाची राहणार आहे. UAVsच्या तुलनेत मानवी वैमानिक असलेली विमाने मोठ्या प्रमाणावर आणि अचूक मारा करण्याची क्षमता निर्माण करू शकतात, ज्याची UAVs सोबत बरोबरी करणे कठीण आहे. हे ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारतीय हवाई दलाने, इराणविरोधातील इस्रायली हवाई हल्ल्यांतून, तसेच जून महिन्यात इराणच्या अणुस्थळांवर करण्यात आलेल्या अमेरिकी हवाई दलाच्या हल्ल्यांतून स्पष्टपणे दिसून आले. भविष्यात UAVs मध्येही मानवी लढाऊ विमानांइतकी घातक मारक क्षमता विकसित होऊ शकते, मात्र सध्याच्या परिस्थितीत भारताने मानवरहित आणि मानवी, अशा दोन्ही प्रकारच्या हवाई लढाऊ क्षमतांचा संतुलित मेळ उभारण्याची आवश्यकता आहे.

    भारतासाठी 2025 मधील एक महत्त्वाची शिकवण अशी आहे की ड्रोनच्या वापरामधील इनोव्हेशन, जेव्हा क्षेपणास्त्रांच्या वापराशी एकत्रित केले जातात, तेव्हा युद्धातील अंदाज व्यक्त करण्याची क्षमताच (प्रेडिक्टेबिलिटी) नष्ट होते. यामुळे शत्रूची परिस्थितीशी जुळवून घेण्याची, प्रतिसाद विकसित करण्याची आणि जलद सावरण्याची क्षमता मर्यादित होते. लष्करी क्षमता भौगोलिक गरजांनुसार सुसंगत आणि अनुरूप केल्या जाणे आवश्यक आहे. मानवरहित क्षमतांमध्ये होत असलेल्या सुधारणांच्या पार्श्वभूमीवर तोफखाना, पायदळ आणि रणगाड्यांनाही प्रतिमानवरहित (काउंटर-अनमॅन्ड) क्षमतांचा विकास करून स्वतःला जुळवून घ्यावे लागेल. आजच्या युद्धभूमीवर लष्करी कार्यक्षमता आणि प्रभावीपणा टिकवून ठेवण्यासाठी सातत्याने तांत्रिक नवकल्पना (टेक्निकल इनोव्हेशन) विकसित करणे आणि डावपेची (टॅक्टिकल) तसेच धोरणात्मक पातळीवरील जुळवून घेणे अत्यंत महत्त्वाचे ठरते.


    हा लेख मूळतः हिंदुस्तान टाईम्समध्ये प्रसिद्ध झाला आहे.

    The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.

    Authors

    Harsh V. Pant

    Harsh V. Pant

    Professor Harsh V. Pant is Vice President - ORF and Studies at Observer Research Foundation, New Delhi. He is a Professor of International Relations with ...

    Read More +
    Kartik Bommakanti

    Kartik Bommakanti

    Kartik is a Senior Fellow with the Strategic Studies Programme. He is currently working on issues related to land warfare and armies, especially the India ...

    Read More +